कुछ भीगे अल्फाझ - एक शांत, तरल अनुभव

हा चित्रपट तसा अपघातानेच नजरेस पडला. प्राईम व्हिडिओजवर निरुद्देश भटकताना हा दिसला, पण कुठलीच नावे ओळखीची वाटली नाहीत. त्यामुळे सवयीने 'आयएमडीबी' रेटिंग बघितले आणि पहायला बसलो.

सुरुवातीला स्पष्ट करतो की एकंदरीतच कविता हा माझा प्रांत नव्हे. उर्दू शायरी तर अजिबातच नव्हे. तत्वज्ञ प्लेटो हा कवींच्या विरोधात होता आणि त्याच्या आदर्श 'रिपब्लिक'मध्ये कवींना मज्जाव होता या एका(च) कारणामुळे मला त्याच्याबद्दल ममत्व वाटते. जसे संगीतविरोध या मुद्द्यावर माझे नि औरंगजेबाचे जमते तसे. असो.

या चित्रपटात सुरुवातीलाच उर्दू-हिंदी शायरीचा मारा होऊ लागल्यावर पळ काढण्याचा मार्ग स्वीकारण्याची इच्छा होऊ लागली. पण चित्रपटाने खेचून धरले. शायरीच्या पलिकडेही जीवन आहे आणि त्या जीवनाला हा चित्रपट चिकित्सकवृत्तीने न्याहाळू पाहतो आहे हे कळाले. आणि ते जीवनही अगदी आजचे - समाजमाध्यमे, मीम्स, आरजे, हिट्स, व्हायरल या शब्दांनी पकडीत घेतलेले.

कथानक कोलकात्यात घडते. त्या निमित्ताने त्या शहराशीही बऱ्याच काळाने दृष्यभेट झाली.

एका खाजगे रेडिओकेंद्रावर रेडिओ जॉकी अल्फाझ रोज एक कार्यक्रम सादर करतो. कुछ भीगे अल्फाझ. त्यात मुख्यत्वे काही कवितांच्या ओळी, भावनांत भिजलेले शब्द आणि या दोन्हींशी सुसंगत अशी हिंदी चित्रपटगीते. मनोरंजनाच्या धबधब्याखाली गुदमरणारी तृषार्त मंडळी हा कार्यक्रम मन लावून ऐकतात. टॅक्सीत, घरी, दारी, दुकानी इ. अल्फाझ हा समाजमाध्यमांपासून दूर राहणारा, स्वतःची ओळख उघड करायला राजी नसलेला.

मीम्स तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणे हा व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीत अर्चना ऊर्फ आर्ची काम करते. तिला थोडासा ल्यूकोडर्मा (पांढरे डाग) आहे. थोडासाच, काही छोटेमोठे ठिपके म्हणावे एवढाच. काही कॅमेरा कोनांमध्ये आणि/वा प्रकाशयोजनांमध्ये कळणारही नाही इतपत. तिच्याबरोबरच काम करणाऱ्या अपूबरोबर तिची घट्ट मैत्री. ते दोघेही अल्फाझच्या कार्यक्रमाचे चाहते.

हे दोन्ही प्रवाह कुठे, कधी नि कसे एकत्र येतात आणि खरोखरच एकत्र येतात का याची कहाणी म्हणजे हा चित्रपट. याहून अधिक लिहायचे तर कथानकाचे गाईड लिहावे लागेल. आणि असे गाईड वाचून मग चित्रपट पाहू इच्छिणाऱ्यांनी इकडे न वळालेले उत्तम.

चित्रपट श्राव्य अर्थातच आहे, पण तितक्याच ताकदीचा दृष्यानुभव देण्यासही समर्थ आहे. किंबहुना दृक-श्राव्य हे जोडशब्द एवढ्या ताकदीने सामोरे येणे हा फारच सुखद अनुभव आहे.

अनिर्बन धर ऊर्फ 'ओनिर' या दिग्दर्शकाचे मी आधी काहीच पाहिले नव्हते. ती उणीव या चित्रपटाने भरून निघाली. वैयक्तिक प्रेमकथा, ल्यूकोडर्मा, समाज माध्यमे, घटस्फोट, आत्महत्या, कार्यालयीन कुरघोड्या, पैशाच्या निर्लज्ज पाठलागावर निघालेला बॉस असे सगळे प्रवाह, कुठलाही प्रवाह वरचढ होऊ न देता हाताळणे हे फारच कौशल्याचे काम.

अल्फाझ चे काम करणारा झैन खान दुर्राणी यालाही कुठे पाहिले नव्हते. कधीकधी त्याचा खर्जघोगरा आवाज कायिक अभिनयावर मात करतो असे वाटते. म्हणजे, मला वाटले.

आर्चीचे काम करणारी गीतांजली थापा. तिला आधी 'ट्रॅप्ड' मध्ये पाहिले होते. पण तो चित्रपट ऐंशी नव्वद टक्के राजकुमार रावचा असल्याने उरलेल्या दहावीस टक्क्यांत ती लक्षात राहिली नव्हती. आणि तेच बरे आहे. या चित्रपटात तिने फार सहजपणे तिची भूमिका साकारली आहे. एरवी ल्यूकोडर्मा (वा इतर कुठलेही दुखणे) झालेले पात्र सतत हौतात्म्याचा झेंडा घेऊनच वावरत असते. तसे इथे काहीही नाही.

आर्चीच्या आईची भूमिका मोना आंबेगावकरने केली आहे. तिचेही आधी काही पाहिले नव्हते. 'बिनधास्त' बघितला होता, पण तो दोनेक दशकांपूर्वी. इथे तिने फारच उचित आणि योग्य काम केले आहे.

एकंदरीतच, सर्व पात्रांचा अभिनय हा पूर्णपणे संयत, नेमका आणि नीटस आहे. हे यश अर्थातच दिग्दर्शकाचे.

आणि दृष्यानुभव जरी भारावून टाकणारा असला तरी अंगावर येणारा नाही हे नमूद करायलाच हवे.