लिल्यान क्रूक्स यांनी संपादित केलेले व्यंगचित्रसंग्रह

ऍमेझॉन (इंडिया) वर पुस्तके धुंडाळताना लिल्यान क्रूक्स या संपादिकेने तिथे प्रकाशित केलेल्या 'एव्हरीडे फनी कॉमिक मेक मी लाफ' या खंडांचा शोध लागला. एकूण वीसेक खंड आहेत.

शब्दप्रधान व्यंगचित्रे ही तडजोड/फसवणूक या सदरात जातात. संवादाधारित विनोदी चुटका मांडण्यासाठी दोन पात्रे दाखवून खाली संवाद लिहिलेले व्यंगचित्र काही खरे नव्हे. दैनिकात येणारे व्यंगचित्रे बऱ्याचदा त्या प्रकारची असतात. अर्थात रोजरोज व्यंगचित्रे काढणे हे एकदा 'काम' झाले की मग पाट्या टाकणे प्रवृत्ती डोके वर काढते.

या संग्रहांमध्ये बरीच 'चांगली' व्यंगचित्रे आहेत. थोडा वानवळा.

करिअर करू इच्छिणाऱ्या स्त्रियांना बऱ्याचदा ज्या शारिरीक दृष्टीकोनाला तोंड द्यावे लागते त्याचे चित्रण करणारे एक व्यंगचित्र. चित्राचे नाव 'करिअर लॅडर'. प्रत्येक पायरी म्हणजे एक पलंग. सगळ्यात खालच्या पायरी(पलंगा)वर पहिला बॉस पहुडलेला आहे आणि दात विचकत वरच्या पायऱ्यांकडे निर्देश करीत 'अशा बऱ्याच पायऱ्या झोपायच्या आहेत' असे सूचित करतो आहे.

कम्प्यूटर नि इंटरनेट यात पूर्ण बुडून गेलेल्या नवरा-बायकोंना अपत्यजन्मासाठी करावी लागणारी क्रिया करायचीही वेळ नि इच्छा नाही. मग दोघांनी आपापले लॅपटॉप एका प्रिंटरला जोडलेत नि त्यातून मूल जन्माला येते आहे.

नवराबायको म्हणजे संसाररूपी रथाची दोन चाके वगैरे वगैरे. पण एक व्यंगचित्र नवरा म्हणजे गिअरशिफ्ट नि बायको म्हणजे स्टिअरिंग अशी मांडणी करते.

आत्महत्या करायला निघालेला एक माणूस. कड्यावरून खाली समुद्रात उडी मारायच्या तयारीत, गळ्याला एक मोठा धोंडा बांधून. कड्यावर जरा मागे एक झाड. त्या माणसाचा आत्महत्येचा विचार अजून डळमळीत आहे. कारण त्याच्या सावलीने त्या झाडाला विळखा घातला आहे.

सेल्फी या मनोविकारावरचे एक व्यंगचित्र. सेल्फी जगण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कशी महत्वाची वाटते, तर फाशी जाणारा माणूस गळ्यात फास अडकवलेला असताना जल्लादासोबत सेल्फी काढतो आहे.

विवाहबाह्य संबंध ठेवल्यावर एका नवऱ्याला उपरती होते आणि तो घरी येऊन कबुली देतो, 'प्रिये, माफ कर, माझे दुसऱ्या एका स्त्रीशी संबंध आहेत'. बायको पलंगावर पांघरूण घेऊन (आत निर्वस्त्र) पहुडलेली आहे. पलंगाखाली एक, पडद्याआड एक, पडद्याच्या पेल्मेटवर एक नि झुंबरावरती एक असे तिचे चार प्रियकर हा कबुलीजबाब ऐकताहेत. खिडकीबाहेर उडी मारण्यात यशस्वी झालेले दोन वेगळेच.

फिशटॅंकमध्ये विरंगुळा म्हणून दोन गोल्डफिश खेळताहेत. पण तो खेळ एकाच्या जिवावर आलाय. खेळ आहे सी-सॉ. एक गोल्डफिश टॅंकबाहेर उडून पडला आहे.

मांजरांना विधी करण्यासाठी माती/वाळू घातलेला ट्रे घरात असतो. कुत्र्यांना मात्र झाडांवर तुरतुरी सोडायला बाहेर जावे लागते. घरात ख्रिसमस ट्री आणल्यानंतर कुत्र्याचा मांजराला टोमणा - 'आता मलाही घरात बाथरूमची सोय झालीय म्हटलं'.

माकडाकडे स्मार्टफोन आहे, पण सेल्फी-स्टिक नाही. काय करायचे? माकड बसले जिराफाच्या पाठीवर नि स्मार्टफोन दिला जिराफाच्या तोंडात.

कालबाह्य झालेला वॉकमन फूटपाथवर गिटार वाजवून समोरच्या थाळीत पैसे गोळा करतोय. हातात हॅंडग्लव्ह्ज, नखरेल पर्स अशा थाटातले आयपॉड त्या थाळीत एक नाणे टाकते आहे.

असो.

एका खंडात दीडेकशे व्यंगचित्रे आहेत. साधारण एक चतुर्थांश ब्रिटिश मासिकांमधली आहेत. त्यातली बरीचशी इंग्रजी भाषेतल्या द्व्यर्थी म्हणी/वाक्प्रचारांवर आधारित. बाकी सरमिसळ आहे. एखादे ग्लासबर्गेन ओळखता येते.

बऱ्याच खंडांची किंडल आवृत्ती फुकट आहे. ही सुरुवातीची प्रमोशनल स्कीम दिसते. कारण ८, ९ नि १० जून २०२२ ला हे खंड ऍमेझॉनवर प्रसिद्ध झाले आहेत.