..... बाकी सारे ठीक आहे !

आज माझ्या देशात देवा - सारे काही ठीक आहे ...

कुणी गरीब, कंगाल कुणी - कुणी मात्र श्रीमंत आहेत |


जगण्याच्या लढाईमध्ये - जनता सारी व्यस्त आहे 

महागाई आणि भ्रष्टाचाराने - थोडी फार त्रस्त आहे | 


रस्त्यांवर चारचाकी, रोज रोज वाढत आहेत

पुला खाली आडोशाला - बेघरांचे जथे आहेत |


पावसाच्या काही सरी - नेतात रस्ते पाण्याखाली

जनतेचे सेवक मात्र - मागतात थोडी चिरीमिरी | 


बॉम्बस्फोट, टोळीयुद्ध - सारे काही सुरळीत आहे

चौकाचौकात भिकारी - त्यांना कायद्याचा धाक आहे |


अणू स्फोट करुन काही - भारत शक्तीशाली होतो

समुद्रातून येउन मृत्यु - रस्त्यांवर थैमान घालतो |


लोकांनाही त्याचे भय - आता फारसे वाटत नाही

मोठ्या मोठ्या शहरांसाठी - अशा घटना विशेष नाहीत |


धर्मांधतेची जीत सदा - सहिष्णुता पराजीत आहे

थोडे फार भांडण, तंटे ....पण बाकी सारे ठीक आहे |


आज माझ्या देशात देवा सारे काही ठीक आहे ...


कुठे पूर आणि दुष्काळ - शेतकर्‍याच्या गळा फास

भेगाळलेल्या जमिनी मधे - माय-लेकराची अश्रुधार |


धान्य कुठे सडते अन् - तळमळते कुठे उपाशी पोर

बेफिकीर धनदांडगे अन् सामान्यांच्या जीवा घोर |


चोरांची इथे शिरजोरी - सामान्याला मात्र काठी

बळी तोच कान पिळी - मग कायदे कानून कोणासाठी? 


औषध नाही, डॉक्टर नाहीत - साथीचे सारे रोग आहेत

संशोधन आणि प्रयोगांसाठी - गिनीपिग्ज् इथे खूप आहेत |


रस्ते नाहीत, शाळा नाहीत - वीज आणि पाणी नाही

कोणाला तू साकडे घालशील? - नशीब तुझे सरळ नाही | 


उन, थंडी, वारा, पाऊस - लेकरा, नको रे काही मागु 

लाल दिव्याच्या गाडीला - उगीच नको बोल लावू |


विठ्ठलाच्या भेटी साठी - वारकरी आसूसलेला

चंद्रभागेचा पान्हा - पण एकदशीला आटलेला |


शिर्डीच्या फकीराला बघ रेशमाची शाल आहे

सामान्याला वस्त्र नाही ...पण बाकी सारे ठीक आहे | 


नशिबाने गांजलेल्या लोकांचा थोडा क्षोभ आहे

सुख थोडे - दु:ख फार ....पण बाकी सारे ठीक आहे ।

आज माझ्या देशात देवा सारे काही ठीक आहे ..