स्वप्न आभाळां पडलं
पृथ्वी कवेमध्ये आली
रात भोगून भोगून
दिवसाला चढे लाली
फळाफुलांचे दागिने
साज धरतीने केला
ऐसा श्रुंगार सोहळा
कुणी कधी न पाहिला
मुख चंद्राचे पाहता
येई सागरां उधाण
लाटालाटांतून वाहे
धुंद प्रणय तुफान
गार शिशिरात लाभे
गगनाची गोड मिठी
मनी वसंत फुलता
धाव घेई प्रेमासाठी
ओल्या मातीचे उटणे
वसुंधरेच्या शरीरी
नार सुस्नात होऊनी
समर्पणाची तयारी