साक्षीभाव : अज्ञानाची कमाल (७)

असा एकही धर्म ग्रंथ नाही आणि एकही सिद्ध नाही की ज्यानं साक्षीभाव हा मुक्तीचा मार्ग सांगितलेला नाही.

साक्षीभावानं पहा किंवा सगळ्या प्रती साक्षीभाव ठेवा अशी ही साधना आहे. त्यामुळे जाणणारा, जे जाणलं जातंय त्यापेक्षा वेगळा आहे हे कळेल, अशी एक पूर्वापार चालत आलेली ठाम आध्यात्मिक धारणा आहे. परंतु ती अज्ञानाची परिसीमा आहे. 

साक्षीभाव साधणारी व्यक्ती जीवनाप्रती तटस्थ होत जाते आणि सगळं जीवन निरस होत जातं. अध्यात्म न करणारी व्यक्ती  घटनांच्या झुलाव्यात हेलकावे खात, प्रारब्धाला कारण ठरवून, किमान जगत तरी जाते पण साक्षीभाव साधणाऱ्याची धड इकडे ना तिकडे अशी भंपक अवस्था होते. प्रगती साधायला गेलो तर साक्षीभाव आडवा येतो आणि समाधानी आहोत हे स्वतःला पटवायचं तर अहर्निश प्रयत्न करावा लागतो, अशी दोलायमान भारतीय मानसिकता निर्माण होण्यामागे ही साक्षीभावाची शिकवण आहे.

साक्षीभावानं स्वरूपाचा उलगडा होणं असंभव आहे कारण जाणण्याची क्षमता ही स्थिती आहे, ती प्रक्रिया नाही. त्यामुळे साक्षीभाव साधणं हा निरंतराचा उद्योग नाही तर जाणण्याची क्षमता ही कायम स्थिती हा उलगडा आहे.

तव्दत, पाहणं ही शारीरिक क्रिया आहे त्यामुळे आपण देहात आहोत (आणि परिणामी व्यक्ती आहोत) हा भ्रम दृढ होत जातो

थोडक्यात, साक्षीभावानं सार्वत्रिकतेचा उलगडा होणं असंभव आहे. तस्मात, आपला जन्मच होऊ शकत नाही ही साधी गोष्ट लक्षात आली तर साक्षीभावाचा आटापिटा करावाच लागत नाही. 

जी स्थिती देहापासून मोकळी आहे ती मुळातच जाणण्याची क्षमता धारण करून आहे. ती सार्वत्रिक आहे त्यामुळे सर्व घटना तिच्यात घडतात आणि ती अपरिवर्तनीय असल्यानं ती घटनांबरहुकूम बदलत नाही, आणि साक्षीचा नेमका अर्थच तो आहे !

थोडक्यात, आपण मुळातच साक्षी आहोत, साक्षीभाव साधा वगैरे प्रकार करणं म्हणजे जे आहे तेच साधण्याचा व्यर्थ प्रयत्न आहे !

हा लेख शांतपणे वाचला आणि जे लिहिलंय त्यावर मनन केलं तर; सार्वत्रिक, जाणण्याची अंगभूत क्षमता असलेल्या, क्रियाशून्य आणि अपरिवर्तनीय अशा आपल्या विलोभनीय स्वरूपाचा उलगडा होईल.