न-नायक – कोई ताजा हवा चली है अभी

२००८ नंतर भारतातल्या मल्टिप्लेक्सना कोणता जबरदस्त स्पर्धक तयार झाला ? व्यवस्थापनाच्या प्रवेशपरीक्षांत विचारला जाणारा एक फसवा प्रश्न. उत्तर: आयपीएल. चित्रपट आणि क्रिकेट हे भारतातले दोन मुख्य धर्म. हे दोन्हीही न आवडणारे अल्पसंख्याक. त्यांनी आरक्षणासाठी आंदोलनं करावीत.

मी या दोन्ही धर्मांचा उपासक. चित्रपटांविषयीचं आणि क्रिकेटविषयीचं लेखन मी ‘छोट्या जाहिराती- लोक ताज्या बातम्यांप्रमाणे वाचतात’ तसं वाचत असतो. अर्थात उडदामाजि काळे गोरे. तद्वतच कणेकर असतात, संझगिरी असतात. ते ओलांडून पुढे जायचं. पुढच्या कोपर्‍यावर अमोल उदगीरकर हा ताज्या दमाचा लेखक सापडतो.

अमोलचे लेखन मी बरेच दिवस वाचत आलो आहे, आणि त्यातले बरेचसे नव्हे तर सगळे लेखन मला आवडले आहे. असे सामान्यत: लेखकाच्या किंवा कोणत्याही कलाकृतीच्या बाबतीत होत नाही. हिंदी चित्रपटांचा अमोलचा प्रचंड अभ्यास आहे, पण खरं सांगायचं तर तसा बर्‍याच लोकांचा असतो. पण अमोलच्या या पहिल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मुकेश माचकर लिहितात तसा ‘पहिल्या वाक्यातच वाचकाच्या मनात उत्सुकता निर्माण करण्याचा आणि आपल्या शब्दांच्या बळावर लेखनात गुंतवून, त्याचं बखोटं पकडून शेवटापर्यंत खेचत नेण्याचा’, हल्ली दुर्मिळ झालेला गुण आहे. हाती घेतलेलं पुस्तक खाली ठेवू नये असं वाटणं, इंग्रजीत त्याला ‘अनपुटडाउनेबल’ असा फार चपखल शब्द आहे, मराठीत असेल तर मला माहीत नाही, हा अमोलच्या लेखनाचं मोठं वैशिष्ट्य आहे असं म्हटलं, की बाकी सगळी वैशिष्ट्ये त्याच्या पोटातच आली असं मला वाटतं.

‘न-नायक’ म्हणजे कोण? जुन्या काळात त्याला ‘बोलट’ असा एक सस्ता शब्द होता. मुख्य भूमिका करणारा तो नट आणि दुय्यम भूमिका करणारे ते सगळे बोलट अशी ती पुलंनी सांगितलेली कोटी. पण अमोलच्या या पुस्तकातले हे सगळे ‘न-नायक’ जनार्दन नारो शिंगणापूरकर सारखे कायम प्रसिद्धीच्या वर्तुळाबाहेर राहून शेवटी लिव्हरच्या विकाराने मरून गेलेले नाहीत. यावरूनच आठवायचे तर चोवीस तास दारूच्या नशेत राहाण्याच्या आणि अत्यंत उद्धट, बेमुर्वतखोर आणि अनैतिक जीवनशैली असलेला आणि आता संपूर्ण बदललेला माझा अत्यंत आवडता पीयूष मिश्रा (हैप्पी भाग जायेगी) या पुस्तकात आहे. यशस्वी असण्यासाठीचे सगळे गुण (विशेषत: अप्रतिम नृत्यकौशल्य आणि विनोदाच्या ‘टायमिंग’ चा जबरदस्त सेन्स – ‘सलाम नमस्ते’) असूनही त्या गुणांचे अजिबात चीज न झालेला जावेद जाफरी आहे. भेदक डोळ्यांचा आणि भारदस्त व्यक्तिमत्वाचा (बॉम्बे) नासर आहे.. पण हे काही खरं नव्हे. असं लिहायचं तर सगळ्यांबद्दलच लिहावं लागेल आणि अमोलने ते आधीच आणि फार उत्तम प्रकारे लिहिलेलं आहे.

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत माचकर लिहितात, ‘अमोलच्या लेखनात विश्लेषण आहेच, पण ते कोरडेठाक नाही आणि आतड्याच्या नात्याचा जिव्हाळा आहेच, पण तो गळेपडू भावविव्हळतेने बुजबुजलेला नाही’. हे वाक्य मला नुसतेच पटले नाही, तर फार महत्त्वाचे वाटले. कलाकाराच्या बाबतीत, विशेषत: आवडत्या कलाकाराच्या बाबतीत असे वस्तुनिष्ठ राहाणे फार अवघड असते. अमोल हा नव्वदच्या दशकातला चित्रपटरसिक आहे असे माचकर लिहितात. म्हणजे चित्रपटरसिकांच्या पिढ्यांच्या भाषेत बोलायचे तर त्याच्यात आणि माझ्यात चांगले दोनचार पिढ्यांचे अंतर आहे. तरीही दीपक डोब्रियाल (तनू वेड्स मनू), बोमन इराणी (जॉली एल एल बी), गजराज राव (बधाईहो), सौरभ शुक्ला (रेड), अर्शद वारसी (सेहर), संजय मिश्रा (धमाल), जिमी शेरगिल (हैप्पी भाग जायेगी), रजत कपूर (भेजा फ्राय) आणि अशा असंख्य ‘नव्या पिढीच्या’ कलाकारांनी आणि त्यांच्या चित्रपटांनी मला विलक्षण आनंद दिला आहे. ‘राज-दिलीप-देव’ यांच्याबरोबर, ‘नर्गिस-मधुबाला-वैजयंतीमाला’ यांच्याबरोबर, ‘लता-गीता-शमशाद’ यांच्याबरोबर किंवा अगदी ‘अमिताभ-अमिताभ-अमिताभ’ यांच्याबरोबरही हिंदी सिनेमा संपला असे माझे कधीच मत नव्हते, अमोलच्या या पुस्तकाने ते मत अधिकच घट्ट केले आहे. चित्रपटाची आवड असली की मग दुय्यम, तिय्यम भूमिकांकडे आणि त्या करणार्‍या कलाकारांकडे, संवादांकडे लक्ष जाते आणि ते सगळे लक्षात राहाते (‘वैसे मै इन मछलियोंके बारेमें उतानाही जानता हूं, जितना ये मछलियां मेरे बारेमें जानती हैं , लेकीन आप तो एक्सपर्ट हैं, आपको कैसे पता चलता है की इसमें नर कौन है और मादा कौन है? सीधीसी बात है साहब, जो तैर रहा है वो नर है, और जो तैर रही है, वो मादा है). अमोलच्या या पुस्तकात असे अनेक संदर्भ आहेत की जे वाचताना आपल्याला अगदी असेच वाटले होते, वाटले आहे असे जाणवते (इरफानचा मृत्यू). त्या आणि इतर अनेक अर्थांनी अमोलने ही नस पकडली आहे. स्ट्रिंडबर्गसारखी. फक्त ही नस आनंदाची, मजेची, कौतुकाची आहे.

इफ विशेस वेर हॉर्सेस, मीही गोप, मारुती, के.एन.सिंग, पेंटल, दुलारी, हरीश मगन, लीला मिश्रा , सी. एस. दुबे, युनूस परवेझ, टी. पी. जैन यांच्यावर लिहिले असते, पण ते असो. उत्तम प्रकाशनमूल्य असलेले आणि चंद्रमोहन कुलकर्णी यांचे अर्थपूर्ण मुखपृष्ठ असलेले हे पुस्तक मला फार आवडले. यात असलेल्या काही तपशीलाच्या चुका पुढच्या आवृत्तीत सुधारल्या जातील असा भरवसाही वाटला. (हल्ली पुढची आवृत्ती निघेल असा वाचकाला भरवसा वाटणे हेही पुस्तकाचे एक बलस्थान मानावे लागते!) या सुरेख पुस्तकात जोगिंदरसारखा किळसवाणा माणूस का असावा असा प्रश्न पडतो. टुनटुनचेही तसेच. पण ते असो. फार पूर्वी एका सामान्य पण अतिशय लोकप्रिय लेखकाने आपल्याच लिखाणातील मोजकी वाक्ये निवडून त्याचे एक पुस्तक काढले होते. त्याच्या प्रस्तावनेत लिहिले होते, ‘हे पुस्तक काय आहे, तर परफ्यूमच्या बाटल्या आहेत. ज्या दिवशी जो परफ्यूम वापरावासा वाटेल ती बाटली उघडावी. तसे या पुस्तकातले जे वाटेल ते पान उघडावे आणि.. नको त्या आठवणी. अमोलचे पुस्तक मात्र अशी रंगपंचमी आहे. इंग्रजी आणि हिंदी, प्रसंगी हिंग्लिश शब्दांचा न घाबरता केलेला वापर या पुस्तकाला एक बिंदास ठसा देतो. एकूण मजा आहे.

अमोलचे अशा प्रकारचे पुस्तक यावे अशी बर्‍याच लोकांची, त्यात मीही आलो, बर्‍याच दिवसांची इच्छा होती. ती अशा देखण्या स्वरुपात पूर्ण झाली याचा आनंद आहे.