मराठीत आलेले व आता मराठीच झालेले शब्द - लहान लेख

वेगवेगळ्या भाषांमधून मराठीने शब्द घेतले व त्यांना सामावूनघेऊन मराठी अधिक शैलीदार झाली, ही बातमी आता जुनी झाली. सदर टिपणात कोणकोणत्याभाषांमधून मराठीत कोणते प्रमुख शब्द आले, ते पाहू. परकीयांचा संबंध व्यापार वयुध्दामुळे आल्याने साधारण या क्षेत्रांशी संबंधित शब्दच परकीयांकडून मराठीत बरेच आले,हे लक्षात येते. महाराष्ट्राच्या निकटवर्ती राज्यांमधून मराठीत शेजारसंबंधांमुळेशब्द आले.

वास्को द गामा हा पोर्तुगीज व्यापारी १४९८साली भारताच्या खालच्या बाजूला व्यापारानिमित्ताने आला. कोचीनमध्ये त्याने आपले बस्तान बसवले. व्यापार करायला सुरवात केली. १४९८ ते १९६१ पर्यंत पोर्तुगीजांचा येथीलहिंदू राजे, मुसलमान राजे, इंग्रज यांच्याशी व्यापारी संबंध येत गेला तसेच, यासर्वांशी प्रसंगोपात संघर्षही होत गेले. सुमारे दीडशे वर्षे कोचीन, दमण दीव, गोवा याभागांवर पोर्तुगीजांचा प्रभाव राहिला. पोर्दुगीज भाषेतून मराठीत आलेल्या वसुंदरपैकी वसलेल्या शब्दांची काही उदाहरणे अशी - पगार, चावी, काडतूस, खमीस, पिस्तूल, बिजागरी, तंबाखू,बटाटा, साबण, हापूस, लोणचे, पायरी, कोबी.

पेशवाई बुडाल्यापासून म्हणजेच सन १८१८पासून सन १९४७ पर्यंत इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानवर होते. अनेक हिंदुस्थानी लोक गरजम्हणून इंग्रजी शिकू लागले. त्यामुळे, आपोआपच इंग्रजी शब्द मराठीत पसरले व सहजपणेरुळले. सायकल, डॉक्टर, रेडिओ, स्टेशन, सिनेमा, सर्कल, टेबल ही काही उदाहरणे.डॉक्टर हा शब्द ग्रामीण भागात इतक्या खोलवर रुजला की काही काही ग्रामीण लोक त्याचा उच्चार डागदर असा करीत. तशा पध्दतीचे संवाद साहित्यात दिसतात. इंग्रजी भाषेतले अनेक शब्द इंग्रजांनी फ्रेंचमधून घेतले, ही एक उपमाहिती.

बाराव्या-तेराव्या शतकात तुर्क व मोगलांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा आपल्या महाराष्ट्राशी निकट संबंध येऊ लागला, मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा फार्सी असल्याने अर्थातच फार्सीचा व मराठीचा संबंध आला. राज्यकारभारविषयक व्यवहारासाठी फार्सीचा उपयोग होऊ लागला, महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक जीवनही काही अंशी फार्सीमय झाले. जवळजवळ आठशे वर्षांचा हा संबंध असल्याने फारसी भाषेतील अनेक शब्द मराठीत रुळले तर काहीही आश्चर्य नाही. अशा शब्दांचे काही नमुने असे – हेजीब, दफ्तरदार, फडणवीस, कारखानीस, खातरजमा, दिलासा,रिवाज, दस्तूर, शिरस्ता, दौलतजादा करणे, शह देणे, नेस्तनाबूत करणे हेवाक्र्प्रचारही फारसीची दमदार भेट होय. असे म्हणतात की, फारसीतील बरेच शब्द अरबीआहेत.

उर्दू ही अलीकडची म्हणजे दोनशे ते तीनशे वर्षांत विकसित झालेली भाषा होय. तुर्की, अरबी, फार्सी या भाषांमध्ये उर्दूची मुळेसापडतात. हिंदी, दख्खनी, रेख्ता या नावांनी उर्दू ओळखली गेली. उत्तर प्रदेश,जम्मू या भागात अधिक प्रमाणात उर्दूसमाजात संवादली जाते. उर्दूतून मराठीत बातचीत, मुद्दा, जरा, चर्चा हे शब्द आले आहेत.

कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात हे तर आपल्या राज्याचे शेजारी. त्यांच्याकडूनही मराठीने काही शब्द घेऊन स्वतःला समृध्द केले.

कानडी भाषेतून आलेल्या शब्दांपैकी काही वानोळे असे - आक्का, अण्णा, गाजर, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली,चिंधी, खोली, कोथिंबीर,चिरगुट, मुंडासे.

गुजरातीतून मराठीत हे शब्द आले असावेत - जेमतेम, चरखा, ढोकळा, दामदुप्पट, अफरातफर, पथारी.

तेलगू भाषेतू मराठीत गदारोळ, अनारसा,किडूकमिडूक हे शब्द आल्याचे सांगतात.

तमीळनाड महाराष्ट्राला तसे दूरचे राज्य पण चिल्लीपिल्ली, मठ्ठा हे शब्द तमीळ भाषेतून मराठीत पोचते झाले.

(समाप्त)