शाप-उःशापाची साखळी नि दैववादी स्वनाश

[टेनिसनच्या 'द लेडी ऑफ शॅलट'च्या निमित्ताने]
मिथक म्हणावे असा एक भेवडावणारा किल्ला. नदीकाठी. आकाशाला भोके पाडणाऱ्या टोकदार बुरुजांचा. एका उत्तुंग डोंगरावर आपले बस्तान बसवून असलेला.
काही अंतरावर नदीत एक बेट. त्या बेटावरही उंच टोकेरी तटबंदीचा एक राजवाडा. तीच बंदीशाळाही. त्या भव्य राजवाड्यातून बाहेरही पाहता येत नसेल तर ती बंदीशाळाच.
त्या बंदीशाळेत ती. खिडकीतून बाहेर पाहत येणार नाही असा तिला शाप. त्यावर उःशाप म्हणजे एक जादूचा आरसा. त्या आरशातून तिला बाहेरच्या जगातल्या प्रतिमा बघता येतील. त्या प्रतिमा वापरून एक जादूचे जाळे विणणे हा तिचा उद्योग, विरंगुळा आणि भागधेय.
एकदा आक्रित घडते. बाहेर एक उंच, देखणा स्वप्नातला राजकुमार गाण्याच्या लकेरी मारीत घोडा फेकत चाललेला आहे. त्या गाण्याच्या ओळींनी भान हरपून ती तीन पावलांतच खिडकी गाठते नि डोळे भरून त्याला पाहते.
शापाच्या प्रभावाने जादूचे जाळे खिडकीतून बाहेर उडून नाहीसे होते नि आरसा तडकून फुटतो. अंत जवळ आला याची तिला जाणीव होते.
अंत आपल्यापाशी येण्याआधी आपणच त्याला गाठावे म्हणून ती एका होडीवर स्वतःचे नाव कोरते नि त्यात बसून गूढगाणे गात प्रवासाला निघते. भेवडावणाऱ्या किल्ल्याकडे.
किल्ल्यातले लोक कुतूहलाने, आश्चर्याने नि भीतीने ते गूढगाणे ऐकत होडीकडे पाहतात. स्वप्नातला राजकुमारही तिचे फिकट सौंदर्य न्याहाळून बघतो आणि देव तिच्या आत्म्याला सद्गती देवो अशी करुणा भाकतो.
कला आणि जीवन. कलात्मक सर्जनासाठी एकटेपण गरजेचे असते का? ते एकटेपण घट्ट असण्यासाठी ते शापातून आलेले असावे का? एकटेपणातून कलानिर्मीती होण्याऐवजी भकास वैफल्य येऊ नये म्हणून उःशापाची योजना असते का? कुठल्याही कलानिर्मीतीला अंतबिंदू असावाच लागतो. तो अंतबिंदू कोण ठरवतो? कलाकाराला तो अंतबिंदू ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्या शापाला बळी पडावेच लागते का? प्रश्न नि प्रश्न.