म्हणींच्या गोष्टी ... (३)

मराठी भाषेचे  शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे.  विविध प्रकारच्या म्हणी,  वाक्प्रचार आणि सुविचारांच्या अलंकारांची  लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत.  काही म्हणी  रोजच्या  संवादात  अगदी सहजपणे वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात?  त्यांच्या मागे काय कथा असतील?  तर काही म्हणींच्या या गोष्टी  ...
 "ऐकावे जनांचे - करावे मनाचे" 
अनेक व्यक्तींनी मिळून एक समाज निर्माण झालेला असतो. समाज जरी एकसंध असला तरी त्या मधील व्यक्तींच्या वृत्ती, प्रवृत्ती आणि स्वभाव भिन्न असतात.
बुद्धिमत्ता, आकलनशक्ती आणि अनुभव देखिल निराळे असतात. प्रत्येकजण स्वतःच्या दृष्टिकोनातून जगाकडे बघत असतो.  
त्यामुळे त्यातही वैविध्य असते. समज, विचार आणि मतांमध्ये फरक असतो. शंभर लोक, हजार तोंडांनी बोलत असतात. अशा समाजात वावरताना स्वतःची विवेकबुद्धी जागृत ठेवून निर्णय घेणे अतिशय जरूरीचे असते, अन्यथा नुकसानच होते. मग कुणी विचारेल, इतरांचे काही ऐकायचे नाहीच का?... तर तसे नाही. इतरांची मते, सल्ले देखिल जरूर ऐकावे. परंतु त्यातील योग्य- अयोग्य निवडण्याचा नीर-क्षीर विवेक तुमच्या मध्ये असायला हवा.  
(ऐकलेली)  मूळ कथा :- 
एका गावात एक शेतकरी कुटुंब राहत होते. धनाजी राव, त्यांची पत्नी पारूबाई आणि मुलगा गणु.  
दिवसभर शेतात राबावे, संध्याकाळी गावातील पारावर बसून गावकऱ्यांबरोबर गप्पागोष्टी कराव्यात, नंतर चार घास खाऊन देवाचे नामस्मरण करीत निद्राधीन व्हावे. असा सरळ साधा जीवनक्रम होता त्यांचा. मुलगा गणू आता हाताशी आलेला,  थोडीफार त्याचीही मदत होत असे. एकंदरीत सारे काही सुरळीत चालू होते.  
धनाजीकडे शेतीच्या कामासाठी उपयोगी असे काही पशू पाळलेले होते. एक बैलजोडी होती, गाई आणि शेळ्या होत्या. थोड्याफार कोंबड्या देखिल होत्या. त्यांच्याकडे काही गाढवे पाळलेली होती. बाजारात किंवा अन्य ठिकाणी सामान वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होत असे. ती गाढवे तो इतरांना देखिल, त्यांचे सामान वाहून नेण्यासाठी देत असे. त्याचा मोबदला त्याला मिळे. तेव्हढीच थोडी उत्पन्नात भर.
एका वर्षी मात्र या सुखाला किंचितसे ग्रहण लागले होते. त्या मोसमात पावसाने ओढ दिली होती. नेहमीपेक्षा पीक फारच कमी आले. जेमतेम घरातली गरज भागेल इतकेच. घर म्हणले की अनेक गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा या तर मूलभूत गरजा. त्याबरोबरच औषधपाणी, मुलांचे शिक्षण, पाहूणेरावळे काही अकस्मितपणे उद्भवणारे खर्च  अशाही  अनेक गरजा असतात. ते खर्च भागवण्यासाठी  इतर मार्ग शोधणे क्रमप्राप्त होते.  
धनाजीने काही कोंबड्या विकल्या काही शेळ्या विकल्या. गायीचे दूध घरात न वापरता त्याचीही विक्री केली. तरीही खर्च काही संपेनात.  
त्यांच्याकडे जी थोडी गाढवे होती, त्यातील एक जरा थकले होते. पूर्वीइतके जड सामान वाहून नेऊ शकत नसे. चालता चालता वाटेतच थांबून राही. तसे आता बाजारात ने आण करायलाही काहीच नव्हते. आणि गावातील सर्वांचीच परिस्थिती, थोड्याफार फरकाने धनाजी सारखीच होती. शेवटी ते गाढव विकायचे ठरले. धनाजीला तसे करणे अगदी जीवावर आले होते. त्याच्याकडे असलेल्या साऱ्या पाळीव प्राण्यावर त्याची भारी माया. परंतु आता परिस्थितीच तशी आली होती.  
एकेदिवशी सकाळी  गणू आणि धनाजी त्यांचे गाढव घेऊन बाजाराकडे निघाले.  वाटेत भेटणारा प्रत्येकजण विचारीत असे,  
"अरे रिकामे गाढव घेऊन कुठे चाललास? " 
"बाजारात  .. " उदासपणे धनाजी सांगत असे.  
"कशाला? "  पुढचा प्रश्न येई.  
"विकणार आहे.. "  मोठ्या अनिच्छेने धनाजी उत्तर देई.  
चालता चालता गावातील मध्यवर्ती जागी असलेला पार आला. सर्व ग्रामस्थांचे ते आवडते ठिकाण.  
रोज तिथे गप्पांचा फड रंगत असे. ग्रामपंचायतीच्या सभाही तेथेच होत.  तिथे नेहमीच कुणी ना कुणी बसलेले असेच. आजही होते चारपाचजण.  
धनाजीला पाहताच त्यांचे आपसातील बोलणे थांबले. कपाळावर आडवा  हात ठेवीत निरखून बघत एकाने विचारले,  
"धनाजी, सक्काळ सक्काळ कुणीकडे? रिकामे गाढव घेऊन चाललायस, येताना बरेच सामान आणायचा विचार दिसतोय. "
"छे हो.. " धनाजी उत्तरला.  
"खरेदी कसली? गाढव विकणार आहे",  हताश होत धनाजी म्हणाला.  
"सग्गळी सोंगे आणता येतात, पण पैशाचे सोंग नाही आणता येत. घरी तेल, तांदुळाला पैसे नाहीत म्हणून.. "
"अस्सं अस्सं, अरे मग एवीतेवी रिकामे गाढव आहे, तर त्यावर तुझ्या पोराला बसव की. चालून चालून थकलाय बघ. "  पारावर बसलेल्यांपैकी एकाने सल्ला दिला.  
"हो रे हो अगदी बरोबर आहे, एव्हढे कसे कळत नाही तुला धनाजी? पहिल्या पासून असाच आहे तो. " इतरांनी अनुमोदन दिले.  
धनाजी अगदी कसनुसा झाला. त्याला सांगायचे होते की, गाढव थकलेले आहे, त्याला त्रास नको द्यायला म्हणून रिकामेच चालवले आहे.  
पण तो काहीच बोलू शकला नाही. पारावर उसळलेल्या हास्याच्या ओघात सारेच म्हणणे वाहून गेले.  
त्याने गणुला गाढवाच्या पाठीवर बसायला सांगितले. गणू तयार होत नव्हता, पण धनाजीने सांगितले जाणत्या लोकांचा सल्ला ऐकावा, आणि त्या प्रमाणेच वागावे.  
काही अंतर पुढे गेल्यावर एक मंदिर होते. त्याच्या कट्ट्यावर बायका आणि लहान मुलांची गर्दी दिसत होती. बायकांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. गप्पाबरोबर लहानसहान कामेही चालू होती. कुणी कापसाच्या वाती वळत होती, कुणी फुलांच्या वेण्या विणीत होती. एक दोघी धान्यातले खडे शोधीत होत्या, तर गावची शिंपीण कपड्यांच्या शिवणी उसवीत होती, परत शिवीत होती.
धनाजी आणि गणू मंदिराजवळ येताच बायकांचे काम करणारे हात थांबले. गप्पा बंद झाल्या. एक बाई एका हाताने पदर सावरीत तोंडावर हात ठेवीत बोलली,
"अग्गं बाई, हे काय बघते आहे मी? "
तिथे खेळणारी मुलेही आपला खेळ थांबवून बघायला लागली.  
"अरे गण्या, तुला काही लाज आहे की नाही?  म्हातारा चालतो आहे, अन तू आरामात गाढवावर बसलायस? कलियुग गं बाई कलियुग" 
बाकीच्या बायका देखील तोंडावर पदर धेत आपापसात कुजबुजू लागल्या.  
गणू पटकन गाढवावरून खाली उतरला. धनाजीकडे बघत नाराजीने म्हणाला,  
"बाबा मी नको म्हणत होतो ना मगाशी? आता तुम्ही बसा. "
धनाजी देखिल अगदीच कानकोंडा होऊन गेला. आपल्यामुळे मुलाला काहीबाही ऐकावे लागले, याचे त्याला वाईट वाटत  होते.  
अजून काही अंतर पुढे गेले. आता ते गावाच्या वेशीजवळ आले होते. वेस ओलांडली की थोडा जंगलाचा सुनसान, निर्मनुष्य रस्ता लागणार होता. त्या नंतर एक लहानशी नदी ओलांडली की बाजाराचे ठिकाण येणार होते.  
वेशीजवळच एक चावडी होती. तिथे काही लोक गजाल्या करीत बसलेली दिसत होती. धनाजी आणि गणू चावडीजवळ आले तशी तिथे असलेल्या एकाने विचारलेच,
"काय धनाजीराव आज इकडं कुनीकडं? "
"बाजारला चाललोय जरा", धनाजीने उत्तर दिले.  
"अरे मग हे काय रे? तू गाढवावर मस्तं बसून चाललायस आणि तुझा पोर चाललाय काट्याकुट्यातून. काय तुझी तऱ्हा ही? "
धनाजी लाजेने अर्धमेला झाला होता. असे कसे आपण निर्दयी? कसं सुचलं नाही आपल्याला आधी?  
आता तो गाढवावरून खाली उतरला. पण गणू गाढवावर बसायला तयार होईना. तो म्हणाला,  
"लोक नाव ठेवतात ना मग, मी नाही बसणार".  
काय करावे ते दोघांनाही सुचेना. रिकामे गाढव चालवले तर लोक चेष्टा करतात. पोरगा बसला तरी बोलतात. धनाजी बसला तरी बोलतात. आता करावे तरी काय?  
दोघेजण पुढे जाऊन एका झाडाखाली थांबले. गाढवाला गवत चरण्यासाठी जरा सोडले. घरून बांधून आणलेली भाजी भाकरी खाताना दोघेजण गप्प होते. आधीच इतके मायेने पाळलेले गाढव विकावे लागल्याचे दुःख होते. त्यात लोकांच्या उलटसुलट बोलण्याने अगदी गोंधळायला झाले होते. धनाजी तसा अगदी पापभीरू माणूस. त्याला कळेना की लोक सगळ्याच बाजूने बोलतायत, तर ऐकावे तरी कोणाचे?
थोड्यावेळाने दोघे पुढे जाण्यास निघाले. या वेळेस  धनाजी आणि गणू, दोघेजण गाढवावर बसले होते. आता कुणी काही बोलणार नाही बहुदा. तसही आता जंगलचा रस्ता आहे. फार कुणी भेटणार पण नाही. असा विचार करीत दोघे चालले होते. गाढव बिचारे पाठीवरच्या भाराने लडखडत चालले होते. इतके ओझे त्याला पेलत नव्हते. त्यामुळे त्याची चालही मंदावली होते. धनाजी आणि गणुला ते कळत होते, पण तरीही ते तसेच नेटाने पुढे जात राहिले.  
बाजार आता खूप दूर नव्हता. मध्ये नदी होती, तिच्यावर एक पुल बांधलेला होता. तेव्हढा ओलांडले की झालेच..  
दोघे असा विचार करतायत तोच त्यांना आवाज ऐकू आला,  
"अरेरे केव्हढे हे क्रौर्य? हरी ओम! हरी ओम! काय पाहतोय मी हे? "
धनाजीने आवाजाच्या दिशेने पाहिले, तो झटकन खाली उतरला आणि हात जोडीत पुढे गेला.  
तिथे एक साधू महाराज बसलेले होते. भगवी वस्त्रे परिधान केलेले, कपाळावर भस्माचे पट्टे ओढले होते. एका बाजूला कमंडलू ठेवलेला होता.  
गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा होत्या. हातात देखिल जपमाळ घेतलेली होती. आजूबाजूला त्यांचे शिष्यगण हात जोडून उभे होते.  
धनाजी आणि गणुने त्यांना आदरपूर्वक वंदन केले. पण तरी महाराजांचा क्रोध शांत झालेला नव्हता.  
"अरे त्या मुक्या जनावराचे किती हाल करतोयस? बिचारे भाराने वाकले आहे. थोडी भूतदया दाखव. " 
"क्षमा असावी महाराज", धनाजी म्हणाला.  
"चूक झाली परत असं नाही करणार". तो पुढे म्हणाला.  
जपमाळ घेतलेला हात उंचावून महाराजांनी आशीर्वाद दिला आणि ते डोळे मिटून ध्यानमग्न झाले.  
धनाजी आणि गणू आता काळजीत पडले. आत काय करावे? बाजार तर अगदी जवळ आहे आता. फारच थोडे अंतर आहे. काय करावे? कसे करावे? विचार करता करता काही वेळाने त्यांना एक युक्ती सुचली. गाढवाला उचलून न्यायचे. पण ते कसे करायचे? गाढव म्हणजे काही लहान मूल नाही, की कडेवर घेतले, किंवा खांद्यावर  बसवले,  किंवा पाठीवरून नेले. ते एक गाढव आहे, चार पायाचे.  
धनाजीकडे एक जाड काठी नेहमीच असे. आजपण होतीच. मग दोघांनी डोक्याची मुंडाशी सोडली. काठी आडवी ठेवून त्या मुंडाशाच्या कापडाच्या मदतीने गाढवाचे पाय त्या काठीला बांधले. आता गाढव त्या काठीला उलटे लटकलेले होते. त्याची पाठ जमिनीकडे होती आणि तोंड आकाशाकडे. चारही पाय बांधलेले असल्याने ते जोरात ओरडत होते. मान डोके जोरात हलवित होते. तिकडे लक्ष न देता दोघांनी मिळून काठी उचलली. धनाजी पुढे आणि पाठीमागे गणु. त्यांनी चटचट पाय उचलायला सुरूवात केली. आता वाटेत कुणी अजून दिसायाला नको, त्या आधी बाजारात पोहचायचे म्हणून.  
गाढव तसे अगदी अशक्त आणि बारकेसे होते. पण तरीही त्याला उचलून नेणे अवघड झाले होते. ते सारी शक्ती एकवटून जोरजोराने हिसके देत होते. त्यामुळे त्यांना स्थिर पावलाने चालणे अवघड झाले होते. आता नदी दिसू लागली. अगदी लहानशी एखाद्या मोठ्या ओढ्या सारखी नदी होती. नदीचे पात्र फारसे खोल नव्हते. पण तिला पाणी भरपूर होते. आणि पाण्याच्या प्रवाह वेगाने वाहत होता. वाऱ्याचा जोर देखिल चांगलाच होता. पाण्याच्या खळखळाटाने गाढव अजूनच बिथरले होते. दोघेजण आता पुलाच्या मध्यावर आले होते. तितक्यात गाढवाने परत एकदा जोराने हिसडा दिला, आणि गणुचा तोलच गेला. पुलाचा कठडा होता म्हणून बरे, नाहीतर तो नदीत पडलाच असता. या गडबडीत त्याच्या हातातली काठी निसटली. काठीचे एक टोक पुलाच्या कठड्यावरून खाली घसरले होते. काठीला बांधलेले गाढव देखील त्या बरोबर कठड्याच्या खाली अधांतरी  लटकले होते. धनाजीने त्याच्या हातातील काठीचे टोक घट्ट पकडून ठेवले होते, पण त्याला एकट्याला ते वजन पेलेना. गाढव जोराने हिसके देतच होते. शेवटी धनाजीच्या हातातील काठी चे टोक देखिल निसटले, आणि त्या काठीसकट गाढव नदीच्या प्रवाहात कोसळले. त्याचे चारही पाय बांधलेले असल्याने, बिचारे गाढव असाहाय्यपणे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत दिसेनासे झाले.  
धनाजी आणि गणू निराश झाले होते. काय ठरवले होते? आणि काय झाले? गाढव गेल्याने नुकसान तर झाले होतेच, परंतु त्याहीपेक्षा दुःख जास्त होते. आजवर इतक्या मायेने सांभाळलेले, त्यांच्या कष्टात त्यांना नेहमीच मदत करणारे  गाढव, त्यांच्या डोळ्यादेखत पाण्यात वाहून गेले होते. दोघेजण सुन्नं होऊन तिथे उभे होते. तितक्यात त्यांना चाहूल लागली. त्यांचा शेजारी श्रीपती  बाजाराहून परत घरी चालला होता.  
"काय रे धनाजी, असे का उभे आहात दोघे? " त्याने चौकशी केली.  
मग धनाजीने त्याला सारे काही सांगितले. श्रीपती म्हणाला,  
"धनाजी तू फार भोळा आहेस. लोकांचे प्रत्येक बोलणे इतके मनावर घ्यायचे नसते. तू आणि गणू रिकामे गाढव घेऊन चालत निघालात तेच योग्य होते. लोक मागचा, पुढचा विचार न करता, जे समोर दिसतय त्यावरच बोलतात. सल्ले देतात. त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष करायचे. आता दुःख करून तुझे गाढव तर परत येणार नाही. नसते सल्ले देणाऱ्या लोकांमुळे त्या मुक्या जनावराला जीव गमवायला लागला, त्याची काहीच चूक नसताना. आणि ज्यांनी तुला सल्ले दिले, त्यांचे काहीच नुकसान झाले नाही. तू मात्र तुझे गाढव गमावून बसलास.  आतातरी शहाणा हो. स्वतःवर विश्वास ठेव. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, नेहमीच ऐकावे जनांचे पण करावे मात्र स्वतःच्या मनाचे. " 
धनाजीला श्रीपतीचे बोलणे पटले होते. एक चांगला धडाच त्याला मिळाला होता. पण त्या साठी त्याला फार मोठी किंमत चुकवायला लागली होती.  
उपकथा :- 
"वन्सं नमस्कार करते बरं का. आणि इकडची सगळी आवराआवर झाली की थोडे दिवस नाशिकला यायचं आहे तुम्ही दोघांनी  काय?" 
सुचेता मामी निरोप घेत म्हणाल्या.  
"नक्की नाही सांगत आत्ताच, तुला माहिती आहे ना  ह्यांचा स्वभाव?  त्यांनी मनावर घेतले तर येईन मी. "
मंगलाबाई बोलल्या.  
"खूप मदत झाली गं सुचेता तुम्हा सर्वांची. सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडले. " मंगलाबाई मनापासून म्हणाल्या.  
कार्यासाठी म्हणून आलेले नातेवाईक एकएक करत निरोप घेत होते. गेला महिनाभर गजबजलेले घर आता शांत झाले होते.
घरात अजून बराच पसारा होता. दारासमोरचा मांडव अजून तसाच होता. दारावरचे तोरण दिमाखात झुलत होते.  
फुलांच्या माळा जरा कोमेजल्यासारख्या दिसत होत्या.  
मंगलाबाई सोफ्यावर शांतपणे बसल्या होत्या. टि. व्ही लावायची पण इच्छा नव्हती त्यांना. कुठलाच आवाज आत्ता, या क्षणी नकोसा वाटत होता.  सरलाताई समोरच बसलेल्या होत्या. सरलाताई म्हणजे मंगलाबाईंची थोरली बहीण. त्या धुळ्याला असायच्या. अमेयाच्या लग्नासाठी म्हणून पुण्याला आल्या होत्या.  मंगलाबाईंवर त्यांचा खूप प्रभाव होता. दोघी सख्ख्या बहिणी, पण त्यांच्या वयात पुष्कळ अंतर होते. सरलाताई सर्व भावंडांमध्ये थोरल्या.  सगळ्यांनाच त्यांचा आधार वाटायचा. सुरवातीला त्यांना सासरी खूप सासुरवास सोसावा लागला होता. तरीही मोठ्या धीराने आणि कष्टाने त्यांनी संसार सावरला होता.  सवतीला देखिल धाकट्या बहिणीप्रमाणे वागणूक दिली होती. आणि त्या साठी सर्वांनाच त्यांच्याविषयी कौतुकमिश्रित आदर वाटत असे.  
अमेय च्या लग्नात त्यांची खूपच मदत झालेली होती. अगदी पत्रिका  छापण्यापासून निमंत्रिताच्या याद्या, खरेदी, देणीघेणी, घरात जमलेल्या पाहुण्यांच्या आदरातिथ्याचे व्यवस्थापन सारे काही त्यांच्या सल्ल्यानुसार केले होते. त्यांचा अनुभवच होता तसा. त्या तेव्हढ्या अजून काही दिवस राहणार होत्या.  म्हणजे मंगलाबाईंनीच तसा आग्रह केला होता. नाहीतर रिकामे घर त्यांना खायला उठले असते.

समोरच्या  दिवाणावर स्वतःची पावले दाबीत बसलेल्या सरलाताईंकडे  बघत मंगलाबाई  काळजीने म्हणाल्या,  
"का गं ताई, पाय दुखतायत का? " 
"हो गं पण ते काही नवीन नाही,  वयोमानानुसार मागे लागलेली दुखणी ही. "  ताई म्हणाल्या.  
काहीवेळ दोघीजणी गप्प बसून होत्या. मग सरलाताई म्हणाल्या,  
"सून चांगली आहे गं तुझी. तिच्या घरचे देखिल बरे वाटले मला. सारे काही रितीने केले नाही? "
"हो ना पहिलंच कार्य माझ्या घरच, चांगलं पार पडलं"  मंगलाबाई समधानाने म्हणाल्या.
"हं पण मंगल, आता जपून, सावधपणे वाग बरं. नाहीतर तू भोळी, सून तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल", सरलाताई म्हणाल्या.  
"का असे म्हणतेस ताई? माझी सून स्वभावाने चांगली आहे. अमेयच्या कॉलेजमध्ये होती ती. मी तिला ओळखते पूर्वीपासूनच", मंगलाबाईंनी सांगितले.  
"ते खरं गं.. " एक निःश्वास सोडीत सरलाताई बोलल्या. " पण दुरून डोंगर साजरे असतात. आजवर ती घरी पाहुणी म्हणून येत होती. आता घरची झाली आहे.  फरक पडतो बघ. "
मंगलाबाईंना आश्चर्य वाटले. आज ताई असं का बोलते आहे हे त्यांना कळत नव्हते. तिला नेमके काय खटकले असेल? मंगलाबाई विचारात पडल्या.  आजवर ताईकडून कधी कुणाबद्दल तक्रार ऐकल्याचे त्यांना स्मरत नव्हते. पण त्यांचा ताईवर तिच्या अनुभवातून आलेल्या शहाणपणावर विश्वास होता. ती उगाच असं काही बोलायची नाही.  
"अनुभवाचे बोल आहे हे मंगल.. "  सरलाताई म्हणाल्या. मंगलाबाईंनी आश्चर्याने विचारले,  
"अगं काय  सांगतीयस  हे ताई?  वीणा? " 
सरलाताईंनी मान हालवीत हात झटकला.  
"काही विचारू नकोस.. तुला म्हणून सांगते नुसतं नटणे, मुरडणे, मित्र मैत्रिणी जमवून खाणे, पिणे आणि अखंड गप्पाष्टक.  आणि आमचे नशीब म्हणजे आमच्या संदीपला पण तेच बरे वाटते. माझ्या बायकोला तू काही बोलू नकोस, असं म्हणतो. "
मंगलाबाईंना ही माहिती नवीनंच होती. त्या पुढे काही विचारणार तेव्हढ्यात पाहुण्यांना स्टेशनवर सोडून गोपाळराव परतले होते. मग तो विषय तसाच राहिला.
पुढचे दिवस गडबडीचेच होते. मांडवपरतणी करायची होती. मोलाने आणलेली जास्तीची भांडीकुंडी, अंथरूणे, पांघरूणे यांची मोजदाद करून परत करायची होती.  विखुरलेले घर परत नीटनेटके करायचे होते. ह्या सगळ्यात आठवडा निघून गेला. सरलाताईंच्या जाण्याची वेळ येऊन ठेपली. जाताना नमस्कार करणाऱ्या मंगलाबाईंना  त्या इतकेच म्हणाल्या, "सुखी राहा आणि मी सांगितलेले विसरू नकोस. "  
अमेय आणि राधिका मनालीहून परत आले होते. मग मंगलाबाईंनी काही दिवसांसाठी नाशिकला जायचे ठरवले. गोपाळराव देखील यायला तयार झाले होते.  दोघेजण नाशिकला आले. नाशिक म्हणजे मंगलाबाईंचे माहेर. त्यांचा भाऊ सुहास तिथे असायचा. काही दिवसांसाठीचा हा बदल त्यांना रूचला.  पुण्याला परत आल्यावर नेहमीचा दिनक्रम सुरू झाला. त्यांचे भिशी मंडळ, वनिता मंडळ,  शेजारिणी इ. कार्यक्रम यथासांग पूर्ववत सुरू झाले होते. राधिका रोज सकाळी अमेय बरोबरच निघत असे. मग घर नेहमीसारखे मंगलाबाईंच्या ताब्यात असे. तसे सासू सुनेचे चांगले जमत असे. ती घरी असली की सतत त्यांना काही ना काही सांगत असे.  मंगलाबाईंना त्याचे अप्रूप वाटे. त्यांना मुलगी नव्हती. तिघे मुलगेच. ते त्यांच्या त्यांच्या विश्वात असत. त्यांचे विषय देखिल मंगलाबाईंच्या कक्षेबाहेरचे असत. काहीवेळा तर त्यांना प्रश्न पडे, ही मुले मराठीतच बोलतायत ना?  मग मला कळत का नाहीये त्यांचे बोलणे?  पण राधिकाची बडबड त्यांना बरी वाटे. त्या ती लक्षपूर्वक ऐकत. स्वतःचेही काहीबाही सांगत.  
वनिता मंडळाचा काही कार्यक्रम होता त्या दिवशी. नेहमीप्रमाणेच असणाऱ्यांची चेष्टा, नसणाऱ्यांची निंदा इ. कार्यक्रम यथासांग चालू होते. मालविका बाई मंगलाबाईंच्या शेजारीच बसलेल्या होत्या.  एका हातात फराळाची ताटली घेऊन दोघींच्या गप्पा चालू होत्या. मालविकाबाई पूर्वी मंगलाबाईंच्याच सोसायटीत राहत असत. अगदी समोरच्याच बंगल्यात. त्यामुळे त्यांना मंगलाबाईंच्या घरची खडानखडा माहिती.  
"मग काय मंगला, आता घरी आराम असेल ना तुला? नवीन सून आली",  विषयाचे सूतोवाच झाले होते.  
"अगं नाही गं, ती सकाळी जाते ती अगदी रात्री सात आठ वाजता घरी येते. मग मी सुद्धा तिला काही जास्त करू देत नाही. ऑफिसमध्ये पण कामच करते ना  ती? "  मंगलाबाई सरळपणे म्हणाल्या. त्यांना त्यात काही विशेष वाटत नव्हते. पण मालविकाबाईंना मात्र ते ठीक वाटले नाही.  
"अग बाई!  म्हणजे घरातलं सारे काही तुलाच करायला लागते की काय अजून? " तोंडावर हात घेऊन, आश्चर्याने डोळे मोठ्ठे करीत त्या बोलल्या.  
मंगलाबाईंनी  नवलाने त्यांच्याकडे बघितले. इतके चकीत होण्यासारखे यात काय घडले आहे हे काही त्यांना कळले नाही.  
मालविकाबाई हळू  कुजबुजल्या स्वरात म्हणाल्या,   "मंगला, या नवीन पिढीतल्या मुली हुशार असतात बरं. गोडगोड बोलतील आणि सारे काही करून घेतील. आपल्यासारख्या अडाणी नसतात त्या... सासूच्या आज्ञेत राहायला. माझी सून महितीय ना? "  आता त्यांचा आवाज अजूनच खाली आला होता.  "तुला म्हणून सांगते.. नुसते बोलणे ऐका. घरी काही करणार नाही. मग मी पण ठरवलं, तिला जरा सरळच करायची, तिच्या बोलण्याकडे सरळ दुर्लक्ष करते मी,  आणि मला सांगायचंय तेव्हढंच बोलते. घराची पूर्ण जबाबदारी तिची, पण किल्ल्या माझ्याकडे. तू पण बघ अस करून... तुझा फायदाच होईल. " मालविकाबाईंनी त्यांच्या मैत्रिणीला अनुभवी सल्ला दिला.  
घरी आल्यावर मंगलाबाई गप्प गप्प होत्या. मालविकाबाईंचे बोलणे ऐकून जरा घाबरूनच गेल्या होत्या. ताईचे बोलणे त्यांच्या मनात रुंजी घालत होते.  सावध राहा.. सावध राहा.  
अंधार झाला होता, परंतु उठून दिवा लावावासा वाट नव्हता त्यांना. त्या तशाच अंधारात बसून राहिल्या.  मंगलाबाईंच्या  आयुष्यात फारसे खाचखळगे लागलेच नव्हते. परीक्षा पाहणारा कालखंड त्यांनी पाहिला नव्हता. विवाहापूर्वी आई आणि ताईंच्या संरक्षणात त्या राहिल्या होत्या. त्यांचा स्वभाव देखिल फारसा हटवादी नव्हता. विवाहानंतर सासूबाईंच्या हाताखाली पहिली काही वर्षे गेली. त्यांच्या आज्ञाधारक स्वभावामुळे घरात भांड्याला भांडे काही लागले नाही. कुठलाही निर्णय घेण्यासाठी त्या नेहमीच दुसऱ्या कुणावर अवलंबून असत. त्यामुळे आज त्या फारच गोंधळून गेल्या होत्या.  विषय असा होता की कुणाला काही विचारणे देखिल शक्य नव्हते.  
लॅचमध्ये किल्ली फिरवल्याचा आवाज आला. दार उघडून राधिका आत आली. भिंतीवरचे बटण दाबून तिने दिवा लावला. समोर बसलेल्या मंगलाबाईंना बघून ती म्हणाली, "हे काय आई, अशा अंधारात का बसल्या होता?  घरात अंधार पाहून मला मला वाटले तुम्ही अजून मंडळातून आलाच नाहीत की काय? " 
मंगलाबाई काही बोलणार होत्या, पण त्यांना मालविका बाईंचे बोलणे आठवले. "सरळ दुर्लक्ष कर.. " 
मग मंगलाबाई गप्प बसून राहिल्या. राधिकाने देखिल त्यांच्या उत्तराची फार वाट बघितली नाही. ती सरळ तिच्या खोलीकडे निघून गेली. आता एकेक जण घरी येतील. रात्रीच्या जेवणाचे बघायला हवे असे मंगलाबाईंना वाटले, पण परत त्यांना ताईचे बोलणे आठवले, "तुझी सून तुझ्या डोक्यावर मिऱ्या  वाटेल".  
"हं तिलाच सांगते करायला. सारखे सगळे मीच का करायचे? "
मंगलाबाईना स्वतःचेच आश्चर्य वाटले. आजवर त्यांनी कधी असा विचार केलाच नव्हता.  
"किती वेळ खोलीत जाऊन बसली आहे. आता अमेय आला की येईल बाहेर. " मंगलाबाईंना वाटले.  
थोड्याच वेळात राधिका हॉल मध्ये आली. मंगलाबाई तिला म्हणाल्या,  
"राधिका जरा जेवणाचे बघ गं. पोळी भाजी तर असेलच सरूबाईने केलेली. कुकर लाव, आणि कोशिंबीर कर. सगळे आल्यावर मग  आमटी कर. मी जरा वेळ पडते",  असे म्हणत त्या उठून त्यांच्या खोलीकडे चालू लागल्या.  
राधिकाला वाटले आज आईंचा मूड जरा ठीक नाही वाटत. पण जास्त विचार न करता ती कामाला लागली.  
हळू हळू घरातले  वातावरण बदलू लागले. मंगलाबाईंच्या वागण्यातला मोकळेपणा नाहीसाच झाला होता. बाकी कुणाच्या फारसे लक्षात आले नव्हते ते,  पण राधिकाला जाणवले.  तिने  अमेयला त्या बद्दल सांगायचा प्रयत्न केला, "अरे आई आजकाल काहीतरी वेगळ्याच वागतायत माझ्याशी. काय झालंय माहीत नाही. "  तसा अमेय म्हणाला, "तुम्ही बायका ना, लहानसहान गोष्टी फार मनावर घेता. " 
मग काय बोलणेच खुंटले.  
त्या दिवशी सकाळी राधिका कामावर जाण्यासाठी निघतच होती. आज तिला बराच उशीर झाला होता. ऑफिस मध्ये लेटमार्क लागणार होता.  
तितक्यात मंगलाबाईंनी तिला थांबवले.  
"अगं आज सुमाकाकूकडे हळदीकुंकू आहे संक्रांतीचे.  तुला जमेल का संध्याकाळी? "
"संध्याकाळी..? " राधिका क्षणभर थांबली. "तसं जमायला हरकत नाही, पण ती अगदी ऐन गर्दीची,  रहदारीची वेळ आहे. म्हणजे वेळेत निघाले तरी तिथे पोहोचायला खूप उशीर होईल मला.  आज नको. मी सुट्टीच्या दिवशी जाऊन येईन तिकडे चालेल? " राधिका म्हणाली.  
त्यात न चालण्यासारखे काही नव्हतेच.  
संध्याकाळी त्या एकट्याच सुमाकाकुकडे गेल्या. तशी काकू म्हणाल्या, "एकटीच बरी आलीस? सून कुठे आहे? "
मंगलाबाईनी सांगितले की ऑफिसमधून इथे यायला उशीर लागेल म्हणून ती नंतर येणार आहे. इतर बायका यायला लागल्या होत्या, मग काकू तिकडे गुंतल्या. गर्दी कमी झाल्यावर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.  एकाच शहरात असूनही, इतर व्यवधाने सांभाळताना एकमेकांकडे जाणे फारसे होत नसे. तरी बरं हल्ली फोनची सोय होती.  
"मग, काय म्हणते तुझी नवी सून? " काकूंनी प्रश्नाचा खडा टाकला.  
"काय म्हणणार? तिला फारसा वेळ नसतो गं, तिचे नोकरीचे ठिकाण घरापासून बरेच दूर आहे. त्यामुळे येण्याजाण्यात खूप वेळ जातो बिचारीचा",  मंगलाबाई म्हणाल्या.  
मग काकू अगदी हलक्या, कुजबुजलेल्या आवाजात म्हणाल्या, "वागायला बरी आहे ना? नाही नविन पिढीतली, आणि नोकरी करणारी म्हणून विचारले".  
मंगलाबाईंनी काही न बोलता मान डोलवली. मग काकूच परत म्हणाल्या,  
"मंगले सुनेवर नीट लक्ष ठेव हो. तुझा नेहमीचा भोळसटपणा नको. तुला सांगते, ऑफिसच्या नावाखाली त्यांचे हिंडणे फिरणे चालू असते. आमच्या घरी बघते ना मी. "
मंगलाबाईंनी आश्चर्याने कांकूंकडे पाहिले. काकूंची सून काही नोकरी करत नसे, पण तिची नुकतीच लग्नं झालेली नातसून बँकेत नोकरी करायची.  
"काहीतरीच तुझे काकू"  मंगलाबाई आश्चर्याने म्हणाल्या.
तितक्यात काकूंची सून तिथे आली. मग तो विषय मागे पडला.  
आता मंगलाबाईंच्या डोक्यात नवीन भुंगा गुणगुणायला लागला. राधिकाला यायला उशीर झाला, की त्यांना वाटायचे ही नक्की दुसरीकडे कुठे गेली असणार आणि घरी सांगेल ऑफिसचे काम होते.  संशय हा फार वाईट रोग आहे. तो ज्याला लागला, त्याचे त्याच्या घरादारासकट वाटोळे झालेच म्हणून समजा. आता त्या राधिकाला उलटसुलट प्रश्नं विचारू लागल्या. तिची कुठलीच गोष्ट त्यांच्या मनास येईना. त्यांच्या मनाची शांती पार हरवली होती.  गोपाळरावांना देखील आता जरा कळायला लागले होते, की मंगलाबाईंच्या वागण्यात आणि विशेषतः बोलण्यात फार बदल झाला होता. त्यांनी त्याबद्दल विचारले तर, "तुम्हाला काही कळायचे नाही",  असे उत्तर मिळाले. आता राधिका देखिल जेव्हढ्यास तेव्हढे बोलत असे. शक्यतो मंगलाबाईंना टाळत असे.
 
घरात तसे मंगलाबाईंना खूप काम नसे. सरुबाई स्वैपाक करून जात. इतर कामासाठी देखिल एक बाई येत असत. पण तरी त्यांना आता वाटायला लागले होते की राधिका घरकामात लक्ष घालत नाही, त्यामुळे सून येऊन देखिल त्यांचे घरकाम कमी झाले नाही. मग त्या सुट्टीच्या दिवशी उगीच काहीतरी जास्तीचे काम काढीत. राधिकाला मदतीला बोलावीत. दिवाळीचा फराळ करायचा होता. राधिका म्हणाली, तिच्या आईच्या ओळखीच्या बाई आहेत, त्या सगळं करून देतील. पण मंगलाबाईंना ते काही मानवले नाही. त्यांनी भाजण्या करण्यापासून सारे घरी करायचा घाट घातला. राधिका चांगलीच वैतागली होती. दिवाळीच्या दिवसात घरातले वातावरण गढुळले होते.
 
दिवाळीच्या फराळाला गोपाळरावांच्या बहिणी आल्या होत्या. सकाळची प्रसन्न वेळ होती. समोरच्या रस्त्यावर मुले फटाके लावीत होती. दारासमोरच्या पणत्या अजून मिणमिणत होत्या. आकाशकंदील वाऱ्याने हलत होता. गप्पागोष्टींना उत आला होता. लफ्फेदार साडी नेसलेली राधिका देखणी दिसत होती. तिने हौसेने नाकात नथपण घातलेली होती. काहीतरी सांगण्यासाठी ती अमेयला शोधत होती. अमेय दारातून आत येताच एकदम म्हणाली,  
"अमेय, कुठे गेला होतास तू? जरा मला मदत हवी आहे इकडे ये. "  असे म्हणत ती आत जाऊ लागली. गोपाळरावांच्या बहिणी, माई आणि अक्का तिथेच होत्या. दोघी जरा जुन्या वळणाच्या. माई मोठ्याने म्हणाल्या, 
"अगं सुने नवऱ्याचं नाव घेऊ नये असं चारचौघात. काही रीतभात आहे की नाही? " 
राधिका अवघडून गेली. यावर काय बोलावे तिला कळेना. मग गोपाळराव म्हणाले, 
"अगं माई आता ते सगळं जुनं झाले. आता जमाना बदललाय. आपणही बदलायला हवे ना? " असे म्हणत वातावरणतील ताण निवळावा म्हणून उगीचच हसले. पण बोललेला बोल काही परत घेता येत नाही. घरातील प्रसन्नतेला तडा गेलाच.  
संध्याकाळी मंगलाबाई आणि गोपाळराव दोघेच घरात होते. दूरचित्रवाणीवरचा दिवाळीचा कार्यक्रम बघत होते. मंगलाबाईंच्या मनातली अस्वस्थता बाहेर  आलीच.  
"आहो, माई म्हणतात ते अगदीच चुकीचे नाही. मलाही तिने अमेयाला असे नावाने बोलावणे बरे नाही वाटत. निदान चारचौघात तरी." 
मंगलाबाईंना हाताने थांबावीत गोपाळराव म्हणाले, "हे बघ मंगल, माईवर जे संस्कार आहेत त्या प्रमाणे ती बोलली. ते योग्य की अयोग्य  हा वेगळा मुद्दा आहे. पण ते ऐकून तू लगेच राधिकाला काही शिकवायला जाऊ नकोस. काही जुन्या गोष्टी सोडून द्यायला हव्यातच. " 
पण मंगलाबाईंचे काही समाधान झाले नाही. आता राधिकावर नाराज होण्याचे त्यांना अजून एक कारण मिळाले होते.  
मंगलाबाईंना आता राधिकाच्या प्रत्येक कृतीमध्ये काहीतरी चूक सापडू लागली होती. "राधिका कपाळावर कुंकू नाही तुझ्या, आणि मंगळसूत्र विसरलीस का घालायला? साबुदाण्याच्या खिचडीत हिरव्या मिरच्या घालाव्यात गं, लाल तिखट कशाला? ती पावभाजी नको बाई मला, तुमच्यासाठी करणार असशील, तर माझ्यासाठी पिठलं भात कर, दिवाणावर ही कुठली चादर घातली आहेस आज? नवीन आणलीस का? रंग नाही आवडला बाई मला, आणि डिझाइन जरा ठसठशीत पाहिजे, हे  फारच बारीक वाटतंय.... " 
अशा सूचनांची सरबत्ती सुरू झाली. राधिका आता घरी जास्तं जास्तं उशीरा येऊ लागली. अमेयने विचारले तिला असं का तर म्हणाली ऑफिसमध्येच बरं वाटतं, तिथे निदान माझं काम मी स्वतंत्रपणे करू शकते. घरातले इतर चौघे सदस्य कानकोंडे होऊन गेले होते. गोपाळराव मंगलाबाईंना समजवायचा निष्फळ प्रयत्न करीत. परंतु मंगलाबाईंचा पक्का समज होता की सुनेबरोबर असेच वागायला हवे.  
अखेर राधिकाला ते सारे असह्य झाले. ती अमेय ला म्हणाली असं कुढत, त्रागा करत एकत्र राहण्यापेक्षा वेगळं राहूयात  आपण. रोजचा संघर्ष तरी टळेल. अमेयला तो विचार नकोसा वाटला. आई वडील आणि भावंडापासून दूर, वेगळ्या घरात राहायची कल्पना त्याला नकोशी झाली. पण परिस्थिती सुधारण्याचे चिन्हं दिसेना. राधिका उदास राहू लागली. लहान सहन गोष्टींवरून तिची चिडचिड होत होती. तिचा मूळचा स्वभाव पार बदलूनच गेला होता. अखेर अमेयने धीर करून गोपाळरावांना सांगितले, की तो आणि राधिका वेगळे राहिले तर सगळ्यांच्या दृष्टीने हितकारक होईल. गोपाळरावांना तो विचार पटला आणि त्यांनी अनुमोदन दिले. त्यांनी मंगलाबाईंना सांगितले की अमेय वेगळे घर घेणार म्हणतोय. मंगलाबाईंना धक्काच बसला. असे काही होईल असे त्यांना वाटलेच नव्हते. परंतु यात देखिल त्यांना राधिकाचाच कावा दिसत होता.  "तिनेच माझ्या मुलाचे कान भरले असणार, नाहीतर अमेय असे कधीच करणार नाही. "  त्यांना राधिकाचा अजूनच जास्तं राग आला.  
"ताई म्हणते ते खोटे नाही, आजकालच्या मुली अशाच. " 
अखेर अमेय आणि राधिका घराबाहेर पडले. एक लहानसा फ्लॅट त्या दोघांनी खरेदी केला होता. वास्तुशांत देखिल केली. मंगलाबाईनी सरलाताईंना फोन करून ही बातमी दिली. ताई म्हणाल्या, "बघ मी म्हणले होते तस्संच झाले ना? " 
मंगलाबाई काहीच बोलल्या नाहीत. वनिता मंडळातल्या, भिशी मंडळातल्या बायका कुजबुजत होत्या. एव्हढे मोट्ठे घर असून सून आणि मुलगा वेगळे झाले, म्हणजे घरात नक्की काहीतरी घडले असणार. त्यांची आडून आडून चौकशी सुरू झाली. मंगलाबाईंना तो सर्व प्रकार असह्य झाला. आता त्यांना त्या कुजबुजणाऱ्यांचा राग आला होता. त्यांना प्रश्न पडला होता की, त्यांच्या घरातल्या खाजगी गोष्टींची हे लोक जाहीरपणे चर्चा का म्हणून करतायत?  मग काही काळासाठी मंडळात न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आता घरात ते चौघेच होते. मंगलाबाई, गोपाळराव, आकाश आणि अमोघ. त्यांचा दिनक्रम नेहमीसारखाच सुरू होता. पण नेहमी घरी असणाऱ्या मंगलाबाईंना फरक जाणवू लागला. राधिकाची रोजची गडबड, बडबड बंद झाल्याने त्यांना अगदी चुकल्यासारखे होऊ लागले. अमेय आणि राधिका दूर गेल्यानंतर एकेक प्रसंग त्यांना नव्याने आठवू लागला होता.

संध्याकाळ दाटून आली होती. अंधार पसरू लागला होता. मंगलाबाई तशाच स्वस्थपणे अंधारात बसून राहिल्या. त्यांना आता प्रकाश नकोसा वाटत होता. कारण उजेड झाल्यावर त्यांच्या डोळ्यातले अश्रू इतरांना दिसले असते ना? तितक्यात दारावरची बेल वाजली. घाईने डोळे पुसत त्या उठल्या. 
"हे आले वाटतं. कितीवेळा सांगितल आहे घराची किल्ली बरोबर ठेवा. दरवेळी मलाच उठावं लागतं दार उघडायला."  स्वतःशीच पुटपुटत त्यांनी दार उघडले. भिंतीवरचे बटण दाबीत दिवा लावताना गोपाळराव म्हणाले,
"मला वाटले आज तुझे वनिता मंडळ होते की काय? म्हणजे मला तासभर बाहेरच थांबायला लागणार. अशी अंधारात का बसलीस? " बोलता बोलता त्यांचे लक्ष मंगलाबाईंच्या चेहऱ्याकडे गेले.
"हे काय आता?  अमेय आणि राधिकाचे जाणे इतका लावून घेऊ नकोस. अगं ती दोघे वेगळ्या घरात राहत असली तरी आपली मुलच आहेत ना? वास्तुशांतीला तुला किती छान साडी घेतली त्याने आठवणीने?"
मंगलाबाईंच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले.  साडी हा त्यांच्या मनाचा अगदी हळवा कोपरा होता. किती वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या त्यांनी जमवल्या होत्या. साडीच्या आठवणीने उमटलेले हसू लगेचच मावळले.  त्या म्हणाल्या,  
"आहो ती मालविका आहे ना,  पूर्वी आपल्या समोर रहायची ती,  ती सांगत होती की तिची सून म्हणे .. " .
गोपाळरावांनी त्यांना मध्येच थांबवले.  ते म्हणाले,  
"हे बघ मंगल त्या मालविकाबाई,  त्यांचे घर, त्यांची सून आपल्यापेक्षा वेगळे आहेत ना? त्यांचा अनुभव आपल्या घराला लागू होईलच असे नाही.
तु अशा बोलण्यांकडे लक्ष देऊ नकोस. तुझ्या बुद्धीवर, समजुतीवर विश्वास ठेव. कारण कुणी शहाण्यासुर्त्या पूर्वजाने आपल्याला आधीच सांगून ठेवले आहे,  ऐकावे जनांचे - पण करावे स्वतःच्या मनाचे. "
मंगलाबाईंना सारे लख्खं उमगले होते. 
"खरं आहे तुमचं",  असे म्हणत त्या स्वयंपाकघराकडे वळल्या.