ऍन हेश - भिरभिरताना कलंडलेली भिंगरी

भीषण अपघातातून स्ट्रेचरवर झोपवेपर्यंत शुद्धीत असलेली, पण मग बेशुद्धी आणि नंतर आठवडाभर 'कोमा'मध्ये काढल्यावर ऍन हेश त्रेपन्नाव्या वर्षी अखेर गेली. ही बातमी फार मोठी झाली नाही. तसे ऍननेही फार मोठे असे नाव कमावलेले नव्हते. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके चित्रपट, त्यातही 'सिक्स डेज सेव्हन नाईट्स' सोडता मध्यवर्ती अश्या भूमिका नाहीत त्यामुळे ती परीघावरचीच कलाकार होती.

म्हणून भिंगरी, चक्रीवादळ नव्हे. तसे चक्रीवादळ होण्याची क्षमता तिच्यात होती असे तिच्या भूमिकांमधून जाणवायचे. पण तिनेही ते फारसे मनावर घेतलेले दिसले नाही. भिरंगटत जाण्यातच तिने आयुष्य दवडले.

विशीतच तिने टेलिव्हिजन मालिकांमधून सुरुवात केली. आणि पंचविशीत चित्रपटांमधून. तिशीला पोहोचताना आला 'डॉनी ब्रॅस्को', ज्यात अल पचिनो आणि जॉनी डेप हे दोन मुख्य कलाकार होते. त्यात जॉनी डेपच्या बायकोच्या भूमिकेत ती लक्षात राहिली, पण छाप पाडून गेली असे म्हणता येत नाही. त्याच वर्षी आलेल्या 'आय नो व्हॉट यू डिड लास्ट समर'च्या पहिल्या भागातही ती अनेकांमधली एक होती. त्यातली जेनिफर लव्ह - हेविट नि सारा मिशेल गेलर या दोघींनी पुढे जितके नाव कमावले त्या तुलनेत ऍन लक्षातही जेमतेमच राहिली.

त्याच्या पुढल्याच वर्षी सायको (रिमेक) आणि 'सिक्स डेज सेव्हन नाईट्स'मध्ये ती दिसली. त्यातल्या 'सायको'मध्ये परत कलाकारांची मांदियाळी होती. व्हिन्स वॉघन, ज्युलिऍन मूर, विल्यम मेसी आदि. तरी 'सायको' फ्लॉप शोच ठरला. ऍन हेशच्या कामाची थोडीफार तारीफ झाली. आंबटषौकिनांनी तिचा 'न्यूड बाथ सीन' तेवढा लक्षात ठेवला.

'सिक्स डेज सेव्हन नाईट्स' हा खऱ्या अर्थाने तिचा म्हणता येईल असा चित्रपट. सोबत हॅरिसन फोर्ड, पंचावन्नचा असणारा पण पासष्टीचा दिसणारा. शिवाय 'फ्रेंड्स'प्रसिद्ध डेव्हिड श्विमर आणि इतर. रोमॅंटिक कॉमेडी प्रकारातील या चित्रपटात ऍनने साकारलेली भूमिका न्यूयॉर्कच्या एका फॅशन मॅगझिनच्या संपादिकेची. दक्षिण पॅसिफिकमधल्या एका बेटावर आपल्या बॉयफ्रेंडसोबत सुट्टीला गेलेली. बॉयफ्रेंडने प्रपोज केल्याने खूष असलेली. पण तिथे सुट्टीतही एक काम येते नि त्यामुळे हॅरिसन फोर्डबरोबर आठवडा एका जवळपास निर्जन बेटावर काढण्याची वेळ येते. तो आठवडा म्हणजे हा सिनेमा. बऱ्यापैकी सरधोपट रोमकॉम. पण ऍन हॅरिसन फोर्डच्या बरोबरीने लक्षात राहिली, खरे तर थोडी जास्तच.

त्यानंतर गेल्या अडीच दशकांत मात्र तिचे चित्रपट वर्षाला एखाद दोन, आणि त्यातही विशेष लक्षात राहण्यासारखे काही नाही असेच होत गेले.

तिच्या वैयक्तिक आयुष्यातही चढ-उतार, खाच-खळगे भरपूर होते. स्वतःच्या वडिलांनीच लैंगिक शोषण केल्याचा तिचा आरोप होता. स्वतःचे वडील बायसेक्शुअल असल्याचेही तिचे म्हणणे होते. तिच्या आईला ते आरोप खोटे वाटत होते. तिच्या वडिलांचा मृत्यू एड्सने झाला. तिला भावंडे चार, त्यातील तीन अकाली निवर्तली. ऍन तिशीत पोहोचत असताना एलन डीजनरेसबरोबर समलैंगिक संबंधांत गुंतली. ते चारेक वर्षे चालले. पंचवीस वर्षांपूर्वी मोठ्या स्टुडिओजचे मालक जुनाट वळणांचे होते. या संबंधांमुळे तिच्या करीअरला खूपच नुकसान पोहोचले असे ऍनचे म्हणणे होते.

मग दिशा बदलून ऍनने कोलमन लफूनबरोबर लग्न करून एका मुलाला जन्म दिला. मग घटस्फोट मग अजून काही.

'ड्रग्ज' घेण्याची तिला सवय होती. मानसिक आजारही तिशीतच बळावले होते. लहानपणाच्या अनुभवांमुळे हे झाले असे तिचे मत होते. शेवटच्या प्राणांतिक अपघातातही ती ड्रग्जच्या नशेत असल्याने अपघात झाला असे उपलब्ध माहितीवरून वाटते. निर्णायक पुरावा नाही.

छोटीशी भिंगरी. आपल्या जिवानुसार भिरभिरणारी. परिस्थिती हाताबाहेर गेली तर पाचफुटी वर्तुळाऐवजी दहाफुटी वर्तुळात भेलकांडणारी. ड्रग्ज, शरीरसंबंध, नैराश्य, त्यातून उसळण्याची क्षीण होत जाणारी जिगीषा.... काय चालले असेल तिच्या डोक्यात शेवटच्या जाणीवक्षणी?

ता.क. - अपघात झाला ५ ऑगस्ट २०२२ला. ऍन गेली १२ ऑगस्ट २०२२ला. ५ ऑगस्ट पासून १२ ऑगस्टपर्यंत ऍमेझॉनवर तिच्या आयुष्यावर अठरा पुस्तके प्रसिद्ध झाली. सगळी तिच्या विखंडित आयुष्याला कोचून कोचून मीठमसाला लावून सजवलेली. या अठरा लेखक/लेखिकांना अनुल्लेखाने मारावी की पायताणाने?