सुखाच्या वराती

दुरुनीच बघणे उरे फक्त हाती

समोरून गेल्या सुखाच्या वराती

किती धूळ बसली इथे काळजावर

 किती गाडली आत गेलीत नाती 
कधी त्रिभुवनी मुक्त संचार होता

अता कोपऱ्या-कोपऱ्यावर जकाती

विनाशर्त प्रीती विनाअट जिव्हाळा

कधीच्याच ह्या नष्ट झाल्यात जमाती
  
म्हणा धर्मशाळाच माझ्या घराला

न थांबे कुणी फक्त येती न जाती

रित्या ना भले राहिल्या ओंजळी पण
अपेक्षात आम्हीच केल्या कपाती

....

 (जयन्ता५२)