विज्ञानकथा लेखनाची आश्वासक आणि दमदार सुरुवात

विज्ञानकथा हा मराठीतला एक तसा दुर्लक्षित प्रकार. जयंत नारळीकरांच्या 'यक्षांची देणगी' या पुस्तकामुळे माझ्या वाचनकक्षेत विज्ञानकथा आल्या. तशा विज्ञान काल्पनिका होत्या वाचलेल्या. भा रा भागवतांच्या कथांत एक वेंधळा वैज्ञानिक असल्याचे आठवते. पण त्या काल्पनिका. कथा नव्हेत.

नंतरही मराठीत विज्ञानकथा म्हणजे परग्रहावरची सृष्टी, आणि ती म्हणजे कशी इथूनच पाचशे / पाच हजार वर्षांपूर्वी गेलेली मानवजात असेच काही वाचण्याची पाळी येई. विज्ञानकथा हा दुर्लक्षितच नव्हे, तर दुर्लक्षणीय प्रकार आहे हे समजल्यावर मग मी त्यापासून लांबच राहिलो. खरे तर मराठी साहित्यापासूनच लांब राहिलो.

'मनोगत'वरील ज्येष्ठ लेखक संजोप राव (संजीव कुलकर्णी) यांना विज्ञानकथा लिहिण्याची सुरसुरी आली. आणि हीच ती वेळ साधून 'लोकप्रभा' साप्ताहिकाने त्याला दर अंकात विज्ञानकथा लिहिण्याची सुपारी दिली.

काही कथा वाचल्यावर जाणवले की हे काही वेगळेच आहे. लेखकाचे पदव्युत्तर शिक्षण सूक्ष्मजीवशास्त्रात. नंतर व्यवस्थापनशास्त्रात डॉक्टरेट. जी ए कुलकर्णींवर एक डॉक्टरेट लौकरच (काही महिन्यांत; या कोविडने घोळ केला) मिळेल. हे सगळे अदरेखून लिहिण्याचे कारण काय? 'लेखक नव्हे, लेखन महत्त्वाचे' (The writing, not the writer) हे मान्य असूनही लिहिले अशासाठी की त्याच्या विज्ञानकथांत या तिन्ही क्षेत्रांचा सुरेख संगम झाला आहे. त्यात येणारे सूक्ष्मजीवशास्त्राचे वा व्यवस्थापनशास्त्राचे उल्लेख वा उपमा अगदी सहजपणे, 'आतून' येतात. गेल्या दोनेक दशकांत इंटरनेट हाताशी ठेवून कुठल्याही विषयावर 'तज्ञ' होणे फार बोकाळले आहे. संगीत, अर्थशास्त्र, विज्ञान, संगणक, व्यवस्थापनशास्त्र या आणि अशा सर्व विषयांवर अधिकारवाणीने लिहिणाऱ्या सुमारांची संख्या भयावह आहे. आणि स्वतःची अशी लेखनशैली विकसित करण्यासाठी मराठी साहित्याच्या अभ्यासाचा नक्कीच संजीवला उपयोग झालेला आहे.

एकूण, कालयंत्र, अंतराळयान, परग्रह, यंत्रमानव आदि चाकोरीतून पूर्ण मुक्त अशी ही विज्ञानकथा लेखनाची आश्वासक आणि दमदार सुरुवात आहे.

'लोकप्रभा' साप्ताहिक अद्यापि ऑनलाईनच आहे. ते (http://epaper.lokprabha.com/t/293) इथे वाचता येते. (टीप: साप्ताहिक जरी एका प्रथितयश वृत्तसमूहाचे असले तरी वेबसाईट मात्र दयनीय आहे. 'वेबसाईट नॉट सिक्युअर' अशी दरडावणी ओलांडून मग वाचायला सुरुवात करता येते.)

संजीवच्या कथा ऐसपैस आहेत. त्यामुळे दोन अंकात मिळून एक कथा पूर्ण होते.

पहिल्याच कथेत जंगली हत्तींचे मानवी वस्तीवर होणारे हल्ले आणि त्यावर शोधलेला उपाय असे वेगळेच कथानक आहे. मुळात जंगली हत्ती मानवी वस्तीत का येतात, मानवांवर हल्ले का करतात याचा विचार करून या कथेतील शास्त्रज्ञ उपाय शोधतात. पण तो उपाय कितपत नैतिक आहे, तो उपाय आहे की तात्पुरती मलमपट्टी आहे असे विचारांचे आवर्त वाचकाच्या मनात उमटल्याशिवाय राहत नाही हे या कथेचे बलस्थान. आणि निवेदनाची भाषा गरजेप्रमाणे हळुवार, रोखठोक वा खवचट होते.

या कथेने वाढवलेल्या अपेक्षा दुसऱ्या कथेतही यशस्वीरीत्या पूर्ण केल्या जातात. आणि कथानक संपूर्ण वेगळे. यातील शास्त्र हे मानसशास्त्र आहे. ग्राहकांच्या मानसिकतेशी मार्केटिंग डिपार्टमेंटची माणसे नेहमीच अतर्क्य खेळ खेळत असतातच. मग प्रॉडक्ट कुठलेही असो. 'आमची पासष्टावी कला' असे निर्लज्ज नागडेपणे सांगितल्यावर अजूनच वाहवाह होते. अशाच एका मार्केटिंग डिपार्टमेंटमधील कृत्यांचा लेखाजोखा यात मांडला आहे. आपल्या भावनांशी अघोरी खेळ खेळणे ही राजकारण्यांची मक्तेदारी नाही. किंबहुना राजकारणी मंडळीपेक्षाही विखारी कुणी असू शकते हे जाणवल्यावर येणारा सुन्नपणा हे या कथेचे बलस्थान.

येथील एक सूत्र, कथेला मानसशास्त्राचा भक्कम आधार, पुढे नेणारी अजून एक कथा 'नैराश्य' (depression) या एका अत्यंत महत्वाच्या विषयाला हात घालते. मुळात मानसिक आजार म्हणजे 'मेंटल' अशी तुच्छतापूर्वक मांडणी करण्याची आपल्या समाजाला इतकी सवय लागली आहे की या आजाराचे रोगी नक्की किती याचा आकडाही आपल्याला माहीत नाही. आणि 'सकारात्मक विचार' ऊर्फ 'पॉझिटिव्ह थिंकिंग' या संज्ञेने इतका घोळ घातला आहे की रोगापेक्षा इलाज भयंकर. मुळात सायकोसोमॅटिक (ज्याला काहीही शारिरीक कारण नाही) असा काही आजार असू शकतो हेच मानायची समाजाची तयारी नसते. त्यामुळे "मनाचे खेळ आहेत सगळे" अशी एक तुच्छतापूर्ण पिंक टाकून त्याची वासलात लावली जाते. पण अशा आजारांकडे हळुवारपणे, सहानुभूतीपूर्वक पाहणारी 'मन काळोखाची गुंफा' ही कथा विज्ञानकथा म्हणून एका वेगळ्याच पातळीवरची आहे.

असो. सगळ्याच कथांचे असे गाईडबुक करण्याचा माझा अजिबात विचार नाही. वेगवेगळया कल्पना, मधूनच तळपून जाणारा एकादा शब्दसमूह, एखाद्या उपमेतून जाणवणारा लेखकाचा दृष्टीकोन/पूर्वग्रह, अजिबात जडजंबाल/गूढ नसलेली विज्ञानाची मांडणी अशी सगळी गंमत आहे. थोडक्यात, प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर कथा वाचाव्यात. आवडल्या तर हा लेख लिहिण्याबद्दल माझे आभार मानावेत. आवडल्या नाहीत तर संजीवला शिव्या घालाव्यात.

काही कथांत एक सूत्र अंधुकसे दृग्गोचर होऊ लागले आहे. निसर्गात ढवळाढवळ करण्याचा मानवाचा यत्न आणि निसर्गाने त्याला दिलेले उत्तर. अजून जसजसे लेखन पुढे सरकेल तसतशी रंगत वाढत जाईल.