म्हणींच्या गोष्टी : - (१) (२) (३) (४) (५) (६) (७)
मराठी भाषेचे शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे. विविध प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार आणि सुविचारांच्या अलंकारांची लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत. काही म्हणी रोजच्या संवादात अगदी सहजपणे वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात? त्यांच्या मागे काय कथा असतील? तर काही म्हणींच्या या गोष्टी …
मराठीतील म्हणी या अगदी नेमक्या आणि अचूक शब्दात आशय व्यक्त करणाऱ्या आहेत. एखाद्या अनुभवाचे वर्णन करण्यासाठी अनेक शब्द आणि वाक्ये खर्ची पडतात. पण तेच काम म्हणींच्या प्रयोगाने काही थोड्या शब्दातच आणि अधिक नेटकेपणाने करणे शक्य होते. आता ही एक सर्वपरिचित अशी म्हण आहे..
"चोरावर मोर"
म्हणीचा अर्थ : एखाद्या चलाख चोराच्या वरताण हुशारी दाखविणारा चोर. असाच अर्थ असणारी आणखी एक म्हण मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे, ती म्हणजे "शेरास सव्वाशेर" अर्थ तोच. एखाद्याची नुसती बरोबरी करायची नाही, तर त्याहून अधिक गुणवत्ता असल्याचे सिद्ध करायचे, मग ती बौद्धिक कुवत असो किंवा शारीरिक क्षमता. वरकरणी दोन्ही म्हणींचा अर्थ जरी समान असला तरी त्यात एक फरक आहे असे मला वाटते.
"चोरावर मोर" या म्हणीत चोर असा शब्द असला तरी चोरावर मात करून अजून जास्ती चोरी करणे इतकाच मर्यादित अर्थ नाही. इथे चोर म्हणजे दुर्गुणी, आढ्यताखोर पण चतुर असलेली व्यक्ती. असा माणूस, जो त्याच्या अक्कलहुशारीने इतरांना गंडा घालतो म्हणजे फसवतो. त्याची लबाडी कळून, समजून देखिल ती सिद्ध करता न आल्याने तो माणूस नियम आणि कायद्यांच्या पंजातून सहजी निसटतो. पण एखादा त्याच्यापेक्षाही चतुर माणूस त्याला त्याच्याच जाळ्यात अडकवतो, त्याच्याहून सरस ठरतो. म्हणून तो चोरावर मोर ठरतो.
शेरास सव्वाशेर या म्हणीत माणूस लबाड किंवा फसवणारा असेलच असे नाही, पण गर्विष्ठ असतो. त्याला मिळालेल्या यशाने तो आढ्यताखोर होतो, इतरांना तुच्छ लेखू लागतो. काहीवेळा त्याच्या सामर्थ्याचा वापर करून दुसऱ्यांना गुलाम करू पाहतो. त्या माणसाच्या वरताण गुण, कौशल्य असलेला एखादा त्याला मात देतो आणि सव्वाशेर ठरतो.
"चोरावर मोर" या म्हणीतील चोर रूढार्थाने चोरी करत नसेल. म्हणजे कुणाच्या संपत्तीचा अपहार करीत नसेल कदाचित.... पण तो लबाड असतो. एकाचे दोन करून किंवा अनेक दंतकथा बनवून इतरांना फसवतो. कधी ही फसवणूक केवळ मौजेखातर केलेली आणि निरुपद्रवी असते. परंतु कधी ती अत्यंत गंभीर स्वरूपाची असते, त्यात कुणाचे नुकसान होते, कुणाची बदनामी होते तर कुणाच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. असे अनेक चोर समाजात सभ्यतेचा बुरखा घेऊन वावरत असतात आणि संभावितपणे निष्पाप असल्याचे ढोंग करतात. बहुतेकवेळा त्यांचे नाटक यशस्वी होते, परंतु एखादी वेळ अशी येते जेव्हा तेच त्यांच्या जाळ्यामध्ये अडकतात, फसतात. कधी त्याच्याच चुकीमुळे तर कधी त्यांना भेटलेल्या त्यांच्यापेक्षा वरचढ हुशारी असलेल्या सज्जनांमुळे.
या म्हणीची मूळ कथा माहिती नाही. तिची उत्पत्ती कधी, कुठे आणि कशी झाली असेल सांगता येत नाही. परंतु ही सर्वत्र प्रचलित असलेली अशी म्हण आहे. या म्हणीची यथार्थता सिद्ध होईल अशी एक वाचलेली कथा -----
(वाचलेली, ऐकलेली कथा)
लहान मुलांना अकबर बिरबल च्या कथा फार आवडतात. प्रौढ माणसांनी देखील त्या वाचल्यास काहीच हरकत नाही. त्या कथांमध्ये नाट्य असतेच आणि जीवनात उपयोगी होईल अशी शिकवणूक देखील असते. तर ही कथा आहे हिंदुस्तानचे शहेनशहा अकबर आणि महाचतुर मंत्री बिरबल यांची.
बादशहा अकबर हे गुणग्राहक होते, त्यांच्या दरबारामध्ये नेहमीच गुणवंतांचा सन्मान केला जात असे. त्यांचा दरबार "नवरत्नांचा दरबार" म्हणून प्रसिद्ध होता, त्या पैकीच एक म्हणजे मंत्री बिरबल. बादशहा अकबर यांचा त्यांचे मंत्री बिरबल यांच्यावर पूर्ण विश्वास होता. खरे तर अकबर बादशहा मुसलमान तर बिरबल हिंदू. परंतु धर्म त्यांच्या मैत्रीच्याआड कधीच आला नाही. कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना बादशहा बिरबलला सल्ला विचारणारच, आणि बिरबलने दिलेला सल्ला नेहमीच योग्य ठरत असे.
बिरबलचे दरबारातील वर्चस्व अनेकांना खुपत होते. त्यांना दरबारात मिळणारे महत्त्व अनेकांना सहन होत नसे. पण काय करणार? बादशहांचा बिरबलवर दृढ विश्वास होता, आणि त्याला तडा जाईल असे काहीच घडत नव्हते. बिरबलकडून काही चूक घडेल हे अशक्यच होते.
बादशहांच्या बेगमसाहिबा देखील सध्या बिरबलवर नाराज होत्या. खरे म्हणजे पूर्वी काही अवघड प्रसंगी बिरबलने केलेल्या मदतीमुळे त्यांची सहीसलामत सुटका झालेली होती. बेगमसाहिबांनी देखील वेळोवेळी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली होती. पण सध्या निराळाच काळ होता, प्रश्न त्यांच्या बंधुराजांचा होता. त्यांच्या माहेरच्या नात्यातील त्यांचे एक बंधू दिलावरखान दिल्ली दरबारी आले होते. त्यांना तिथे काही उचित पद, मान सन्मान मिळावा अशी अपेक्षा होती, परंतु त्यात अडसर होता मंत्री बिरबल यांचा. कुणा विश्वासू, अनुभवी आणि कार्यकुशल दरबाऱ्याचे पद काढून घेऊन बादशहांच्या सालेसाहेबांना देण्यास बिरबलचा विरोध होता, आणि दरबारी कुठलेही उच्चं पद रिक्त नव्हते.
दिलावर खॉ नी दरबारातील काही मंत्री आणि अधिकारी यांच्या बरोबर संधान साधले. दिवसरात्र त्यांची चर्चासत्रे चालत. सर्वजण बिरबलाच्या दरबारातील वर्चस्वामुळे त्रस्त झालेले होते. अनेक दिवसांच्या विचारविमर्षानंतर सर्वानुमते ठरले की बिरबलाचाच काटा काढायचा. दरबारात बिरबल नसतील तर सालेसाहेबांच्या नियुक्तीला कुणीही विरोध करणार नाही. बेगमसाहिबांच्या शिफारशीने कदाचित मंत्री बिरबल यांचेच पद दिलावर खॉ ना बहाल करण्यात येईल. पण हे घडणार कसे? मंत्री बिरबल म्हणजे काही सर्वसामान्य व्यक्ती नव्हेत. सर्वजण विचार करून करून थकले, पण उपाय सापडेना. अखेर त्यांच्या चर्चांमधून एक नामी युक्ती त्यांना सुचली आणि तात्काळ त्याची कार्यवाही करण्यास आरंभ झाला. बादशहाचे हजाम अब्दुल मियॉ, जे अनेक वर्षांपासून बादशहाची सेवा करत होते, त्यांना पाचारण करण्यात आले. सर्व योजना त्यांना समजविण्यात आली आणि सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक रेशमी थैली त्यांना देण्यात आली. कामगिरी फत्ते झाल्यावर अजूनही बक्षिशी मिळणार होती. अचानक झालेल्या धनलाभाने शाही हजाम खूश झाले होते.
शाही हजाम महालाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता, कसल्यातरी विचारात गर्क असावेत, कारण महालातील सेवक समोर आले तरी हजामाने त्यांची नेहमीप्रमाणे खबरबात घेतली नव्हती.
"हुजूर .. शाही हजाम" म्हणत सेवकाने बादशहांना वर्दी दिली.
बादशहांनी अब्दुल मियॉ ना आत येण्यास फर्मावले आणि काहीशा नाराजीने बोलले,
"कुठे होता आपण इतके दिवस अब्दुल मियॉ? न काही खबर न काही निरोप? आम्हाला दुसऱ्या हजामाची व्यवस्था करावी लागली. तसे काही महत्त्वाचे काज होते तर सांगायचे होते, आम्ही ना नसती केली... तुम्हाला माहिती आहे."
अब्दुल मियॉ कुर्निसात करीत जरा घाबरतच म्हणाले,
"हुजूर, गलती झाली, माफी असावी. पण कारणच तसे घडले. ... त्याचे असे झाले की, मी माझ्या आब्बाजानना भेटण्यासाठी गेलो होतो.. जन्नत मध्ये"
"काय? अब्दुल मियॉ डोके ठिकाणावर आहे ना? इतकी जास्त शराब पिणे ठीक नाही" बादशहा जरा रागातच बोलले.
"हुजूर, मी बिलकुल होश मध्ये आहे.. खरे तेच बोलतोय" हजामाने उत्तर दिले.
बादशहा आश्चर्यचकित होऊन ऐकत होते. त्यानंतर हजामाने एक सुरस आणि रंजक कथा सांगितली, ज्यावर विश्वास ठेवणे कुणाही शहाण्या माणसाला शक्य झाले नसते. त्यांनी सांगितले ते जन्नत मध्ये त्यांच्या आब्बांना भेटण्यास गेलेले असता, खुद्द शहेनशहा-ए-हिंदुस्तान, म्हणजे बादशहा सलामत चे आब्बाहुजूर तिथे होते.
नित्याप्रमाणे अब्दुल मियॉ चा वस्तरा वेगाने चालत होता. काही वेळा वस्तरा बाजूस ठेवून, कैची हाती घेतली जाई. बादशहा अकबर त्यांच्या आसनावर विराजमान झालेले होते. डोळे मिटून आजच्या दिवसभराच्या वेळापत्रकाचा मनोमनी आढावा घेत होते. त्यांच्या अतिशय व्यस्त दिनक्रमामधले काही शांततेचे क्षण त्यांना मिळत असत जेव्हा ते हजामासमोर बसलेले असत. त्या वेळात इतर कुणाला तिथे यायला बंदी असे, वस्तरा आणि कैची सोबत अब्दुल मियॉ ची जुबान देखील तितक्याच वेगाने चालत असे... नेहमीच. बादशहांना देखील त्यांचे काही बोलणे मनोरंजक वाटत असे. दिल्ली शहरात घडणाऱ्या काही लहान मोठ्या घटना त्यांना समजत असत. सर्वसामान्यांचे प्रश्न, अडचणी काही वेळा त्यांना कळत असत. शाही कारभारावर जनता संतुष्ट आहे की नाही याचा आढावा घेता येत असे. पण आज शाही हजामाकडे एक वेगळीच कथा होती. बादशहा शांतपणे त्यांची कथा ऐकत होते.
बादशहांना आता या संभाषणाची मौज वाटत होती. त्यांचे विचारचक्र चालू होते. हजामाच्या बोलण्यामागे काही कारण असावे का? पण एक हजाम असे काय कारस्थान करू शकेल? एकतर ते पूर्ण शुद्धीत नसावेत, किंवा रात्री त्यांनी जास्त शराब घेतली असावी आणि त्याचा असर अजून उतरलेला नसावा. असे नसेल तर ते हेतुपूर्वक काही बनीबनायी, झूठी कहानी ऐकवत होते. पण कशासाठी?
अब्दुल मियॉ चा वस्तरा आणि जुबान सारख्याच वेगाने चालले होते.
"खाविंदांचे आब्बाहुजूर खूप नाराज दिसत होते. ते म्हणाले तिथे जन्नत मध्ये सारे सुख आहे, फक्त एका गोष्टीची कमी आहे असे म्हणाले" अब्दुल मियाँनी त्याची कथा पुढे सांगण्यास प्रारंभ केला.
"कमी आहे? जन्नत मध्ये? आणि कशाची?" बादशहानी विचारले.
"आब्बाहुजूर म्हणाले, ते जन्नत मध्ये गेल्यावर कुणी त्यांची खबर घेतली नाही. तसेच दिल्ली दरबारातील खबरबात त्यांना कुणी सांगत नाही, म्हणून ते नाराज आहेत. ते म्हणाले, कार्यबाहुल्यामुळे खुद्द हुजूर तर जाऊ शकणार नाहीत, परंतु त्यांचे विश्वासू महामंत्री बिरबल जर काही काळासाठी जन्नत मध्ये जाऊ शकले तर आब्बाहुजुरांना बरे वाटेल." हजामाने घाईने बोलणे संपवले.
त्याला भय वाटत होते, की असली कथा ऐकल्यावर बादशहा खफा झाले असतील. बोलता बोलता हातातील कैचीने बादशहांच्या केसांचा एक मोठा झुपका त्यांनी कापून टाकला, आणि काहीतरी चुकल्याचे त्यांच्या लक्षात आले, पण आता नाईलाज होता. हातातील कापलेल्या केसांच्या झुपक्याकडे अपराधी नजरेने बघत त्यांनी बादशहांकडे नजर वळवली. पण बादशहांचे लक्ष त्यांच्याकडे नव्हतेच. बिरबलचे नाव ऐकताच त्यांना बरेच काही ध्यानी आले होते, परंतु त्यांनी ते दर्शविले नाही. हजामाकडे वळून बघत त्यांनी विचारले,
"आब्बाहुजूर असे म्हणाले? खरेच आहे, आमच्या व्यस्त दिनक्रमामुळे आम्ही त्यांची खबर घेतलीच नाही. ठीक आहे.. त्यांनी बिरबललाच पाठविण्यास सांगितले का? का बरे? तुम्ही विचारले असेल ना? पण जन्नतचा रस्ता कुणाला माहिती आहे? जायचे कसे?"
"हुजूर बिरबल महाराजांचे दरबारातील महत्त्व ते जाणून आहेत .. आणि जन्नत मध्ये जाणे अगदी आसान आहे, बिरबल महाराज हिंदू आहेत, म्हणून त्यांच्या प्रथे प्रमाणे अग्नी द्यायचा, मुसलमान असते तर दफन करायचे, त्यात काय अवघड आहे?" शाही हजामाने तोडगा सुचवला.
"बरोबर आहे," असे म्हणत शहेनशहांनी संमती दर्शक मान डोलवली.
हजामाला संकटातून सुटल्याप्रमाणे आनंद झाला होता. एकतर चुकून जास्त कापले गेलेल्या केसांकडे हुजुरांचे लक्ष गेले नव्हते, आणि हजामाने सांगितलेल्या कथेवर त्यांनी विश्वास ठेवला होता. हजामाला भय वाटत होते की असली निरर्थक कथा सांगितली म्हणून बादशहा त्यांना सुळावर तर चढवणार नाहीत ना? पण तसे काहीच घडले नव्हते. हजामाला हायसे वाटले. हजामतीसाठी लागणारी उपकरणे ठेवलेली थैली त्याने गोळा केली आणि बादशहांना त्रिवार कुर्निसात करीत तिथून काढता पाय घेतला.
बादशहांच्या लक्षात आले होते की हे कुणाचे तरी कारस्थान आहे. कुणाचे असावे याचाही थोडा अंदाज आला होताच. पण पुराव्याविना कुणाला सजा देता येणार नव्हती.
नेहमीप्रमाणे दरबार भरलेला होता. बादशहांनी बिरबलला सामने येण्यास फर्मावले.
"बिरबल तुम्हाला एका महत्त्वाच्या कामगिरीवर जायचे आहे. जन्नत मध्ये आमच्या अब्बाहुजुरांची खबरबात तुम्ही घ्यायची आहे. समजले का? " प्रयासाने चेहरा गंभीर ठेवीत बादशहांनी आज्ञा केली.
बिरबलने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. बादशहांचा चेहरा गंभीर होता. त्यांनी उपस्थित असलेल्या इतर मानकऱ्याकडे पाहिले. मग बादशहापुढे मुजऱ्यासाठी झुकत खालमानेने ते म्हणाले,
"जी हुजूर, आम्ही जरूर जाऊ, पण प्रवास लांबचा आहे, तयारीकरता काही अवधी पाहिजे."
"मंजूर आहे" बादशहाने परवानगी दिली. त्यांना खात्री होती, बिरबल सुखरूप परत येईलच आणि असे कारस्थान रचणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढेल.
तीस दिवसांनंतर बिरबलच्या स्वर्गारोहणाचा मुहूर्त ठरला. दरबारातील काही सरदारांना आनंदाने आसमान ठेंगणे वाटू लागले होते. बेगमसाहिबा आणि त्यांचे बंधुराज देखील आनंदात होते. आता थोडेच दिवस राहिले... बिरबल आता कधीच पृथ्वीवर परत येणार नाही हे कळले, की सालेसाहेबांची दरबारातली जागा पक्की होणार होती.
बघता बघता तीस दिवस उलटले. बिरबल नेहमीप्रमाणे रोज दरबारी कामकाजात सहभागी होतच होते. कारस्थानी सरदार ते पाहून अस्वस्थ व्हायचे. ते बिरबलला अनेक वर्षे ओळखत होते. पितरांना भेटण्यासाठी स्वर्गात जायचे, या फोल कल्पनेवर त्यांनी विश्वास ठेवला कसा? याचेच त्या सरदारांना आश्चर्य वाटत होते. बिरबल काहीतरी युक्ती करून स्वर्गारोहण टाळेल असेच त्यांना वाटत होते, पण तसे काहीच घडले नाही.
स्वर्गारोहणाचा दिवस उगवला. राजवाड्याच्याच एका उद्यानात चंदनी लाकडांची भव्य चिता रचली होती. आजूबाजूचा परिसर तोरणे, माळा आणि फुलांनी शृंगारलेला होता. वातावरण गंभीर होते.
बिरबलने सर्वाकडे पाहून हात जोडले आणि बादशहांना मुजरा केला, त्यानंतर शांतपणे चितेवर आरूढ झाले. तिथे जमलेल्या सेवकांचे डोळे पाणावले होते. मध्येच कुणीतरी रडत असल्याचा आवाज येत होता. बिरबल डोळे मिटून, हात जोडून बसले होते. बादशहांनी आज्ञा करताच तिथे उपस्थित ब्राह्मणांनी चितेला अग्नी दिला. बघता बघता चहूबाजूंनी लाल केशरी ज्वाळा दिसू लागल्या, आणि चितेवर बसलेल्या बिरबलची मूर्ती दिसेनाशी झाली. शहेनशहांचा चेहरा देखील आता चिंताग्रस्त दिसत होता. बिरबल या दिव्यातून सुखरूप परत येईल ना? त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. बिरबलला निरोप देण्याकरता जमलेल्या जमावामध्ये दिलावर खॉ आणि त्याचे सहकारी होतेच. त्यांना त्यांचा आनंद लपविणे जमत नव्हते.
मग बरेच दिवस लोटले, काही महिने संपले. बिरबल परत येण्याची चिन्हे दिसत नव्हती. बंधुराजांना दरबारी पद बहाल करण्यासाठी बेगमसाहिबांचा तगादा चालूच होता. दिवसेंदिवस बादशहाची काळजी वाढू लागली होती. या कारस्थानामध्ये दरबारातील एक रत्न गमावले तर नाही ना? अशी भीती त्यांना सतावत होती.
एकदिवस नेहमीप्रमाणे दरबारी कामकाज चालू होते. बिरबल नसल्यामुळे बादशहांना ते निरस आणि कंटाळवाणे वाटत होते. तितक्यात मुख्य प्रवेशद्वारापाशी काही गडबड ऐकू येऊ लागली. बादशहांनी तेथील रक्षकांना काय प्रकरण आहे ते बघण्याकरता पाठविले. काही काळानंतर रक्षक परत आले. त्याच्या मागोमाग थकलेला, चुरगळलेली वस्त्रे परिधान केलेला आणि खूप मोठ्ठी दाढी असलेला एक गृहस्थ होता. रक्षक त्याच्याकडे हात दाखवून काही सांगणार तितक्यात बादशहा अत्यानंदाने म्हणाले,
"ओ हो .. बिरबल अखेर तुम्ही परत आलात तर ? "
हात समोर बांधून आणि खाली माना घालून उभ्या असलेल्या दरबारी मानकऱ्यांनी चमकून मान उंचावून पाहिले. केव्हढे आश्चर्य? साक्षात बिरबल त्यांच्यासमोर उभे होते.. अगदी सुखरूप. काहींना मनापासून आनंद झाला होता, पण दिलावर खॉ आणि त्याचे पाठीराखे सरदार मात्र भयचकित झाले होते. त्यांच्या नजरेसमोर बिरबलने पेटलेल्या चितेत प्रवेश केला होता. मग ही भुताटकी तर नाही?
बिरबलने त्याच्या जन्नत च्या प्रवासाचा सर्व वृत्तांत कथन केला. आब्बाहुजुरांचा निरोप देखील सांगितला. शेवटी ते म्हणाले,
"हुजूर जन्नत मध्ये सर्व सुख-सुविधा आहेत, परंतु फक्त एक कमी आहे." सर्वजण उत्सुकतेने बिरबलचे अनुभव कथन ऐकत होते. बिरबलने पुढे सांगितले,
"जन्नत मध्ये चांगला असा हजाम नाही, त्यामुळे मोठीच अडचण झाली आहे. माझा अवतार तर आपण पाहतंच आहात. आब्बाहुजुरांना अब्दुल मियॉ ची राहून राहून याद येते. ते म्हणाले अब्दुल मियॉ मोठे कसबी हजाम आहेत. त्यांना एकवार तिकडे पाठविले तर बरे होईल असे अब्बाहुजुरांनी सांगितले आहे."
बिरबलचे बोलणे ऐकताना तिथे उपस्थित असलेल्या कारस्थानी सरदारांच्या काळजाचे पाणी होत होते.
बादशहांनी तेथील एका सेवकाला शाही हजामाला वर्दी देण्यास सांगितले. निरोप मिळताच अब्दुल मियॉ घाईने राजवाड्यावर हजर झाले होते. खाविंदांनी असे मधेच का बोलावले असेल या विचारात ते गर्क होते. नेहमीप्रमाणे महालाकडे न जाता दरबारी जाण्यास सांगण्यात आले तेव्हा त्यांना फारच आश्चर्य वाटले. हे काहीतरी नवीनच घडत होते.
"अब्दुल मियॉ, तुमच्यासाठी आब्बाहुजुरांचा निरोप आहे. तुम्हाला जन्नत मध्ये बोलावले आहे त्यांनी. तुमच्याइतका कुशल हजाम त्यांना जन्नतमध्ये अजूनपर्यंत मिळालेला नाही."
बादशहाचे बोलणे ऐकताच हजामाच्या डोक्यावर जणू वीज कोसळली होती.
"हुजूर, माफी हुजूर, रहम किजीये!" असे म्हणून अब्दुल मियॉ शहेनशहांना विनवणी करीत होते. सोन्याच्या काही थोड्या मोहरांसाठी त्यांनी भलतीच आफत ओढवून घेतली होती.
हजामाचे आक्रंदन बघून सर्वजण चकित झाले. बिरबल तर स्वतः जन्नत मध्ये जाऊन सुखरूप परत आले आहेत, मग याला कसले भय वाटते आहे?
बादशहा म्हणाले, "अब्दुल मियॉ सारे काही सांगून टाका, खरे सांगाल तर सजा करणार नाही."
हजामाने त्यांची कर्मकहाणी कथन केली. शाही हजामाला या कारस्थानात सामील करून घेणारे सरदार हळू हळू तेथून निघून जाण्याच्या प्रयत्नात होते, तितक्यात दरबारातील रक्षकांनी त्यांना कैद केले. त्यांचे सारे कारस्थान उघडकीस आले होते. या कारस्थानात खुद्द बेगमसाहिबा देखील सामील आहेत हे सत्यदेखील सर्वांना माहिती झाले होते. आता बेगमसाहिबांना भय आणि शरमेमुळे बादशहासमोर येणे कठीण झाले होते.
बादशहाने बिरबलला शाही बगिच्यामध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. बिरबलने नेमकी काय युक्ती केली ते जाणून घेण्यास ते उत्सुक होते. बगिच्यामधील एका मंडपामध्ये ठेवलेल्या आसनांवर दोघे आसनस्थ झाले होते. सरबताचे प्याले तबकांमध्ये ठेवून सेवक बाजूला उभे राहिले होते.
"बोला बिरबल, कसा केला तुम्ही जन्नतचा प्रवास?" बादशहांनी हसत हसत विचारले.
"हुजूर फार काही अवघड नव्हते. शाही उद्यानापासून माझ्या घरापर्यंत मी एक भुयारी मार्ग तयार करून घेतला. त्या मार्गाचे प्रवेशद्वार उद्यानामध्ये जिथे खुलत होते, तिथेच चिता रचली होती. चितेमध्ये प्रवेश केल्यावर ज्वाळांनी ती चिता वेढली गेली, आणि मी तिथल्या प्रवेशद्वाराने भुयारात प्रवेश केला. कंदील आणि मशाली घेऊन, माझे विश्वासू सेवक तिथे हजर होते. त्याच्या समवेत चालत चालत सरळ माझ्या घरी पोहचलो. त्यानंतर घराबाहेर येण्याचे टाळले, आणि पुरेसा अवधी सरला आहे याची खात्री करून दरबारामध्ये हजर झालो. घरी असताना माझ्या गुप्तहेरांकरवी शाही हजामावर मी पाळत ठेवली होती. कारण एक न्हावी उगीचच एव्हढे मोठे कारस्थान करणे अशक्य वाटत होते. आणि दुसरे म्हणजे शाही हजामाचे माझ्याशी वैर असण्याचे काही कारणच नव्हते. त्यामुळे कुणाच्यातरी सांगण्यावरूनच त्याने हे धाडस केलेले असणार याची मला पुरेपूर खात्री होती. त्याच्याकडे नित्यनेमाने येणाऱ्या लोकांवर नजर ठेवली असता, त्याचे सहकारी कोण असावेत याचा सहजपणे उलगडा झाला. पुढचे सारे आपणास माहिती आहेच." बिरबलने सविस्तरपणे त्याने केलेल्या शोधमोहिमेचा आढावा घेतला.
"अर्थात ... परंतु तुम्ही चितेमध्ये प्रवेश केल्यानंतर, बरेच दिवस तुम्ही दरबारी आला नाहीत तसे आम्हाला भय वाटू लागले की प्रयोग फसला की काय? पण तुम्ही तर चोरावर मोर ठरलात. शाबास बिरबल!" बादशहा कौतुकाने म्हणाले.
बादशहांनी केलेली स्तुती नम्रपणे स्वीकारून बिरबल हलक्या आवाजात म्हणाले,
"क्षमा करावी हुजूर, परंतु या सर्व घडामोडींमध्ये बेगमसाहिबा नाराज असणार."
बादशहा अकबराच्या कपाळावर आठ्यांची जाळी झाली होती. थोड्या त्रासिकपणे, थोड्या काळजीने ते म्हणाले,
"खरे आहे, बेगमसाहिबा नाराज आहेत, परंतु त्यांच्या खुशीखातर आम्ही अपराध्यांना तसे मोकळे सोडणार नाही. न जाणो पुनः ते कारस्थान रचतील. नाही, त्यांना सजा व्हायलाच पाहिजे."
काही क्षण तिथे शांतता पसरलेली होती. काहीवेळाने बिरबलने बोलण्यास सुरुवात केली.
"जहॉपन्हा , आपण त्यांच्या बंधुराजांना खिल्लत आणि किताब देऊन दख्खन मध्ये पाठवून द्यावे. त्यामुळे तुमचा गृहकलह शांत होईल आणि खानसाहेब दरबारापासून दूर राहिल्याने, ते आणि त्यांचे साथीदार येथील कामकाजामध्ये दखलअंदाजी करू शकणार नाहीत."
बिरबलने सल्ला दिला, आणि नेहमीप्रमाणे बादशहांनी देखील तो स्वीकारला.
***
(उपकथा)
(समाजात वावरत असताना विविध प्रकारच्या माणसांबरोबर व्यवहार करण्याचा प्रसंग येतो. माणसे ओळखणे, एक कलाच आहे, ती सर्वांनाच साधेल असे नाही. काही माणसे मितभाषी असतात तर काही बडबडी, काही हसतमुख तर काही गंभीर. पण हे झाले बाह्यरूप, माणसाचे अंतरंग समजणे अती अवघड. माणसे जितकी समाजाभिमुख तितके त्यांचे मनॊव्यापार क्लिष्ट असतात. कारण समाजात योग्य, साजेसे वर्तन करण्याकरता अनेकवेळा माणूस स्वतःच्या व्यक्तिमत्वावर वेगवेगळे मुलामे लावतो, चेहऱ्यावर निरनिराळे मुखवटे चढवतो. मग असा माणूस समजणे दुरापास्त होऊन बसते. पण अशा व्यक्ती दुर्मिळ नसतात, आपल्या आजूबाजूला त्या वावरत असतात. काहीवेळा त्यांची लबाडी निरुपद्रवी असते, मानवी स्वभाव म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य असते. पण काही वेळा मात्र त्यांच्या लबाडीची किंमत कुणालातरी मोजावी लागते.)
"आई ती सुलेखा आली तर तिला सांग, मी आज ताईकडे जाणार आहे, आणि उद्याच घरी येईन म्हणून."
विनीताने पायामध्ये चप्पल अडकवताना आईला सांगितले.
"अग पण ताई आणि भावजी वणीला गेले आहेत, देवीची ओटी भरण्याचा नवस केला होता ना तिच्या सासूबाईंनी? तिच्या घरी आज कुणीच नसणार आहे, तू काय करशील तिथे जाऊन?" आईने विनीताला थांबवीत सांगितले.
"ते माहिती आहे गं मला. मी आत्ता या नोट्स ची झेरॉक्स कॉपी करून घ्यायला चालले आहे, आणि परत घरीच येणार आहे. पण ती सुली आहे ना, मला बिलकुल आवडत नाही. सारखी अभ्यास अभ्यास करत असते. म्हणून ... " विनीताने कारण सांगितले.
आई चकितच झाली. विनीताची आई तशी साधी भोळी गृहिणी होती. अशी लबाडी करणे तिला आवडले नाही. ती म्हणाली,
"हे बघ विनीता , मी तिला असे काही सांगणार नाहीय, आणि तू देखील तसे करू नकोस."
आईचे बोलणे ऐकून रागाने ती म्हणाली," असली कसली आई आहेस तू? मला जरादेखील मदत करीत नाहीस?"
आणि इतके बोलून घराबाहेर निघून गेली.
विनीता प्रथम वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी, अभ्यासात तशी बरी होती, पण स्वभाव जरा तऱ्हेवाईकच. तिचे कधी आणि कशाने बिनसेल सांगता येणार नाही. विनीताचे आई वडील आधुनिक विचारसरणीचे होते. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींवर कसलीच बंधने लादली नव्हती, की घरकामाचा बोजा त्यांच्यावर टाकला नव्हता. थोरली सुनीता सिव्हिल इंजिनियर होऊन एका बांधकाम कंपनी मध्ये नोकरी करत होती. चांगले शिक्षण, नोकरी असूनही तिच्या स्वभावात ऋजुता होती, नम्रता होती. ती तिच्या सासरी चांगली रुळली होती. पण विनीताबद्दल तिच्या आईवडीलांना काळजी वाटत असे.
आज सकाळपासून विनीताचे काहीतरी बिनसले होते. चेहरा उतरलेला आणि काहीसा त्रासलेला दिसत होता.
"विनीता, अशी नुसतीच का बसलीयेस? ताईकडे जायचंय आपल्याला. तिच्याकडे बरेच पाहुणे यायचे आहेत, तिला जरा मदत लागणार आहे. चल आवर लवकर." आई म्हणाली.
बोलता बोलता तिची लगबग चालू होती. लेकीकडे जाताना घ्यायच्या वस्तू ती तिथेच जेवणाच्या मेजावर जमा करत होती. पुरणयंत्र, अंगणातल्या अळवाची पाने, खोवलेला नारळ असे काही बाही होते. विनीता रडवेल्या आवाजात म्हणाली,
"आई डोकं खूप दुखतंय गं ! ठणकतंय अगदी. पाय पण दुखतायत आणि थंडी वाजते आहे."
आई काळजीने तिच्याजवळ आली. तिच्या कपाळावर हात ठेवीत म्हणाली,
"ताप तर नाहीये, पण थंडी वाजते म्हणते आहेस .... ही तर थंडीतापाची लक्षणे. नेमके आजच आजारपण काढले आहेस. आता काय करायचे? बिचारी सुनीता लहानग्या सुजय ला सांभाळून कसे करेल सगळे?"
आईची तगमग होत होती. विनीताची काळजी होतीच, पण तिकडे सुनीताचे कार्य कसे पार पडेल याचीही चिंता होती. तिने विनीताला औषधाची गोळी आणि पाणी दिले. त्रिभुवनकीर्तीची बाटली तिच्याकडे देत म्हणाले यातली आत्ता एक घे, बरे वाटेल. मी सुनीताला फोन करून कळवते... असे आई म्हणत होती, तर लगेच तिला थांबवत विनीता म्हणाली,
"नाही.. नको, तू जा ताईकडे. मी माझी नीट काळजी घेईन."
तिचे बोलणे ऐकून आई थांबली, "खरं म्हणतीयस ना? नाही तर मग तक्रार करशील."
"नाही गं -- जा तू, मी व्यवस्थित राहीन" विनीताने आश्वासन दिले.
आई सुनीताकडे गेली, आणि ती जाताच जणू जादूच झाली. विनीताच्या रडवेल्या चेहऱ्यावर उत्साह आला. तिने तिच्या मैत्रिणींना फोन करून घरी यायला सांगितले, आणि कोपऱ्यावरच्या इडलीवाल्याकडून पार्सल आणण्यासाठी निघाली.
अशी होती विनीता ... थोडी लबाड पण हुशार. बेमालूमपणे नाटक करणे तिला चांगले जमत असे.
विनीताच्या घरी गेले दोन तीन दिवस उत्साहाचे वातावरण होते. घराची साफसफाई करून झालेली होती. दिवाणावर नवीन चादर दिसत होती. सोफा, कुशन्स, लोड-तक्के यांच्यावर नवीन आवरणे/आच्छादने दिसत होती. तिच्या सासूबाईंनी चकली, चिवडा, लाडू असे काही पदार्थ देखील वनिता बाईंकडून करवून घेतले होते... अगदी स्वतःच्या देखरेखीखाली.
अरे हो...सांगायचे राहूनच गेले की. विनीताचे शिक्षण पूर्ण होऊन ती "कुलकर्णी आणि कुलकर्णी" या सनदी लेखपालांच्या कार्यालयात कनिष्ठ लेखपाल या पदावर रुजू झालेली होती. तिचा विवाह संपन्न होऊन, तिची ओळख आता सौ विनीता दामले अशी होती. सासरी नव्याची नवलाई संपून वादाची ठिणगी कधी पडली हे समजलेच नव्हते. सासरच्या घरात वावरताना विनीता फारशी आनंदी दिसत नसे. तिला दिवसभर नोकरीनिमित्त घरापासून दूर राहावे लागत असे म्हणून बरे, नाही तर काही खरे नव्हते.
तिचे थोरले दीर आणि जाऊ त्यांच्या दोघा मुलांबरोबर घरी येणार होते. तिचे दीर आधी शिक्षणाकरता कॅनडामध्ये गेले होते आणि नंतर तिथेच स्थायिक झाले होते. वर्ष, दोन वर्षातून एकदा ते भारत भेटीसाठी येत असत. सध्या त्यांच्याच स्वागताची तयारी चालू होती.
मनगटावरील घड्याळाचा पट्टा नीटनेटका करीत विनीता घराच्या दाराकडे निघाली होती, तितक्यात तिच्या सासूबाई तिथे आल्या, तिला म्हणाल्या..
"विनीता येताना मटार आणशील का? आपण ते रात्री सोलून ठेवूया, म्हणजे उद्या उसळ करता येईल. आणि उद्या तू रजा घेणार आहेस ना?"
"मटार आणीन की, किती? ५किलो ना? पण उद्या रजा घेणे नाही जमणार मला... ते लोक महिनाभर आहेत ना इथे? मग पुढच्या आठवड्यात घेईन मी रजा" विनीता काहीशी तुटकपणे म्हणाली. तिला तो सर्व प्रकार असह्य होत होता. तसेही स्वतःखेरीज इतर कुणाचे कोडकौतुक करणे तिला माहितीच नव्हते.
ऑफिस मध्ये नेहमीच्या सवयीने तिचे काम चालू होते, परंतु आज तिचे त्यात तितकेसे लक्ष लागत नव्हते. गेले आठ दहा दिवस घरात नुसता गोंधळ चाललेला होता. घरातील बाकी सदस्य आनंदात होते. नातेवाईकांच्या भेटीगाठी, मित्रमंडळींच्या गप्पा इत्यादीमध्ये सारे गर्क होते. विनीताला देखील ते त्यात सामील करून घ्यायचा प्रयत्न करीत होते, पण ती अलिप्तच रहात असे. अजून काही दिवस हा प्रकार सहन करणे तिला जमेल असे वाटत नव्हते. आणि तिला एका नामी कल्पना सुचली.
"चालेल ... असेच करते मी आता," ती स्वतःशीच बोलली.
संध्याकाळी विनीता घरी आली तेव्हा तिचा चेहरा उतरलेला होता. तिच्यावर कसलातरी असह्य ताण असावा असे दिसत होते. तशी घरात ती विशेष कुणाशीच जास्ती बोलत नसे, पण आज तिचा अबोला अगदी जाणवण्या इतका होता.
"का गं ? काय झाले तुला? बरे वाटत नाही का?" सुमित ने विचारले.
"नाही मी ठीक आहे, ..पण आईची तब्येत ठीक नाहीये रे, म्हणजे तिने तसे काही सांगितले नाही. मीच ताईला फोन केला होता, तर ती म्हणाली आईला डॉक्टरकडे न्यायचे आहे. मला फार काळजी वाटते आहे" विनीता म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी यायला लागले होते.
"इतकी काळजी करू नकोस, तसे काही असते तर तुला कळवले असते ना? नाहीतर असं कर, तू आईकडे जाऊन ये दोन चार दिवस. तुझी काळजी दूर होईल, आणि आई बाबांना बरे वाटेल. मी पण आलो असतो पण वरुण आणि श्रुती आले आहे त्यामुळे.." सुमित मनापासून बोलत होता. त्याला विनीताबद्दल खरंच सहानुभूती वाटत होती.
"मला कळतंय ते.. पण तुझी आई आणि घरातले सगळे काय म्हणतील? घरी पाहुणे आलेले असताना मी.." विनीता मानभावीपणाने म्हणाली.
"काही म्हणणार नाही कुणी, तू जा आणि मला कळव काय आहे ते" सुमितने तिला आश्वासन दिले.
दुसऱ्या दिवशी विनीता तातडीने माहेरी जाण्यासाठी निघाली. वैष्णोदेवी ट्रॅव्हल्स ची बस कल्याणकडे निघाली आणि विनीताने सुटकेचा निःश्वास टाकला.
पुढचा पूर्ण आठवडा ती कल्याणमध्येच होती. तिच्या आईला अर्थातच काही आजार नव्हता. तिला डॉक्टरकडे फक्त रूटीन चेक अप साठी जायचे होते, सुनीताने तसेच सांगितले होते. पण विनीताने त्याचा फायदा करून घेत घरच्या गोंधळातून स्वतःची सुटका करून घेतली होती. असे वागणे, करणे चुकीचे आहे, यालाच लबाडी म्हणतात, असे तिला अजिबातच वाटले नव्हते. तिची सद्सदविवेकबुद्धी तिला त्रास देत नव्हती.
"कुणी केलाय हा सगळा घोटाळा? कुणाकडे काम होते मेडिस्टारचे? माहिती आहे ना किती महत्त्वाचे क्लायंट आहेत ते आपले? गोखले साहेब मला फोन करताहेत, त्यांना काय उत्तर देणार आहे मी?"
हातातली फाइल समोरच्या टेबलावर टाकून कुलकर्णी बोलत होते, त्यांच्या संतापाचा पारा चढलेला होता.
"दामले मॅडम कडे होते त्यांचे काम सर." ऑफिस मध्ये नव्यानेच आलेला सोनार म्हणाला.
कुलकर्णींनी विनीताकडे पाहिले, "तुम्ही केलंय का हे ? मग इतका वेळ विचारतो आहे तर गप्प का राहिलात? आता या सगळ्या नोंदी नव्याने करून घ्या आणि मग बॅलन्स शीट करायला घ्या. कारण चुका शोधण्यात भरपूर वेळ वाया जाईल... आज मंगळवार आहे . शुक्रवार पर्यंत सर्व काम पूर्ण व्हायला हवे ... मग मी ते तपासून सोमवारी किंवा मंगळवारी गोखल्यांना बोलावून घेईन" कुलकर्णी म्हणाले.
नेहमी शांत आणि मृदू स्वरात बोलणारे कुलकर्णी काहीशा चढ्या आवाजात, रागाने बोलत होते.
"पण सर ..." विनीताने बोलण्याचा प्रयत्न केला. तिने शुक्रवार आणि शनिवार ची रजा घेतली होती. विनीता, सुमित आणखी काही जण मिळून महाबळेश्वरला जाणार होते. पण आत्ता रजेबद्दल बोलणे योग्य नाही हे तिला कळत होते.
"नाही मला काही कारणे नको आहेत... शुक्रवार पर्यंत सर्व पूर्ण व्हायलाच पाहिजे" कुलकर्णी अधिकारवाणीने बोलले.
"पण सर हे काम मी केलेले नाहीये... मेडिस्टार चे काम आधी पाटणकर बघत होते... ते रजेवर गेले आहेत म्हणून सोनार कडे दिले होते ते काम" विनीता घाईघाईने बोलली.
तिचे बोलणे ऐकून सोनारच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडी भीती दिसत होती.
"मॅडम ... असं काय बोलता आहात? सुरुवातीच्या थोड्या नोंदी मी केल्या आहे.. पण बाकी सर्व तुम्हीच केले ना?" सोनार म्हणाला.
"नाही सर... त्यानेच सर्व केले होते.. आणि शेवटची आकडेमोड मी केली आहे. पण मला मिळालेला डेटा चुकीचा असल्याने ती सर्व कॅल्क्युलेशन्स चुकली असतील" सोनारकडे न बघता विनीताने तिची बाजू मांडली.
कुलकर्णींचा चेहरा त्रासिक झाला होता.
"हे बघा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप नकोत आता. काम वेळेत पूर्ण होणे जरुरीचे आहे. एक प्रतिष्ठित क्लायंट मला गमवायचा नाहीये.. सोनार सुरुवातीचे काम तुम्ही केले होते ना? .. मग तुम्हीच ते परत पहिल्यापासून करा. मॅडम त्याला मेडिस्टारच्या सर्व फाइल्स द्या" एव्हढे बोलून कुलकर्णी तिथून निघून गेले.
सोनारने मुकाट्याने समोरच्या कळफलकावर बोटे चालवण्यास सुरुवात केली. सोनार खरं बोलत होता, पण विनीताने नेहमीच्या कौशल्याने स्वतःवर येणारी जबाबदारी त्याच्यावर सोपविली होती. ऑफिस मध्ये तो नवीन होता, त्यामुळे कुलकर्णींनी देखील विनीताचे म्हणणे ग्राह्य मानले होते.
नंतरचा पूर्ण आठवडा सोनार मेडिस्टारचे काम करत होता. ऑफिस ची वेळ संपली तरी तो त्याच्या जागेवरच बसलेला दिसत असे. तिथे काम करणारे बाकी कर्मचारी, जमेल तशी त्याला मदत करीत असत... पण विनीताने मात्र तिकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. ती सोनारची पहिलीच नोकरी होती. कुलकर्णी तसे सज्जन आणि समजूतदार होते, परंतु व्यवसायाच्या दृष्टीने असे अकार्यक्षम कर्मचारी धोकादायक होते. पुढच्याच महिन्यात सोनारला नोटीस मिळाली होती.
ऑफिस मधील कर्मचारी अस्वस्थ झाले होते. सोनारवर अन्याय झाला आहे असेच सर्वांचे मत होते. पण बोलणार कोण? आणि कसे? या घटनेने एक मात्र घडले होते, ऑफिस मध्ये विनीताच्या बद्दल सर्वांच्या मनात नाराजी निर्माण झाली होती. अर्थात विनीताला त्याबद्दल काहीच वाईट वाटत नव्हते. आजवर असे अनेकदा झाले नव्हते का? तिने तर स्वतःच्या सख्ख्या बहिणीला देखील खोटे ठरवले होते. सुनीताने दिलेल्या चुकीच्या निरोपामुळे, घरात पाहुणे असताना तिला कल्याणला जाणे भाग पडले, असेच तिने भासवले होते. आईच्या शब्दाखातर सुनीताने त्याविरोधात अवाक्षर उच्चारले नव्हते. आणि तिच्या जावेने, श्रुतीने देखील मनातला संशय मनातच ठेवला होता. त्याचे असे झाले, घरात सर्वजण श्रुतीच्या पाककौशल्याची स्तुती करीत होते. श्रुतीने अगदी हौसेने मटर-पनीर करण्याचा घाट घातला होता. पण कसे माहिती नाही, नेमके त्या दिवशी त्यात मीठ जास्ती झाले होते.
विनीताचे नशीब खरोखर चांगले होते, की अशा काही अवघड प्रसंगातून ती सही सलामत निभावून जात असे. मग तिचा स्वतःच्या बुद्धिमत्तेवरील विश्वास अजूनच दृढ होत असे. दर वेळी ती कुणाला तरी दोष देऊन नामानिराळी होत असे. काही वेळेला तिची लबाडी कळत असूनही लोक गप्प रहात, तिने दिलेला दोष स्वीकारीत. पण विनीताला काहीच पर्वा नसे, तिची वेळ साजरी होण्याशी तिला मतलब होता.
आज ती तिच्या ऑफिसमध्ये कामात मग्न होती. तिच्या समोरचे सोनारचे टेबल अजूनही रिकामे होते. इतक्यात बाजूचे काचेचे दार उघडून एका मध्यमवयीन स्त्रीने प्रवेश केला. हातातील फाइल सावरत तिने विनीताला विचारले,
"देशपांडे?"
देशपांडे सीनियर अकौंटन्ट होते आणि व्यवस्थापक देखील. विनीताने उजवीकडे हात दाखवीत म्हणाले,
"इथून सरळ जा आणि उजव्या बाजूची दुसरी केबिन. "
"थँक यू !" असे म्हणत ती स्त्री तिथून पुढे गेली.
असेल कुणी नवीन क्लायंट, असेच सर्वांना वाटत होते. परंतु काही वेळाने त्या बाई परत येऊन सोनारच्या रिकाम्या जागेकडे गेल्या. देशपांडे देखील तिथे आले होते ते म्हणाले,
"या सौ. फणसळकर बरं का, आजपासून इथे काम करतील. सी.ए. आहेत, आधी चंद्रात्रे इंडस्ट्रीज मध्ये नोकरी करीत होत्या" देशपांडेंनी बाईंची ओळख करून दिली.
फणसळकर बाई ऑफिस मध्ये थोड्या कालावधीतच चांगल्या रुळल्या होत्या. त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल सर्वांनाच आदर होता. त्यांची कार्यपद्धती अगदी नेमकी आणि अचूक होती. कुठलीही माहिती त्या अगदी थोड्यावेळात देऊ शकत असत. त्यांच्या गुणांमुळे लवकरच कुलकर्णी आणि कुलकर्णी च्या अतिशय विश्वासू कर्मचारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. कार्यालयातील कर्मचारी वर्गाचे अघोषित नेतृत्व त्यांच्याकडे आले होते.
हे सर्व चांगले असले तरी सर्वजण त्यांच्यापासून जरा अंतर ठेवून असत. कारण बाई अती स्पष्टवक्त्या होत्या... म्हणजे खरे तर फटकळच म्हणा ना. बोलणे अगदी रोखठोक, कुणाला काय वाटेल याचा विधिनिषेध नाही. विनीताला त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाचा दोन तीन वेळा अनुभव आलेलाच होता, त्यामुळे ती जरा जपूनच असे. काही वेळा त्या त्यांच्याकडची लहानमोठी कामे विनीताकडे सोपवीत असत. विनीताला ते आवडत नसे, पण त्या वयाने आणि अनुभवाने देखील तिला सीनियर होत्या, त्या मुळे नकार देणे तिला जमत नसे. त्या लहानशा कार्यालया मध्ये त्यांना फार टाळणे शक्य होत नसे.
तो फेब्रुवारी महिना होता. सगळेच जण त्यांच्या कामकाजामध्ये व्यस्त होते. स्वागतकक्षा मध्ये काम करणाऱ्या शिरीनला नेहमी तिच्या पर्स मध्ये असलेल्या इटुकल्या आरशात पाहून, चेहऱ्यावर सुगंधी पावडरचा पफ फिरवायला देखील अजिबात वेळ मिळत नव्हता. समोरच्या स्क्रीन कडे पाहून आणि लहान-मोठे आकडे वाचून वाचून विनीताचे डोके दुखायला लागले होते, पण नाईलाज होता. मार्च महिन्यात सगळ्यांनाच त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण करायचे असतात. कर परतीचे अर्ज दाखल करायचे असतात. त्याकरता लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता वेळेत होणे आवश्यक असते. काहींचे आर्थिक व्यवहार तपासून गुंतवणुकीसाठी आणि करविषयक सल्ले द्यायचे असतात, काही व्यवसायांचे लेखा परीक्षणाचे अहवाल पूर्ण करायचे असतात. थोडक्यात, सध्या त्या कार्यालयातील कुणालाच क्षणाचीही उसंत नव्हती.
"विनीता एक काम होते तुझ्याकडे, करशील का?" फणसळकर बाई एक दिवस तिच्या टेबलाजवळ येऊन बोलत होत्या.
"काय आहे? खरं म्हणजे माझ्याकडे बरंच काम आहे हो आधीच... " कागदपत्रांनी ओसंडून जाणाऱ्या ट्रे कडे हात दाखवीत ती म्हणाली.
"काही नाही गं, हे एक स्टेटमेंट मी तयार केलंय सूर्या पब्लिसिटीचे. त्यांना त्यांच्या कुठल्याशा कर्जप्रकरणासाठी ते हवे आहे. तर त्यातल्या फक्त जमा, खर्चाच्या रकमांचे आकडे तपासायचे आहेत, आणि आज चार पर्यंत त्यांच्याकडे द्यायचे आहे. मला नेमके आज डेंटिस्ट कडे जायचे आहे, रूटकॅनलसाठी, नाहीतर मीच पूर्ण केले असते" बाई म्हणाल्या.
विनीताने नाईलाजाने होकार दिला. सूर्याच्या फाइल्स त्यांनी तिच्याकडे सुपूर्त केल्या. आता तिला पहिल्यांदा त्यांचे काम हातात घ्यावे लागणार होते, चार वाजे पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होते ना. तिने फाइल उघडून रकमा टॅली करायला सुरूवात केली. लहान लहान नोंदी बऱ्याच असल्याने खूप वेळ लागत होता. तिने तिचे काम पूर्ण केले, प्रिंटआउट्स घेऊन नीट स्टेपल करून एका मोठ्या लिफाफ्यामध्ये ठेवले आणि गजाजन कडे दिले 'सूर्या' कडे नेऊन देण्यासाठी. आता ती निःशंक मनाने तिच्या टेबलवर असलेल्या इतर फायलींकडे वळली.
"दामले मॅडम हे काय आहे?" देशपांडेंनी एक कागदी लिफाफा तिच्या टेबलावर ठेवीत विचारले.
विनीताने काही न समजून तो लिफाफा उघडला,
" हे सूर्या पब्लिसिटीसाठी तयार केलेले आहे, त्यांना ते कुठल्यातरी कर्जप्रकरणाकरता .."
विनीताचे बोलणे मध्येच थांबवीत देशपांडे म्हणाले,
"तुम्हाला कुलकर्णीनी बोलावले आहे."
विनीताने फणसळकर बाईंकडे पाहिले. समोरच्या कंप्यूटर स्क्रीनकडे पाहून, पेन्सिलीने समोरील कागदावर त्या काही लिहीत होत्या. त्यांचे विनीताकडे बिलकुल लक्ष नव्हते, म्हणजे निदान त्या तसे दाखवीत तरी होत्या.
विनीता कुलकर्णींच्या ऑफिस मध्ये आली, तिच्या हातात तो सूर्याचा लिफाफा होताच. कुलकर्णीं समोरच्या खुर्चीकडे हात दाखवीत म्हणाले,
"दामले मॅडम आज तुमच्या चुकीमुळे आपण एक प्रतिष्ठित क्लायंट गमावलेला आहे हे माहिती आहे का तुम्हाला? इतके चुकीचे स्टेटमेंट तुम्ही तयार केले हे मला खरे वाटत नाहीये, पण दुर्दैवाने ते सत्य आहे,"
विनीताला आता थोडे काही उमगले होते, पण अजूनही तिला बरेच काही माहिती नव्हते. ती म्हणाली,
"नक्की काय झाले आहे ते मला कळेल का? कारण हे काम फणसळकर बाईचे आहे, आणि..."
कुलकर्णी मधेच म्हणाले,
"दामले मॅडम कृपया थांबा, मागे एकदा असेच झाले होते आठवते आहे ना? तेव्हा मी तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला, आता परत तेच नको."
विनीताला वाटले आता तिची नोकरी संपली, तिचे आधारासाठी खुर्चीच्या कडेवर हात ठेवला,
"नाही मी खरंच सांगते आहे, फणसळकर बाईंनी मला ते करायला दिले होते, त्यांना डेंटिस्टकडे जायचे होते त्या दिवशी म्हणून... तुम्ही विचारा त्यांना. मी फक्त त्यांनी दिलेल्या फाइल मधून सर्व रकमा टॅली केल्या. कारण सूर्या पब्लिसिटीचे काम पहिल्यापासून फणसळकर बाईंकडेच आहे, मला त्यांबद्दल काहीच माहिती नाही."
विनीता तिचे निरपराधित्त्व सिद्ध करण्यासाठी तळमळीने बोलत होती, पण कुलकर्णींना ते खरे वाटत नव्हते. फणसळकर बाईंच्या कार्यक्षमतेवर त्यांचा अधिक विश्वास होता, त्या खोटे बोलणार नाहीत असे त्यांना वाटत होते. काही क्षण कुलकर्णी शांत राहिले, पण त्यांचा चेहरा त्रासिक होता ते म्हणाले,
"बरोबर आहे तुमचे, मी फणसळकर मॅडमकडेच दिले होते ते काम, पण त्या म्हणाल्या की काही कारणाने त्यांना ते वेळेत पूर्ण करणे जमणार नव्हते, म्हणून तुमच्याकडे सोपवले.. बरोबर आहे ना?" कुलकर्णींनी तिला प्रश्न विचारला आणि उत्तराची वाट न पाहता पुढे बोलायला सुरूवात केली.
"बरं ठीक तुम्ही ते काम त्यांना मदत करण्याच्या हेतूने स्विकारले, पण चुका किती त्यात? काही नोंदी दोन वेळा केलेल्या आहेत तर काही मध्ये टायटल आणि रक्कम याची अदलाबदल केलेली ... झालेली आहे. तुम्ही या चुका मुद्दाम केल्या असे नाही म्हणायचे मला.. पण आपले खूप नुकसान झाले आहे, काय करायचे आता? तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीकडून अशा चुकांची अजिबातच अपेक्षा नव्हती. "
विनीताला काय बोलावे सुचत नव्हते, ती अडखळत म्हणाली,
"प्लीज, फणसळकर बाईंना इथे बोलवाल का?"
कुलकर्णींनी गजाननला बाईंना निरोप देण्यासाठी पाठविले, त्या येईपर्यंत तिथे असह्य शांतता होती. फणसळकर बाईंना विचारले तर त्या म्हणाल्या त्यांनी ते काम विनीताकडे दिले आणि त्या डेंटिस्टकडे गेल्या, त्यांना काहीच माहिती नाही. परोपरीने विचारून देखील त्यांनी त्या प्रकारात त्यांचा काहीच दोष नाही असे सांगितले. डेटा एंट्री त्यांनी केली आहे हे कबूल करायला बाईंनी नकारच दिला. सगळा दोष विनीताच्या माथी आला होता. आजवर अनेकवेळा विनीताने असेच काही करून स्वतःची सुटका करून घेतली होती... आज तिच्या युक्तीचा प्रयोग तिच्यावरच होत होता.. आणि ती काहीच करू शकत नव्हती.
विनीता निराश होऊन स्वतःच्या जागेवर परत आली. समोरच्या स्क्रीन वरचे आकडे तिला आता अर्थहीन वाटत होते. तिची नोकरी तर सुरक्षित होती, पण सर्व महत्वाची कामे तिच्याकडून काढून घेण्यात आली होती. एखाद्या शिकाऊ उमेदवाराप्रमाणे पडेल ते काम करणे तिच्या नशिबी आले होते. तिच्या कार्यक्षमतेवर आता कुणाचाच विश्वास नव्हता.
फणसळकर बाई साळसूद चेहरा करून कामात मग्न असल्याचे दाखवीत होत्या.
विनिताने नेहमीच अवघड प्रसंगातून सुटका करून घेण्याकरता, दोष दुसऱ्याला दिला होता. काही वेळा तर निव्वळ लहानमोठा स्वार्थ साधण्याकरता तिने इतर कुणाच्यातरी नावावर काही खोट्या/चुकीच्या गोष्टी खपवल्या होत्या. असे करण्यात ती चांगलीच तरबेज झालेली होती. पण आज मात्र फासे उलटे पडले होते. तिचीच युक्ती वापरून तिची फसगत केलेली होती आणि इतकी बेमालूमपणे, की ती स्वतःचे निर्दोष असणे सिद्ध करू शकत नव्हती.
आज ती पुरती फसली होती .. फणसळकर बाईंनी तिच्यावर मात केली होती.
***