पश्चातबुद्धी

तीन पेग झाले.
बघता बघता झाले.
बोलायची पद्धत हो.
नाहीतर,
कोण किती पितो हे बघण्यात,
कुणाला रस?
चौथा भरला.
स्वतःलाच रागेही भरलो.
दिवसाला दीड पेग,
तब्येतीला चांगला,
असे डॉक्टर म्हण(ता)त.
दिवसाचा नि रात्रीचा मिळून तीन ढोसले तरी,
बेट्या अजून हवेच?
बेवडो सालो!
असो.
चौथा न सांडता भरला.
कृपा जगन्नियंत्याची.
आणि/वा माझ्या डोळ्यांच्या डॉक्टरची.
वृत्तपत्र वाचायला घेतले.
कालचे होते.
पण म्हटले,
काय फरक पडतो?
बातमीचे शीर्षक फाकडू.
'Lingayats bat for his continuation as CM amid unease in Yediyurappa camp'
आवशीचो घो!
अरे मला विचारल्याशिवाय,
त्या येडियुरप्पाला (बाळ ठाकरेंच्या भाषेत 'येडा अप्पा'),
कुणी मुख्यमंत्रीपदावरून काढायला बघतेय की काय?
मला विचारल्याशिवाय,
त्याला एवढ्यात परत मुख्यमंत्री केला.
तेव्हा मी म्हटले,
होते चूक कधीकधी.
पण,
विचारल्याशिवाय नेमायचे,
आणि विचारल्याशिवायच काढायचे,
हा अपमान.
घोर अपमान.
खरे तर,
एवढा राग मला,
त्या येडा अप्पाला आत्ता परत मुख्यमंत्री केला,
तेव्हाच आलेला.
लक्ष्मण सावदी,
हा माझा क्यांडिडेट.
पोर्नोग्राफीला बॉलिवूडमध्ये सनी लिओनेने,
म्हणजे, सनी लिओने ने (उगाच नेने मंडळींचे पित्त खवळायला नको),
मानाची जागा मिळवून दिली.
पण लक्ष्मण सावदीने,
थेट विधानसौधातच,
मोबाईलसारख्या लेटेस्ट तंत्राचा वापर करून,
नीट जागेवर बसून,
वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर,
क्रांतीच करून टाकली.
हा येडा अप्पा तेव्हा,
बहुधा च्यवनप्राश खात बसला असावा.
पण झाले असे,
की तेव्हा नेमकी आदल्या रात्री कोपऱ्यावरच्या कलालाने,
मला नकली रम दिलेली.
दुसऱ्या दिवशी,
ठणकणारे डोके,
नकली रमने,
की येडा अप्पाने,
हे कळेनासे झाले.
मुकाट्याने झिनटॅक गिळली,
जेल्युसिल चोखली,
आणि गप्प बसलो.
पण आता हे फारच झाले.
अरे विचारल्याशिवाय नेमता,
आणि विचारल्याशिवायच त्याचा बाबा भोसले करता?
मग उमगल्या दोन गोष्टी.
पहिली म्हणजे,
इतिहासाची पुनरावृत्ती होते.
ती पक्ष वगैरे पाहत नाही.
दुसरी म्हणजे,
कलालाने भडव्याने,
आज नकली व्हिस्की दिली बहुधा.