किरकोळ नवरे - एक परीक्षण

किरकोळ नवरे - एक परीक्षण


    गेल्या पंधरा ते वीस वर्षांत नवरा बायकोच्या नात्यावर आधारीत असलेल्या नाटकांच्या लहानशा लाटेत किरकोळ नवरे या नाटकाची भर पडलेली आहे. एकविसाव्या शतकात स्त्री पुरूषांमध्ये आलेला मोकळेपणा, दोघांतली समानता व व्यक्तिस्वातंत्र्याला आलेले महत्त्व हे घटक स्वाभाविकपणे या नाटकात अपरिहार्यपणे येतात. शहरी उच्च मध्यमवर्ग हा आणखी एक घटक नाटकात आहे. याच घटकांवर नाटकाचा डोलारा उभा आहे.
  जोडप्याच्या घरी अचानक नायिकेचा पूर्वीचा नवरा येतो. हा नवरा तुरुंगातून सुटून आलेला असतो. घरावर अधिकार कोणाचा, नायिकेने कोणासोबत राहायचे या मुद्द्यांमुळे त्रिकोनात रंग भरत जातात.  नायिकेचा आताचा नवरा एक नाजुक प्रकरणात पूर्वी अडकलेला असतो, ही गोष्ट नाट्य वाढवायला मदत करते. नाटकाची अखेर काय होते, हे नाटकातच पाहणे योग्य. लेखक व दिग्दर्शक सागर देशमुख यांनी विनोदी रीतीने हे प्रकरण हाताळले आहे. नाटक सस्पेन्स प्रकारातले नसूनही प्रेक्षकाला शेवटाचा अंदाज येत नाही. देशमुख त्यात यशस्वी झाले आहेत.
  आधीच्या नव-याच्या भूमिकेत देशमुख, आताच्या नव-याच्या भूमिकेत पुष्कर चिरपुटकर व बायकोच्या भूमिकेत अनिता दाते- केळकर भूमिकांना न्याय देतात. केळकर यांनी केलेला डबल रोल प्रशंसनीय. उच्च मध्यमवर्गीय घराचे नेपथ्य सही सही दाखवलेले आहे.
  उच्च मध्यमवर्गीय पार्श्वभूमीमुळे प्रकरण, प्रेमप्रकरण, प्रेग्नंसी, दोन पुरुषांची जवळीक, घटस्फोट, बिअर हे संदर्भ सतत येत राहतात, दिसत राहतात. नाटक नव्या काळाचे असल्याने तसे संदर्भ येणे स्वाभाविक मानले तरी ते फार फार वेळा येतात, असे वाटते. प्रेक्षकातील सर्व वयोगटांना तो मानवेल असे नाही. साठ सत्तरच्या दशकातील शंभर टक्के सरळमार्गी नायक आता राहिलेला नाही हे मान्य केले तरी अनेक उच्च मध्यमवर्गीय या गोष्टींपासून दूर आहेत. यातील काही गोष्टी टाळून व्यक्तिरेखा तयार करता आल्या असत्या का, हा मुद्दा चिंतनीय आहे. उदा. पुरूष व्यक्तिरेखांच्या हातात बिअर देण्याची गरज आहे का, यावर विचार व्हावा. 
    एकाचे वाक्य पूर्ण होत असताना दुसरा स्वतःचे वाक्य सुरु करतो, ही अलीकडे वारंवार दिसणारी बाब. दोन वाक्यांत अंतर ठेवले तर नाटकाचा परिणाम वाढेल. संवाद सावकाश रीतीने घेतले तर परिणाम वाढेल.

- केदार पाटणकर