पूर्तता

पूर्तता आहे खरी की फक्त आहे सांगता...
ही तुझी आहे व्यथा की व्यर्थ केवळ आर्तता?
मांडतो आहे कधीचा मी हिशेबी आकडे
दूरवर आहे जरी येथे कधीची शून्यता...
शब्द का यावेत ओठी या क्षणी तू सांग ना
आज वाचूया पुनः डोळ्यांतली ही मुग्धता
शोधतो आहे मला माझ्या मनी मी सारखा
का तुला समजेल माझी ही फुकाची व्यग्रता?
गोवले आहे स्वतःला भोवऱ्यांच्या आत अन्
वाटते की जाणतो मी जीवनाची भव्यता...
- कुमार जावडेकर