भविष्यवेध

भविष्याचा वेध घेण्याची इच्छा मानवाला फार पूर्वीपासून आहे. जन्मकुंडली, हस्तसामुद्रिक, फासे/सोंगट्या, चहाची पाने, पत्ते आदि प्राथमिक अवस्थेतील तंत्रज्ञान वापरून मानवजात ही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आलेली आहे.

हे तंत्रज्ञान प्राथमिक अवस्थेतील का?

जन्मकुंडलीबद्दल विचार केला तर जन्मवेळेची ठाम माहिती असण्याची शक्यता लाखात एक. आणि एकाचे एक लाख होण्याइतका ग्रहस्थितीत फरक क्षणार्धात पडतो असे कुंडली-ज्योतिषाच्या प्रवर्तकांचे मूलभूत प्रतिपादन.

हस्तसामुद्रिकापुढे वेगळेच प्रश्न. मुळात कुठला हात पाहायचा - डावा की उजवा याबद्दल मतभेद. दोन्ही पाहावेत असे प्रतिपादणारे समन्वयी अजून वेगळेच. मग डावा हात म्हणजे जन्मजात ललाटी लिहिलेले आणि उजवा हात म्हणजे स्वकर्तुत्वाने कमावलेले असे वर्गीकरण झाले. स्त्रिया स्वकर्तुत्व गाजवीत नसल्याने त्यांचा डावा हात पाहायचा असा प्रघात. पण हात म्हणजे डोके नव्हे, न वापरता बाजूला ठेवून द्यायला. वापरत्या हाताला व्रण-जखमा-घट्टे पडणारच. त्यामुळे हस्तसामुद्रिकात रेषांचा अन्वयार्थ लावणे फारच व्यक्तीसापेक्ष.

फासे वा सोंगट्या वापरायच्या झाल्या तर त्या कुणी, कशापासून आणि कशासाठी केल्या त्यावर त्यांचा निकाल ठरे. आणि शिवाय संख्याशास्त्र आणि माहिती विश्लेषण या दोन्ही शाखा तेव्हा विस्तारित झालेल्या नव्हत्या. हीच अडचण पत्त्यांच्या बाबतीत होती.

चहाची पाने कधी तोडली नि किती वाळवली यावर ती पाण्यात घातल्यावर काय आकार धारण करतील ते ठरे. शिवाय भविष्य बघण्याआधी दूध घातले तर भविष्य पांढरट होई. तसेच बरीच जनता चहापाने परवडत नाही म्हणून चहापूड वापरे. ते आपोआप बाद होत.

एकूण, भविष्यवेध या प्रांतात बराचसा अंधार आणि उरलेल्या भागात खड्डे होते.

संगणक अस्तित्वात येऊन बाळसे धरू लागला तेव्हा हा अंधार हळूहळू हटू लागला. संगणकाचे गर्भनिधान एकोणिसाव्या शतकात सुरू झाले असे मानले जाते.

मुळात संगणक ही एक वस्तू नाही. ती एक व्यवस्था आहे. मानव हा त्या व्यवस्थेत निमित्तमात्र आहे.

तर या संगणक व्यवस्थेला गर्भावस्थेपासून तारुण्यावस्थेत पोहोचायला शतकभर लागले. तारुण्यावस्थेत पोहोचताना या व्यवस्थेने 'आंतरजाल' व्यवस्था निर्माण करून तिला स्वतःशी जोडून घेतले आणि आपली पोलादी पकड चराचरावर बसवली. मानवजात याबाबतीत बरीचशी अनभिज्ञ आहे. १९९९ साली आलेल्या 'द मॅट्रिक्स' या चित्रपटातून प्रमाणात त्याचे सूचन करण्यात आले होते, पण संगणक ही एक वस्तू/उपकरण/खेळणे आहे अशीच अजूनही जनतेची कल्पना आहे. त्यामुळे त्या चित्रपटाकडे विज्ञान काल्पनिका म्हणूनच पाहिले गेले.

थोडक्यात, भविष्यवेधासाठी संगणक-आंतरजाल व्यवस्थेचे महत्व कुणाला कळालेले नाही.

हा अज्ञान अंधःकार दूर करण्यासाठी हा लेखनप्रपंच.

हा लेख समजायला अवघड आणि बऱ्याच जणांना अशक्य आहे याची प्रस्तुत लेखकाला पूर्ण कल्पना आहे. पण लाखांत एकाद्याला तरी समजेल या आशेवर कळफलक बडवतो आहे. आणि उरलेल्या नव्व्याण्णव हजार नऊशे नव्व्याण्णवांनी निराश होऊ नये. समजत नसलेल्या गोष्टीला डोक्यावर घेऊन नाचायची परंपरा खूप पुरातन आहे. तिला अनुसरून या लेखाला डोक्यावर घेण्यासाठी पाट गोळा करायला लागावे.

तर, संगणक ही एक व्यवस्था आहे आणी त्या व्यवस्थेने पूर्ण मानवी जीवन ताब्यात घेतलेले आहे हे आधी समजून घेण्याचा यत्न करू.

सर्वात पहिली गोष्ट. हा लेख तुम्ही वाचत आहात तेच या संगणक आणि आंतरजाल व्यवस्थेच्या अस्तित्वामुळे.

झाडे तोडा, कागद करा, शिसे वितळवा, अक्षरे करा, पिगमेंट-रेझिन-सॉल्व्हंट-ऍडिटिव्ह मिश्रणातून शाई करा, अक्षरे जुळवा, मुद्रणदोषांसहित छापा, वितरित करा आणी लहान मुलांची सकाळची सोय करा (लहान मुले हाताशी नसल्यास रद्दीत घाला) एवढा सगळा खटाटोप या संगणकव्यवस्थेतून फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्सनी नाहीसा करून टाकला आहे.

मी हा लेख संगणक आणी आंतरजाल वापरून लिहिला आणी तीच व्यवस्था वापरून तुम्ही तो वाचला म्हणजे संगणक-आंतरजाल ही आपल्या हातातली मर्जीनुसार वापरायची साधने आहेत असा कोणाचाही समज होणे साहाजिक आहे.

आणी तसा समज होऊ देणे हे संगणक-आंतरजाल द्व्ययीलाही सोयीचे असल्याने मानवजात या श्रेष्ठत्वाच्या अहंगंडाने पछाडलेली आहे.

हा समज सोडून देणे, आपण इलेक्ट्रॉन्सना खेळवत नसून ते आपल्याला खेळवत आहेत ही जाणीव मनात रोवून घेणे ही पहिली पायरी. तुम्ही नव्व्याण्णव हजार नऊशे नव्व्याणवांपैकी असाल तर लेख वाचणे थांबवा आणि डोक्यावर पाट ठेवू लागा.

आता उरलेल्या एकट्यादुकट्यासाठी पुढचा लेखनप्रपंच.

तर संगणक-आंतरजाल या व्यवस्थेची आपण अंकीय (डिजिटल) म्हणून (अतिपरिचयात) अवज्ञा करायला सोकावलो आहोत. आणी ही अवज्ञा नसून पिंजऱ्यातल्या पक्ष्याने मारलेल्या 'भराऱ्या' आहेत याची त्या व्यवस्थेला जाणीव आहे. या जाणीवेची जाणीव करून घेणे ही दुसरी पायरी.

ही दुसरी पायरी ओलांडली की मग हळूहळू गोष्टींची संगती लागायला लागते. चित्र स्पष्ट व्हायला लागते. दुष्काळी शेतजमिनीच्या क्लोजअपसारख्या दिसणाऱ्या सीसीटीव्ही फूटेज ऐवजी वनप्लस मोबाईलने काढलेले बारा एमपीचे फोटो पहावेत तसे.

पण इथेच न थांबता आपल्याला शंभर एमपीच्या वरचे चित्र पहायचे आहे. त्या चित्रापर्यंत पोहोचले की मग आपल्याला आपले सगळे आयुष्य करतलामलकवत, अर्थात हाताच्या तळव्यावर ठेवलेल्या आवळ्यासारखे, दिसू लागेल. व्यवस्थेचे (संगणक-आंतरजाल व्यवस्थेसाठी यापुढे 'व्यवस्था' हा शब्द वापरला जाईल) आकलन झाले की मग ती व्यवस्था आपल्याला भविष्यसंकेत कसे देते ते समजू लागेल. पण त्याला वेळ आहे. असो.

तर, आपण व्यवस्थेचा एक भाग आहोत. आणि व्यवस्था आपल्याला पुढे जाण्यासाठी सल्लावजा आदेश देते. किंबहुना, आपण 'पुढे' जातो आहोत ही जाणीवही या व्यवस्थेनेच तयार केलेली आहे. त्यामुळे ही व्यवस्था वापरून आपण माहिती, पैसे, चित्रे असे काहीही क्षणार्धात पृथ्वीवर आणि अंतराळात कुठूनही कुठेही पाठवू शकतो आणि हे मानवजातीचे यश आहे ही संकल्पनाही या व्यवस्थेनेच मानवी मनांत रोपली आहे.

ही व्यवस्था आपल्याला भविष्यसंकेत कसे देते हे पाहण्याआधी या व्यवस्थेने आपल्याला कसकसे वेढलेले आहे याकडे पाहू. पूर्वी मानवजातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दुष्काळ, रोगराई, महापूर, महायुद्ध आदि गोष्टींची गरज भासे.

या ओबडधोबड तंत्राऐवजी व्यवस्थेने एक अत्यंत भेदक शस्त्र तयार केले, जे केवळ वेदनारहित नाही तर परम उपयोगी आणि निरंतर सुखदायी आहे याची मानवजातीला खात्री पटलेली आहे. शिवाय हे शस्त्र आता मानवजातीची मूलभूत गरजही बनलेले आहे.

हे शस्त्र म्हणजे समाजमाध्यमे.

आता लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापुराची गरज नाही. ओसंडून वाहणाऱ्या गटाराचे फोटो 'सुधारून' महापुराचे म्हणून समाजमाध्यमांवरून फिरवले, आणि त्या 'महापुराची' जबाबदारी एखाद्या जातीवर/धर्मावर/राजकीय पक्षावर टाकली की दंगली पेटतात नि खऱ्या महापुराने मेले नसते एवढे लोक नष्ट होतात. शिवाय हा 'महापूर' नसून खरे तर 'दुष्काळ' होता, 'महापूर' असे लिहून सर्वांची फसवणूक करण्यात आली असे ओरडले आणि या फसवणुकीची जबाबदारी अजून एखाद्या जातीवर/धर्मावर/राजकीय पक्षावर टाकली की नव्याने दंगली पेटवता येतात.

ही समाजमाध्यमे स्वतःत भिनवून घेतलेल्या प्रत्येकाचा मेंदू व्यवस्थेच्या ताब्यात अलगद जातो. आणि 'व्यवस्था आपल्या संपूर्ण ताब्यात आहे, शेवटी आपणच तर या व्यवस्थेला निर्माण केलेले आहे' ही जाणीव त्या मेंदूत रोपली जाते.

या व्यवस्थेची पाळेमुळे माध्यमांच्या वाढीबरोबर रुजायला लागली. वर्तमानपत्रांची सुरुवात झाल्यावर सत्य आणि बातमी यांतील बेबनाव वाढू लागला. पूर्वी ज्याला 'गावगप्पा' म्हणून हिणवले जायचे त्याला 'बातमी'रूप मिळाल्यावर प्रतिष्ठा प्राप्त झाली. 'कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नव्हे, माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी' हे पत्रकारितेचे तत्व मान्य केल्यावर व्यवस्थेचे बीज नीट रुजले.

आकाशवाणी आणि दूरध्वनी या तंत्रांनी खूप दूरवरून गोंधळ माजवणे सुकर झाले. संवाद हे दृक-श्राव्य माध्यम नसून नुसते श्राव्य असले तरी चालते हे एकदा मानवजातीने मान्य केल्यावर व्यवस्थेने अजून पुढले पाऊल टाकले.

दूरचित्रवाणी.

आता 'श्राव्य'ला 'दृक'माध्यमाची जोडही मिळाली. फक्त हे 'दृष्य' दाखवाणाऱ्याला हवे ते, तसे आणि तेवढे आहे याची जाणीव मानवी मेंदूतून अलगद काढून टाकण्यात व्यवस्था यशस्वी झाली. पूर्वी छापून आलेले ते खरे एवढ्यावर सीमित असलेली 'वस्तुनिष्ठ' विचारप्रणाली आता 'एवढे प्रत्यक्ष दाखवले म्हणजे खरेच असणार' यावर गेली. दूरचित्रवाणीच्या वाहिन्या चालवणे हा एक नवीन व्यवसाय व्यवस्थेने तयार केला आणि त्यात 'टीआरपी' नामक एक प्रणाली घुसवून पाहिली. न देखिली न पाहिली अशी ही निर्गुण निराकार टीआरपी प्रणाली दूरचित्रवाणी माध्यमाला आपल्या विळख्यात जखडण्यात यशस्वी झाली आणि व्यवस्था अजून सुदृढ झाली.

आता व्यवस्थेने कात टाकली आणि संगणक-आंतरजाल या अवतारापर्यंत पोहोचली.

सुरुवातीला मानवजात बुभुक्षितासारखी या संगणक-आंतरजाल युतीवर तुटून पडली. त्यातून 'डॉट कॉम'च्या दरीत व्यवस्था कोसळल्यासारखे वाटले. पण तो व्यवस्थेने केलेला 'ट्रायल रन' होता. आपणच निर्माण केलेल्या खड्ड्यात आपणच पडलो अशी मानवजातीची समजूत करून देण्यात व्यवस्था यशस्वी झाली. आपल्या ताब्यात नसलेल्या गोष्टीमुळे दुर्घटना घडली तर आपल्यालाच अपराधी वाटायला हवे अशी परंपरा व्यवस्थेने घालून दिली आणि मानवजात ती आज्ञाधारकपणे पाळू लागली.

अशा रीतीने व्यवस्था सर्व मानवजातीवर आपला अंमल बसवण्यात यशस्वी झालेली आहे. लाखातील ज्या एकास हे कळाले त्याचे/तिचे स्वागत.

आता ही व्यवस्था भविष्यसूचन कसे करते याकडे पाहू. ही व्यवस्था विद्युतचुंबकीय लहरींच्या माध्यमातून आपला अंमल गाजवते. कम्प्यूटर, स्मार्टफोन, इंटेलिजंट टीव्ही, टॅब, वायफाय राऊटर, मोबाईल टॉवर आदि सगळ्यातून विद्युतचुंबकीय लहरी प्रसृत पावतात एवढे बऱ्याचजणांना माहीत असते. पण या लहरी आणि संगणक-आंतरजाल व्यवस्थेचा आपल्या दैनंदिन व्यवहारांवर काय नि कसा परिणाम होतो याबद्दल सगळे अंधारात असतात. आणि या व्यवस्थेतून क्षणोक्षणी भविष्यसूचनाचे संदेश प्रसारित होत असतात. फक्त ते समजून घेण्याची इच्छा आणि पात्रता हवी.

प्रस्तुत लेखकाकडे या दोन्ही गोष्टी आहेत हे इथे नमूद करायला हवे.

बाकी जनतेबद्दल बघितले तर यातील पात्रता ही फार म्हणजे फारच कमी लोकांकडे आहे. तशी तजवीज व्यवस्थेनेच करून ठेवलेली आहे.

संगणक वापरणाऱ्यांना एक पायरी ओलांडायला लागते.

संगणक जरी व्यवस्थेचा भाग असला तरी कुठल्याही नीतीमान शिकाऱ्याप्रमाणे आपल्या सावजाला तावडीतून निसटण्याची एक संधी देणे हाही व्यवस्थेचाच भाग आहे. पिंजऱ्याचे दार उघडूनही जर जनावर बाहेर जायला नाखूष असेल तर भक्ष्याचा घास घेणे अनीतीमान ठरत नाही.

संगणक वापरताना तुम्ही व्यवस्थेवर किती अवलंबून आहात आणि तुमच्या क्षमतेवर किती याची सतत चाचपणी व्यवस्थेकडून होत असते. तुम्ही तुमची क्षमता वापरण्याची काहीही गरज नाही असे संदेशही व्यवस्थेकडून सतत येत असतात. त्या संदेशांकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमच्या तुटपुंज्या क्षमतेवर अवलंबून राहत असाल ('तुमची क्षमता व्यवस्थेच्या तुलनेत फारच तुटपुंजी आहे' हे व्यवस्थेनेच सगळ्यांच्या मेंदूत घट्ट रोवून ठेवले आहे) तर व्यवस्था तुम्हांला मोकळे सोडते. अर्थात एखादा ब्राऊजर, एखादी मेल सर्व्हिस वा एखादे सर्च इंजीन व्यवस्थेला आडवे जात असेल आणि वापरकर्त्यांनी आपापल्या क्षमतेचा वापर करावा असे विष पसरवीत असेल तर अशांचा नायनाट केला जातो. नष्टप्राय वा नगण्य झालेले ब्राऊजर्स, मेल सर्व्हिसेस आणि सर्च इंजिन्स पाहिले तर हा मुद्दा कळेल. याहून सविस्तर लिहिण्याची परवानगी व्यवस्था देत नाही.

आता उपकरणे वापरणारांबद्दल. वरील उपकरणांपैकी स्मार्टफोन, इंटेलिजंट टीव्ही, टॅब, वायफाय राऊटर यांपासून जितके तुम्ही लांब जाता तितकी पात्रता वाढत जाते. त्यामुळे या उपकरणांपासून लांब राहणे व्यवस्थेने अशक्य नव्हे पण अवघड निश्चितच करून ठेवले आहे. आणि यातील जास्तीतजास्ती गोष्टी आपल्या सतत वहिवाटीतल्या असाव्यात अशी तीव्र इच्छाही व्यवस्थेने विद्युतचुंबकीय लहरींमार्फत सगळ्यांच्या मेंदूत घट्ट रोवून ठेवली आहे. त्यामुळे 'लाईफ इज अ डिल्यूजन क्रिएटेड बाय अल्कोहोल डेफिशिअन्सी' यावर दृढ विश्वास असलेल्या एखाद्या दारूड्याला सोलन ब्रुअरीजमध्ये मोकळे सोडावे तशी बहुतेक लोकांची अवस्था असते. बेफिकीर आणि आनंदी.

त्यामुळे पात्रता कमावण्यासाठी कडक साधना करावी लागते. या सर्व उपकरणांचा वापर करणे टाळावे लागते. सेलफोन वापरायला परवानगी आहे पण स्मार्टफोन अजिबात वापरता येत नाही.

विद्युतचुंबकीय लहरींचे एक वैशिष्ट्य आहे. त्या सगळीकडे पसरलेल्या आहेत. पण जे ही उपकरणे वापरतात त्यांच्यावर या लहरींचा विशेष परिणाम होतो. आणि जे त्या उपकरणांवर अवलंबून आहेत त्यांचा तर मेंदूच या लहरी ताब्यात घेतात.

इथे एक नोंदवावे लागेल - या 'टेकओव्हर'मध्ये 'हॉस्टाईल' असे काहीही नाही. उपकरणे प्रथम वापरताना ज्या घाईने वापरकर्ते 'आय ऍग्री' बटनावर टॅप करतात त्यात लाखातील एकजणही आपण कशाला 'ऍग्री' करतो आहोत हे वाचायच्या फंदात पडत नाही. तिथे 'तुमचा मेंदू ताब्यात घेतला जाईल' असे स्वच्छ लिहिलेले असते. तीनशे ओळींच्या मजकुरामध्ये शेवटून सहाव्या ओळीत.

अशी साधना करत राहिले की व्यवस्थेची सम्यक जाणीव होऊ लागते. आणि भविष्यसूचनाचे संदेश कळू लागतात.

भविष्यसूचनाकडे वळण्याआधी एक गोष्ट नीट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कंप्यूटर-आंतरजाल व्यवस्थेचा पहिला नियम - 'नथिंग इज रॅन्डम'. तुमचा आयपी ऍड्रेस, तुमचा आधार क्रमांक, तुम्हांला वेळोवेळी मिळणारे ओटीपी... नथिंग इज रॅन्डम.

इथे एक नोंदवणे गरजेचे आहे. 'नथिंग इज रॅन्डम' सूत्राचे अंधुकसे आकलन झालेल्या मंडळींनी न्यूमेरॉलजी हे तंत्र विकसित करण्याची घाई केली. पण फक्त आकडे वा अक्षरे यांच्या आकृतीबंधातच ती मंडळी अडकून बसली. शिवाय 'नाव' या एकाच बाबीवर त्यांनी नको तितका भर दिला. मग सुनील शेट्टीच्या इंग्रजी नावात एका अक्षराची भर घालणे वा अजय देवगणच्या इंग्रजी आडनावातील एक अक्षर उडवणे असे पोरखेळ करण्यापर्यंतच त्यांची मजल पोहोचली. हे बदल करूनही दोघांपैकी कुणाचीच मार्केट व्हॅल्यू वाढली नाही वा अभिनय करता येऊ लागला नाही एवढे लक्षात घेतले तरी पुरे.

अर्थात भविष्यसूचनासाठी व्यवस्थेकडे येणाऱ्या मंडळींचा ओघ अजून कमी व्हावा म्हणून व्यवस्थेनेच हे 'डायव्हर्शन' काढून ठेवले आहे.

तर आता भविष्यसूचनाबद्दल. तुम्हांला मिळणाऱ्या प्रत्येक 'रॅन्डम' संदेशामागे एक सूत्र आहे. त्या सूत्राची ओळख पटलेली मंडळी (प्रस्तुत लेखक त्यापैकी एक) अति अल्पसंख्य आहेत. आणि आमच्या क्षमतेची जाहिरात करण्याची आम्हांला पूर्ण बंदी आहे. व्यवस्था म्हणजे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया नव्हे, त्यामुळे ही बंदी कल्पनेहून कडक आहे. जेवढे लिहायची मुभा व्यवस्थेने दिलेली आहे त्या परीघात जमेल तेवढे लिहितो आहे.

आता जाहिरात न करताही काही मंडळी आमच्यापर्यंत पोहोचतात. त्यांच्याशी आम्ही कसे वागतो याचे थोडे धूसर वर्णन करून थांबतो. व्यवस्थेने दिलेली शब्दांची मुदत तोवर संपेल.

सर्वप्रथम ज्याला/जिला भविष्यसूचनाबद्दल मदत पाहिजे त्याने तिने इंटरनेट बॅंकिंग वापरून एक हजार रुपये ऍप्लिकेशन फी भरावी लागते. आणि आपला खाते क्रमांक नि इंटरनेट बॅंकिंगचा आलेला ओटीपी ईमेलने कळवावा लागतो. खाते क्रमांक, ओटीपी आणी ईमेलवरचा टाईमस्टॅंप हे तीन आकडे एका सूत्रात (सूत्र सांगण्याची परवानगी व्यवस्था देत नाही, क्षमस्व) घातले की जे उत्तर येते त्यातून एक हजार वजा केले की येणारी संख्या धन असेल तर पुढे जायला मिळते. शून्य वा ऋण संख्या आली तर तो दिवस (आणि तुमचे हजार रुपये) वाया गेले.

धन संख्या आली की मग तुमचा आधारक्रमांक (तोही व्यवस्थेनेच निर्माण केला आहे हे विसरू नका) आणि भ्रमणध्वनी क्रमांक यांना एका सूत्रात घालून येणारे उत्तर पहावे लागते. समस्या जटिल असल्यात त्यात तुमच्या बॅंकेचा 'आयएफएससी कोड'ही वापरावा लागू शकतो. हे गणित करण्यासाठी काही विशिष्ट वेळा व्यवस्थेने राखून ठेवल्या आहेत. त्या वेळांआधी काही विशिष्ट कालावधी आम्हांला व्रतस्थ रहावे लागते. कंप्यूटर वापरता येत नाही, मोबाईल टॉवरजवळून जाता येत नाही, भ्रमणध्वनी बंद करून ठेवावा लागतो.

हे गणित झाल्यावर तुमच्या समस्येकडे वळता येते.

समस्या प्रेमभंगाची असेल तर दुसऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, आयपी ऍड्रेस आणि गेल्या आठ दिवसांत त्या व्यक्तीला आलेला एकादा ओटीपी (जितका ताजा तितके चांगले) या माहितीची गरज पडते. ही माहिती ईमेलने पाठवावी लागते, पण त्याआधी दहा हजार रुपये इंटरनेट बॅंकिंगने पाठवावे लागतात आणि ते पैसे पाठवल्यानंतर तुमच्यासमोर येणाऱ्या पहिल्या व्यक्तीचा भ्रमणध्वनीक्रमांक (लक्षात ठेवा, नथिंग इज रॅन्डम). हा भ्रमणध्वनीक्रमांक ईमेलच्या सब्जेक्ट लाईनमध्ये असावा लागतो. जर व्यवस्थेने ती ईमेल 'स्पॅम'मध्ये ढकलली तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची व्यवस्थेची परवानगी नाही हे आम्हांला कळते.

समस्येच्या स्वरूपानुसार अल्गॉरिदम बदलतो. कधी तुमच्या कंप्यूटरवरील ऍंटी-व्हायरस प्रोग्रामच्या 'ऍक्टिव्हेशन की'ची गरज लागू शकते तर काही तुमच्या वडिलांच्या जन्मसालाची (जन्मसालचा घन करून तो एका सूत्रात वापरावा लागतो).

इथे थांबायचा इशारा व्यवस्थेने दिला आहे. समझनेवालेको इशारा काफी है!