साता समुद्रा पलीकडून देखील येत राहतो

आजकाल आजोबा जात नाहीत बाहेर 
खिडकीतून बघत बसतात आभाळ 
बाहेर कडक उन्ह पडलेलं 
तरी सर्वत्र असतो साठलेला बर्फ अंगणात 
छतावर शुभ्र पीठ सांडावं तसा 
नि खिडकीवर लोंबत असतो 
विक्रमादित्याने पाठीवर घेतलेल्या म्हाताऱ्या सारखा
पोरं जातात कामावर 
त्यांच्या त्यांच्या वेळेला 
प्रत्येकाची गाडी असते दिमतीला 
बाहेर पडताना जशी चप्पल असते पायाला
आजोबा नाही जात चुकून बाहेर 
जरी त्याना आग्रह केला पोराने तरीही 
बसून असतात कॉम्प्युटरवर आपल्याच देशातील पेपर वाचीत 
बघत कधी नाटक ... कधी सिनेमा ....
आजोबाना मधूनच दिसू लागते त्यांचे गाव 
गावातली नदी 
त्या हिरव्या मिरच्या , हिरवी भाजी 
ती गर्दी ,तो गोंधळ 
कोंडून जाते त्यांचे मन 
गुदमरून जातो श्वास 
मग लावून बसतात जुने सिनेमे 
नि बघत बसतात ती नदी ते डोंगर 
रानातल्या पायवाटा
पहाटे जाग येते तरी पडून असतात 
किती वाजले कळत नसते 
पाखरांचा किलबिलाट ऐकू येत नाही 
नाही कोंबड्याची बांग
आजोबा हरवून जातात आपल्यातच 
आठवीत बसतात आपले गाव 
ती गर्दी तो गोंधळ
त्या टपऱ्या , ते स्टोल्स , ते किणकिणनारे आवाज 
साता समुद्रा पलीकडून देखील येत राहतो त्यांना त्या भज्यांचा वास 
विलक्षण हरवून जातात त्या नादात ,त्या गंधात .....
प्रकाश