कोंबडीचे तुकडे धुऊन त्याला आले-लसूण वाटण, हळद आणि थोडे मीठ लावून पाच तास ठेवावे.
बिनहाडी कोंबडी 'झोराबियन' या ब्रॅंडची चांगली मिळते. पुण्यात 'फाईन फूड्स'च्या दुकानांत मिळते. एक 'फाईन फूड्स' औंधच्या गायकवाड पेट्रोल पंपाशेजारी आहे.
मेथी जुडी धुऊन, पाने निवडून बारीक चिरावीत.
ढबू मिरची धुऊन, देठ काढून बारीक चिरावी.
कढईत (शक्यतो नॉन-स्टिक) तेल तापवून ते धुरावल्यावर त्यात ज्योत बारीक न करता चिरलेली ढबू मिरची टाकावी.
मिरचीचे पाणी सुटायला लागल्यावर त्यात मुरवलेली कोंबडी घालावी. सर्व नीट हलवून घ्यावे. ज्योत बारीक करून झाकण ठेवावे आणि एक वाफ आणावी (पाच ते आठ मिनिटे).
त्यात बारीक चिरलेली मेथी घालून हलवावे. मीठ (गरजेप्रमाणे) घालावे. झाकण ठेवून कोंबडी पूर्ण शिजवून घ्यावी. पंधरा ते वीस मिनिटांत शिजावी.
त्यात अमूल फ्रेश क्रीम (प्रमाण आवडीनुसार २५ ते १०० ग्रॅम) घालून सारखे करावे आणि मंद आचेवर दोन-तीन मिनिटे ठेवून ज्योत बंद करावी.
(१) यात गरम मसाला नाही, मिरची नाही. ढबू मिरचीचा असेल तो तिखटपणा, आले-लसूण-मेथी यांची असेल ती चव आणि क्रीमचा गोडसरपणा.
(२) याला रस्सा नाही. अंगासरसाही नाही. त्यामुळे पोळी/भाकरी/ब्रेड या वर्गातील पदार्थाबरोबरच वाढता येईल.
(३) प्रयोगच करायचा असेल तर हातसडीच्या इंद्रायणी तांदुळाचा मऊसर भात करून त्यात हे घालून सारखे करावे. 'रिसोटो'वर्गीय प्रकार होऊ शकेल.
स्वप्रयोग
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.