मराठी कादंबरीची वाटचाल - छोटे टिपण

    कथा, कविता, कादंबरी,समीक्षा, रिपोर्ताज, नाटक असे साहित्याचे स्थूलमानाने प्रकार पडतात. मराठी साहित्यातील कादंबरी या प्रकाराचा आपण थोडक्यात वेध घेऊ. बाणभट्टाने आपल्या कथेतील नायिकेचे कादंबरीहे नाव कथेला दिले. तेव्हापासून कादंबरी हा शब्द रूढ झाला. तथापि, इंग्रजीतीलनॉव्हेल या प्रकाराचे मराठी रुप नावल असे करण्यात येऊन ते कादंबरीसाठी योजिले जाऊ लागले.
   कादंबरीची साधारण व्याख्या अशी करता येईल – खूप मोठा भाषिक तसेच प्रसंगांचाअवकाश असलेली कथा म्हणजे कादंबरी होय. प्रथमपुरूषी, तृतीयपुरूषी, फ्लॅशबँकअशा विविध तंत्रांनी कादंबरी लिहिली जाते. तसेच, काळानुरूप त्या त्या विषयांचा ठसाकादंबरीवर उमटलेला दिसतो.
   हरी केशवजी यांनी यात्रिक क्रमण हीकादंबरी १८४१ साली लिहिली पण ती अनुवादित होती. त्यामुळे, तिला प्रथमत्वाचा मानदेता येत नाही. १८५७ साली बाबा पदमजी यांनी यमुनापर्यटन ही कादंबरी लिहिली. हीच कादंबरीमराठीतील पहिली कादंबरी मानली जाते. पुढे १८६१ साली लक्ष्मणशास्त्री हळबे यांनीमुक्तामाला नावाची अदभुतरम्य कादंबरी लिहिली. काही अभ्यासक याच कादंबरीला प्रथमत्वाचा मान देतात. या कादंबरीच्या प्रभावात पुढे सदाशिव रिसबूड, केशव जोगवेकर, रामकृष्ण नाईक, रा.भि.गुंजीकर यांनी कादंब-या लिहिल्या. शृंगारीक तसेच किंचित सामाजिक कादंब-यांचा काळ १८८० पर्यंत राहिला.
    सन १८८५ ते १९२० हा काळ आधुनिक मराठी कादंबरीचा पाया घालणारा ठरला. हा काळ ज्ञानप्रसाराचा तसेच रुढीविरोधाचा असल्यानेत्याचे प्रतिबिंब तत्कालीन कादंब-यांत पडले. पण लक्षात कोण घेतो, कर्मयोग या कादंब-यांतून हरिभाऊंनी रुढीविरोध केला. त्यांनी काही ऐतिहासिक कादंब-याही लिहिल्या.हरिभाऊंचे समकालीन वा.म.जोशी यांनी या काळात विपुल लेखन केले. इंदू काळे व सरलाभोळे या पत्रात्मक कादंबरीद्वारे कादंबरीलेखनाची नवी शैली वा.म. यांनी रुढ केली.श्रीधर केतकर यांनी अशाच प्रकारच्या सामाजिक कादंब-या लिहिल्या. ब्राम्हणकन्या हीत्यांची गाजलेली कादंबरी होय. नाथमाधव हे तेव्हाचे लक्षवेधी नाव. ऐतिहासिक कादंब-यांमध्ये त्यांचे नाव अग्रभागी येते.
     सन १९२० मध्ये टिळक युगाचा अस्तहोऊन गांधीयुगाला सुरवात झाली. रंजकता संपून वास्तववाद येत चालल्याची चाहूल तिथेलागली. पुढील वीस ते तीस वर्षे रंजनवादी व जीवनवादी अशा दोन्ही प्रकारांच्यासाहित्याची निर्मिती झाली. वि.स.खांडेकर व ना.सी.फडके हे दोन कादंबरीकार त्याकाळात लोकप्रिय झाले. प्रणय हा छोटा समान धागा असलेल्या त्यांच्या लेखनात एक फरकहोता. खांडेकरांना जीवनवाद महत्त्वाचा वाटला तर फडक्यांना कलावाद प्रिय होता. गं.त्र्यं.माडखोलकर,वरेरकर, वि.वा.हडप, गीता साने, विभावरी शिरूरकर ही नावे त्या काळात महत्त्वाचीहोती. स्वातंत्र्याचा काळ येईपर्यंत स्वप्नरंजनाकडून वास्तवतेकडे कादंबरीचा प्रवासहोत राहिला.
     सन १९५० नंतरचा काळ गो.नी.दांडेकर,श्री.ना.पेंडसे, व्यंकटेश माडगूळकर, रणजीत देसाई, शिवाजी सावंत, ना.सं.इनामदारयांनी गाजवला. अण्णाभाऊ साठे हे तेव्हाचे अतिशय जोरकस असे नाव. त्यांची फकिरा हीकादंबरी लक्षवेधी ठरली. साठे यांच्या जोडीने शंकरराव खरात, केशव मेश्राम, नामदेवकांबळे, उत्तम तुपे यांनी दलित कादंबरीचा प्रवाह सकस केला. व्यंकटेश माडगूळकर ,रा.वि.टिकेकर,ग.ल.ठोकळ, शंकर पाटील, रा.रं बोराडे यांनी ग्रामीण कादंबरीची धुरा सांभाळली होती.        औद्योगिकरणानंतरच्या माणसाची कहाणी कादंबरीतून येऊ लागली. निराशा, बेरोजगारी, शेती, भ्रष्टाचार हे विषय कैकवार कादंबरीतून येऊ लागले. कोसला या भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीने कादंबरीविश्वाला नवे वळण दिले. भाऊ पाध्ये, मनोहर शहाणे, ह.मो.मराठे यांनी शहरी माणसाचे चित्रण केले. राष्ट्रपुरूषावरील चरित्रात्मक कादंबरी लिहिण्याचा मान भा.द.खेरयांच्याकडे जातो.
      सन १९८० नंतर सामाजिक, ग्रामीण, राजकीयअशा संमिश्र नेपथ्यावरच्या कादंब-या आल्या. त्यात, पुरुषोत्तम बोरकर (मेड इनइंडिया- १९८७), अशोक व्हटकर(बगाड – १९८५), नागनाथ कोतापल्ले (गांधारीचे डोळे –१९८५), राजन गवस (चौंडकं – १९८५), राजन खान (यतीम -१९९०), सदानंद देशमुख (बारोमास –२००४) ही काही आठवलेली नावे.     
     सध्याच्या फोर जी च्या वेगवान जीवनात कादंबरी वाचण्यासाठी तुलनेने कमी लोक वेळ काढतात. असे असूनही, अनेक उत्साही लेखक कादंबरी लिहीत आहेत. मनोज बोरगावकर (नदीष्ट), बाळासाहेब लबडे (पिपिलिका मुक्तिधाम ) ही काही  आठवलेली नावे. त्यांना चांगला प्रतिसाद मिळो.

(समाप्त)