डावी-उजवी

पंगत मांडण्याची लगबग सुरू होते. ताटे मांडली जातात. त्यामध्ये दोन तीन वाट्या, बाजूला फुलपात्र असते. उदबत्तीचा सुगंध दरवळतो आहे, रांगोळ्यांचे रंग डोळ्यांना सुखावत आहेत, समोर मांडलेल्या पानांमध्ये वाढपी एक एक पदार्थ वाढत आहेत. सर्व पदार्थ वाढून झाले की कुणी उच्च स्वरात मंत्राचे उच्चारण करून भोजनास प्रारंभ करावा अशी हात जोडून विनंती करतात.

ही अशी मनात कोरली गेलेली दृश्ये आहेत. आजकाल असे काही फारसे दिसत नाही. ऐसपैस पंगत मांडून, हास्य विनोद करत, तर कधी श्लोक पठण करीत भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी कुणाजवळ वेळ नसतो. अनेक व्यवधाने असतात. घड्याळे हातालाच नाहीत तर नशिबाला देखील बांधलेली असतात. पंगतीचा सारा दिमाख आता लयाला गेला आहे. मोठ्या समारंभामध्ये उपचारापुरती एखाद दुसरी पंगत मांडली जाते इतकच.

पंगत वाढणे हे देखील एक कौशल्याचे काम आहे. भोजनाचे ताट कसे वाढायचे? भोजनाच्या थाळीमध्ये निरनिराळे पदार्थ, किती, कुठे? आणि कुठल्या क्रमाने वाढायचे? याचेही एक शास्त्र आहे. पदार्थ वाढणे म्हणजे ताटामध्ये ठेवणे इतकाच त्याचा अर्थ नाही. या सर्व पद्धतीमागचे शास्त्रीय कारण मला सांगता येणार नाही. पण अनेक वर्षांच्या सवयीने ते मनात ठसले आहे. कोशिंबीर डावीकडेच वाढली जाते, आणि भाजी उजवीकडे. वाटी या दोन्हीच्या मध्येच ठेवली जाते. आणि हे सवयीने आपोआपच घडते.

भारतीय भोजन हे चौरस आहाराचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे असे म्हणतात. मी काही आहार तज्ज्ञ नाही. किंवा सारे काही मोजून मापून घेण्याच्या आहारी गेलेली नाहीये. पण ते खरे असावे असे माझे प्रांजळ मत आहे. चौरस, संतुलित आहार, समतोल आहार कसा असावा? हे अशा शुद्ध शाकाहारी भोजनाच्या ताटाकडे पाहून कळते. निरनिराळे शाकाहारी पदार्थ, काही कमी तर काही जास्ती वाढायचे असतात. हे प्रमाण देखील सांभाळावे लागते. चटणी, कोशिंबिरीची धाकली असते आणि कोशिंबिरीने भाजीच्या अर्ध्यात राहायचे असते हे अनुभवाने घोटलेले सामान्यज्ञान आहे.  ताट वाढण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे आणि अनेक पिढ्या तशीच चालत आलेली आहे. मला देखील ताट कसे वाढायचे याच्या वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. कुणी समोर उभे राहून शिकविले नाही, परंतु बघून, अनुभवातून ते समजत गेले.

सर्वात प्रथम भोजनाच्या ताटात चिमूटभर का होईन मीठ वाढायचे असे शास्त्र आहे. नैवेद्याच्या ताटात मीठ वाढायचे नाही हे पण लक्षात ठेवायचे असते. त्यानंतर दोहोबाजूने (ताटाच्या कडेला, मधोमध नाही) वेगवेगळे पदार्थ वाढायचे, पण ते देखील क्रमाने. मिठाच्या डाव्या बाजूला चटणी, त्या पुढे कोशिंबीर -- त्या नंतर पापड, कुरडई इ तळण. त्याच्या (कोशिंबीर आणि चटणीच्या) पुढे थोडेसे पुरण, बाजूला दाटसर शेवयांची खीर. आता ताटाची दुसरी बाजू येते, तिथे भाताची मुद आणि त्यावर साधे वरण (हे मात्र ताटाच्या साधारण मध्यभागी यायला हवे), बाजूला पोळी अथवा पुरी. आतापर्यंत तीन चतुर्थांश ताट भरलेले असते. मिठाच्या उजव्या बाजूला आमटी, उसळ आणि एखादा गोडाचा पदार्थ असलेल्या वाट्या असतात. त्याच्यापुढे भाजी (बहुतेक वेळा अळूची आणि बटाट्याची). वाढपी भातावर साजूक तूप वाढून गेला की भोजनाची सुरुवात करायची, त्या आधी नाही. जेवणाऱ्याचा भात संपायच्या आधी मसालेभाताचे ताट आलेले असे. असे भोजनाचे ताट म्हणजे एक आदर्श चौरस आहारच म्हणायला पाहिजे. आजकालचे आहारतज्ज्ञ जे सांगतात ते सारे काही या ताटात असते.

अर्थात असे साग्रसंगीत भोजन सणासुदीला किंवा काही समारंभा निमित्त केले जाते. या भोजनात कांदा, लसूण हे तामसी पदार्थ नसतात, आणि अर्थातच मांसाहारी पदार्थ वर्ज्यच असतात. याचे कारण भोजना आधी, देवाला नैवेद्य दाखवला जातो हे असावे. तसेही भारतीय, हिंदू भोजनात हे पदार्थ शक्यतो नसतातच. 

रोजच्या भोजनाला इतका थाटमाट नसला तरी डावी-उजवी बाजू असतेच. म्हणजे भोजनाच्या ताटात डावीकडे आणि उजवीकडे वाढले जाणारे पदार्थ असणे आवश्यक असते. जसे माझ्या घरी चटणी,लोणचे, कोशिंबीर, आमटी किंवा उसळ , भाजी, पोळी, भात सोबत भाजलेला किंवा तळलेला पापड इतके तरी पदार्थ रोज असणे आवश्यक असते (हल्ली जरा बदल झाला आहे). सोबत ताक, दही, दूध, तूप या पैकी काहीतरी असले तर उत्तमच. 

माझ्या घरी (माहेरी) काही थोडे अपवाद वगळता, बहुतेक सर्वजण शाकाहारीच आहेत. तसेच ओळखीचे, आजूबाजूला राहणारे वगैरे सर्वच शाकाहारी. सणासुदीला, धार्मिक समारंभ प्रसंगी शाकाहारी पदार्थ असणार हे अध्याऱ्हुत असतेच (अजूनही). या व्यतिरिक्त कधी काही निमित्ताने सहभोजनाचा प्रसंग असेल, तरीही भोजन पूर्णत: शाकाहारीच असणार हे ठरलेले.  घरी सामिष पदार्थ सहसा नसत. क्वचित कधी अंड्याचे ऑम्लेट केले जाई इतकेच. अधून मधून काही काळ पोळ्या करण्याकरता बाई येत असत, परंतु बाकी सर्व माझ्या आईलाच करावे लागे. येणारे जाणारे , पै-पाहुणे, नातेवाईक इ भरपूर होते. कधी माझी चुलत अथवा मामे भावंडे सुट्टीकरता आलेली असत. कधी काही निमित्ताने बाहेर गावाचे नातेवाईक, ओळखीचे वगैरे चार दोन दिवसांसाठी मुक्कामी असत. परंतु त्या काळात कधी बाहेरून जेवण मागवले, अथवा जेवणाकरता हॉटेलमध्ये गेल्याचे मला स्मरत नाही.

त्या वेळेस स्वयंपाकघरामध्ये माझी मदत फारच अल्प असे. कोथिंबीर निवडून दे, दाणे सोलून दे किंवा त्याचा कूट करून दे. खोबरे (कोरडे असल्यास) किसून दे अथवा नारळ खोवून दे इतपतच. स्वयंपाकघरात आज सहज उपलब्ध असलेली विद्युत उपकरणे देखील त्यावेळी नसत. चटणी वाटायला पाटा-वरवंटा आणि दाण्याचा कूट करण्यासाठी खलबत्ता होता. आज हे सारे आठवले की आई आणि तिच्याप्रमाणेच २४ तास घरकामात व्यस्त असणाऱ्या सर्व स्त्रियांबद्दल फार आदर वाटतो. इथे आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे माझे वडील देखील प्रसंगी, जरूर असेल तर घरकामात मदत करीत. हे असे, त्या काळी आमच्या आजूबाजूच्या घरांमध्ये अभावानेच बघण्यात येई. एखादेवेळेस मोलकरीण आलेली नसे किंवा घरातले पाणी संपलेले असे. अशावेळी बाबा भांडी स्वच्छ करणे, अंगणातल्या नळावरून पाणी आणणे इत्यादी कामे आनंदाने करीत.

भोजनासंबंधी काही अलिखित नियम आहेत. जे कुणी सांगत अथवा शिकवीत नाहीत, परंतु ते सर्वांना माहिती असतात आणि त्यांचे पालनही केले जाते.

प्रथम : जेवताना कुठल्याही पदार्थाला वाईट म्हणायचे नाही, नावे ठेवायची नाहीत. तो अन्नब्रम्हाचा अनादर असतोच परंतु पदार्थ शिजवून तुमच्या पानात वाढणाऱ्याच्या कष्टाला कमी लेखल्यासारखे दिसते. कारण पदार्थ मुद्दामहून वाईट कधीच केला जात नाही.

द्वितीय : अन्नपदार्थ वाया जाऊ द्यायचे नाही. हवे असेल तेव्हढेच पानात वाढून घ्यायचे. अधिक हवे असल्यास पुन्हा वाढून घ्यावेत. आधीच भरमसाठ घेऊन नंतर ते टाकून द्यायचे नाहीत. उष्टे खरकटे अन्न ताटात दिसले नाही पाहिजेत.

तृतीय : जेवणाच्या आधी घोटभर पाणी प्यायचे, आणि जेवण संपल्यानंतर बाकीचे पाणी प्यायचे.. अधेमधे शक्यतो नाही. 

चतुर्थ : पूर्वी मुंज झालेली मुले अथवा मोठी माणसे, सुरुवातीला ताटाभोवती पाण्याचे प्रोक्षण करून बाजूला चित्राहुती ठेवीत असत... म्हणजे थाळीच्या उजव्या बाजूला चिमूटभर अन्नाचा घास ठेवीत. याचे कारण जमिनीवर असलेल्या किडामुंग्यांना ते मिळावे म्हणून.

पंचम : कुणाचे खाणे काढू नये... म्हणजे कोण किती जेवतो/खातो ते मोजू नये. असे करण्याने पाप लागते असे समजले जाते. सर्वसाधारण माणसे, त्यांच्या नैसर्गिक भुकेपेक्षा जास्त अन्न ग्रहण करीत नाहीत. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, त्यामुळे कुणाला कमी खाणे लागते तर कुणाला जास्तीची जरुरी असते. पण ते मोजून जेवणाऱ्याला टोचून बोलू नये.

घरातली गृहिणी अन्नपूर्णा असते. ती जर संतुष्ट, समाधानी असेल तर घरच्यांना ताजे आणि रुचकर अन्न मिळण्याची खात्री असते. एकूणच भोजन म्हणजे  अन्नोदकाची षोडशोपचाराने केली जाणारी पूजाच असे.  हे जीवशैलीचे संस्कार आहेत... कुणीही न बोलता, न सांगता, कसलीही शिकवणी न देता आपोआप घडलेले आणि मनीमानसी रुजलेले.