मतलबी

जेव्हा गरम हवेची तृष्णा
घाम पीतच राहते
हवेची एक झुळुक
अंगठा दाखवून निघून जाते...
जेव्हा धरेच्या शीतलतेला
चरचरीत ऊन आग लावते
तरंगत्या ढगाचा तुकडा
डोळे मिचकावत निघून जातो...
जेव्हा जगण्याच्या लालसेला
गरीबी शोषतच राहते
एखादा सहानुभूतीचा शब्द
टवाळ होऊन सतावत राहतो...
हलाखीनं झाला माणूस
आंधळा बगळा धवल
जिथे चोच घातली
नुसता चिखलच चिखल...
जगण्याचा प्रवास दीर्घ सायास
सावली मिळालीच तर क्षणभर
दुर्लभ जन्माची अशी मजा
मिळाली चाखायला न मागता...
त्रिविध तापांनी पोळलेल्या अन्‌
जरेनं गांजलेल्या म्हातार्‍यांना
सारा अर्थ गवसलेला असतो!
म्हणतात, खरं एकच की-
कल्पिला भगवंत तेव्हढा भला आहे...
कदाचित्‌ त्यांचा अनुभव असेल
दुनियेतल्या निष्ठुर दात्यांना
हांजी हांजीच आवडत असते!
आणि त्यांना भले म्हणून जर
कष्ट आपले कमी होत असतील
तर दात्याच्या खुशीतच
घेत्यावर खुषीचा वर्षाव आहे!!
मतलबी...