कथा - गणेश जन्माची

गौरीनंदन गजवदन महागणपती सर्व महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. भाद्रपदातील चतुर्थी ते चतुर्दशी या कालखंडामध्ये पृथ्वीतलावर त्यांचा निवास असतो अशी समजूत आहे. ते दहा दिवस आनंद आणि उत्साहाने भारलेले असतात, त्यापासून कुणीही अलिप्तं राहू शकत नाही. घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा अनेक पिढ्यांनी जपलेली आहेच. गणपतीची पुजा, आरती, प्रसाद सर्वजण हौसेने करतात.

लोकमान्य टिळकांनी पुणे शहरात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. स्वतंत्र्य प्राप्तीच्या पूर्वीचा तो काळ होता. त्या काळात गणेशोत्सवाचे स्वरूप ध्येयवादी होते, आणि जनजागृती हा मुख्य हेतू होता. काळानुरूप गणेशोत्सवाचे स्वरूप पुष्कळच बदलले आहे पण उत्साह मात्र तोच आहे. आधुनिक विज्ञान प्रमाण मानणारी तरुण पिढीसुद्धा उत्साहाने गणेशोत्सव साजरा करताना दिसते. परदेशस्थ भारतीयांनी देखिल ही परंपरा मनोभावे जपलेली आहे.  

गणपती उत्सव लोकप्रिय आहेच, त्याच प्रमाणे गणेश कथा देखिल आवर्जून वाचल्या, सांगितल्या आणि ऐकल्या जातात. पौराणिक कथा नेहमीच अद्भुत आणि चमत्काराने परिपूर्ण असतात. त्यातील प्रसंग, घटना इत्यादींची कारणमीमांसा करायची नसते. त्यातील रंजकतेचा आस्वाद घ्यायचा आणि आस्तिक असाल तर त्या देवी-देवतेला मन:पूर्वक नमन करायचे असते.   

तर अशा या सर्वप्रिय गणेशांच्या जन्माची ही कथा...

कैलास पर्वत हे महादेव शिव शंकर आणि देवी पार्वती यांचे निवासस्थान. 

कैलासपती आज त्यांच्या निवासस्थानी उपस्थित नव्हते . तसे ते नेहमीचे होते. परंतु आज देवी पार्वती काहीशा संचित आणि त्रस्त दिसत होत्या. निवास्थानाभोवती शिवगण होते. महालामध्ये देवींच्या सख्या होत्या. परंतु त्या गिरीकन्येचे चित्त काहीसे विचलित झालेले दिसत होते. त्यांचे सर्व आप्तं, माता, पिता, बंधू, भगिनी त्यांच्या सोबत नव्हत्या. कैलासशिखरावरील त्यांचे निवासस्थान सर्व लोकांपासून दूर होते. 

विचारात मग्न झालेल्या देवी सर्वांगाला चंदनाचा लेप करीत होत्या. काही काळानंतर करायच्या स्नानाची ती तयारी होती. पात्रामधील लेप चेहऱ्यावर लावीत असताना, त्यांनी काही निराळे करण्याचे योजले. बघता बघता त्या चंदनी लेपाची एक सुबक, सुंदर मूर्ती घडू लागली. मन लावून देवी त्या कलाकृतीला आकार देत होत्या. एका सुकुमार बालकाची मूर्ती त्यांनी साकारली होती.  

देवी पार्वती मोठ्या कौतुकाने त्या मूर्तीला न्याहाळीत होत्या. एकवार हसून त्यांनी मूर्तीच्या मस्तकी स्वत:चा हात ठेवला. जगत्जननीच्या मायेने त्या बालकाच्या मूर्तीमध्ये प्राण भरले.  जीवित झालेल्या कुमाराने मातेला प्रणाम केला. त्याला आशीर्वाद देत देवीने म्हणले,  

"कुमार, तुम्ही आमचे पुत्र. आता आम्हांस कसलीच चिंता नाही. आता या गृहाचे तुम्हीच अधिपती, याच्या रक्षणाची जबाबदारी तुम्हावर." 

असे म्हणून माता पार्वतीने त्या कुमाराला सर्व शस्त्रे, अस्त्रे बहाल केली. त्याला सांगितले, की कुणासही गृहामध्ये प्रवेश द्यायचा नाही. 

तो सुकुमार बालक प्रवेशद्वाराजवळ शस्त्र सज्ज होऊन थांबला होता. तेथे असलेले शिवगण कुतूहलाने त्याचे अवलोकन करीत होते. आणि त्याच वेळी डमरूचा नाद घुमू लागला. नंदीच्या गळ्यातील घुंगरांचा तालबद्ध आवाज येऊ लागला. साक्षात शिव शंकरांचे आगमन होत होते. 

महादेव मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. तिथे एक कोवळे बालक पाहून आचंभित झाले. त्यांनी पृच्छा केली, 

"बाळा कोण तू? इथे कुणाबरोबर आला आहेस?"

"मी पार्वती पुत्र आहे आणि मातेच्या आज्ञेवरून येथे थांबलेलो आहे." कुमाराने उत्तर दिले. तो पुढे म्हणाला,  

"मातेची आज्ञा आहे, आपण गृह प्रवेश करू शकत नाही. काही काळ आपणास इथेच थांबावे लागेल."

भगवान शंकरांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. एक लहान बालक त्यांना त्यांच्याच गृहामध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करीत होता. तेथील शिवगणांनी कुमाराला समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो लहानसा मुलगा, भलताच हट्टी, तो काही ऐकेना. 

अनेकांनी केलेल्या समजावणीचा उपयोग होत नव्हता. अखेर शंकरांनी त्यांचा त्रिशूळ हाती घेतला. तो बालक देखिल शस्त्र सज्ज होता. आधी सगळ्यांना वाटले शस्त्रे पाहून तो भयभीत होईल. परंतु त्याला कसलेच भय नव्हते. जगन्मातेचे आशीर्वाद त्याच्या मस्तकी होते. 

मग घनघोर युद्ध झाले. ब्रम्हा, विष्णू आणि इंद्रादी देव ते नवल पाहण्यास तेथे आले. देवी लक्ष्मीचे लक्ष देखिल या युद्धाने वेधले होते. माता सरस्वतीच्या वीणेचे झंकार मंदावले होते. नारद मुनी देखिल नारायणाचा जप थांबवून स्तब्ध झाले होते. 

ते युद्ध अनोखे होते. एका बाजूला साक्षात शिवशंकर होते. त्यांच्या डमरूच्या नादाने महासागरांमध्ये वादळे निर्माण होत असत, आणि त्यांच्या तांडवाने सारी पृथ्वी डळमळत होती. दुसऱ्या बाजूस एक सुकुमार, कोवळे बालक होते. परंतु आश्चर्य म्हणजे युद्धामध्ये तो लहानसा मुलगा, श्री शंकरांपेक्षा तसूभरही कमी नव्हता. निरनिराळ्या शस्त्रास्त्रांच्या प्रयोगाने सारे वातावरण कोंदून गेले होते. शिवगणांना प्रश्न पडला होता की कुमाराची मदत करावी? का भोलेनाथांची? अखेर शंकरांच्या   त्रिशूळाने बालकाच्या मस्तकाचा वेध घेतला,  कुमाराचे शिर धडावेगळे झाले होते. 

देवी पार्वतीचे तेथे आगमन झाले.  प्रवेशद्वाराजवळ  तिच्या पुत्राचा निष्प्राण देह होता. पार्वती मातेने अपार शोक केला. परंतु पुत्राची ती अवस्था पाहून देवी  अती क्रोधित झाल्या,  

"माझ्या पुत्राचा तुम्ही वध केलात. आता तिन्ही लोक नष्ट होतील... सर्वनाश होईल." देवी पार्वतीने शापवाणी उच्चारली होती, आता अखिल ब्रम्हांडाचा अंत निश्चित होता. 

आणि सर्वत्र हा:हाकार पसरला. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमधे प्रलय उसळला होता. सारे विश्व, अवघे चराचर भयकंपित झाले होते. देव, दानव, मानव, पशू, पक्षी भयाने हीन-दीन झाले होते. देवीने शाप मागे घ्यावा म्हणून सारे तिची विनवणी करीत , दयेची याचना करीत होते. परंतु त्या जगन्मातेला फक्त तिच्या पुत्राचा निष्प्राण देह दिसत होता.    

अखेर नारदमुनींनी शिवशंकरांना विनंती केली, "या महाभयंकर संकटात, तुम्हीच आमचे त्राते आहात. हा प्रलय थांबविण्याचे सामर्थ्य अन्य कुणाकडे नाही."

शिवशंकरांचा क्रोध आता निवळला होता. एका सुकुमार, कोवळ्या बालकाचा बळी घेण्यात कसला आलाय पराक्रम? जे घडले ते योग्य नाही हे आता त्यांच्या ध्यानी आले होते. काही क्षण त्यांनी विचार केला आणि शिवगणांना आज्ञा दिली,  

"येथून पूर्व दिशेकडे जा. जाताना जो पहिला जिवंत प्राणी दिसेल त्याचे शिर धडावेगळे करून इथे घेऊन या." 

महादेवांची आज्ञा घेऊन काही शिवगण पूर्वेकडे निघाले. थोडे दूरवर जाताच एक शुभ्र रंगाचा गजराज त्यांच्या दृष्टीस आला. गणांनी त्वरेने त्याचा शिरच्छेद करून त्याचे मस्तक हस्तगत केले आणि कैलासाकडे प्रयाण केले.  

भगवान, गजराजाचे शिर हाती घेऊन कुमाराच्या मृतदेहाजवळ आले. हलक्या हाताने ते शिर त्यांनी बालकाच्या स्कंधावर ठेवले, उजवा हस्त उंचावून आशीर्वादाचे शब्द उच्चारले. आणि एक नवल घडले. निद्रेमधून जागे व्हावे त्या प्रमाणे कुमार उठून बसला होता. परंतु त्याच्या स्कंधावर आता गजमुख होते. 

तिथे जमलेले सर्व देवी-देवता आणि शिवगण हर्षित झाले होते. स्वर्गातून पुष्पवर्षा झाली, डळमळणारी पृथ्वी स्थिरावली होती, महासागरातील वादळे शमली होती आणि थरथरणारे पाताळही शांत झाले होते.    

देवी पार्वतीचा दु:खावेग ओसरला होता पण अजूनही त्यांचे समाधान झालेले नव्हते.

"तुम्ही माझ्या पुत्राचे रूपच बदलले आहे. आता जन्मभर ही खंत मला बाळगावी लागणार आहे" देवी पार्वतीने त्यांचा रोष प्रकट केला होता. 

महादेव म्हणाले, "देवी तुमचा पुत्र महापराक्रमी आहे. बालवयात त्याचे असे अमाप कर्तृत्व पाहून आम्हांस परमसंतोष होत आहे. आज पासून मी त्यांस सर्व गणांचे आधिपत्य स्वाधीन करीत आहे. त्याची मातृभक्ती अमोलिक आहे, आणि आज्ञापालन करताना त्याने दाखविलेले धैर्य अतुलनीय आहे. असा सर्व सद्गुणांनी युक्त गुणेश, मातापित्यांना सुख देणारा आहे, त्यांस नेहमीच अग्रपूजेचा मान मिळेल. सर्व मंगल कार्यात त्याचे प्रथम आवाहन करण्यात येईल, कारण सर्व कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेला तो विघ्नहर्ता आहे."    

शिवशंकरांनी केलेली  पुत्राची स्तुती पार्वती देवींना सुखवित होती. त्यांच्या पुत्रास मिळालेल्या सन्मानाने आणि शिवशंकरांनी दिलेल्या वरदानामुळे, त्यांना अतीव समाधान प्राप्त झाले होते आणि त्यांचा रोष नाहीसा झाला होता.    

तेव्हापासूनच गौरी-शंकरांचा हा सुपुत्र, गणाधिपती गणेश नेहमीच अग्रपूजेचा मानकरी आहे. 

***