प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि पर्यावरण

गेली काही वर्षे गणपती उत्सव जवळ आला की ज्या विषयांवर वाद-विवाद सुरू होतात त्यात 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्त्या, त्यांच्या विसर्जनामुळे होणारे प्रदूषण, त्या मूर्त्यांवर बंदी आणण्याची मागणी, 'पर्यावरणपूरक' मूर्त्या असे बरेच काही हिरीरीने मांडले जाते. या विषयाबद्दल थोडी सविस्तर मांडणी करणे हा या लेखाचा उद्देश. पीओपीच्या कचराव्यवस्थापनाच्या संशोधनात सहभागी झालो होतो ही माझी लेख लिहिण्याची ईषत पात्रता.

पॅरिसच्या उत्तरेला असलेल्या मौंमार्त्र (Montmartre) या टेकडीवरील जिप्समचे दगड भाजून नि दळून केलेली पूड म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी). मूर्त्या करण्याखेरीज ही पूड अनेकविध कामांसाठी वापरली जाते - भिंतींना गिलावा करण्यासाठी, 'फॉल्स सीलींग' साठी, मोडलेल्या हाडाला आधार देण्यासाठी, खडू करण्यासाठी, अग्निरोधक म्हणून आणि रसायनशास्त्राच्या प्रयोगांत चंबू हवाबंद करण्यासाठी. अशा विविध प्रकारे पीओपी गेले किमान एक ते दीड हजार वर्षे उपयोगात आणले जाते आहे. सुमारे शंभर वर्षांपासून पीओपीचाच एक प्रकार दंतवैद्य कृत्रिम दातांसाठी साचा करण्यासाठी वापरतात.

आज या सर्व उपयोगांमध्ये मूर्त्या तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपीचे प्रमाण किती आहे याचा खात्रीशीर आकडा उपलब्ध नाही. खात्रीशीर आकडा शोधायला गेले तर मनोरंजन मात्र होते. या बातमीनुसार सरासरी एका दिवसाला सुमारे पाच हजार मूर्त्या विसर्जित होतात. एक घरगुती मूर्ती सुमारे एक ते सव्वा किलोची असते. अगदी दोन किलो धरली तरी दिवसाला दहा टन. म्हणजे दहा दिवसांत शंभर टन. पण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या मते हा आकडा किमान पाचशे टन आहे (राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची वेबसाईट 'सुरक्षित' नाही असा संदेश येईल; स्वजबाबदारीवर पुढे जाऊन वेबसाईटवरील माहिती वाचा).

पाचशे टन हा आकडा जरी मान्य केला तरी दिवसाला पन्नास टन. बांधकाम क्षेत्रात किती प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरले जाते? एका मध्यम आकाराच्या गृहप्रकल्पाच्या बांधणीमध्ये एक ते पाच टन पीओपी एका दिवसात वापरले जाते. लहान, मध्यम नि मोठे सर्व प्रकल्प अंतर्भूत केले तर दिवसाला हा आकडा सहज शंभरी पार करतो. आणि गृहप्रकल्पांची बांधणी वर्षभर नि भारतभर चालू असते.

बांधकाम क्षेत्रांत वापरल्या जाणाऱ्या पीओपीचे कचरा व्यवस्थापन कसे केले जाते? त्यासाठी तिथे किती पीओपी कचरा तयार होतो याकडे पाहू. पाणी मिसळून पीओपीचा लगदा केला जातो आणि तो भिंतींना गुळगुळीत करण्यासाठी लिंपला जातो. यात जे खाली पडते ते पुन्हा वापरले जात नाही. एका स्क्वेअर फुटाच्या बांधकामात सुमारे पाव ते अर्धा किलो पीओपी वाया जाते. म्हणजे चारशे स्क्वेअर फुटांमागे किमान एक क्विंटल.

हा राडा रोडा कुठेतरी नेऊन टाकणे यापलिकडे काहीही केले जात नाही. ठिकठिकाणी दिसणारे राडारोड्याचे ढीग मूक साक्षीदार आहेत.

मग गणपतीच्या दिवसांत पीओपी कसे पर्यावरणाला घातक आहे असा गलबला का सुरू होतो? आणि त्याचाच एक भाग म्हणून 'पर्यावरणपूरक' मूर्त्यांची भलामण कशी केली जाते याकडे नीट पाहू.

शाडूच्या मूर्त्या पर्यावरणपूरक असतात अशी एक समाजमान्य समजूत आहे. मुळात शाडूमाती निर्जीव असते, सजीव मृदा नव्हे. विसर्जन केल्यावर तिचा गाळ तयार होऊन तळाला बसतो. आणि नदीव्यवस्थेत गाळ हा पर्यावरण-घातक असतो, पर्यावरणपूरक नव्हे. त्यात अजून काही पदार्थ मिसळून त्याला 'पर्यावरणपूरक' अशी चिठ्ठी चिकटवण्याआधी त्यात नक्की 'पर्यावरणपूरक' काय आहे या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.

तुरटीच्या मूर्त्या कराव्यात म्हणजे त्या विसर्जित केल्यावर पाणी आपोआप शुद्ध होईल अशीही मांडणी कुणी केल्याचे ऐकिवात आहे. तुरटीच्या मूर्त्या करण्यासाठी लागणारी कलाकारी कितीजणांकडे आहे, तुरटीच्या मूर्त्या सुमारे सुपारी ते सफरचंद या आकाराच्या होऊ शकतील. त्याहून मोठ्या करायच्या झाल्यास एवढी अख्खी तुरटी कुठे मिळेल, मुळात सर्व मूर्त्या तुरटीच्या करायच्या झाल्यास तेवढी तुरटी उपलब्ध आहे का आणि त्याची किंमत किती पडेल, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुरटी नदीपाण्यात जाणे पर्यावरणाला पूरक आहे की मारक या प्रश्नांबद्द्ल अर्थातच मुग्धता आहे.

पीओपीच्या मूर्त्या का केल्या जातात, आणि त्यांच्या विसर्जनामुळे प्रदूषण होते म्हणजे काय होते या प्रश्नांची उत्तरे शोधली तर चित्र स्पष्ट होईल.

शाडूच्या मूर्त्या या हाताने घडवाव्या लागतात, थोडक्यात, त्यासाठी कसबी कलावंत असणे गरजेचे आहे. पीओपीच्या मूर्त्या साच्यातून काढता येतात. त्यामुळे यंत्रावर काम केल्यासारखे त्यावर कामगार काम करू शकतात.

एक वैयक्तिक अनुभव - मला स्वतःला चित्रकला आणि शिल्पकला याचे अजिबात अंग नाही (एक सरळ रेषा काढता येत असेल तर शपथ). पण साच्यातून मूर्त्या काढण्याचे काम माझ्यासारखा अकुशल कामगारही जवळपास तेवढ्याच वेगाने करू शकतो.

यामुळे पीओपीच्या मूर्त्या करण्यासाठी शाडूच्या मूर्त्या करण्यापेक्षा सुमारे एक पंचमांश (वा त्याहून कमी) वेळ लागतो.

अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे किंमत. बाजारात उपलब्ध असलेली शाडू माती कमीतकमी ऐंशी रुपये किलो या भावाने उपलब्ध आहे. पीओपीची किंमत आहे सुमारे आठ रुपये किलो.

या कारणांनी पीओपीच्या मूर्त्या केल्या आणि विकल्या जातात.

आता पीओपीच्या मूर्त्या विसर्जित केल्याने प्रदूषण होते म्हणजे काय होते ते पाहू.

पीओपी विषारी नसते. विसर्जन केल्यावर पीओपीची मूर्ती फारशी न विरघळता तशीच पडून राहते. मग पाण्याच्या प्रवाहातल्या इतर पदार्थांशी टकरा होऊन ती हळूहळू भंग पावत जाते. मुंबईच्या समुद्रकाठांवर किंवा नद्यांच्या पात्रांत याची उदाहरणे भरपूर दिसतील.

मग पीओपीचे प्रदूषण म्हणजे काय?

नदी (आणि समुद्र) ही एक सजीव परिसंस्था आहे. त्यात वनस्पती आणि जलचर असतात. पीओपी हा त्या जीवसंस्थेतला घटक नव्हे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा बाह्यघटक जेव्हा त्या संस्थेत शिरतो तेव्हा त्या संस्थेचा समतोल बिघडतो. पुण्यातला आकडा पाचशे टन आहे असे आपण आधीच मानले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठलाही घटक जर नदीच्या जीवसंस्थेत शिरतो तेव्हा त्या प्रमाणामुळे ते प्रदूषण मानले जाते.

रासायनिक सांडपाणी नदी वा जलसंस्थेत शिरल्याने होणारे प्रदूषण वेगळे - त्यामुळे जलचर थेट जिवालाच मुकतात. आणि ते पाणी वापरणारे/पिणारे भूचरही.

मोठ्या प्रमाणावर बाह्यघटक जीवसंस्थेत घुसल्याने होणाऱ्या प्रदूषण समजवून घेण्यासाठी एक टोकाचे उदाहरण पाहू. पाचशे टन उत्तम दर्जाचा आंबेमोहोर तांदूळ जर आपण पुण्याच्या नदीत टाकला तर तेही प्रदूषणच आहे. कारण नदीतली जीवसंस्था हे आंबेमोहोर तांदळाचे स्थान नव्हे. त्या जीवसंस्थेत तो बाह्यघटकच.

म्हणजे, किंमत आणि सोय या दोन घटकांमुळे पीओपी मोठ्या प्रमाणावर - खरे तर भीतीदायक प्रमाणात - वापरले जाते. आणि त्याच्या विसर्जनामुळे जलप्रवाहातील जीवसंस्थेवर घातक परिणाम होतो.

इथे हा मुद्दा लक्षात ठेवायला हवा की शाडूमातीच्या मूर्त्या पाण्यात विरघळतात आणि जलप्रवाहातील जीवसंस्थेला घातकच असतात. फक्त किंमतीकडून परवडत नसल्याने त्या मूर्त्यांचे प्रमाण एकूण मूर्त्यांच्या सुमारे दहा ते पंधरा टक्केच असते. त्यामुळे खलनायकपदाची माळ पीओपीच्या गळ्यात पडते.

याला उपाय काय?

प्रथम वाहत्या पाण्यातच मूर्ती विसर्जन करण्यामागचा हेतू काय ते पाहू. धर्मशास्त्रात तसे सांगितले आहे हे उत्तर शंभर टक्के बरोबर आहे. फक्त त्याच धर्मशास्त्रात मूर्ती कशाची करावी हेही सांगितले आहे हे लक्षात ठेवावे. मूर्ती नदीतील गाळाची करावी असे धर्मशास्त्र म्हणते. म्हणून वाहत्या पाण्यात (पक्षी: नदीत) विसर्जन करावे हे योग्यच. नदीपात्रातला गाळ नदीपात्रात परत जाऊन एक चक्र पूर्ण होते.

मूर्ती करताना पीओपी, शाडू माती, कागदाचा लगदा असे पदार्थ वापरायचे, तेव्हा धर्मशास्त्र रेशमात गुंडाळून ठेवायचे. विसर्जन करताना धर्मशास्त्राला उजेड दाखवायचा. तर्क-बुद्धीला हे मान्य असेल तर प्रश्नच मिटला, नव्हे उद्भवलाच नाही.

पण ही विसंगती कळत असेल तर पुढचा भाग - मग या पीओपीच्या कचऱ्याचे करायचे काय?

त्याला दोन उत्तरे आहे. औष्णिक/सौर आणि यांत्रिक ऊर्जा वापरून पीओपी पुनर्वापरासाठी तयार करता येते. वा रासायनिक प्रक्रिया करून पीओपीचे रूपांतर चुना (बांधकामासाठीचा) आणि खत यांमध्ये करता येते.

प्रथम औष्णिक/सौर आणि यांत्रिक ऊर्जा.

पीओपीची रासायनिक संज्ञा कॅल्शियम सल्फेट (CaSO4·1/2H2O). मूर्ती केल्यावर ही संज्ञा होते (CaSO4·2H2O). म्हणजे काय, तर प्लॅस्टर ऑफ पॅरिस जेव्हा कोरडा भुगा स्वरूप दिसते तेव्हाही त्यात सुमारे पाच टक्के पाणी रेण्विक पातळीवर बंधित असते. मूर्ती करताना आपण अजून पाणी घालून त्याचा लगदा करतो तेव्हा ते वीस टक्क्यांवर जाते. मूर्ती खडखडीत उन्हात वाळवली तरी हे वीस टक्के पाणी तसेच असते. किंबहुना, त्यामुळेच मूर्ती उभी रहाते.

जर तापमान १४० डिग्री सेल्सिअसपर्यंत नेले तर हे पाणी निघून जाते आणि मूर्ती पूर्ण ठिसूळ होते. हाताने सहज भुगा करता येईल इतकी. हा भुगा बारीक दळून घेतला आणि चाळून घेतला तर जे 'पीठ' मिळेल ते म्हणजे शुद्ध पीओपी. परत वापरण्यासाठी तयार. अशा प्रकारे मिळवलेल्या पीओपीचा वापर करून पुनःपुन्हा मूर्त्या तयार करता येतात. पाच वेळेस तर नक्की, कारण आम्ही करून पाहिल्या आहेत.

अशा प्रकारे पीओपी परत मिळवायचे असेल तर तापवणे, दळणे आणि चाळणे या क्रिया कराव्या लागतील.

ते करायचे नसल्यास दुसरा मार्ग - रासायनिक प्रक्रिया करून.

अमोनियम कार्बोनेट (रासायनिक संज्ञा (NH4)2CO3) च्या द्रावणात मूर्ती बुडवली तर ७२ ते ९६ तासांत ती पूर्ण विरघळते. इथे मूर्ती सुमारे एक किलो वजनाची (घरगुती उत्सवात वापरलेली) आहे असे गृहीत धरले आहे. विरघळल्यानंतर त्या द्रावणाचे घटक असतात कॅल्शियम कार्बोनेट (बांधकामासाठीचा चुना) आणि अमोनियम सल्फेट (बागेसाठी खत). एक किलो मूर्तीसाठी सुमारे एक किलो अमोनियम कार्बोनेट लागते. द्रावण करण्यासाठी एक किलो अमोनियम कार्बोनेट नऊ लिटर पाण्यात विरघळवावे लागेल.

अमोनियम कार्बोनेट ऐवजी अमोनियम बायकार्बोनेट (निम्म्याहून जास्ती स्वस्त पडते) वापरले तर विरघळल्यानंतर त्यात कार्बॉनिक ऍसिड हे सौम्य आम्लही तयार होते. या आम्लाचा काही त्रास होत नाही.

या द्रावणाला अमोनियाचा मंद वास येतो. त्रास होण्याइतका नाही.

थोडक्यात, इच्छा तिथे मार्ग हे उलट करून असे म्हणावे लागेल, की मार्ग आहे, नव्हे, आहेत. इच्छा पाहिजे.

नाहीतर आहेच मतामतांचा निष्फळ गलबला...