जातिसंस्था एक वास्तव

   "जातिआधारित विवाहसंस्थेची बरखास्ती" या लोक्सत्ता १४ नोवेंबर १९ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखात श्री मधु कांबळे यांनी जातिनिर्मूलनासाठी जातिबाह्य विवाह हाच जालिम उपाय आहे असे प्रतिपादन केले आहे. पण आरक्षणास धक्का लावणे हा पर्याय नाही असेही त्याचबरोबर प्रतिपादिले आहे.
         आंतरजातीय विवाहानंतर होंणाऱ्या अपत्याची जात कोणती असणार किंवा त्याना यातिविहीन असे संबोधणार का याविषयी काही खुलासा केला असता तर बरे झाले असते.त्यानी जात लावायची नाही असे ठरवले तरी शासकीय पद्धतीने त्या व्यक्तीची माहिती जातीशिवाय पूर्ण होतच नाही शिवाय जातीचा फायदा मिळण्यासाठी जातीची नोंद आवश्यकच आहे उलट या मिश्र विवाहाने जातिव्यवस्था अधिकच बळकट होईल असे मला वाटते.याविषयी माझ्या परिचयाचे उदाहरण श्री.कांबळे यांच्या माहितीसाठी देतो (त्याना हवे असल्यास त्यासंबंधी नावनिशीवार माहितीही मी देऊ शकेन).माझ्या परिचयाच्या ब्राह्मण तरुणाने मागास जातीतील तरुणीशी प्रेमविवाह केला.त्याच्या मुलाच्या प्रवेशाच्यावेळी आईच्या जातीचा फायदा त्या मुलाला घेता आला.अर्थात त्या मुलाचा आता कायमचा समावेश आईच्या जातीत झाला.येथे जातिआधारित फायद्याची शक्यता नसती तर जातिव्यवस्था आणखीच दृढमूल होण्याचा हा प्रकार घडला नसता.जनगणनेला जातींचा आधार ही पण जातिव्यवस्था अधिकच दृढमूल करते.मतांच्या राजकारणाकरिता जातिव्यवस्था कोणतेही शासन आले तरी त्याना हवी असते हे ही जातिव्यवस्था टिकण्याचे आणखी एक  कारण .जातिव्यवस्थेचे आर्थिक व सामाजिक फायदे नष्ट केले तरच जात न लावणे बंधनकारक करता येईल आणि मगच जातीविषयी कोणासच ममत्व रहाणार नाही.जातिबाह्य विवाहानंतर जात रहाणारच नाही अशी व्यवस्था श्री,कांबळे याना अभिप्रेत असेल तरीही जोपर्यंत जात कागदोपत्री लावणे आवश्यक असेल तोवर ती मनातून कशी हद्दपार करता येईल ? 
           जातिसंस्था हे भारतीय सामाजिक वास्तव आहे व जो समाज बलिष्ठ त्याच्या मर्जीप्रमाणे ते झुकणार त्यामुळे मुस्लीम राज्यकर्त्यांची हिन्दु मातेपासून झालेली अपत्ये मुस्लीम ठरून (उदा:जहांगीर) गादीची वारस ठरणार तर हिंदू राज्यकर्त्यांची मुस्लीम स्त्रीपासून झालेली संतती मात्र मुस्लीम ठरून राज्यकर्ता होण्याच्या लाभापासून वंचित होणार (उदा: बाजीराव पेशव्यांचा पुत्र समशेर ) जातिसंस्थेच्या संदर्भात ही दोन उदाहरणे  अप्रस्तुत वाटतील पण या दोन उदाहरणातून प्रकट होणारी प्रवृत्तीच जाति निर्मूलनाच्या आड येत असते.कारण जातिभेदाइतकेच धार्मिक भेदही सध्या समाजात दऱ्या उत्पन्न करणारे बनत चालले आहेत.