निर्वस्तू आणि क्रियाशून्यता (२)

आपण निर्वस्तू आहोत हा उलगडा न होण्यामागे जे एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे, आपल्याला क्रियाशून्यता मान्य नाही किंवा आपल्याला स्वतःचं ते  वैशिष्ट्य समजलेलं नाही. हा उलगडा न होण्यानं कर्मयोगावर व्यर्थ आणि दिशाभूल करणारा उहापोह झाला आहे.

क्रियाशून्यता म्हणजे शारीरिक निष्क्रियता नाही किंवा कर्मापासून मुक्तीचा ध्यास नाही. तद्वत, क्रियाशून्यता म्हणजे फलाकांक्षारहित किंवा ईश्वर समर्पित कर्मही नाही.  तर आपण निश्चल आहोत आणि कर्म केवळ दैहिक आणि मानसिक पातळीवर घडतंय ही जाणीव. खरं तर ही जाणीवच कोणतंही काम स्वच्छंद करते पण प्रचलित कर्मयोगात केवळ कर्माबद्दल चर्चा आहे त्यामुळे क्रियाशून्यत्वाचा बोध होण्याऐवजी, जनमानसात कर्माबद्दल अनास्था निर्माण होण्यापलीकडे काहीही झालेलं नाही.

क्रियाशून्यता हा निर्वस्तूचा (किंवा आपला) स्वभाव आहे. ज्याप्रमाणे शांतता मुळातच आहे आणि तीच कोणत्याही ध्वनीचा स्रोत आहे, शांततेशिवाय ध्वनी निर्माण होणं असंभव आहे तद्वत क्रियाशून्यस्थितीच सर्व क्रियांचा आधार आहे.  ध्वनी निर्मिती मग ती शब्द असो की स्वर, शिकावी लागते पण शांतता शिकता येत नाही, ती आहेच. तो आपला स्वभाव आहे, देहाचा जन्म शांतता घेऊनच झाला आहे. आपण आणि शांतता असं द्वैत नाही, तर आपणच शांतता आहोत. तद्वत क्रियाशून्यता हा  आपला स्वभाव आहे.  

ज्याप्रमाणे शांतता साधता येणार  नाही, तिचं फक्त आकलन होऊ शकेल, त्याचप्रमाणे  क्रियाशून्यता साधता येत नाही तिचं फक्त आकलन होऊ शकेल. कोणत्याही भाषेतला कोणताही मंत्र, श्लोक किंवा शब्द शांततेप्रत नेऊ शकत नाही कारण उच्चारणाचा स्रोतच शांतता आहे, ती अनिर्मित आहे;  व्यक्तातून अव्यक्ताचा उलगडा अशक्य आहे.  अगदी त्याचप्रमाणे जगातल्या कोणत्याही क्रियेतून अथवा साधनेनं क्रियाशून्यतेचा उलगडा असंभव आहे कारण क्रियाशून्यता म्हणजे खुद्द आपणच आहोत.  क्रिया ही दैहिक किंवा मानसिक आहे; ती सुरू होण्यापूर्वी, चालू असताना आणि संपल्यावर सुद्धा आपण (म्हणजे क्रियाशून्यता) आहेच आणि ती अपरिवर्तनीय आहे. थोडक्यात, कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक क्रियेनं आपल्यात काहीही बदल घडत नाही, त्यामुळे कर्मयोग, कर्मफल, कर्मलेप या  सर्व कल्पना व्यर्थ आहेत. 

कोणत्याही कर्माचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही त्यामुळे कर्माच्या यशापयशाचा आपल्या क्रियाशून्य स्थितीशी काहीएक संबंध नाही. क्रियाशून्य स्थितीच्या आकलनामुळे कर्म वैकल्पिक होतं आणि ते वैकल्पिक असेल तरच आनंदाचं असू शकतं.  जे काम न करण्याचा विकल्पच नाही ते काम कधीही आनंद देऊ शकणार नाही.

क्रियाशून्यता ही अपरिवर्तनीय स्थिती आहे आणि ती हरेक कर्म अंतर्बाह्य व्यापून आहे. अगदी पृथ्वी सुद्धा या क्रियाशून्यतेतच फिरते आहे आणि ती क्रियाशून्यताच पृथ्वीला अंतर्बाह्य व्यापून आहे. खरं तर ती क्रियाशून्यताच सर्व चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहे आणि तीच सर्व अस्तित्वाचा आधार आहे.

या वस्तुस्थितीत, आपण आणि क्रियाशून्यता वेगळे असू शकत नाही, किंबहुना आपणच ती क्रियाशून्यता आहोत.

या क्रियाशून्य स्थितीचा किंवा आपल्या या गुणवैशिष्ट्याचा केवळ उलगडा होऊ शकतो. हा उलगडा इंद्रीयगामी नाही कारण जाणीव इंद्रीयातून उन्मुख होणं ही क्रिया आहे आणि त्या क्रियेतून आपण क्षणोक्षणी व्यक्ताचा वेध घेत असतो.  जगण्यासाठी जाणीव इंद्रीयातून उन्मुख होण्यापरता इलाज नाही पण क्रियाशून्य स्थितीचा उलगडा होण्यासाठी जाणीव स्त्रोताशीच स्थिरं व्हायला हवी. थोडक्यात, जाणण्याची क्षमता हा आपला स्वभाव असल्यानं, अनुन्मुख जाणीवच (जीला नेणीव म्हणतात), आपल्याला क्रियाशून्यतेचा उलगडा घडवू शकते. 

हा श्लोक तुम्हाला क्रियाशून्यतेचा उलगडा घडवू शकेल. त्यावर मनन आणि चिंतन करत जाणं हा स्वरूपाचा उलगडा होण्याचं एक सोपं रहस्य आहे.

नेणीवेचे सुख भोगता,जाणीवा आल्या स्रोताशी I

ऐसी अपूर्व मुक्तता, न बदले रमून संगाशी |