भीमसेन जोशींची जन्मशताब्दी

भीमसेन जोशींची जन्मशताब्दी नुकतीच झाली. जन्म फेब्रुआरी१९२२.

आता कुणीच अमर नाही वगैरे, इत्यादि हे खरे आहे. पण काही लोकांच्या बाबतीत आपण आयुष्याचे नियम दुर्लक्षितो. कारण हे लोक आपल्या आयुष्याची व्याख्या करतात. आपली अपेक्षा असते की नियम वाकतील, मोडतील वा तिसऱ्या मार्गाला लागतील, पण या लोकांच्या वाट्याला जाणार नाहीत. नियम तसे करायचे नाकारतात. मग आपल्या आयुष्याचा पाया हादरतो.

संगीतशास्त्र (भरताचे नाट्यशास्त्र, श्रुतींची संकल्पना, थाट, घराणी, ) या विषयाबद्दल लिहिण्याची माझी इच्छा आणि पात्रता दोन्ही नाही. त्यामुळे भीमसेन जोशींचे हिंदुस्तानी अभिजात संगीतातले स्थान याबद्दल आव आणून अभ्यासपूर्ण काही लिहिण्याचे मी टाळतो. बऱ्याच मंडळींनी तसे लिखाण केलेआहे. ते लिखाणही मी टाळतो. सूर्य किती प्रखर आहे हे जाणवण्यासाठी मला तिसऱ्याच कुणी काढलेल्या सूर्याच्या फोटोची गरज नाही. माझे भाग्य की मी स्वतःच्या नजरेने तो झळाळ टिपलाआहे. चाळीसेक वर्षांपूर्वी मी त्यांना प्रत्यक्ष ऐकायला सुरुवात केली. तेव्हा साठी गाठलेली असूनही त्यांनी कारकीर्दीच्या शिखरावर जमवलेली घट्ट मांड सोडली नव्हती. ती नंतर दोनेक दशके सोडली नाही. त्या काळात जे सुवर्णक्षण टिपता आले त्या स्मृती जागवाव्यात म्हणून संपूर्ण स्वान्त सुखाय असा हा विस्कळित लेखन खटाटोप.

सवाई गंधर्व संगीत महोत्सव हे पंडितजींनी स्वहस्ते घडवलेले शिल्प हे सर्वांना माहीत आहे. त्या महोत्सवात कुणाला म्हणून आणायचे त्यांनी बाकी ठेवले नव्हते.आणि तिथल्यासाठी म्हणून एक वेगळे गाणेही त्यांनी आपल्या भात्यात राखीव ठेवले होते. समारोप व्हायला सूर्य उजाडे. शेवट हा सवाई गंधर्वांच्या रेकॉर्डिंगने होत असे. त्याआधीचा मान पंडितजींचा. त्यामुळे त्यांची गाण्याची वेळ होई तेव्हा ललत, भटियार, तोडी यांची आतषबाजीहोई. पण एवढेच नव्हते. एकदा ते तंबोरे लावीतअसताना आधी अमजद अलीखांच्या कार्यक्रमाला साथ करून मंचावरून निघणाऱ्या झाकिर हुसैननी पंडितजींना साथ करायची इच्छा व्यक्त केली. पंडितजी म्हणाले, "बसा की".

हिंदुस्थानी अभिजात संगीताला आढ्यताखोर दुर्बोधतेतून आपापल्या पद्धतीने बाहेर काढणारे हे दोन दिग्गज.उत्साही तरुणवर्गाला 'शक्ती' आणि 'मेकिंग म्युझिक'अशा प्रयोगांतून कबजात घेतलेले झाकिर हुसैन. आणि 'संतवाणी'ने तळागाळापासून सर्वांना हालवून टाकलेले पंडितजी. 'शुद्धते'चा गर्विष्ठ आग्रह धरणारे महंत काहीही म्हणोत,या दोघांनीही अभिजात संगीताच्या शुद्धतेला अजिबात ढका लावलेला नव्हता. तो दोन महाप्रवाहांचा संगम ज्यांनी अनुभवला ते धन्य.

असेच एकदा भीमसेन जोशींचे गाणे नि एमएफ हुसैन यांनी त्याचवेळेस चित्र काढणे असा कार्यक्रम झाला. असले थेर केल्याने संगीताच्या शुद्धतेला आणी परंपरेला खूप मोठा धक्का बसला म्हणून मार्तंडांनीत्या वेळेस यथायोग्य गळेही काढले. भीमसेन जोशींची त्या प्रयोगाबद्दलची प्रतिक्रिया मोजक्या शब्दांत होती, "मी तासभर गायलो, मग हुसैन उठले आणि एका मोठ्या कॅनव्हासवर पांढरा रंग लावला. नंतर लालगडद रंग. असे त्यांनी चित्र काढले. नवचित्रकलेतले मला काही कळत नाही."

अशीच एक आठवण, पण केवळ माझ्या स्मरणशक्तीवर आधारित. भल्या पहाटे पंडितजींनी चक्क मारवा आळवला होता. 'गुरू बिन ग्यान' ही विलंबित चीज नि द्रुतमध्ये तराणा. याचे मी रेकॉर्डिंग ऐकले होते. आता ते सवाईमधले नसले तर चूक माझी.

ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात काही काळ मला त्यांच्या संपर्कात येण्याची संधी मिळाली. मुख्यत्वेकरून परममित्र चंदू उर्फ पंडित चंद्रकांत सरदेशमुख याच्यामुळे. चंदू एक अवलिया होता. वयाच्या चौथ्या वर्षी सतारीला पहिल्यांदा हात लावला आणि अजून चार वर्षांत थेट सवाई गंधर्वमध्ये त्याचा कार्यक्रम झाला. हा आठ वर्षांचा कलाकार कोण हे बघण्यासाठी उत्सुक श्रोत्यांना भेटवण्यासाठी खुद्द पंडितजी त्याला खांद्यावर घेऊन मंडपभर हिंडले होते. त्या कार्यक्रमामुळे त्याला पंडित रवीशंकर यांनी शिष्य म्हणून स्वीकारले आणि अन्नपूर्णादेवींच्या स्वाधीन केले. चंदूची आणी माझी दोस्ती विद्यापीठात झाली. तेव्हा तो ललित कला केंद्राचा संचालक होता आणि मी संगणकशास्त्र विभागात विद्यार्थी. वयात दशकभराचे अंतर. पण ते तोडून आम्ही दिवसदिवस एकत्र काढले. त्या सहवासाने मला श्रीमंत केले. अकरा वर्षांपूर्वी एका मोटार अपघातात चंदू गेला.

चंदूमुळे मला पंडितजींच्या घरी जाऊन त्यांना भेटता आले. 'कॉग्निटिव्ह मॉडेल ऑफ अन्डरस्टॅंडिंग इंडियन क्लासिकल म्युझिक यूजिंग कंप्यूटर' हा माझ्या कामाचा विषय होता. "ते तुमच्या कंप्यूटरमधले आम्हांला काही कळत नाही. गाण्यातले थोडे कळते, त्याबद्दल काही मदत पाहिजे असेल तर बोला" असा दैवी खर्जातला संदेश मिळाला.

पुढे मी सगळे अर्धवट सोडून फिल्म-मेकिंगकडे गेलो आणि पंडितजींच्या प्रत्यक्ष भेटी संपल्या.

पण मैफिलीतून ते नंतर दशकभर भेटत राहिले. आणि रेकॉर्डिंग्जमधून तर सतत. विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात एक स्पूलचा ग्रुंडिग रेकॉर्डर-प्लेअर होता. त्याचे हेडफोन लावून जो 'पूरिया' आणि 'दुर्गा' ऐकला तो थेट आतवर उतरला.

अजूनही कधी फारच सैरभैर झाले तर सरळ हेडफोन लावून पंडितजींना शरण जातो. आपल्या स्वरस्तंभांनी ते अवघे अवकाश पेलून घेतात.