निरुद्देश नगरवारी

शिरोटीप: हे लेखन आत्मकथन/आत्मचरित्र याकडे संपूर्णतया झुकलेले आहे याची नोंद घ्यावी. यातील तथ्य नि सत्य हे 'माझे' तथ्य नि सत्य आहे. कुणास अजून दुसरे तथ्य नि सत्य माहीत असेल तर चडफडत/तणतणत बसावे.

लघुचित्रपटक्षेत्रात काम करीत होतो त्या दिवसांतली गोष्ट.

पुढले काम सुरू व्हायला दोनेक आठवड्यांचा कालावधी होता. दुसरे करण्यासारखे काही दृष्टीपथात नव्हते.

ऍन तेव्हा पुण्यात आली होती. ती तेव्हा भौतिकशास्त्रात संशोधन करीत होती आणि एका वर्षासाठी तिला 'आयुका'मध्ये पीडीएफ (पोस्ट डॉक्टरल फेलोशिप) आणि क्वार्टर्स मिळाल्या होत्या.

एकदा तिला कुणीतरी क्वांत्रो नावाची फ्रेंच लिक्युअर आणून दिली होती त्या बाटलीचे उद्घाटन (आणि समारोपही - बाटली छोटी होती) करायला तिने बोलावले होते. विद्यापीठाच्या मागच्या माळी प्रशिक्षण केंद्राच्या बाजूने ब्रेमेन सर्कलकडे जाताना स्पायसर कॉलेजनंतर कॅफे महाराष्ट्र नावाचे एका मल्याळी रेस्टॉरंट होते. तिथे मल्याळी परोटा (उच्चारी बरोट्टा) आणि खिमा चांगला मिळे. बांगडा फ्रायही.

कुठल्या प्रकारच्या दारूबरोबर काय खायचे याच्या फ्रेंच कल्पना जगात थोर समजल्या जातात. फूड पेअरिंग हा एक आढ्यताखोरपणे चर्चिला जाणारा विषय. रेड वाईन सोबत रेड मीट (बीफ, पोर्क, मटन) आणि व्हाईट वाईन सोबत व्हाईट मीट (फिश, चिकन) एवढ्यावर हे थांबत नाही. रेड वाईन कुठली (कॅबरने, शिराझ, मर्लो, टेम्प्रानिलो, झिनफॅन्डेल इ इ), व्हाईट वाईन कुठली (शार्डने, रिसलिंग, सॅव्हियो ब्लां इ इ) हेही हिरीरीने चर्चिले जाते. स्पार्कलिंग वाईन किंवा फॉर्टिफाईड वाईन हे अजून वेगळेच.

क्वांत्रो वाईन नसून लिक्युअर होती. तिला अपेर्तिफ ऍंड डीजेस्तिफ मानले जाते. म्हणजे जेवणाआधी (भूक चाळवण्यासाठी) आणि जेवणानंतर (पचन सुलभ होण्यासाठी) घेण्याची गोष्ट.

आम्ही ते पाळले. म्हणजे क्वांत्रोने सुरुवात केली. मग खिमा-बरोट्टा आणि बांगडा फ्राय. मग जेवण संपल्यावर परत क्वांत्रो. एकच छोटासा बदल केला तो म्हणजे खिमा-बरोट्टा आणि बांगडा फ्रायलाही क्वांत्रोची साथ दिली. थोडक्यात, क्वांत्रोची रेघ सरळ ओढली. शेजारी जेवणाची समांतर रेघ थोड्या वेळाने आली आणि बऱ्याच वेळाने नाहीशी झाली. क्वांत्रोची रेघ बाटली संपल्यावर संपली.

बाटली छोटी होती पण वाटली तेवढी छोटी नव्हती. मी तिथेच रहायचे ठरवले. रात्री मी घोरतो असे ऍनचे मत पडले. रात्री ऍन घोरत नाही असे माझे मत पडले.

सकाळी डोके ठीक होते, पण फार हालचाल करू नये असा संदेश प्रसारित करीत होते. दुपारपर्यंत निवळले.

हॅंगओव्हर उतरल्यावर अनेकदा काही गोष्टी जाणवतात आणि तत्पश्चात बोधीवृक्ष श्रेणीतले साक्षात्कार होतात. तसे मला जाणवले की गेले दोनतीन महिने मी कुठे स्कूटरप्रवास केला नव्हता. मग साक्षात्कार झाला की असे करणे हे आपल्याला शोभत नाही.

पण जायचे तर कुठे? विचार करण्याआधी जिथे जायचे तिथे राहायची सोय असणे गरजेचे होते. आर्थिक ताकद स्कूटरचे पेट्रोल, सिगरेट्स आणि गरज पडल्यास जेवण हे पेलण्याइतकी होती. पण रेस्ट हाऊस / हॉटेलमध्ये राहण्याइतकी नव्हती.

कोल्हापूर-सांगली-मिरज नि कोंकण ही ठिकाणे त्यादृष्टीने योग्य होतीच. पण काही वेगळे करता येईल का?

सोलापूर? तिथे एक चुलतचुलत भाऊ होता हे खरे, पण मी ते केवळ ऐकूनच होतो, प्रत्यक्षात भेट कधी झाली नव्हती. नाशिक? कुणी नजरेसमोर येईना. औरंगाबाद (आता छत्रपती संभाजीनगर) इथेही तीच गोष्ट.

'काखेत कळसा' ची ट्यूबलाईट चमकली. नगर. तेव्हाचे अहमदनगर. आताचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर.

विद्यापीठात ज्याला मी काही काळ, आणि ज्याने मला बराच काळ आसरा दिला होता तो मित्र. सुरेश. तेव्हाना तो नगरच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून चिकटला होता. त्याचे एमफिल चालू होते. ते संपले असते की पक्का चिकटला असता.

त्याला सुरुवातीला सामान हलवण्यासाठी मदत म्हणून दोनेक वर्षांपूर्वी मी गेलो होतो. सामान म्हणजे काय, दोन माणसांनी एस्टीने न्यावे इतकेच. गादी, ट्रंक, बादली या त्यातल्या मोठ्या वस्तू. तेव्हा तो तात्पुरता म्हणून नगर एस्टी स्टॅंडसमोरच एका खोलीत कॉट बेसिसवर राहिला. नंतर त्याने कळवले की आता तो एका अडीच खोल्यांच्या घरात (दोन खोल्या नि मोठी गॅलरी/बाल्कनी) हलला आहे. सोबत त्याच्या कॉलेजमध्ये शिकवणारे अजून दोघे आहेत. ते दोघेही मला साधारण माहितीचे होते. एक लक्ष्मीकांत. हा आंध्र प्रदेशमधला ख्रिश्चन होता. दुसरा शुभदीप. हा हरयाणवी जाट होता.

त्यांच्या घराजवळ एक किराणा मालाचे दुकान होते. तिथला टेलिफोन नंबर हा सुरेश आणि गॅंगसाठी पीपी म्हणून वापरला जाई. फोन करून यांच्यापैका कुणालातरी बोलवायला सांगायचे. मग परत पाच मिनिटांनी फोन करायचा. तोवर त्यांच्यापैकी कुणीतरी हजर असे. एसटीडी बूथचे जाळे भारतात जिकडे तिकडे पसरले होते त्यामुळे असे फोन करणे सहजशक्य झाले होते.

झाले तर.

तोवर दुपारचे दोन वाजून गेले होते. नगर सुमारे ११० किलोमीटर. म्हणजे सिगरेटखेरीज न थांबता स्कूटर ताणली तर दोन ते अडीच तास. लगेच निघालो.

त्याकाळी माझे बिऱ्हाड विंचवासारखे पाठीवर होते. सुपर एफई स्कूटरची पुढली आणि बाजूची डिकी यात कुठेही मुक्काम करता येईल इतके सामान कायम असे. कपडे, टूथब्रश, रेझरब्लेड्स, पुस्तके इ. लागणाऱ्या वस्तूंचे गणित एवढ्या 'ऑप्टिमाईज्ड' पद्धतीने केले होते की 'ऑप्टिमायझेशन टेक्निक' शिकवणाऱ्यांनी केस स्टडी म्हणून ते दाखवायला हरकत नव्हती. टूथब्रश हो, टूथपेस्ट नाही (जिथे जाऊ त्याची/तिची). साबणासाठीही जिथे जाऊ तिथला. ट्विन ब्लेडचे रेझर्स तोवर वापरात आले होते. त्यातली फक्त ब्लेड्स. रेझरचा दांडा (मराठीत 'फावडा') ज्याच्याकडे जाऊ त्याचा. बहु उद्देशीय बूट (चामड्याचे नाही, त्याकाळचे 'नॉर्थ स्टार' किंवा 'ऍक्शन' शूज) कायम पायात, बाटाची चप्पल कायम डिकीत (बुटांना चपलेपेक्षा डिकीत जास्ती जागा लागते). पुस्तके पाचपेक्षा जास्ती नाहीत (आणि तीनपेक्षा कमी नाहीत). पुस्तकांची पृष्ठसंख्या ४००पेक्षा कमी (शक्यतो ३०० पेक्षा कमी). शर्ट म्हणजे फक्त टीशर्ट्स.

एवढ्या आधारावर मला विमुक्त आणि भटक्या जमातीचे मानद सदस्यत्व मिळायला हरकत नव्हती. पण त्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल हे माहीत नव्हते म्हणून ते राहिले.

अर्ज करण्यावरुन आठवले. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला पुणे विद्यापीठाच्या जुन्या इमारतीमधूनच (टॉवरवाली इमारत) सगळे कामकाज चाले. मागच्या बाजूची 'न्यू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग' तेव्हा बांधकामाच्या टप्प्यातही नव्हती. तर त्या कॉरिडॉरमध्ये एकदा मोठ्या नोटीसबोर्डवर A2 आकाराची मोठी जाहिरात होती. पारितोषिकासाठी अर्ज मागवण्यासाठी. पारितोषिक कुठले? तर नोबेल.

इथे शिरोटीप ध्यानात घ्यावी. इथे केवळ माझा शब्द प्रमाण आहे.

मला हा कुणीतरी केलेला खोडसाळपणा वाटला. म्हणून मी आत चौकशीला गेलो नि एका टेबलासमोर उभा राहिलो.

एका संसाराला लागून भागलेल्या चाळिशीच्या स्त्रीने कंटाळवाणी नजर उचलून माझ्याकडे पाहिले आणि नजरेनेच 'काय' अशी पृच्छा केली.

"ते बाहेर नोबेल प्राईज साठी..." माझे प्रश्नाकडे जाऊ पाहणारे वाक्य मध्येच तोडून तिने मागे मान वळवली आणि मागच्या टेबलवरच्या भागलेल्या पुरुषाला विचारले "अहो जोशी, ते नोबेलचं कोण बघतंय?".

जोशी म्हणाले, "पुरंदरे. पण ते आज रजेवर आहेत".

'यायचेच तर पुन्हा केव्हातरी या' असा बिन आवाजी संदेश प्रसारित करून स्त्री परत खाली मान घालून बसली.

असो.

माझे विमुक्त आणि भटक्या जमातीचे मानद सदस्यत्व राहिले ते राहिलेच. नंतर मीही संसाराला लागलो आणि वाया गेलो.

वाटेत रांजणगांवला एकदा, शिरूरला एकदा नि सुप्याला एकदा एकदा अशा तीन सिगरेटींवर मी नगर गाठले. रांजणगांवला आणि शिरूरला बिअर पिण्याचा मोह झाला. पण व्हीआयपी मंडळींच्या मागेपुढे कुणाला जाऊ देत नाहीत तसे काँत्रोच्या मागे चोवीस तास तरी कोरडे रहावे म्हणून मी तो टाळला. चोवीस तासांनी नगरला कार्यक्रम होणारच होता.

गेले महिनाभर सुरेशशी बोलणे झाले नव्हते. त्याला आश्चर्याचा धक्का द्यायचा म्हणून मुद्दाम पुण्याहून निघताना फोन केला नव्हता. नगरला पोहोचल्यावर दुकानात फोन करायचा, सुरेशला बोलावायला न सांगता केवळ पत्ता विचारून घ्यायचा आणि थेट त्याच्या घरी पोहोचून शिवीगाळ करायची असा बेत होता. त्याचे कॉलेज तीन वाजता सुटे.

नगर गांवात पोहोचलो नि एक एसटीडी बूथ गाठला.

त्या दुकानाचा नंबर फिरवला.

उत्तर नाही.

दुकानदार दुकान बंद करून गेला असेल की काय? पण साडेचारच वाजले होते.

दुकानात गिऱ्हाईक फार असेल, दुकानदार लघु/दीर्घशंकेला गेला असेल, दुकानामागे जाऊन बिडी ओढत असेल (गणपत वाणी वाचल्यामुळे किराणा दुकानदार सिगरेट ओढत असेल असे वाटले नाही) अशा कारणांनी उत्तर नसेल म्हणून मी पंधरा मिनिटे थांबलो. मी गणपत वाणी नसल्याने मी एक सिगरेट ओढली.

पंधरा मिनिटांनीही उत्तर नाही.

आता सिगरेट पुरली नसती. टपरीवर एक चहा, एक क्रीमरोल आणि नंतर एक सिगरेट असा वीस मिनिटांचा बेत केला.

तरीही फोनला उत्तर नाही. काय करावे?

पाच वाजून गेले होते. परत पुणे गाठायचे म्हणजे साधारण साडेसात. हरकत नव्हती. पण केवळ कुणीतरी एक फोन उचलत नाही म्हणून जाऊनयेऊन सुमारे सव्वादोनशे किमीचे स्कूटर चालवणे वाया जाणे हा अपमान होता.

अजून एका सिगरेटने कल्पना रुजवली आणि मी जवळपासच्या मोठ्या पोलिस स्टेशनची चौकशी केली. कोतवाली पोलिस स्टेशन. स्कूटर तिकडे हाणली.

कुठल्याही पोलिस स्टेशनमध्ये असते तसे वातावरण होते.

मी ड्यूटी हवालदाराला नम्रपणे माझे काम सांगितले - माझ्याकडे फोन नंबर होता, मला तो फोन कुठल्या भागात आहे हे पाहिजे होते. थोडक्यात रिव्हर्स नंबर डिरेक्टरी.

हवालदार विचारात पडला. हे पैसे देणारे कूळ नाही हे त्याला उमगले, पण कुतूहल त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने फोन लावून पाहिला. उत्तर नाही. त्याने आजूबाजूला चौकशीला सुरुवात केली. इतरांनाही आश्चर्य आणि कुतूहल (त्याच क्रमाने) वाटले. पोलिस स्टेशनला रिव्हर्स नंबर डिरेक्टरी ही सुविधा नवीनच होती. मग डोके खाजवायला सामूहिक सुरुवात झाली. नुकतेच आणलेले संशयित लॉकपमध्ये जरा निवांत झाले. आपल्याला माहीत असणारे फोन नंबर सगळ्या पोलिसांनी आठवायला सुरुवात केली आणि सुरुवातीच्या दोन आकड्यांवरून तो सावेडी भागातला नंबर असावा असे ठरले.

सुरेश कुठल्यातरी मोठ्या रोडच्या जवळ राहत होता हे मला आठवत होते. त्याने त्या रोडचे नांवही सांगितले होते, पण ते आठवत नव्हते (ते आठवत असते तर हा उद्योग कशास केला असता?). सावेडी भागातले मोठे रोड कुठले याला जी उत्तरे आली त्यात पाईपलाईन रोड आणि सावेडीनाका रोड हे नक्कीच नव्हते. गुलमोहोर रोड. बरोबर!

गुलमोहोर रोड गाठल्यावर पुढली अडचण लक्षात आली. गुलमोहोर रोड दीडेक किलोमीटरचा आहे. त्यात कुठून सुरुवात करायची? मला एकदम तीर्थरूपांची (तेव्हां हयात आणि कार्यरत, आता दिवंगत) आठवण झाली.

ते एक किस्सा नेहमी सांगीत. त्यांनी एकदा त्यांच्या आतेबहिणीच्या चुलतदीराला सत्तरच्या दशकात दशकात मुलुंड (पूर्व) मधून 'आडनांव नामजोशी, एका पायाने अधू' एवढ्या सविस्तर वर्णनावरून शोधून काढला होता. त्यांनी छोटी देवळे आणि 'इथे जानवीजोड व फुलवाती मिळतील' अशी पाटी मिरवणारी दुकाने यांच्यावर लक्ष केंद्रित करून ते साध्य केले होते. नामजोशी आडनांवाचा माणूस जानवीजोड आणि फुलवाती नक्की खरेदी करील आणी छोट्या (मोठ्या देवळांत चपला चोरीला जाण्याची भीती) देवळांत नक्की जाईल असे ते दिवस होते.

इथे तर मला तीन संपूर्ण नावे, कार्यस्थळासकट माहीत होती. आधी मी बंद असलेली किराणामालाची दुकाने शोधली. पण मला पाहिजे होते ते दुकान बहुधा आडगल्लीत होते. मुख्य गुलमोहोर रोड नि मुख्य गल्ल्यांत तर काही दिसले नाही. मग मी अठरा ते वीस वयोगटांतली मुले शोधायला लागलो. क्रिकेट खेळताना काहीजण दिसले. पण सगळे लेकाचे बीएस्सीवाले निघाले. माझे तिन्ही मित्र इंग्रजी विभागातले. पण त्या मुलांपैकी एकाने 'समोर जाऊन डाव्या हाताच्या गल्लीच विचारा' असा अंधुक सल्ला दिला. त्या गल्लीत गेलो तर एका कट्ट्यावर महिला मंडळ बसले होते. त्या मावश्यांना विचारले तर त्यातल्या एकीने आपल्या लेकीला आतून बोलावले. लेक बीए इंग्रजी करीत होती, तिला तिघेही नीट माहीत होते. तिने नीट पत्ता सांगितला.

अशा रीतीने पावणेसहाच्या सुमारास मी जिना चढून (या तिघांची जागा पहिल्या मजल्यावर होती; खाली घरमालक राहत असत) दरवाज्यावर लाथ घातली. नुसताच लोटलेला दरवाजा उघडला आणि लोळत पडलेले तिघे चकित होऊन बघत राहिले.

यथायोग्य शिवीगाळ झाली. 'तू जिवंत आहेस हे माहीत असते तर मी आधीच फास लावून घेतला असता.' 'तुझ्यापासून सुटका होण्यासाठी पुणे सोडले. आता नगरपण सोडावे लागेल बहुधा.' 'सोडच तू नगर. इथिओपियालाच जा. त्यांना इंग्रजीची गरज आहे नि आम्हांला सुरेशमुक्त भारताची' असे प्रेमळ संवाद झडले. पाठीत गुद्दे घालून झाले.

लक्ष्मीकांत नि शुभदीप फक्त पाहत होते. त्यांच्याशी अजून एव्हढी जवळीक झालेली नव्हती.

माझ्या प्रवासाची कहाणी - काँत्रो ते कोतवाली पोलिस स्टेशन - ऐकून सुरेश खूष झाला. खुषी साजरी करायला 'म्हातारा साधू' हवाच. तो आणायला बाहेर पडलो. त्याच्या घराच्यापासून दोन प्लॉट सोडून ते दुकान होते. तो दुकानमालक आज दुपारी माल आणायला म्हणून मुख्य बाजारपेठेत गेला होता तो आमच्यासमोरच टेंपोतून परतला. तो दुकानदार केवळ पीपी फोनच नव्हे, तर इतर अनेकानेक गोष्टी पुरवण्यासाठी सक्षम होता. 'म्हातारा साधू' त्यातली एक गोष्ट. नगर आर्टिलरी डेपोमध्ये संधान साधून मिलिटरी कॅंटीनमधून तो माल मिळवीत असे आणि बाजारभावाने विकत असे. त्याला किती नफा सुटतो याबद्दल त्रागा करण्याऐवजी आम्हांला जवळपास घरपोच माल बाजारभावात मिळतो यावर आम्ही खूष होतो. नाहीतर दीडदोन किमी लांब राहुरी रस्त्याला जावे लागले असते.

पुढले काही दिवस तिथेच रहावे असा बेत झाला. सुरेशकडे स्वयंपाकाचा सगळा सरंजाम होताच. ते हाताने करूनच उदरनिर्वाह करीत होते. नगरमधल्या खाणावळी त्यांच्या पोटाला नेहमीसाठी सोसवत नव्हत्या. आणि लक्ष्मीकांत उत्तम स्वयंपाक करे. त्याच्याकडून बरेच शिकण्यासारखे होते.

पुढले काही दिवस दुपारी तीनपर्यंत वाचत पडायचे, मग ही मंडळी आल्यावर हिंडायला बाहेर पडायचे असा दिनक्रम ठेवला. एकदोनदा त्यांच्या कॉलेजमध्येही जाऊन बसलो लायब्ररीत.

लक्ष्मीकांतकडे चेतक होती. त्यामुळे चौघांची हिंडायची सोय होती.

एका संध्याकाळी चांदबीबी का महल बघायला गेलो. तीस वर्षांपूर्वी ती जागा नगरहून पार बाहेर, दुसऱ्या गावाला जावे अशी होती. त्या छोट्याश्या टेकाडावर चढणारा रस्ता तर पूर्ण निर्मनुष्य होता.

वर जाऊन त्या महालाच्या छतावर बसलो. सूर्य नुकताच मावळला होता. आम्ही चौघेच होतो असे वाटले, पण संधिप्रकाशात अजून दोघेजण उगवले. आमच्या 'प्रायव्हसी'मधला भंग शुभदीपला आवडला नाही. त्याने त्यांना आपला हिसका दाखवला.

अत्यंत नम्रपणे "क्या बढिया मौसम है" अशी सुरुवात केली.

त्या दोघांनी होकार भरला.

मग "ये एरिया कितना होगा महल का, कुल मिलाके पांच छे हजार स्क्वेअर फूट तो होगा, नही?"

त्या दोघांना काय उत्तर द्यावे ते कळेना. त्यांनी अर्धवट होकार भरला.

"और नगरमें रेट तो अभी पांच-छेसौ का तो चल ही रहा है। उस हिसाबसे कितने लाख बनेंगे?"

दोघेही पूर्ण ब्लॅंक झाले. मग त्यांच्या ब्लॅंक चेहऱ्यांकडे बघून शुभदीपने शेवटला पत्ता टाकला.

"अरे, आपकी नही है क्या ये जगह? मुझे लगा आपकी है इसलिये सोचा पूछ लूं। क्या है ना, लोग पूछते रहते है मुझे नगरमें कुछ प्रोपर्टी हो तो बताओ करके, इसलिये पूछ रहा था। सॉरी हां भाईसाब, आपको तकलीफ हुई"

आम्ही तिघांनी चेहरे प्रयत्नपूर्वक सरळ ठेवले होते. आम्ही चौघे मनोरुग्ण्यालयातून आलो आहोत की आपण दोघांनी मनोरुग्णालयात भरती व्हावे या दुविधेत त्यांना सोडून आम्ही परतलो.