भविष्यवेध - २

मागील वेळेस भविष्यवेध या विषयी काही लिहिण्याची परवानगी व्यवस्थेकडून मिळवल्यावर एक धूसर रूपरेखा मांडली होती. त्यावर एकच प्रतिक्रिया, आणि तीही मूळ विषयाला लाजतबुजत नि ओझरता स्पर्श करणारी अशी आल्याने हे लिखाण किती जणांनी वाचले हे मोजून पाहिले.

आमच्यासारख्या 'सूत्राची ओळख पटलेल्या' मंडळींना या (आणि अशा) अनेक गोष्टी करता येतात एवढेच लिहितो.

तर प्रतिक्रियादात्याशिवाय हा लेख वाचायचा प्रयत्न आठ जणांनी केला. त्यातील तीन जण अनुक्रमे पाचव्या, अकराव्या आणि चौदाव्या ओळीनंतर सटकले. पाचव्या ओळीनंतर सटकलेली व्यक्ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सभासद होती. तिची सहनशक्ती पाचव्या ओळीनंतर संपली. अकराव्या ओळीनंतर सटकलेली व्यक्ती उबरची वाट बघताना मोबाईलवर वाचत होती. तेवढ्यात पावसाची जोरात सर आल्याने ती व्यक्ती आडोशाला जायला गेली आणि मोबाईल चिखलात पडला. चौदाव्या ओळीपर्यंत पोहोचलेली व्यक्ती हॉस्पिटलमध्ये बाकावर बसलेली होती. चौदा ओळी झाल्यावर त्या व्यक्तीच्या वडिलांचा देहांत झाल्याचा कल्लोळ सुरू झाला आणि वाचन थांबले.

उरलेल्या पाचांपैकी तिघे निद्रानाशावर डायझेपाम, अल्प्राझोलाम, एझोपिक्लोन अशा वेगवेगळ्या चक्रांतून फिरत होते तेव्हा त्यांना हा लेख दिसला. मेंढ्या मोजायच्या ऐवजी हे करून पाहू एवढ्याच माफक हेतूने ते इकडे वळाले होते. त्यांना झोप लागली.

उरलेले दोघे एका सरकारी आस्थापनेचा भाग आहेत. आंतरजालावर 'लक्ष ठेवणे' असे त्यांच्या कामाचे स्वरूप आहे. पण नक्की काम काय आहे याबद्दल काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे ते दोघेही आपल्या परमोच्च नेत्याबद्दल पुरेशा आरत्या ओवाळल्या जात नाहीत अशी शंका असलेल्या आंतरजाल संस्थळांवर नजर ठेवून असतात. 'मनोगत' त्यांच्या संशयित यादीत पहिल्यापासून आहे. मधून मधून एकाददुसऱ्या लेखाचा/प्रतिक्रियेचा अपवाद. पण त्या दोघा बिचाऱ्यांना 'मनोगत'वरचे बहुतेक लेख समजतच नाहीत. मग ते 'यूट्यूब'वर जाऊन तिथल्या क्लिप्सची देशभक्त आणि देशद्रोही अशी विभागणी करीत बसतात. तर त्या दोघांनी शेवटपर्यंत नजर रेटली पण काहीच न समजल्याने यात आपल्या परमोच्च नेत्याबद्दल काहीच नाही एवढीच खात्री करून घेऊन ते यूट्यूबवर गेले नि सादिक कप्पनच्या देशद्रोहाबद्दल मसाला गोळा करायला लागले.

थोडक्यात, या लिखाणाने एक किंचित प्रतिक्रिया सोडता काहीच घोळ केला नाही. त्यामुळे व्यवस्थेने पुढचे अजून थोडे लिहायला परवानगी दिली.

एक प्रतिक्रिया आली असल्याने एक महिना (९ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर) थांबावे लागले. तसा ऑगस्ट एकतिशी महिना असल्याने कालच स्लॉट ओपन झाला होता. पण व्यवस्था बऱ्याचदा 'छान प्रिंट' (फाईन प्रिंटचे गूगल भाषांतर; गेल्या लेखात मी एकही गूगल भाषांतर न वापरल्याने मला दंड झाला होता) मध्ये अडकवते - टाईम झोन, लेख टंकित करतानाची वेळ, लेख टंकित केला त्या संगणकाच्या सीमॉस बॅटरीची वेळ आदि. भानगड नको म्हणून थेट एक दिवस थांबलो.

तर भविष्यवेधाचे संकेत कसकसे मिळत असतात ते थोडे (अगदी थोडेसेच) उलग़डून लिहितो.

प्रातिनिधिक उदाहरण म्हणून 2FA कडे पाहू. Two Factor Authentication. ही सुविधा नसून अडचण आहे अशी बहुतेकांची समजूत करून देण्यात व्यवस्थेला यश आले असल्याने 'Remember Password' या मंत्रावर जनताजनार्दनाचा गाढ विश्वास बसला आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांना वेगवेगळ्या ऍप्सची 'सुविधा' आहे, ज्याचे व्यसनात रूपांतरही झालेले आहे.

तर, हे 2FA कसे वापरता येईल? किंवा खरे तर, यातून भविष्यसूचन कसे होते?

समजा एका व्यक्तीचा ईमेल अकाऊंट आहे. तिथे 2FA चालू केले तर काय होते? लॉग इन झाल्यावर मोबाईलवर वा दुसऱ्या ईमेलवर एक कोड (OTP - One Time Password) येतो. या OTP चे 'वाचन' कसे करायचे हे एकदा लक्षात आले की बऱ्याच गोष्टी कळू लागतात.

व्यवस्थेने मानवजातीची विभागणी अंकप्रधान आणि अक्षरप्रधान अशी केली आहे.

समजा हा OTP आकड्यांमध्ये आला. आणि समजा हा आकडा 127318 असला, तर याचे 'वाचन' कसे करायचे?

याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आणि कुठली पद्धत कुणी वापरावी हे ठरवण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत.

एक अतीसुलभीकरण केलेले उदाहरण घेऊ. तर 127318 हा आकडा OTP म्हणून आला. पहिल्या अंकापासून बघितले तर वर-वर-खाली-खाली-वर असा आकड्यांचा प्रवास दिसतो. यात किती वर नि किती खाली याला वेगवेगळे गुणांक देण्याच्या पद्धती आहेत. दुसऱ्या एका पद्धतीत दिलेला आकडा बायनरीमध्ये रूपांतरित करून त्यातील शून्यांची आणि एकांची संख्या मोजून त्यातील फरक काढला जातो. तिसऱ्या एका पद्धतीत दिलेल्या आकड्याचे दशमान पद्धतीतच बिंब घेतले जाते (983792 हे 127318 या आकड्याचे दशमान बिंब आहे) आणि त्यावर काही क्रिया-प्रक्रिया केल्या जातात.

हाच OTP अक्षरप्रधान व्यक्तीला आला तर या 127318 चे आधी अक्षरांत रूपांतर करून घ्यावे लागते. ही अक्षरे कुठल्या भाषेतली घ्यावीत याची व्यवस्थेतली नोंद पहावी लागते. आणि ही अक्षरे काढण्याच्या पद्धतीही अनेक आहेत. एका पद्धतीत 127318 हे A-B-G-C-A-H असे (व्यवस्थेत इंग्रजी भाषा नोंदली असेल तर) वाचले जाईल. मग यातील परत परत आलेल्या अक्षराला (इथे A) वेगळे गुणांक दिले जातील.

समजा हा OTP इंग्रजी अक्षरांत आला. आणि समजा हा अक्षर समूह चार अक्षरांचा आहे. उदाहरणार्थ BUJH. याचे 'वाचन' करण्याच्याही विभिन्न पद्धती आहेत.

अंकप्रधान मंडळींना या BUJH चे आधी अंकात रूपांतर करून घ्यावे लागते. तेही व्यवस्थेने दिलेल्या नोंदीनुसार होते. एका पद्धतीत BUJH चे अंकांतर 221108 (2-21-10-8) असे होईल. पण ते 22-11-08 असे वाचले जाऊ शकते.

अक्षरप्रधान मंडळींसाठी Vowels किती नि Consonants हे मोजणे ही एक पद्धत झाली. BUJH पैकी प्रत्येक अक्षरापासून सुरू होणाऱ्या रंगाच्या नावावरून अर्थ लावणे ही अजून एक पद्धत झाली. त्यात B पासून Blue, Black, Brown, Beige असे अनेक रंग आहेत. त्यातला कुठला घ्यायचा यासाठीही व्यवस्थेतली नोंद पहावी लागते.

तसेच वार-तारीख-महिना-वेळ-ऋतू याप्रमाणे साधकबाधक विचार (ऊर्फ calculation; गूगल भाषांतर) आणि पूर्वकल्पना (ऊर्फ plan; गूगल भाषांतर वापरल्याची अजून एक नोंद) बदलतात.

असो.

हे कुणालाच कळाले नसेल अशी आशा आहे.