मुंबईचा पाहुणा

शिशिरचे लग्न तर झाले. आता परत जाण्याची घाई करण्याचे कारण नव्हते. शिशिर आणि ऍनला कितीही बाता मारल्या तरी पुण्याला माझी वाट पाहत एकही प्रॉजेक्ट बसलेला नव्हता. आणि बाता मारून फायदा नव्हता, ते दोघे मला (विशेषतः शिशिर; पण एक-दोन भेटीतच ऍननेदेखील ते साध्य केले होते) आरपार वाचू शकत होते. त्यामुळे 'येतो येतो' अशा चार महिने मारलेल्या थापांचा त्यांनी पुरेपूर वचपा काढला आणि कमीत कमी दोन आठवडे असा माझा मद्रासमध्ये राहण्याचा कालावधी निश्चित करून टाकला.

मीही ही उन्हाळी सुट्टी मजेत घालवायचा चंग बांधला. पण हळूहळू अडचणी लक्षात येऊ लागल्या. शिशिर, ऍन, अजय आणि सरकीलाल सगळे PhDसाठी तिथे जमलेले होते. मीच एकटा (इथेही) बिनकामाचा होतो. पुण्यात कामात असल्याचे बहाणे तरी करता येत (विशेषतः कुणी "असली कसली अवदसा आठवली रे तुला? किमान तो अभ्यासक्रम पूर्ण तरी कर, आणि मग कर काय करायचे ते" असे उपदेशामृत पाजायला आले की) पण इथे काय करणार? साधे बाहेर पडायचे म्हटले तरी भाषेची अडचण.

त्यामुळे संध्याकाळी या सगळ्यांबरोबर अड्यारच्या बाजारात हिंडणे आणि दिवसा त्यांच्या हॉस्टेलच्या टीव्ही रूममध्ये बसणे अशी दिनचर्या ठेवली.

त्या काळात तमिळनाडूमध्ये सी-सॉ च्या खेळात करुणानिधीबुवांचे पारडे जड होते. MGR गेल्याने त्यांना जरा हुश्श झाले होते. अम्मा स्वतःच्याच पक्षातल्या गटांना शिस्तीत आणण्याच्या प्रयत्नात होत्या. पारडे जडच राहावे म्हणून करुणानिधी बरेच 'लोकाभिमुख' निर्णय घेत होते. गरीब बिचारी माणसे हातभट्टीची विषारी दारू पिऊन मरतात नाहीतर आंधळी होतात. त्यांना माफक दरात 'सुरक्षित' दारू मिळावी हा एक असाच निर्णय. दुधाच्या पिशव्यांसारख्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांत ही पाण्याच्या रंगाची दारू तीन रुपयांना एक पिशवी अशी मिळे. एका पिशवीत एका माणसाचे एक वेळचे काम होई. लोक त्या दारूला 'डीएमके' असेच म्हणत.

एकदा आम्ही ही दारू आणण्याचा बेत केला. ऍनही आमच्याबरोबर आली. दारूविक्री केंद्राचे स्थापत्य मजेशीर होते. एक मोठा चौरसाकृती वाडा. त्यात अंगणात मध्येच आपल्या मंडईत असतो तसा लाकडी फळकुटावरचा गाळा. चौरसाच्या आतील बाजूंना लागलेल्या हातगाड्या, त्यावर चणे, दाणे, उकडलेली अंडी, तळलेले मासे, सिगारेट्स, विड्या असला परोपरीचा माल. आणि मधल्या गाळ्यासमोर झुंबड. ऍनने त्यात शिरू नये असे आमचे मत पडले. जग हिंडून आलेल्या तिला हे अर्थातच मान्य नव्हते. शब्दाला शब्द लागला. बोचकारे निघाले. संतापाने फणकारून ती त्या गर्दीत शिरली. तिची पाठराखण करायला मीही पळालो.... आता काय होईल आणि त्याला कसे तोंड द्यावे याचा विचार करत.

काहीही झाले नाही! धक्काबुक्की सोडाच, गर्दीने चक्क दुभंगून तिला वाट करून दिली. आणि गाळ्यावरच्या माणसानेही आमचा नंबर पुढे घेऊन आम्हाला पाकिटे दिली.

'तरी मी सांगत होते' असा बायकांच्या चेहर्‍यावर जन्मजात असणारा भाव मिरवत ऍन आमच्याकडे बघायला लागली. मुकाट्याने परतलो. गणपतीच्या मिरवणुकीत घोळक्याने हिंडणार्‍या 'सभ्य' लोकांची आम्हाला सवय! हे लुंगीवाले यंडुगुंडू बेवडे असे वागतील हे आम्हाला कसे कळणार?

असे दिवस जात होते.

हॉस्टेलच्या आचार्‍याने चिकन करीची एक नवीन पद्धत दाखवून वाहवा घेतली. मसाला लावून मुरवलेले चिकनचे तुकडे तंबीने खरपूस तळून काढले आणि मग झणाणत्या करीमध्ये घातले. नाकडोळे पुसत का होईना, त्याने दाद मिळवलीच!

अचानक मला गुरुजींनी दिलेल्या पत्त्याची आठवण झाली. त्यावर फोन नंबरही होता. लगेच फोन लावला. 'सत्यनारायण' (call me 'Satya') या इसमाशी बोललो. हा माणूस इंडस्ट्रियल फोटोग्राफी की काहीसे करून उपजीविका करत होता. पण फिल्म लायनीत जाण्याचा भुंगा त्याच्या डो़क्यात भुणभुणत असल्याने त्याने पुण्याला फिल्म इन्स्टिट्यूटची वारी केली होती. तिथे त्याची डाळ शिजली नाही पण गुरुजींशी गाठ पडली. आणि आमचे गुरुजी असली कुळे सांभाळण्यात प्रवीण.

हा सत्या कुठेतरी PG म्हणून राहत होता, आणि मी तिथेच त्याला भेटायला आणि जेवायला जावे असा त्याचा आग्रह होता. एखाद्या एकदम अनोळखी माणसाला भेटणे इथपर्यंत ठीक होते, पण त्याचे बोट धरून दुसर्‍या अनोळखी कुटुंबात घुसणे मला अवघड वाटले. पण सत्याने आग्रह करकरून हे ठरवूनच टाकले.

कोडंबक्कम स्टेशनच्या बाहेरच्या फोन बूथवर सकाळी अकराला भेटायचे ठरले. सवयीनुसार मी पावणेअकरालाच ड्यूटीवर हजर झालो. पण अकराच काय, साडेअकरा वाजत आले तरी सत्याचा पत्ता नव्हता. शेवटी वैतागून मी त्याला फोन करावा, तो फोनपाशी असला तर चांगला भोसडावा, आणि नसला तर 'मी निघतो' असा निरोप त्याच्या घरमालकाकडे ठेवावा म्हणून फोन बूथमध्ये शिरलो. तोच एक माणूस अगदी माझ्या पाठीला नाक लावून आत शिरायचा प्रयत्न करताना दिसला. त्याला घाई असेल म्हणून मी उदारपणे त्याला पुढे जाऊ दिले. पण नाही, तो "पहिले आप" च्या खेळात तरबेज दिसला. वैतागून मी आत शिरलो तर तो काचेला नाक लावून उभा. परत "पहिले आप"ची अजून एक फेरी.

मी फोनची डायल फिरवायला लागलो. नंबर पूर्ण होताच त्या बाहेरच्या माणसाने काचेवर ठोकाठोक केली. मी संतापाने बघितले. दार जवळजवळ ढकलूनच उघडत तो म्हणाला, "सत्या"!

आम्ही दोघांनीही एकमेकांना आधी पाहिले नव्हते. आणि स्टेशनला दोन बाजू असतात, दोन्ही बाजूंना बूथ असू शकतात  हे आमच्या ध्यानात आले नव्हते. सत्याभाऊ इतका वेळ दुसर्‍या बाजूच्या बूथवर फिल्डिंग लावून बसले होते.

सत्या तमिळ होता हे सांगावे न लागण्याइतका त्याचा वर्ण गडद होता. उंची मात्र चांगली होती. आणि एकंदरीत किडकिडपंत होता.

त्याने स्कूटर आणली होती. घरी जाण्याआधी जरा 'घसा ओला' करण्याचे आमंत्रण मिळताच मी ते स्वीकारले. फुकट्यात मिळाले तर नाही का म्हणा? त्याने स्कूटर एका बैठ्या बंगल्यांच्या सोसायटीत नेली. आता इथे कुठे तीर्थ मिळणार असा विचार करत होतो तर एका बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये सत्याने मला नेले. वरती नारळाची झापेच होती. आणि आतल्या चौकोनी खोलीला चारही भिंतींना जमिनीपासून तीन-साडेतीन फुटांवर दोनफुटी फळ्या काटकोनात ठोकलेल्या होत्या. एका कोपर्‍यात खिडकी होती, त्यातून 'माल' मिळायची सोय होती.

सत्याने माझी आवड विचारताच मी सावधपणे 'बियर' म्हणून टाकले. उगाच दुपारी कडक काहीतरी पिऊन भलतेच व्हायचे. सत्याला तसली भीती नसावी. माझ्या बियरच्या बाटलीबरोबर त्याने स्वतःकरता एक डीएमकेचा पाउच घेतला. त्याने पाणीही प्लॅस्टिकच्या पाऊचमधूनच घेतले. प्लॅस्टिकचा ग्लास बहुधा पाऊचबरोबर मिळाला. आणि हे सगळे प्रकरण माझ्या एका बियरबरोबर त्याने संपवले.

त्याच्या मागे स्कूटरवर बसायला जरा कचरतच होतो, पण बसलो धीर करून. घरापर्यंत नेलेन बुवा व्यवस्थित.

घर छोटेसे होते. पण दुमजली होते. तळमजल्यावर घरमालकाचे वर्कशॉप होते. पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावर घर. माझी वरात थेट दुसर्‍या मजल्यावर नेण्यात आली. आणि तिथे गेल्यावर या सगळ्या प्रकाराचे प्रयोजन कळले.

घरमालकाला एक सोळा-सतरा वर्षांची मुलगी होती. तिला सिनेमा-नटी व्हायची माफक इच्छा होती. पण तिच्या पाच पैशाच्या इच्छेत सत्याने पंचाण्णव पैशाची हवा भरून अख्ख्या रुपयाचा फुगा फुगवला होता. त्याची स्वतःची कॅमेरामन होण्याची इच्छा आणि स्त्रीकडे पाहून बर्‍याच पुरुषांच्या मनात जी येते ती इच्छा यांचा संगम झाला होता. आणि सत्याची इच्छापूर्ती करण्यासाठी मला इथे मुंबईचा यशस्वी दिग्दर्शक म्हणून या कुटुंबासमोर पेश करण्यात येत होते.

मी फॉर्मल लॉजिक शिकलो होतो. पण (१) मी पुण्याचा होतो (२) मुंबईला यशस्वी दिग्दर्शक असतात आणि (३) पुण्याहून मुंबई जवळ आहे, या तीन गृहीतकांना कुठल्याही दिशांना कितीही ताणले तरी निष्कर्ष "मी मुंबईचा यशस्वी दिग्दर्शक होतो" येणे शक्य नव्हते. पण हे आता सांगणार कुणाला? म्हणजे आता दिग्दर्शकाची भूमिका वठवणे आले.

नाटकांतून बरीच कामे केलेली होती. पण का कोण जाणे, माझ्या वाट्याला सतत खलनायकाच्याच भूमिका येत. आणि इथे तसे करून चालणारे नव्हते. दिग्दर्शकाचे बेअरिंग (म्हणजे काय ते विचारू नका; एका बियरवर कल्पनापतंग किती उडवणार? चांगले एक दोन डीएमके मारून आलो असतो तर डायरेक्टरचेच काय, अम्माचेही बेअरिंग जमले असते) आणे-आणेस्तोवर नायिकेची एंट्री झालीच.

रंग पक्का होता. वय सोळाचे स्पष्ट दिसत होते. "प्राप्ते तु षोडषे वर्षे, गर्दर्भी अप्सरा भवेत", त्यामुळे तिच्या सौंदर्याची चिकित्सा करण्यात अर्थ नव्हता. सत्याने तो निर्णय घेऊन टाकला होता.

आता प्रश्न होता, तो इंग्रजीचे फारसे ज्ञान नसलेल्या या भावी श्रीदेवी, जयाप्रदा वा सिल्क स्मिथाला मी काय उपदेश करणार याचा. त्यातून तात्पुरती सुटका करायला सत्याने स्वतः काढलेल्या तिच्या फोटोंची चळत समोर ठेवली. थोडी सुटका झाली. फोटोग्राफीबद्दल चार शब्द माहीत असल्याने मी लगेच त्या काडीच्या आधाराने तरायच्या प्रयत्नाला लागलो. फ्रेम कशी लावली, लायटिंग काय केले, किती ASAची फिल्म, शटरस्पीड काय ठेवला अशा प्रश्नांच्या लडी उलगडत मी हिरॉईनवरून विषय सायडिंगला घेतला.

पाच मिनिटे सत्याने कळ काढली. आणि मग डीएमके चा सणसणता भपकारा सोडत त्याने माझ्या डोळ्यांजवळ तोंड आणले (मूळ हेतू कानाजवळ आणायचा असावा बहुतेक; डीएमके झाली तरी माणूस कानाने ऐकतो, डोळ्यांनी नव्हे हे विसरण्याइतकी कडक नव्हती) आणि गुरगुरत्या आवाजात मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिली.

एव्हाना बियर साफ उतरली होती. घामाच्या धारांनी सचैल स्नान झाले होते; वर पत्रा होता. मग मी गाडी हाणली. या उकडहंडीतून खाली जेवायला जायचे असेल तर माझे (काहीतरी, किंवा काहीतरीच) संवाद म्हणण्याला पर्याय नव्हता.

"नट/नटी व्हायचे तर आधी वाचन दांडगे हवे. इंग्रजी येणे 'मस्ट' आहे. हॉलिवूडकडे बघा. त्यांचे नट फाडफाड इंग्रजी बोलतात. कारण? ते इंग्रजी वाचतात. मग त्यांना ऑस्करही सहज मिळून जातात."

सत्याने मान डोलवली.

"नट/नटी तब्येतीने सुदृढ असायला पाहिजे. शूटिंगच्या दरम्यान खाण्यापिण्याचे हाल होतात. कलेची साधना करायची तर खडतर कष्ट करावे लागतात. उपास तापास काढावे लागतात."

सत्याने अजून जोरात मान डोलवली. पण त्यात थोडी अस्वस्थता दिसत होती.

"फिल्म लायनीत धोके खूप आहेत. मोह खूप आहेत. त्यातून वाचायला हवे."

सत्याने डोळे बटाट्याएवढे केले. मला 'क्यू' मिळाला.

"आणि त्यातून वाचायचे असले तर डोके ठिकाणावर असलेला, समतोल बुद्धीचा कुणी प्रगल्भ जाणकार जवळ पाहिजे सदोदित."

सत्याचे डोके खुशीने डोलू लागले. डीएमकेचे भपकारे सोडणार्‍या त्याच्या नाकपुड्या अजूनच फुलारल्या.

"त्याच्या शिवाय काही खरे नाही. तुमचे करियर घडणे वा बिघडणे अश्या व्यक्तीवर संपूर्णतया अवलंबून असते. नशिबाने तुला असली व्यक्ती मिळालेली आहे."

आता सत्याचा काळा चेहरा लाजून जांभळा व्हायला आला. घाईघाईत त्याने माझा डायलॉग 'कट' केला आणि मला जेवायला खाली शेपाटले.

मुलीचे इंग्रजीचे ज्ञान पाहता तिला पाच-दहा टक्क्यांपेक्षा जास्त काही कळले असण्याची भीती नव्हती. त्यामुळे मीही  बिनघोर खाली गेलो.

खाली तिच्या आईने जेवणाचा जंगी बेत उठवला होता. मला मी कुणी राक्षस (गाडाभर अन्न, आणि एक बोकड इ इ) असल्यासारखे वाटू लागले. मटणाचे, कोंबडीचे आणि माशांचे प्रत्येकी दोन पदार्थ (तिला 'एक' न शिकवता थेट 'दोन, तीन, चार,..." असेच गणित शिकवले असेल का?), आणि 'तोंडी लावायला' म्हणून उकडलेली अंडी! केळीच्या पानाच्या एका कोपर्‍यातला एक पदार्थ संपवावा तर तो परत पानात पडे. छे! इथे भीम किंवा बकासुराचेच काम होते.

जमेल तेवढे खाल्ले, आणि तंबोर्‍यासारख्या पोटाने उठलो. कसेबसे हात धुतले.

मुंबईच्या यशस्वी दिग्दर्शकाला परत अड्यारला सोडायला भावी हिरॉईनचा पिता स्वतः स्कूटर घेऊन आला.