वर्क फ्रॉम होम: हुलकावणी देणारा वाळवंटातील गारवा!

कोविड महामारीपासून, घरून कामाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. ती काळाची गरज होती. पण आता परिस्थिती नसताना त्याच गोष्टीला चिकटून राहण्यात काय शहाणपण आहे? काही प्रमाणात प्रवासातील अडथळे आणि प्रवासाचा वेळ दूर होतो, कर्मचाऱ्यांची ऊर्जा वाचते. पण तुमचा प्रवासाचा त्रास वाचला म्हणून ऑफिसमधून काम करण्याचे इतर मौल्यवान फायद्यांचा त्याग करणे योग्य आहे का?

सुरुवातीला, एका भारतीय कर्मचाऱ्याला घरून काम करण्याच्या कल्पनेने खूप आनंद होतो, कारण त्याने अनेक हॉलिवूड चित्रपट पाहिले असतात ज्यात मुख्य अभिनेता किंवा अभिनेत्री बॉसशी फोनवर बोलत असतो, दुसऱ्या हाताने सँडविच बनवत असतो. त्यांच्याकडे एक बेबी सिटर आहे, जो दिवसभर त्यांच्या बाळाची काळजी घेतो. पण माझ्या मते, जेव्हा आपण भारताच्या दृष्टीने बघतो, तेव्हा 95% भारतीय कुटुंबे, घरे आणि त्यांची मानसिकता अद्यापही घरातून कामासाठी योग्य नाही. कुटुंबियांना सोडा, कर्मचारी स्वतःच घरातून काम करण्यासाठी पुरेसे सक्षम नाहीत. असे का? सांगतो.

85% प्रकरणांमध्ये, भारतात वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा जोडीदार (मग तो हाऊस वाईफ असो की घरून काम करणारा असो की बाहेर जाऊन काम करणारा असो) घरातून काम करणाऱ्या व्यक्तीच्या क्षेत्रातील नसतो आणि कदाचित उदार आणि समजूतदार नसतो. कोणत्या बाबतीत उदार? सांगतो!

ऑफिसमध्ये असताना, आपण आपण आपल्या पुरुष किंवा महिला सहकाऱ्यांशी बोलून लहान लहान कॉफी ब्रेक घेऊन आपला ताण कमी करण्याचा प्रयत्न करतो. आता अशा परिस्थितीची कल्पना करा की, जिथे एखादी व्यक्ती घरून काम करत आहे आणि त्याच्याकडे खास कामासाठी वेगळी खोली नाही आणि तो त्याच्या कामासाठी बेडरूम वापरत आहे आणि त्याचे कामाचे तास दिवसाला 12 तासांपर्यंत वाढले ​​आहेत. का? कारण, कोणताही प्रवास करावा लागत नसल्यामुळे, त्याचा बॉस (जो त्याच्या स्वत:च्या घरी असतो आणि दिवसाला 14 तास काम करतो. कारण? त्याच्या बॉसमुळे!) त्याला सकाळी 7 ते रात्री 9 या संपूर्ण वेळेत कोणत्याही वेळी मीटिंगला कनेक्ट करायला सांगत असतो. बॉसदेखील त्याला स्वतःचे उदाहरण देतो की तो स्वत: सुद्धा दिवसाला 14/15 तास काम करतो. तर मग अशा विचित्र आणि अवेळी असलेले कॉन्फरन्स कॉल्स आणि त्यात भर म्हणून इतर नेहमीची आव्हानात्मक कार्यालयीन कामे असतात ती वेगळीच!

त्यामुळे कर्मचाऱ्याला जास्त ताण, जास्त काळजी आणि जास्त थकल्यासारखे वाटणार नाही का?

आता आपण एक उदाहरण घेऊ! समजा, अशा एखाद्या (दिवसातील 12 ते 14 तास घरून काम करावे लागणाऱ्या) विवाहित पुरुष कर्मचाऱ्याला त्याच्या स्त्री सहकाऱ्याशी (जी तिच्या घरी असेल) ब्रेक दरम्यान थोडा मोकळा वेळ मिळेल तेव्हा बोलण्याची इच्छा झाली, तर तो तिच्याशी (ऑफिस इतक्याच) मोकळेपणाने बोलू शकेल का?

घरून काम केल्यामुळे, सहकारी, बॉस यांच्याशी समोरासमोर संवाद होत नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाला समोरच्या व्यक्तीला मोबाईलवर किंवा अधिकृत ॲपवर कॉल करावा लागतो. घरातील त्या पुरुष व्यक्तीचा जोडीदार हे समजून घेण्याइतपत उदार असेल का की, हे फक्त कामाचा ताण मोकळा करण्यासाठी सहकाऱ्यांमधील चाललेली सामान्य चर्चा आहे आणि अफेअर नाही? कारण इतका वेळ त्याचा/तिचा कशासाठी फोन येतो? त्यामुळे संशयाला जागा तर निर्माण होणार नाही ना? होय, नक्की तयार होईल!

काही बाबतीत जोडीदार खूप समंजस असतो आणि समजून सुद्धा घेतो. घरून काम करणाऱ्याने व्यवस्थित परिस्थिति जर जोडीदाराला समजावून सांगितली, कामाचे स्वरूप सांगितले आणि ऑफिसच्या सहकाऱ्यांबद्दल पूर्ण माहिती जर जोडीदाराला दिली तर गैरसमज निर्माण होत नाहीत. ऑफिस पार्ट्यांना किंवा इतर ऑफिस कार्यक्रमांना जर जोडीदार वेळोवेळी हजर राहीला असेल आणि सहकारी जोडीदाराला माहीत असतील तर काही अडचण येत नाही.

ऑफिसमध्ये काम करत असतांना आजकाल कॉर्पोरेट आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये दिवसाचे 9 ते 10 तास सोबत असल्याने एकमेकांशी वागतांना आणि बोलतांना मित्रांसारखा मोकळेपणा आलेला असतो. हे मैत्रीपूर्ण बोलणे घरून काम करतांना जर सहकाऱ्यांना सारखा सारखा फोन करून केले तर काय होईल? कुणाला वाटेल हा काम करतोय की फक्त गप्पा मारतो आहे? ऑफिसमध्ये असतांना अशाच गप्पा मारत असतात का? वगैरे! पण आयटी क्षेत्रातील काम असे असते की ते करतांना अनेकांशी संपर्क करून, अनेकांची मदत घेऊन करावे लागते. या गप्पा पण कामाचा एक भाग असतात.

जेव्हा पती-पत्नी दोघेही घरातून काम करत असतात तेव्हा समस्या अधिक वाढते. मुलांना सोडायला शाळेत कोण जाणार? घरची कामे कोण करणार? काही प्रमाणात घरची मदत (मोलकरीण) करेल. पण मोलकरीण तुमच्यासाठी प्रत्येकच गोष्ट करू शकत नाही. तिलाही मर्यादा असतात. मग अशा या बाकीच्या कामाचे काय? मग घरची कामे वाटून घेऊ. आपण एक टाइम टेबल बनवू अशा गोष्टी सुरु होतात! आणि जर घरी पालक असतील तर हा वाद आणखी वाढतो. कारण पती आणि पत्नी दोघेही घरून काम करत आहेत तर मग घरची कामे कोण करेल यावरून पतीचे पालक दोघांपैकी कुणाची बाजू घेतील?

जेव्हा घरी पालक असतात तेव्हा समस्या अधिक उग्र रूप धरण करते. त्यांच्या वयानुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या पालकांच्या गरजा त्वरित पूर्ण कराव्या लागतील. हा एक मोठा फायदा आहे आणि मोठा तोटा देखील आहे. फायदा असा आहे की, आपण त्यांची काळजी घेण्यास सक्षम होतात. पण त्यांच्या अपेक्षा इतक्या वाढतात की, तुम्ही नीट काम करू शकणार नाही.

जिथे एकाच पिढीतील जोडीदार घरात तुमची कार्यशैली पूर्णपणे समजू शकत नाही, तिथे तुमच्या जुन्या पिढीतील पालकांना ते कसे समजणार?

शिवाय, लहान मुले त्यांच्या डोळ्यासमोर स्वत:चे वडील (किंवा आई) सतत पाहतील तर खरे, मात्र पालकांशी त्यांना बोलता येत नसेल तर काय उपयोग?

हळू हळू घरून काम करणाऱ्या पुरुषाला देखील घरातील अनेक कामांत गृहीत धरले जाते. मुलांचा अभ्यास, मार्केट मधून वस्तु आणणे, दरवाज्यावर कुणी आले ते बघणे, मेकॅनिक आला तर त्याला बघणे, पार्सल घ्यायला जाणे.

वरवर पाहता आपल्याला असे वाटते की, महिलांना घरून काम करून खूप फायदा होतो. पण नाही! निदान भारतात तरी नाही!

भारतीय घरांचा विचार केला तर घरात बहुतेक करून घरांत सासू सासरे असतात. संयुक्त कुटुंब असते. जरी स्त्रिया घरून काम करतात जे पुरुषांप्रमाणे आणि पुरुषांइतकेच आहे, तरीही मुलांसाठी टिफिन बनवणे, कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण बनवणे, पारंपारिकपणे घरातील इतर कामे करणे यासारखी घरगुती कामे स्त्रियांकडूनच अपेक्षित असतात. पुरुषांनी नव्हे तर हे स्त्रियांनी केले पाहिजे. मी माझ्या अनेक स्त्री सहकाऱ्यांकडून ऐकले आहे की, फारच मोजक्या भारतीय घरांत सासू सासरे हे घरून ऑफिसचे काम करणाऱ्या स्त्रीला घरातील कामात मदत करतात. अन्यथा घरून काम करणाऱ्या स्त्रीचे शोषण होते. त्या घरून काम करणाऱ्या स्त्रीचा पती जर ऑफिसात जाऊन काम करणारा असेल तर मग बोलायलाच नको!

मी असे म्हणत नाही की, घरून काम करण्याचे कोणतेही फायदे नाहीत. त्याचे खालीलप्रमाणे फायदे आहेत परंतु प्रत्येक फायद्यात एक तोटा लपलेला आहे. कसा ते बघू!

1. लवचिकता: रिमोट वर्क तुम्हाला तुमच्या जीवनशैली आणि दैनंदिन दिनचर्येला अनुरूप असे अनुकूल वेळापत्रक तयार करण्यास अनुमती देते. तुम्ही तुमचे कामाचे तास तुमच्या सर्वात उत्पादक वेळेनुसार जुळवून घेऊ शकता, मग ते सकाळी लवकर असो किंवा रात्री उशिरा. मध्ये मध्ये वेळ मिळाला तर गाणे ऐकणे, बातम्या पाहणे, थोडे फिरून येणे, चित्रपट बघणे शक्य होते. छंद जोपासता येतात. ब्रेकमध्ये एखादे पुस्तक वाचता येते. चित्र काढता येते.

वास्तव: परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे शक्य नाही, कारण कस्टमर त्यांच्या वेळापत्रकानुसार कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेची मागणी करतो, तेव्हा कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या वेळापत्रकानुसार नाही तर कस्टमरच्या वेळेनुसारच काम करावे लागते आणि कॉल्स घ्यावे लागतात, ज्यामुळे उलट घरातील इतर लोकांना त्रास होऊ शकतो. जसे रात्री 9 वाजता कॉल असला तर, घरी इतरांची जेवणाची किंवा झोपण्याची वेळ असू शकते.

2. प्रवास वाचतो: घरून काम केल्याने रोजचा प्रवास कमी होतो, तुमचा वेळ, पैसा वाचतो आणि प्रवासाचा ताण कमी होतो.

वास्तव: परंतु बाहेरील लोकांशी अनेक दिवस संपर्क टाळल्याने कर्मचाऱ्यांच्या सामाजिक जीवनावर आणि मानसिकतेवर परिणाम होतो. त्यांच्यात एनोक्लोफोबियाची लक्षणे दिसायला लागतात. हा फोबिया असलेल्या व्यक्तीला गर्दी सहन होत नाही.

3. खर्च बचत: घरून काम केल्याने खर्चात लक्षणीय बचत होऊ शकते. तुम्ही वाहतूक, कामाचा पोशाख, इस्त्री आणि बाहेर खाण्यासाठी कमी खर्च कराल. तेलकट खाणे कमी होईल. शिवाय, ती महागडी रोजची कॉफी विकत घेण्याची गरज नाही!

वास्तव: तुम्ही तुमच्या कंपनीचा खर्च वाचवाल पण त्यामुळे तुमचा स्वतःचा खर्च मात्र वाढेल आणि तुम्हाला याची जाणीवही होणार नाही.

4. आराम आणि वैयक्तिकरण: तुमचे होम ऑफिस तुमच्या आवडीनुसार बनवले जाऊ शकते. आरामदायी खुर्ची निवडा, तुमचे कार्यक्षेत्र सजवा आणि उत्पादकतेला प्रेरणा देणारे वातावरण तयार करा.

वास्तव: जेव्हा तुमच्याकडे मोठे घर असेल तेव्हाच हे शक्य आहे. लहान फ्लॅट असलेल्या लोकांचे काय? खास घरून काम करण्यासाठी तुम्ही मोठा फ्लॅट घ्याल तर डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहील.

5. वाढलेली उत्पादकता: काही लोकांना घरून काम करताना ते अधिक उत्पादनक्षम असल्याचे वाटते. कमी विचलित, शांत परिसर आणि वैयक्तिकृत सेटअप केल्याने कर्मचारी अधिक चांगल्या प्रकारे कामावर फोकस करू शकतो.

वास्तव: घरात आपण कमी विचलित होतो आणि शांत वातावरण लाभते ही एक दंतकथा आहे, किमान भारतात तरी. तुमच्या सोसायटीत सुरू असलेले ड्रिलिंगचे काम आणि सुतारकाम तुम्ही कसे थांबवू शकता? रस्त्यावरील कोणत्याही मिरवणुका, डीजे आणि डॉल्बी सिस्टीम कसे थांबवायचे? प्रत्येक कर्मचाऱ्याकडे घरी साऊंड प्रूफ खोल्या नसतात!

6. आरोग्याचे फायदे: घरून काम करतांना तुमचे तुमच्या सभोवतालवर अधिक नियंत्रण असते. तुम्ही व्यायाम करण्यासाठी किंवा हेल्दी जेवण बनवण्यासाठी ब्रेक घेऊ शकता. शिवाय, आजारी सहकाऱ्यांशी कमी संपर्क म्हणजे आजारांचा कमी संपर्क!

वास्तव: भारतात तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीला अजिबात नियंत्रित करू शकत नाही, उलट घरातील लोक तुमच्यावर नियंत्रण ठेवतील. कल्पना करा, जेव्हा पाहुणे तुमच्या घरी येतात आणि तुमच्या महत्त्वाच्या मिटिंगमुळे, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष शकणार नाही. आणि ते तुमची परिस्थिती समजून घेण्याइतके उदार असतील का? नाही! ते तुमच्याबद्दल नंतर इतर नातेवाईकांशी बोलतील की तुम्ही पुरेसे आदरातिथ्य करत नाही. ते तुमच्याबद्दल अफवा पसरवतील.

7. वर्क-लाइफ बॅलन्स: वर्क फ्रॉम होम मुळे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखणे सोपे आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी किंवा छंद जोपासण्यासाठी तुम्ही कामापासून दूर जाऊ शकता.

वास्तव: वर्क फ्रॉम होम मुळे कामाचे तास वैयक्तिक वेळेपासून वेगळे करणे महत्त्वाचे ठरते. जेव्हा तुम्ही घरून काम करता तेव्हा कामाचे तास 9 तासांवरून 12 ते 13 तासांपर्यंत वाढतात. अशावेळी तुम्हाला स्वतःसाठी क्वचितच वेळ मिळतो, कुटुंबाचा विसर पडतो. मग वर्क लाईफ बॅलन्स कुठे आहे? उलट ऑफिसमधून काम करत असतं तेव्हा घरी आल्यावर घरी आल्याचे वेगळे फिलिंग येते. अन्यथा घरून काम करतांना घरी असून घरातील लोकांसोबत बोलता येत नाही, घरातील आवश्यक घटनांमध्ये कामामुळे भाग घेता येत नाही हे लक्षात येते आणि उलट निराशा आणि विफलता मनात वाढीस लागते.

याशिवाय, घरून केलेल्या कामात खाली दिलेले अतिरिक्त तोटे आहेत:

1. एकटेपणा: घरून काम केल्याने एकटेपणाची भावना येऊ शकते. जेव्हा तुम्ही सहकाऱ्यांसोबत शारीरिकरित्या उपस्थित नसता, तेव्हा संघातील सदस्यांमधील निकोप संबंध विकसित करणे आव्हानात्मक बनते.

2. प्रेरणेचा अभाव: कार्यालयीन वातावरण घरून न लाभल्याने काम करण्याची योग्य ती प्रेरणा मिळत नाही. तसेच सहकाऱ्यांच्या सोबत असल्याने जे पटकन काम होते ते घरून नीट होत नाही. कारण ऑफिसमध्ये एकमेकांचा दबाव असतो. एक प्रकारची शिस्त असते.

3. तंत्रज्ञान किंवा उपकरणे यांच्या समस्या: तांत्रिक अडथळे, इंटरनेटची कमी स्पीड किंवा खराब होणारी उपकरणे कामाच्या कार्यक्षमतेत व्यत्यय आणू शकतात. समस्यानिवारण ही तुमची जबाबदारी बनते. ऑफिसमध्ये एखादे उपकरण खराब झाले तर आयटी सपोर्ट इंजिनियर असतात ते उपकरण दुरुस्त करून देतात.

5. सततच्या ऑडिओ/व्हिडिओ मीटिंग मुळे येणारा थकवा: घरून काम असल्याने सतत ऑडिओ किंवा व्हिडिओ होतात. समोरासमोर संवादाचा अभाव आणि सतत स्क्रीनसमोर असल्यामुळे येणारा थकवा यामुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

6. सहकार्य, समन्वय आणि सहयोगाचा अभाव : जेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या सोबत नसता तेव्हा सहकाऱ्यांसोबत काम करतांना सहयोग करणे अधिक आव्हानात्मक होते. नातेसंबंध आणि विश्वास निर्माण करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्नांची आवश्यकता लागते. जेव्हा तुम्ही जास्त काळ घरून काम करता तेव्हा एक वेळ अशी येते की तुम्ही ऑफिसचे सर्व शिष्टाचार विसरता आणि तुम्ही अंगात भिनलेली व्यावसायिक वागणुकीचे सवय आणि शिस्त गमावता. आणि जर एखाद्या दिवशी तुम्हाला अचानक क्लायंटला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये बोलावले गेले तर तुम्ही क्लायंटला भेटून प्रोफेशनल वागायला अडचण यायला लागते.

7. बॉडी लँग्वेज बदलते: तुमची बॉडी लँग्वेज सतत घरी असल्याने बदलून जाते आणि अचानक काही कारणासाठी ऑफिसला जावे लागल्यावर ऑफिसच्या वातावरणाला अपेक्षित असलेली बॉडी लँग्वेज लगेच तुम्ही अंगी बाणवू शकत नाही, उसनी आणू शकत नाही. आणि अशात जर क्लायंट मीटिंग असेल तर तुम्हाला मीटिंग रूममध्ये अवघडल्यासारखे वाटू लागते.

8 . जास्त काम करण्याचा धोका: घरून काम करतांना काम वाढते त्यामुळे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमधील सीमारेषा कुठे गेली ते समजत नाही. ती पुसली जाण्याची शक्यता असते. जास्त काम केल्याने बर्नआउट होऊ शकते.

9. माहिती आणि डेटा सुरक्षा: घरातून काम केल्याने माहिती आणि डेटा लीक होण्याचा धोका जास्त असतो. घरून काम करताना सायबर सुरक्षा धोके देखील येतात. कमकुवत आणि असुरक्षित पासवर्डचा सतत वापर केल्याने धोका निर्माण होतो. हॅकर्स पासवर्ड क्रॅक करू शकतात आणि संवेदनशील कॉर्पोरेट माहितीमध्ये प्रवेश मिळवू शकतात. प्रभावी सायबर सुरक्षिततेसाठी सुरक्षित पासवर्ड महत्त्वाचे आहेत. जेव्हा कर्मचारी असुरक्षित नेटवर्क आणि उपकरणे वापरतात, जसे की विनामूल्य वाय-फाय, तेव्हा असुरक्षित माध्यमातून फायली शेअर केल्याने संवेदनशील डेटा उघड होऊ शकतो. योग्य सुरक्षा उपायांशिवाय सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट केल्याने डेटा व्यत्यय आणि हॅकरचा अनधिकृत प्रवेश होऊ शकतो. सुरक्षित संवादासाठी नेहमी आभासी खाजगी नेटवर्क (VPN) वापरा. कामासाठी वैयक्तिक उपकरणे वापरणे धोकादायक असू शकते. या उपकरणांमध्ये योग्य सुरक्षा कॉन्फिगरेशनची कमतरता असू शकते, ज्यामुळे ते सायबर हल्ल्यांना आमंत्रण देणारे बनतात. पाहुणे किंवा कुटुंबातील सदस्यांना चुकून लॅपटॉप चां पासवर्ड शेअर केल्याने सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

10. आजारपणाची सुट्टी: गंभीर परिस्थितीत जसे कर्मचाऱ्याची तब्येत बरी नसते किंवा कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत बरी नसते, पण महत्त्वाची कामे पूर्ण करायचीच असतात आणि डेडलाईन असते तेव्हा जर कर्मचारी काही तास तब्येत ठीक नसतांना काम करायला तयार असेल, तरच फक्त घरून काम करणे फायदेशीर आहे. पण अर्थात कर्मचाऱ्याने स्वेच्छेने ते स्वीकारले असले पाहिजे आणि कंपनीने सक्ती करायला नको! नाहीतर आजारपणाची सुट्टी वजा होते आणि काम पण करावे लागते.

हे लक्षात ठेवा की -

  • एका बाजूला आपण कामाचे जीवन आणि वैयक्तिक जीवन वेगळे करण्याबद्दल बोलतो आणि दुसऱ्या बाजूला आपण घरून काम करून दोन्ही गोष्टी एकत्र करत आहोत.
  • जेव्हा वडील (किंवा आई) ऑफिस नंतर घरी येतात आणि मूल त्यांच्या मांडीवर धावत येऊन बसते तेव्हा मुलाला (आणि आई/वडिलांना) जो आनंद होतो त्याची तुलना नाही.
  • ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत मन मोकळं करण्यासाठी कॉफी ब्रेकच्या संभाषणांची तुलना इतर कशासोबतही होऊ शकत नाही.
  • ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर लगेच तुमच्या आवडत्या सहकाऱ्यासोबत तुम्ही घेतलेली कॉफी किंवा चहाची इतर कशाशीच तुलना होऊ शकत नाही.
  • तुमच्या आजूबाजूला बसलेल्या खऱ्या लोकांशी कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंगला उपस्थित राहण्याची तुलना नाही.
  • सहकारी तुमच्यासाठी केक आणतात आणि तुमचा वाढदिवस कॅन्टीनमध्ये साजरा करतात आणि तुम्ही समोसे आणि चिप्सचा एकत्र आस्वाद घेता तेव्हाच्या आनंदाची तुलना नाही.
  • ऑफिसमध्ये तुम्ही केलेल्या आरोग्यदायी गॉसिपची तुलना कशाशीही नाही.

शेवटी सांगावेसे वाटते की, काही अशा नोकऱ्या उपलब्ध आहेत, ज्या फक्त घरून काम करण्यासाठीच योग्य असतात, जसे की ग्राफिक डिझायनर, व्हीडीओ एडिटर, डेटा एन्ट्री क्लर्क, लेखक, ब्लॉगर, अनुवादक इ. ते ठीक आहे. पण तरीही प्रश्न उरतो की, घरची परिस्थिती अनुकूल असावी.