वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग ८

भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५ , भाग ६, भाग ७

वर्ल्ड वॉर टू मेमोरियल पाहून झाल्यावर आम्ही या पलीकडे असलेल्या प्रसिद्ध लिंकन मेमोरियलच्या दिशेने चालू लागलो. 
हा स्क्रीनशॉट गुगल मॅप्सवरुन साभार
 इथे मधोमध एक आयताकृती आकाराचे तळे आहे. ज्यात नुकत्याच वसंत ऋतूच्या आगमनामुळे काही बदकांच्या जोड्या विहरत होत्या.           आम्ही रमत गमत इकडे तिकडे पाहत बरेच फोटो काढले. काही लोक भाड्याच्या सायकली घेऊन पर्यटन स्थळे पाहत होती. लिंकन मेमोरियलच्या जवळ पोहोचल्यावर मात्र आम्ही एका ठिकाणी पोटपूजा करण्यासाठी बसलो. इथे एक धिटुकली खार आमच्या मागे पुढे करू लागली होती. तिला आशा होती आम्ही तिला काहीतरी खायला देऊ. मात्र वन्य जीवांना आपले खाणे देऊ नये असे म्हणतात. त्यामुळे इच्छा असूनही तिला काही खायला दिले नाही. निराश होवून तिने दुसरीकडे मोर्चा वळवला :-(. मग मात्र आम्ही लिंकन मेमोरियल आतून पाहण्यासाठी चालू लागलो.        मेमोरियल लोकांसाठी खुले झाल्या नंतरच्या वर्षी म्हणजे १९२३ साली काढलेला हा फोटो जालावरून साभार.लिंकन मेमोरियलच्या समोरच्या तळ्यात काही मंडळी आईस स्केटिंग करत आहेत. १९२२ सालचा हा फोटो जालावरून साभार.हे मेमोरियल अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या स्मरणार्थ बांधले आहे. तसे पाहिले तर अमेरिकेच्या इतिहासातील अनेक गणमान्य नेत्यांच्या स्मारकास विरोध झाला अगदी तसेच लिंकन यांच्या स्मारकास देखिल झाला.कारण की नियोजित जागा काहीशी दलदलीची आणि तिथवर पोहोचायला कठीण मानली जात होती. मात्र काँग्रेसने ३००,००० डॉलर मंजूर केले मार्च १९१४ साली बांधकामाला सुरुवात झाली. बांधकामात काही बदल करूनही हे मेमोरियल वेळेत म्हणजे १९२२ सालच्या मे महिन्यात पूर्ण झाले. या प्रसंगी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वॉरेन हार्डींग आणि लिंकन यांचे एकमेव जीवित पुत्र रॉबर्ट टॉड लिंकन हे उपस्थित होते.                मेमोरियलची प्रस्तावित जागा. वरील फोटो विकीवरून साभार.मेमोरियलच्या बाह्य स्वरूपाबद्दल बोलायचे झाले तर ते ग्रीक मंदिरासारखे बांधले आहे. यासाठी कोलोरॅडो येथे मिळणारे युल मार्बल वापरले आहे. ग्रीक मंदिरासारखे बांधल्यामुळे अतिशय भव्य असे खांब तीन बाजूंनी बघायला मिळतात. हे खांब सुमारे ४४ फूट इतक्या उंचीचे आहेत. खांबांवरच्या कमानींवर लिंकन यांच्या मृत्यू समयी अमेरिकेत समाविष्ट असणाऱ्या  ३६ राज्यांची नावे कोरली आहेत.Photoप्रमुख शिल्पकार डॅनियल चेस्टर फ्रेंच याच्या हाता खाली Piccirilli Brothers यांनी निर्माण केलेली लिंकन यांची मूर्ती १९ फूट उंच आहे.ही मूर्ती घडवायला सुमारे ४ वर्ष लागली. जॉर्जिया येथे मिळणार्‍या संगमरवरा पासून ही मूर्ती घडवली गेली आहे. त्यांची ही मूर्ती टेनेसी मार्बलवर विराजमान आहे. या मूर्ती बद्दल अनेक प्रवाद आहेत. त्यात काहींचे मत असे आहे की ही मूर्ती साइन लँग्वेजचा वापर करत आहे. जसे की त्यांचे डावा हात 'A' आणि उजवा हात 'L' ही त्यांच्या नावाची आद्याक्षरे संबोधत आहे.कुणी असेही म्हणत की लिंकन यांची नजर यूएस कॅपिटॉल वर रोखली आहे.ही मूर्ती पाहताच अब्राहम लिंकन यांची करारी मुद्रा लगेच नजरेत भरते.  मूर्तीचे निरीक्षण करत राहिल्याने आतल्या भागांचे फारसे फोटो काढायचे राहूनच गेले. मेमोरियलच्या दोन्ही बाजूंच्या व मागच्या बाजूनेही उपलब्ध असणार्‍या पोर्चमधून आपण फिरू शकतो. मागच्या बाजूने दिसणारा हा  पोटोमॅक नदीवरचा पूल अन पलीकडे आर्लिंग्टन नॅशनल सेमेटरी.       तसेच समोरच्या पायर्‍यांवरुन दिसणारा वर्ल्ड वॉर टू मेमोरियलचा काही भाग, वॉशिंग्टन मॉन्युमेंट व लांबवरचे युएस कॅपिटॉल.      
ही ऐतिहासिक वास्तू अमेरिकेतल्या एका क्रांतिकारी आंदोलनाची साक्षीदार आहे. २८ ऑगस्ट १९६३ रोजी सिव्हिल राइट्स चळवळीतल्या मार्च ऑन वॉशिंग्टन फॉर जॉब्स अ‍ॅन्ड फ्रीडमदरम्यान मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांनी त्यांचे ऐतिहासिक आय हॅव अ ड्रीम भाषण लिंकन मेमोरियलच्या पायर्‍यांवरुनच केले. योगायोगाने हे लेखन यंदाच्या मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर डेच्या अगोदरच्या दिवशी प्रकाशित होत आहे.     
हे दोन्ही फोटोज जालावरून साभार
      लहान असताना लिंकन यांचे शाळेच्या हेडमास्तरांना लिहिलेले ते प्रसिद्ध पत्र वाचले होते. तसेच २०१२ साली आलेला 'दुवा क्र. १' सिनेमा पाहून प्रभावित झालो होतोच. त्यामुळे या महान व्यक्तीचे मेमोरियल पाहायचे भाग्य लाभले याबद्दल निश्चितच आनंद वाटला.वरील फोटो जालावरून साभार. 
या फोटोचे वैशिष्ट्य असे की लिंकन मेमोरियल सूर्योदय समयी पाहिले असता लिंकन यांचे शिल्प रविकिरणांनी नाहून अतिशय तेजस्वी दिसते.ही सहल झाल्यानंतर जालावर वाचायला मिळालेला एक गमतीशीर किस्सा म्हणजे या मेमोरिअलमध्ये असलेली स्पेलिंग मिस्टेक.  लिंकन यांच्या दुसऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधीचे भाषण भिंतीवर कोरलेले आहे. FUTURE शब्द कोरताना कारागिराने चुकून EUTURE असे कोरले. नंतर दुरुस्ती करण्यात आली असली तरी चूक सहजपणे लक्षात येते.      
माहितीचा स्रोत: विकी
क्रमशः