पहिले (स्वायत्त) पाऊल

सुमारे पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. संगणक विज्ञानातले पतव्युत्तर शिक्षण अर्धवट सोडून मी लघुचित्रपटांच्या दुनियेत शिरलो होतो. त्यातही वृत्तपट/माहितीपट या क्षेत्रात. कारण साहित्यावर आधारित लघु/दीर्घ चित्रपट हे वेगळे क्षेत्र आहे.

वृत्तपट/माहितीपट यांत वृत्तांकन वा दस्तावेजीकरण हा एकमेव हेतू असतो. त्यामुळे त्यात काल्पनिक गोष्टी वा गृहितके यांना जागा नसते. नसते म्हणजे, नसावी. पण वृत्तपट/माहितीपट यांचे प्रचारपटांत रूपांतर करण्याची परंपरा फार जुनी आहे.

मुळात कॅमेरा हे एक निष्पक्ष माध्यम आहे हे विधानच साफ चुकीचे आहे. जे घडले ते जसेच्या तसे शब्दांत मांडले तर फार तर विरामचिन्हांची फिरवाफिरव करून अर्थ बदलणे शक्य असते. पण त्यातली टोकाची उदाहरणे सोडली...

टोकाचे उदाहरण: 'WOMAN WITHOUT HER MAN IS A WRECK' हे वाक्य विरामचिन्हमंडित करा. मुद्दाम सगळी कॅपिटल अक्षरे वापरली आहेत, जेणेकरून विराम चिन्हांचे काही सूचन होऊ नये.

हे वाक्य दोन प्रकारे मांडता येईल. 'WOMAN, WITHOUT HER MAN, IS A WRECK'

किंवा

'WOMAN! WITHOUT HER, MAN IS A WRECK!'

...तर टोकाच्या उदाहरणांखेरीज विरामचिन्हांची फिरवाफिरव करून लिखित/उच्चारित भाषेत अर्थ फार बदलत नाही. पण दृष्य भाषेची गंमत म्हणजे त्याची ताकद आपल्याला माहीत असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. 'एक चित्र हजार शब्दांचे काम करते' हे वाक्य सर्वांना ठाऊक असते. पण हे असे का आहे, याचा विचार कुणी फारसा करीत नाही. आपल्या आसपासची दृष्यभाषेची उदाहरणे पाहून त्यावर विचार करणारे अजूनच कमी.

थोडक्यात सांगायचे झाले, तर कॅमेरा ठेवण्याची जागा (कॅमेरा प्लेसमेंट) आणि कोन (कॅमेरा ऍंगल) इथेच 'निष्पक्ष'पणा विरायला सुरुवात होते. 'फ्रेम' ही तर कॅमेरामन/दिग्दर्शकाने एकही शब्द न वापरता आपले मत मांडायला सुरुवात केल्याचे चिन्ह आहे.

आपल्याला 'चित्रपट हे एक दृक-श्राव्य माध्यम आहे' हेही वाक्य माहीत असते. पण बहुतेकांची जाणीव 'श्राव्य'पाशीच अडकते. मग संवाद अत्यंत बाळबोध होतात.

'आता मी काय बरे करू?' या संवादाची गरज पडत असेल तर अभिनेता/अभिनेत्री लाकडी ठोकळा आहे हे निश्चित. चुकलो. लाकडातही थोडाफार जीव असू शकतो.

असे बाळबोध संवाद 'हिट'ही होतात. समाजाच्या चित्रपटांबद्दलच्या एकूण जाणीवांशी हे सुसंगतच आहे म्हणा.

असो.

तर पहिली दोनेक वर्षे 'प्रॉडक्शन असिस्टंट' म्हणून फुटकळ कामे करण्यात गेली.

'प्रॉडक्शन असिस्टंट' हे उगाचच ईगो कुरवाळण्यासाठी. ईगो जास्त कुरवाळायचा असेल तर 'एडी' ऊर्फ असिस्टंट डायरेक्टर असेही म्हणता येई. पण मुंबईच्या चित्रपट दुनियेत त्याला प्रचलित असलेला रोकडा शब्द म्हणजे स्पॉट बॉय. कारण शूटिंग चालू असताना रिफ्लेक्टर धरणे, शूटिंग फ्रेममध्ये येऊ पाहणारा जनप्रवाह अडवणे, कॅमेरामन/साऊंड रेकॉर्डिस्टला चहा-बिडी आणून देणे ही कामेही 'प्रॉडक्शन असिस्टंट' या पदाबरोबर विनायास गळ्यात पडत.

याखेरीज फिल्म अर्काईव्हजच्या लायब्ररीत बसून संदर्भ शोधून देणे, शूट झालेले फूटेज कानाला हेडफोन लावून ऐकणे नि शब्दनशब्द लिहून काढणे (ट्रान्स्क्रिप्शन), प्रत्यक्ष शूटिंगमध्ये शूटिंग लॉग आणि कंटीन्यूटी शीट्स च्या गरजेप्रमाणे नोंदी ठेवणे अशी कामे मी त्या काळात केली. दोन शॉर्ट फिल्म्सचे ट्रान्स्क्रिप्शन केले. एक गुंथर सोंथायमर यांची 'वारी' आणि एक के. जी. गिंड्यांची मुलाखत. ट्रान्स्क्रिप्शन हे खरे तर 'हमाली' श्रेणीतले अत्यंत कंटाळवाणे काम. पण ही दोन कामे मला खूप काही शिकवून गेली.

अवांतर - 'ट्रान्स्क्रिप्शन'ची इथे झालेली सवय नंतर सहासात वर्षांनी मेडिकल ऍंथ्रॉपॉलजी मधला संशोधन प्रकल्प राबवताना कामी आली.

शूटिंग लॉग म्हणजे असे की लघुचित्रपटांचे शूटिंग यूमॅटिक टेप (पाऊण इंच रुंदीची मॅग्नेटिक टेप) वर रेकॉर्ड केले जाई. तुलनेसाठी आकडा - आपल्या ऑडिओ कॅसेटमधली मॅग्नेटिक टेप पाव इंच रुंदीची असते.

यूमॅटिक टेपचे दोन प्रकार असत. अतिसोप्या भाषेत लो बॅंड (कमी दर्जा) आणि हाय बॅंड (जास्ती दर्जा). पस्तीस वर्षांपूर्वी हाय बॅंडने बऱ्यापैकी पाय रोवले होते. ज्यांना ते अगदीच परवडत नसे ते लो-बॅंड वापरत, पण एकूण वापरापैकी लो-बॅंड तोवर दहा-पंधरा टक्क्यांहून जास्त उरले नव्हते.

एक यूमॅटिक टेप सुमारे वीस ते बावीस मिनिटांचे शूटिंग रेकॉर्ड करू शके. शूटिंग करताना ज्या क्रमाने ते लघुपटात दिसणार आहे त्याच क्रमाने करणे बऱ्याचदा अशक्य असे. स्थल-कालाच्या मर्यादेत 'जे उपलब्ध आहे ते' या निकषावर शूटिंग होई. त्यामुळे कुठल्या टेपवर कुठले शॉट्स कुठल्या क्रमाने शूट केलेले आहेत, त्या शॉट्सचा इन (स्टार्ट) टाईम आणि आऊट (एन्ड) टाईम, आणि तो शॉट 'ओके' आहे की 'एनजी' (नॉट गुड, बाद) हे लॉगबुकमध्ये नोंदवणे हे प्रॉडक्शन असिस्टंटचे काम असे. शॉट 'एनजी' असेल तर शक्यतो टेप रिवाईंड करून तो पुसून त्यावर नवीन शॉट घेतला जाई. पण ते शक्य नसेल तर 'एनजी' अशी नोंद गरजेची असे. आणि दरवेळेस ते शक्य असेलच असे नव्हे.

वृत्तपट/माहितीपट यांत कुणाची मुलाखत घ्यायची असेल तर आधी फार तालमी करणे बहुतेक वेळेस शक्य नसे. मुलाखत देणारी/रा मुलाखत देण्याच्या तंत्राबद्दल बहुधा अनभिज्ञ असत. त्यामुळे मध्येच अडखळणे, एखादा शब्द वा वाक्य रिपीट करणे, इकडेतिकडे बघणे, कॅमेऱ्यात बघून 'ठीक आहे ना?' असा मुद्राभिनय करणे अशा अनेक कारणांनी शॉट 'एनजी' होई.

बऱ्याचदा सुरुवातीपासूनच 'आपण फार कामात आहोत, कसाबसा एका मुलाखतीपुरता वेळ देतेय/देतोय' असा मुलाखत देणाऱ्यांचा तोरा असे. दर वेळेस थांबून कॅसेट रिवाईंड करायची झाली तर प्रॉडक्शन असिस्टंट लॉगमध्ये बघून आधीचा शॉट संपल्याचा टाईमस्टॅंप सांगे तिथपर्यंत रिवाईंड करणे यात शूटींग क्रूच्या देहबोलीतून कुठेतरी 'मुलाखत देणाऱ्याची चूक झाली आहे' असे प्रक्षेपित होण्याची दाट शक्यता असे. मग निमित्ताला टेकलेली/ला मुलाखत देणारी/रा बिथरे. त्यापेक्षा मुकाट शॉटपुढे 'एनजी' लिहून मोकळे झालेले बरे पडे.

एकूण शूट केलेली फिल्म आणि शेवटचा तयार प्रॉडक्ट यांचे गुणोत्तर त्याकाळी मुख्य प्रवाहातल्या हिंदी चित्रपटांमध्ये विसास एक वा त्याहून जास्ती असे. म्हणजे एकूण वीस तासांचे शूटिंग केले तर त्यातून एक तासाची [प्रेक्षक बघतात ती] फिल्म तयार होई. कारणे दोन. एक म्हणजे फिल्म एकदा एक्स्पोज झाली की संपले. शॉट बाद असेल तर 'एनजी' लिहून पुढे. पण मुख्य कारण म्हणजे रीटेक्स आणि मल्टिपल टेक्स (एकच दृष्य वेगवेगळ्या कोनांतून शूट करणे नि संकलनाच्या टेबलावर पाहिजे ते जुळवणे). कॅसेट रिवाईंड करून त्यावर री-शूट करता येत असे त्यामुळे कथाधारित लघुपटांमध्ये हे गुणोत्तर पाचापर्यंत खाली आणता येऊ शके.

आता फिल्म/कॅसेट हद्दपार होऊन सगळे 'डिजिटल' झाल्याने या गुणोत्तराकडे कुणी लक्षही देत नाही. 'शॉट घेऊन ठेव, वापरायचा की नाही हे नंतर बघू' या आवेशात सगळे चालते.

सत्यजित रे यांच्या नावे खपवली जाणारी (मिथक?)कथा अशी की माणिकदांच्या चित्रपटांत (बंगाली लोकांत प्रत्येकाला टोपणनांव असतेच असते. त्याला डाकनाम म्हणतात. कागदावरचे नाव म्हणजे भालोनाम. तर सत्यजित रेंचे 'डाकनाम' माणिकदा. ते वापरल्याने वापरकर्त्याची सत्यजित रेंबरोबरची जवळीक सिद्ध होते) हे गुणोत्तर दोनास एक यापेक्षाही कमी असे. कारण त्यांच्या प्रत्येक शॉटची फ्रेम ते स्वतः कागदावर रेखाटत. ते पाहून कॅमेरामनने फ्रेम लावावी. त्यामुळे प्रत्येक शॉटला साऊंड नि कॅमेरा सुरू केल्यावर दोनेक सेकंद जे जातात (साऊंड रेकॉर्डर नि कॅमेरा जुळून यायला - सिंक्रोनाईज व्हायला) ते आणि तालमी करूनही 'एनजी' झालेले शॉट यात होणारा वायफळ खर्च धरून त्यांचे गुणोत्तर दोनास एक यायचे (असे म्हणतात). एकच सीन पाच-सात (वा त्याहून जास्ती) ऍंगल्समधून शूट करायचा नि मग त्याचे तुकडे करून संकलकाने जोडायचे ही उधळपट्टी त्यांना मान्य नव्हती. शेवटी एक सीन जर संकलनाच्या टेबलावरून पाच शॉट्सच्या जुळणीतून बाहेर पडणार असेल तर ते पाच शॉट नेटके नि गरजेपुरतेच असावेत असा त्यांचा कटाक्ष असे.

एक उदाहरण घेऊ.

हे अतिसुलभीकरण आहे हे लक्षात ठेवावे. पॅन लेफ्ट-राईट (जमिनीसमांतर डावी-उजवीकडे), टिल्ट अप-डाऊन (वर-खाली), झूम इन-आऊट (दृश्याच्या जवळ-लांब जाणे) अशी मिळून आठ (२ गुणिले २ गुणिले २) काँबिनेशन्स होतात. शॉट चालू असताना (ऑन शॉट) यातले काहीही करता येतेच.

तर दोन व्यक्ती, अ आणि ब, बोलत आहेत. दोन्ही पुरुष. मित्र. घटना घरांतर्गत (इनडोअर) घडते आहे.

संवाद:

अ: (कानाला लावलेला सेलफोन बाजूला करीत) "अरे काय त्रास आहे! फोन का उचलत नाही हा फोकळीचा?"

ब: (हात पुढे करीत) "बघू बरं. तुला सेलफोन नीट वापरता येत नाही. बऱ्याचदा फोनच्या करताना तू फक्त 'लास्ट नंबर रिडायल' करतोस."

अ: (हात पुढे करीत) "घे, घे. अलेक्झांडर ग्रॅहम बेलने फोनचा शोध लावला नि तू सेलफोनचा. घूस आता फोनमध्ये नि पलिकडे जाऊन हाण भडव्याला."

ब: (सेलफोन हातात घेत) "अरे, हा कुठला फोन? आयफोन होता ना तुझा?"

अ: "हो, तो फोन मेला पाण्यात पडून. आणि ऍपलचा चीफ म्हणे 'त्यातला' आहे. छी! हा फोन गूगलचा. गूगल पिक्सेल. गूगलचा जमाना आहे आता. शिवाय गूगलचा प्रमुख 'आपला' आहे, सुंदर पिचाई. आणि 'तसला' नाही."

आपल्याला फ्रेम पाच वेगवेगळ्या प्रकारे लावता येईल असे समजू.

फ्रेम १: 'अ'च्या उजव्या बाजूने आणि 'ब'च्या डाव्या बाजूने, दोघांचेही चेहरे दिसताहेत अशी.

फ्रेम २: 'अ'च्या खांद्यावरून कॅमेरा 'ब'चा चेहरा दाखवतोय अशी.

फ्रेम ३: 'ब'च्या खांद्यावरून कॅमेरा 'अ'चा चेहरा दाखवतोय अशी.

फ्रेम ४ लो ऍंगल शॉट: 'अ'च्या उजव्या बाजूने आणि 'ब'च्या डाव्या बाजूने, दोघांचे चेहरे दिसतील अशी. पण जागा फ्रेम १ पेक्षा वेगळी. (लो ऍंगल शॉट हा बऱ्याचदा तणाव/संघर्ष दाखवण्यासाठी आणि पात्रे 'लार्जर दॅन लाईफ' दाखवण्यासाठी वापरला जातो. 'सिंघम' वा तत्सम मारधाडीच्या सिनेमांत जेव्हा हीरो आपटाधोपटी सुरू करतो तेव्हा कॅमेरा हमखास लो ऍंगलने हीरोचे महाकायपण अधोरेखित करतो. लक्ष देऊन पहावे.)

फ्रेम ५ टॉप ऍंगल: दोघांच्या बरोबर वरून, दोघांची डोकी/टकले दिसतील अशी.

याची आता फ्रेमनुसार वाटणी अशी:

अ: (कानाला लावलेला सेलफोन बाजूला करीत) "अरे काय त्रास आहे! - फ्रेम १

फोन का उचलत नाही हा फोकळीचा?" - फ्रेम ३

ब: (हात पुढे करीत) "बघू बरं. - फ्रेम २

तुला सेलफोन नीट वापरता येत नाही. बऱ्याचदा फोनच्या नावाखाली 'लास्ट नंबर रिडायल' करतोस." - फ्रेम १

अ: (हात पुढे करीत) "घे, घे. - फ्रेम ४

अलेक्झांडर ग्रॅहम बेलने फोनचा शोध लावला नि तू सेलफोनचा. - फ्रेम १

घूस आता फोनमध्ये नि पलिकडे जाऊन हाण भडव्याला." - फ्रेम ३

ब: (सेलफोन हातात घेत) "अरे, हा कुठला फोन? - फ्रेम ५

आयफोन होता ना तुझा?" - फ्रेम २

अ: "हो, तो फोन मेला बादलीतल्या पाण्यात पडून. आणि ऍपलचा चीफ म्हणे 'त्यातला' आहे. छी! हा फोन गूगलचा. गूगल पिक्सेल. गूगलचा जमाना आहे आता. शिवाय गूगलचा प्रमुख 'आपला' आहे, सुंदर पिचाई. आणि 'तसला' नाही." - फ्रेम १

तर सध्या प्रचलित पद्धतीप्रमाणे हा सीन वेगवेगळ्या फ्रेम्समध्ये तुकडे करून घ्यायचा. जमल्यास प्रत्येक तुकडा पाच वेळेस घायचा, फ्रेम बदलून. मग संकलनाच्या वेळी काय ते बघायचे. थोडक्यात, शूटिंगला सुरुवात करण्यावेळी दिग्दर्शकाचे डोके रिकामे असले तरी हरकत नाही. संकलक काय ते बरेवाईट करतो.

अवांतर - हृषीकेश मुखर्जी आणि डेव्हिड धवन हे दिग्दर्शक मूळचे संकलक आहेत.

तर, शूटिंग करताना प्रॉडक्शन असिस्टंट चतुर्हस्त गजाननासारखा चार आघाड्यांवर लढत असे. आणि तरीही एक/दोन हात कमी पडले म्हणून शिव्या खाई.

पस्तीस वर्षांपूर्वी तरी प्रॉडक्शन असिस्टंट असलेली मंडळी फारतर बारावी पास एवढ्याच पातळीची असत. एखादा ग्रॅज्युएट असल्यास माहीत नाही. त्या तुलनेत मी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत पोहोचून (आणि ते सोडून) आलेला असल्याने असेल, मला थोडा मान मिळे. शिव्या थेट बसत नसत, माझ्या सहकाऱ्याला बसत.


हे सगळे चालू असताना एक बिरबलाची खिचडी शिजायला घातली होती.

लघुपाटबंधारे प्रकल्प हे मध्यम अथवा मोठ्या धरणांपेक्षा अधिक उपयुक्त आहेत अशी एक विचारधारणा प्रतिष्ठा पावून होती. विकेंद्रित शासन (डीसेंट्रलाईज्ड गव्हर्नन्स) ही रोमॅंटिक कल्पना अनेक आरामखुर्ची-विचारवंतांच्या अंगावर रोमांच उठवी.

असा एक लघुपाटबंधारे प्रकल्प राज्यपातळीवर सात-आठ वर्षांपूर्वी सुरू झाला होता. जरी तेव्हा (प्रकल्प सुरू झाला तेव्हा) उदारीकरणाचे वारे काय, झुळूकही सुरू झाली नव्हती, तरी या प्रकल्पाला अमेरिकेतल्या एका सेवाभावी संस्थेने आर्थिक पाठबळ पुरवले होते. किती? सुमारे सहा कोटी डॉलर्स. त्यावेळच्या चलन-विनिमय दरानुसार नव्वद कोटी रुपये (स्वातंत्र्य मिळाले तेव्हा तीन रुपयांना डॉलर मिळे. तो वाढत ऐंशीच्या दशकाच्या शेवटी पंधरा रुपयांवर पोहोचला. नंतरच्या दहा वर्षात पंचेचाळीस रुपयांवर पोहोचला. २०१४ साली साठ रुपयांवर पोहोचला. सध्या त्र्याऐंशी रुपयांवर आहे). त्यातून सुमारे नव्वद लघुपाटबंधारे प्रकल्प उभे राहणे अपेक्षित होते. म्हणजे एक कोटी रुपयांना एक लघुपाटबंधारे प्रकल्प.

यात अर्थातच मुख्य काम (लघुपाटबंधाऱ्याचे आणि कालव्याचे बांधकाम) अजिबात होऊ शकले नसते.

नंतर या कामाच्या निमित्ताने पाटबंधारे आणि शेती या विभागांतल्या अनेकांशी संबंध आला तेव्हा एका लघुपाटबंधाऱ्याचा खर्च किती असतो याची चाचपणी करायचा प्रयत्न केला. एक आकडा असा कुणी सांगितला नाही. पण पाटबंधारे खात्यातले एक निवृत्त अधीक्षक अभियंता (सुपरिटेंडिंग इंजिनियर) एकदा "ह्यॅं.... शंभर कोटीच्या खाली कितीपन चोट्या कामाला हातपन लावनार नाय कुनी" असे बोलून गेले.

पाटबंधारे प्रकल्पांवर निर्धारित केलेला आणि प्रत्यक्ष होणारा खर्च यातील फरकाचे आकडे रंजक आहेत.

वानवळा - भंडारा जिल्ह्यातल्या गोसिखुर्द प्रकल्पासाठी मूळ मंजुरी होती साडेचारशे कोटी रुपयांची. त्यानंतर वीस वर्षांत तो आकडा साडेसात हजार कोटींच्या वर पोहोचला. या वीस वर्षांत सगळ्या पक्षांनी सरकारे स्थापन करून घेतली होती, त्यामुळे कुणा एका पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही. अंक-निरक्षरता हा कर्करोगापेक्षा भयंकर असा साथीचा रोग आहे. असो.

तर ही एका प्रकल्पामागे सरासरी एक कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांचे प्रबोधन आणि प्रशिक्षण, त्यांच्या स्थानिक समित्या (चाक कमिटी) स्थापन करून पाण्याचे व्यवस्थापन त्यांच्याकडे सोपवणे, वेगळाल्या पिकांची बियाणी उपलब्ध करून देणे यासाठी वापरायची होती. तशी बहुतेक सगळी वापरून झाली होती.

आता अमेरिकेत असलेल्या सेवाभावी संस्थेच्या मुख्य कार्यालयाला या एकूण खर्चाचा अहवाल पाहिजे होता.

ही रक्कम पुण्यातल्या एका सल्लागार आस्थापनेमार्फत सरकारला देण्यात आली होती. या सल्लागार आस्थापनेने हा अहवाल करण्यासाठी अजून एका सल्लागार आस्थापनेला काम दिले होते. ही अजून एक सल्लागार आस्थापना चालवणाऱ्यांना अशी कल्पना सुचली की छापील अहवालाऐवजी/सोबत एक लघुपट करून पाठवावा.

हे काम फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणाऱ्या माझ्या गुरुजींकडे आले होते. गुरुजींचा एक चेला कॅमेरामन होता. सुधन्वा देशपांडे. सुधन्वा चित्रपट सृष्टीत कॅमेरामन होण्यासाठी धडपडत होता. स्टिल फोटोग्राफी करून त्याचा उदरनिर्वाह चालत असे.

गुरुजींनी नेहमीप्रमाणे आपल्या खांद्यावर प्रकल्प ओढून न्यावा, सुधन्वाने असिस्टंट कॅमेरामन व्हावे (आणि शिकावे), मी असिस्टंट डायरेक्टर व्हावे (आणि शिकावे) असा बेत ठरला. सुरुवातीचे सगळे काम मी पुढे होऊन करावे. सगळे जुळून आले की गुरुजी फिल्म इन्स्टिट्यूटमधून चार दिवस रजा टाकून शूटिंग निस्तरतील. एडिटिंग पुण्यातच करायचे असल्याने ते तसेही आम्ही रात्री करीत असू. गुरुजींना रजा टाकायची गरज नसे.

पण वर म्हटल्याप्रमाणे ही बिरबलाची खिचडी होती. दोनेक वर्षे नुसतेच 'करू करू' चालले होते (मुख्य सल्लागार आस्थापनेचे). पहिल्यांदा त्यांनी सगळी तांत्रिक माहिती भरलेले अहवाल आम्हांला दिले. दीडदोन किलोचे ते बाड चाळून-धुंडाळून मी पटकथेचा आराखडा तयार केला. तो त्यांना पसंत पडला. मग वर्षभर शांतता. मग एकदा परत त्यांनी विषयाला तोंड फोडले म्हणून मी नि सुधन्वा पुणे नि सातारा जिल्ह्यातला एकेक प्रकल्प शूटिंगच्या दृष्टीकोनातून प्रत्यक्ष बघून आलो. पुणे जिल्ह्यातला प्रकल्प मुळशी तालुक्यात होता नि सातारा जिल्ह्यातला खंडाळा तालुक्यात. माझी सुपर एफई स्कूटर घेऊन प्रत्येकी एक दिवस लागला. मग परत शांतता. मग महाराष्ट्रातल्या कुठल्याकुठल्या प्रकल्पांचा शूटिंगमध्ये समावेश करावा याबद्दल त्यांनी मौलिक विचार व्यक्त करायला सुरुवात केली. एकदोन बैठकांमध्ये आम्ही ऐकून घेतले. मग जेव्हा त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचे आकडे आम्ही मांडायला सुरुवात केली (प्रवास-निवास खर्च, शूटिंगची सामग्री पुण्याबाहेर न्यायची असेल तर दीडपट खर्च, सर्व शूटिंग क्रूचाही खर्च पुण्याबाहेर दीडपट आदि) तेव्हा दुय्यम सल्लागार आस्थापना टरकली. चार पैसे सुटण्याऐवजी सहा पैसे जाताना त्यांना दिसू लागले.

मग तोडगा निघाला की सातारा, सांगली, कोल्हापूर नि सिंधुदुर्ग हे चार जिल्हे निवडावेत. त्या दुय्यम सल्लागार आस्थापनेचे दोन संचालक, एक शेती विभागातले निवृत्त वरिष्ठ आणि मी दौऱ्यावर निघालो. सुधन्वाला एक इंडस्ट्रिअल फोटोग्राफीचे काम आले होते. मूळ कल्पनापतंग उडवून पावणेदोन वर्षे झाली होती. उन्हाळा सुरू होत होता.

एका ऍंबॅसिडरमधून आम्ही ड्रायव्हरसकट पाचजण निघालो. एम डब्ल्यू आर २०२० क्रमांकाची ती पेट्रोल ऍंबॅसिडर मऊसूत चाले. ड्रायव्हर विवेक नावाचा पंचविशीतला, म्हणजे माझ्याच वयाचा मुलगा होता. आमचे छान जुळले. त्या दौऱ्यात मी बऱ्याचदा ती गाडी चालवली.

दुय्यम सल्लागार आस्थापनेचे दोन्ही संचालक सुमारे चाळिशीचे होते. राष्ट्रकार्यासाठी अविवाहित. शेती विभागातले निवृत्त वरिष्ठ केएनडी जोशी सत्तरीचे.

असे आमच्या-आमच्यातच चाळीस वर्षांहून (म्हणजे दोन पिढ्यांहून) जास्त अंतर होते. पण दोन टोके - जोशीबुवा एकीकडे आणि मी नि विवेक एकीकडे - छान जुळली. उरलेले दोघे कधी शिंगे मोडून वासरांत शिरण्याचा प्रयत्न करीत तर कधी प्रौढ-प्रगल्भ दिसण्याचा. दोन्ही प्रयत्न अपयशी होत.

केएनडी जोशींची इनिशिअल्स खरी तर केडी जोशी. ते नोकरीला लागले स्वातंत्र्य मिळण्याच्या आसपास त्याकाळच्या बॉम्बे इलाख्यात. त्यांचे गांव निपाणी. स्वातंत्र्यानंतर दहाएक वर्षांतच जेव्हा मराठी-कानडी भाषिक वाद उफाळला तेव्हा जोशीबुवांनी मराठीची बाजू घेतली. त्यांचे कन्नड बंधू खवळले. जोशींचे नांव काशिनाथ दत्तात्रय जोशी. म्हणजे केडी जोशी. पण ते कानडी आहेत हे ठसवण्यासाठी कन्नड बंधूंनी ते केएनडी जोशी केले. पण महाराष्ट्र सीमेपासून दोनतीन किमीवरच्या निपाणीचे जोशी स्वतःला मराठीच मानत राहिले. आणि निवृत्तीनंतर पुण्यात येऊन स्थायिक झाले.

पहिला थांबा सातारा जिल्ह्यात. बंगलोर हायवेला असलेले अतीत ओलांडून आम्ही एका अर्ध-कच्च्या रस्त्याला उजवीकडे वळलो. सुमारे तासभर ठेचकाळत गेल्यावर तो प्रकल्प होता. तिथल्या गावात चावडीवर काही शेतकऱ्यांच्या आणि कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती घ्याव्यात (शूटिंग करताना) अशी कल्पना होती. त्यासाठी हे 'साईट हंटिंग' होते. जागा नि गांवकरी दोन्ही छान होते. चावडीवर एक मोठे मारुतीचे कौलारू देऊळ होते. मोठे म्हणजे शेशंभर मावळा मावेल असे. तिथे शूटिंग करायला चांगली जागा होती.

बासुंदी चहा पिऊन निघालो.

आता सांगली. जसजशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमारेषा जवळ येत चालली तसतसे जोशीबुवा खुलायला लागले. त्यांच्याकडच्या किश्श्यांची पोतडी उघडली. जोशीबुवांचा कोंकणस्थी खवचटपणावर आणि कातडीबचाऊपणावर विशेष राग होता. राग म्हणण्यापेक्षा रोख होता. माझी अजिबात हरकत नव्हती. त्यांच्या रोखाला टोक होते, धारही होती, पण विष नव्हते.

दोन्ही संचालक राष्ट्रहितापुढे सगळे गौण या मताचे होते त्यामुळे यात ते पडत नसत.

शिवाय दोघेही देशस्थ होते नि मला फटके पडताना त्यांना सुप्त आनंदच होत असे.

विवेक बहुजनसमाजातला होता त्यामुळे तो या सगळ्याकडे तटस्थ निर्विकारपणे पहात असे - करमाळ्याच्या शेतकऱ्याने टीव्हीवर झिंबाब्वे नि वेस्ट इंडिजची मॅच बघावी तसे.

जोशीबुवा कृषी विभागातून उपसंचालक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांचे बरेच कनिष्ठ अद्याप कार्यरत होते नि मोठ्या पदांवर होते. कृषी विभाग नि पाटबंधारे विभाग यांना बऱ्याचदा हातात हात घालून काम करावे लागते. त्यामुळे जोशीबुवांच्या पाटबंधारे विभागातही भक्कम ओळखीपाळखी होत्या.

या दोन्ही विभागांच्या हातात हात घालून काम करण्यावर उतारा म्हणून महसूल विभाग या दोघांच्या पायात पाय घालून पाडायच्या मागे असे - इति जोशीबुवा. त्यामुळे कलेक्टर ऑफिसमधून कुणी कामासाठी कृषी वा पाटबंधारे विभागात आला (वा उलटे झाले) तर त्याला रीतसर तंगवले जाई. वेगवेगळ्या योजनांखाली कृषी नि पाटबंधारे विभागांना थेट निधी मिळे, कलेक्टरच्या कृपेची गरज नसे. पाटबंधारे विभागाकडे तर स्वतःचे वायरलेस सेट्स असत कारण त्यांच्या साईट्स बऱ्याचदा दुर्गम भागांत असत. कलेक्टर ऑफिसला हे खटके, पण इलाज नसे.

थोडक्यात, पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किंवा कृषी विभागाचे उपसंचालक (जिल्हाप्रमुख) यांच्याकडेच आम्ही जावे, कलेक्टर कचेरीत फिरकू नये असा जोशीबुवांनी आदेश दिला.

जेवणवेळेस पेठनाक्याला पोहोचलो. जोशीबुवांना इस्लामपुरातली एक खानावळ आठवली. तिथे खरपूस भाकरी नि मटन असा सुंदर बेत झाला. जोशीबुवा मांसाहारी होते. 'माणूस काहीही खाऊ शकतो, म्हणून माणूस सर्वात बलिष्ठ प्राणी झाला आहे' हे त्यांचे तत्वज्ञान होते.

राष्ट्रकार्यकर्ते दोघे शाकाहारी. त्यांच्यासाठी पिठले करवण्यात आले. पण पिठल्याचा रंग पाहूनच दोघे भेदरले. शेवटी पिठले लोणच्यासारखे लावून त्यांनी भाकरी संपवली.

सांगली जिल्ह्यातला प्रकल्प सांगलीच्या पूर्वेला मिरज नि कवठेमहांकाळच्या मध्ये होता. रखरखीत उन्हात राखाडी मातीत लघुपाटबंधारे प्रकल्प सोडाच, एखादा बांध असेल नि त्या बांधाला पाणी असेल असे मानणेही अवघड होते. प्रकल्पापर्यंत पोहोचलो. पाणी होते, ते सोडण्याची व्यवस्थाही होती, पण दृकभाषेत हे अजिबात उतरत नव्हते. तरीही मी पंधरावीस फोटो काढून घेतले (गुरुजींनी मला एक एसएलआर मिळवून दिला होता) आणि मुक्कामाला रात्री कोल्हापुरात पोहोचलो. सरकारी काम असल्याने रुबाबात पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊसमध्ये उतरलो.

कोल्हापूर जिल्ह्यातला प्रकल्प गडहिंग्लज तालुक्यात होता. तिथे जायला सोयीचा मार्ग निपाणीतून. जोशीबुवा अजूनच खूष.

मिसळ दत्तमध्ये खावी की फडतरेंकडे या माझ्या प्रश्नाला जोशीबुवांनी "चला हो, निप्पाणीला मिसळ खाऊ घालतो"म्हणून आमची वरात निपाणीला नेली. मिसळीचे ठिकाण नामवंत नव्हते. खरेच नव्हते. म्हणजे दुकानावर बोर्डच नव्हता. मोजून चार बाकडी. पण मिसळ अप्रतिम होती.

गडहिंग्लज तालुक्यातला प्रकल्प छान होता. मागे डोंगर, पुढे गर्द झाडी. शूटिंगला मजा आली असती.

दुपारच्या जेवणाला जोशीबुवांनी गडहिंग्लजमधली एक खाणावळ गाठली. इस्लामपुराचीच पुनरावृत्ती, नव्हे, वरची पायरी. फक्त इथे भाकरीऐवजी तेल लावलेल्या खरपूस पोळ्या होत्या. तुडुंब पोटाने निघालो नि आजरामार्गे सावंतवाडीला पोहोचलो. मुक्काम इरिगेशन गेस्ट हाऊस.

जोशीबुवा त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात होते. तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा झालेला नव्हता. त्यामुळे वर उत्तरेला मंडणगड ते खाली दक्षिणेला सावंतवाडी असा तीनेकशे किमीचा टापू एकाच जिल्ह्यात होता. ताशी तीसचाळीस किमीच्या वेगाने जाणाऱ्या त्या काळच्या वाहनांना पूर्ण दिवस लागे.

दापोली-लाडघर पट्ट्यात घडलेला एक किस्सा जोशीबुवांनी रंगवून सांगितला.

पशुपालनात जर्सी गायी पाळा असे सरकारी फर्मान निघाले. त्यावर आक्षेपांचा भडिमार झाला त्यातूनही विभागाने वाट काढली. एका गावातल्या खोताच्या अंगणात झालेली बैठक येणेप्रमाणे:

आक्षेप - गायींची किंमत खूप आहे.

सरकार - अनुदान देऊन ती किंमत कमी केली आहे.

आक्षेप - गायींना चरण्यासाठी जागा नाही.

सरकार - सरकारी गायरानात फुकट सोय केली आहे.

आक्षेप - ही लाडा-कोडाची परदेशी जनावर, त्यांचे रोगही तसेच खर्चिक असणार.

सरकार - सरकारी पशु-चिकित्सक त्यांचे इलाज मोफत करील.

शेवटला आक्षेप (शब्दशः) - समजां तुम्हीं म्हणतां तशां या गायी इथे पोहोचल्यांच, इथलें गवत त्यांनी खाल्लेंच, त्या आजारी पडल्यांच नाहीत किंवा आजारी पडल्यांस न मरता बऱ्यां झाल्यां, तर त्यांचे दूध कोणी काढावयाचे?

जोशीबुवा निरुत्तर होऊन परतले.

सावंतवाडीचे गेस्ट हाऊस इरिगेशन डिपार्टमेंटचे होते. तिथे तिल्लारी प्रकल्पावर काम करणारे कार्यकारी अभियंता भेटले. त्यांना सायंसंध्या करण्यात मदत हवी होती. ती करून मी तोंड पुशीत जेवायला परतलो.

सावंतवाडीजवळचा प्रकल्प आंबोली घाटाच्या दिशेने माडखोल गावालगत होता. तिथे उगम पावणारी तेरेखोल नदी पुढे समुद्राला मिळते तेव्हा ती महाराष्ट्र आणि गोव्याची समुद्रकाठची सीमारेषा होते.

माडखोलला प्रकल्प फार आकर्षक नव्हता, पण लाभार्थी शेतकरी खणखणीत आवाजात बोलायला तयार होते. त्यामुळे तेही ठिकाण पक्के केले नि परतीच्या मार्गाला लागलो.

परतताना आंबोलीऐवजी फोंडाघाटाने परतण्याचे ठरले कारण जोशीबुवांना कुडाळला कुणालातरी भेटून यायचे होते. त्यानिमित्ताने कुडाळला एक लक्षात राहील असे माशांचे जेवण मिळाले.

आम्ही पुण्याला परतल्यावर मी एक चार दिवसांचे शूटिंग शेड्यूल तयार केले. एक दिवस सातारा प्रकल्प, मुक्काम सांगली. दुसरा दिवस सांगली प्रकल्प, मुक्काम कोल्हापूर. तिसरा दिवस कोल्हापूर प्रकल्प, मुक्काम सावंतवाडी. चौथा दिवस सावंतवाडी प्रकल्प, रात्री परत. शेड्यूल दुय्यम सल्लागार आस्थापनेला पाठवून दिले. त्यांनी ते पुढे पाठवले असे आम्हांला कळवले.

पुन्हा शांतता.

उन्हाळा संपत आला. वळवाचा पाऊस सुरू झाला. तो संपून मॉन्सूनचा पाऊसही सुरू झाला. पहिला जोर साताठ दिवस राहिला. एकदा आंबा घाट एक दिवस बंद झाला नि अणुस्कुरा घाट तीन दिवस.

अचानक एका सकाळी दुय्यम सल्लागार कंपनीचे संचालकद्वय मला शोधायला फिल्म आर्काईव्हजच्या लायब्ररीत अवतरले. कारण काय, तर म्हणे शूटिंग लगेच करायचे आहे. शूटिंगच नव्हे, तर पोस्ट-प्रॉडक्शन (एडिटिंग, साऊंड मिक्सिंग इ) हेही करून दहा दिवसांत लघुपट तयार हवा.

'ग्राहक राजा असतो' हे सत्य मान्य असल्याने आक्षेप घेण्यात अर्थ नव्हता. फक्त आता हे सर्व कसे जुळवायचे याचे उत्तर शोधायला हवे होते.

रस्ता ओलांडून फिल्म इन्स्टिट्यूट गाठली. गुरुजी नेहमीप्रमाणे कॅंटीनला भेटले, चहा नि विल्स नेव्हीकट सह. गुरुजींनी दुसरा बाँब फोडला. त्यांना आठवडाभर इन्स्टिट्यूटमधून हलता येणार नव्हते - काहीतरी टीव्हीच्या प्रोड्यूसर्सची एक आठवड्याची कार्यशाळा घ्यायची होती.

माझे हातपाय गळाले. असिस्टंट कॅमेरामनचा कॅमेरामन आणी असिस्टंट डायरेक्टरचा डायरेक्टर एकदम, एका वेळेला?

गुरुजींनी तोडगे काढायला सुरुवात केली. "तुला कॅमेरा अटेंडंट म्हणून दीपक दवे देतो. तो ऑलरेडी कॅमेरामन म्हणून काम करतो. तो सुधन्वाला मदतही करील आणी ट्रॅकवरही ठेवील. साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून हरी गायकवाड देतो. नंतर तसेही एडिटिंग तोच करणार आहे, शूटिंग करतानाच तो एडिटिंगच्या दृष्टीने सगळे व्यवस्थित ठेवील. प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून संताजी यादव देतो. तो माझ्याबरोबर भारत फिरलेला आहे. थोडक्यात, माझी सगळी टीम देतो. मग तर झाले?"

'माझी सगळी टीम देतो, फक्त मी नसेन' असे पटवून श्रीकृष्णाने कौरवांना कसे गंडवले होते हे मला नीट माहीत होते. माझा धीर होईना.

मग गुरुजींनी लय बदलून वेगळाच राग आळवायला सुरुवात केली. "हे काम हातातून सोडायलाही हरकत नाही. कामे काय, येतात नि जातात. पण तुला जे वाटते आहे, की हा तुला या प्रोजेक्टमध्ये अपयश येईल तर ती एक शक्यता आहे. दाट शक्यताही असेल. पण तू प्रोजेक्ट सोडूनच दिलास तर अपयश गॅरंटीड. शक्यता की गॅरंटी याचा विचार कर."

मग त्यांनी शेवटला गोळा टाकला. "आणि प्रोजेक्ट सोडूनच द्यायचा विचार पक्का झाला तर फिल्म लाईनही सोडून दे. सगळे मनासारखे जुळून आल्यावरच काम पूर्ण करेन असा 'मोगल ए आझम' एखादाच होतो आणि त्यामागेही वेड लागायची पाळी आलेला एखादा शापूरजी पालनजी असणे गरजेचे असते. तुला बाहेर बरी नोकरी मिळेल एखादी. कंप्यूटरचे काम करणाऱ्यांना खूप डिमांड यायला लागली आहे हल्ली".

असा ईगोवर घाव बसल्यावर इलाज उरला नाही.

आणि गुरुजींनी देऊ केलेले त्रिकूट खरेच अनुभवी होते. शिवाय मिळूनमिसळून वागणारेही होते. दीपक, हरी आणि संताजी गेली पाच ते पंधरा वर्षे या क्षेत्रात काम करीत होते.

मी धीर गोळा केला नि शूटिंग शेड्यूल पक्के करायला बसलो.

पावसाचा भरंवसा नाही, त्यामुळे 'जेवढे जमेल तेवढे' या तत्वावर काम होईल हे दुय्यम आणि प्राथमिक सल्लागार आस्थापनेकडून मान्य करून घेतले. मग प्रवास आणि सामानाची तयारी करायला लागलो.

त्याकाळी शूटिंगसाठी वापरले जाणारे लाईट्स मोठ्या लाकडी घनाकृती खोक्यांत येत. सुधन्वाने सहा लाईट्स लागतील असा अंदाज दिल्यावर परत गुरुजींना गाठले. त्यांनी 'चार लाईट्स खूप झाले' असा दरडावणीवजा आदेश दिल्यावर सुधन्वा गप्प बसला. कॅमेरा, रेकॉर्डर, स्टॅंड, रिफ्लेक्टर्स आदि बाकीच्या वस्तू. माणसे आम्हीच पाच. म्हटल्यावर किमान एक मेटॅडोरसदृश गाडी लागेल हे नक्की. तेवढ्यात सुधन्वाने त्याच्याबरोबर दोन मैत्रिणी येणार असल्याचे जाहीर केले. परत गुरुजींना न गाठता मी सुधन्वालाच सल्लागार आस्थापनेकडून एक मेटॅडोर नि एक ऍंबॅसिडर एवढे बजेट मान्य करून घ्यायला पाठवले. त्याने कसे काय कोण जाणे, त्यांना पटवले. ऍंबॅसिडर म्हणजे विवेक. म्हणजे मला अजून एक मदतीचा हात आला.

पावसात फार हिंडायला नको या निमित्ताने मी सांगली जिल्ह्यातला प्रकल्प उडवला. तसाही तो पडद्यावर (खरे तर टीव्हीवर) फार आकर्षक दिसलाच नसता. आणि तिथल्या शेतकऱ्यांना वा अधिकाऱ्यांना प्रकल्पाचे फार कौतुक असल्याचे त्यांच्या देहबोलीतून वाटले नाही.

आता उरले तीन. सातारा, कोल्हापूर नि सिंधुदुर्ग.

पुण्यातल्या पाटबंधारे खात्याच्या विभागीय मुख्यालयात जाऊन त्यांच्या फोनवरून या तिन्ही जिल्ह्यांत आमच्या आगमनाची द्वाही फिरवण्याची व्यवस्था केली. तसेच कृषी विभागाला कळवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर टाकली.

सरकारी पदांच्या उतरंडीत विभागीय मुख्यालयातून त्या त्या जिल्ह्याच्या एक्झिक्यूटिव्ह इंजिनियरना फोन गेल्याने सगळी यंत्रणा पटापट हालली.

सकाळी सहाचा कॉल टाईम होता. सगळे आले वेळेत, सुधन्वा नि मैत्रिणी सोडून. पण सगळे सामान मेटॅडोरमध्ये चढवण्यात अर्धा तास गेला तोवर तेही आले.

पिरपिर पावसात आम्ही पुणे सोडले. कात्रज ओलांडल्यावर पाऊस थांबला. खंबाटकी ओलांडल्यावर तर चक्क थोडे ऊनही आले. अतीतला पोहोचेपर्यंत 'झाले मोकळे आकाश' गुणगुणायची सोय झाली होती. दहा वाजेपर्यंत गावात पोहोचलो. मारुतीच्या देवळासमोर पाटबंधारे खात्याची जीप उभी होती. पन्नासेक माणसेही जमलेली होती. पाटबंधारे खात्याच्या एक्झिक्यूटिव्ह इंजिनियरने वायरलेस सेट्स कामाला लावून ही किमया घडवून आणली होती.

शूटिंगच्या साहित्याची मांडामांड झाली. लायटिंग करण्यासाठी सुधन्वा वेळ खाऊ लागल्यावर मी दीपकला नजरेने खूण केली. दीपक चांगला कॅमेरामन तर होताच, पण कुणाला न दुखवता काम काढून घेण्यातही पटाईत होता.

नंतर कळालेली गोष्ट अशी की त्याच्या घराण्यात फिल्म लाईनमध्ये गेलेला हा पहिलाच. बाकीचे सगळे खानदान आपापल्या दुकानांवर रुजलेले असे. दीपकही फिल्म लाईनमध्ये येण्यापूर्वी त्याच्या वडिलांच्या साडीच्या दुकानात काम करीत होता. कुणाला ताई म्हणावे, कुणाला मावशी, कुणाला काकू नि कुणाला आज्जी या आराखड्यांसकट तोंडात साखर नि डोक्यावर बर्फ हे त्याला सहज जमे.

दुकानदारी रक्त असल्याने तो हिशेबालाही पक्का होता. त्यामुळे मी चार दिवसांच्या खर्चासाठी घेतलेली रक्कम (एटीएम, नेट बॅंकिंग, डेबिट कार्ड हे शब्द तेव्हा कुणालाच ठाऊक नव्हते) त्याच्याच हवाली करून टाकली होती.

सगळे जुळले नि मी मुलाखतींना सुरुवात केली. जेवणवेळेपर्यंत मुलाखती उरकल्या. जेवायला गांवकऱ्यांनी देवळातच सोय केली होती. भाजी (वांग्याची), भाकरी नि गोड बुंदी. यातल्या गोड बुंदीच्या गोडपणाला निष्प्रभ करण्याइतपत भाजी तिखट होती.

अजून उघडीपच होती. पटकन प्रकल्पावर एक चक्कर मारावी म्हणून आम्ही निघालो. पण रस्त्याची अवस्था बघता पाटबंधारे खात्याच्या जीपवर कब्जा करावा लागला. विवेक नि मेटॅडोरचा ड्रायव्हर संजय यांच्या संगतीत सुधन्वाच्या मैत्रिणींना सोडून आम्ही धरणावर गेलो.

सुधन्वाचे हे मोठे असे पहिलेच काम. त्याच्या पहिलेपणाचा एक तोटा असा की त्याचा हात कॅमेऱ्यावर सराईतपणे बसलेला नव्हता. धरणावर गेल्यावर मी त्याला एक लेफ्ट टू राईट पॅनशॉट लावायला सांगितला. धरण ठीकठाक भरलेले होते नि किनारे हिरवेगार झाले होते.

पॅनशॉट चांगला होण्यासाठी दोन पथ्ये - पॅनची गती एकसमान पाहिजे आणि जिथे शॉट संपवायचाय तिथे थांबताना कॅमेरा हिंदकळायला नको. सुधन्वाने तीन रीटेक्स केले. दर वेळेस तो एंड पॉईंट ओलांडून उजवीकडे थोडा पुढे जायचा नि गचका देत मागे डावीकडे यायचा. अखेर जमले.

परत येऊन कोल्हापूरच्या दिशेने निघालो तोवर चार वाजत आले होते. कोल्हापुरात पोहोचायला जवळजवळ आठ वाजले. कराडपाशी पाऊस पिरपिरला, पण पेठनाक्यानंतर पूर्ण थांबला.

आणि पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसच्या रखवालदाराने जागा द्यायला साफ नकार दिला. 'बुकिंगबद्दल कुणी साहेबांनी काही सांगितले नाही' एवढ्या एकाच मंत्राची त्याने सहस्त्रावर्तने करायला घेतली. माझ्याकडे फोन नंबर्स होते ते सगळे ऑफिसचे.

शेवटी फार वाद न घालत बसता ओपल गाठले. फार खोल्यांइतके पैसे नव्हते त्यामुळे एका खोलीत तीन जास्तीच्या गाद्या घालून आम्ही पाचजण आणि सुधन्वाच्या दोन मैत्रिणी दुसऱ्या खोलीत असे जमवले. संजय नि विवेक खाली मेटॅडोरमध्येच झोपले.

मला मुख्य म्हणजे झालेले शूटिंग हरी गायकवाडबरोबर बसून सलग बघायचे होते. हरीच आमचा एडिटर असणार होता.

तोवर दीपक कावळा नाक्यावर जाऊन तीर्थ घेऊन आला.

अवांतर - चित्रपटसृष्टीतली मंडळी म्हणजे तोंडाला सतत दारूचा पेला वा सिगरेट वा दोन्ही हे एव्हढेसे खरे नसते. काम करीत असताना बहुतेक वेळेला हातघाईचा प्रसंग असतो. जेवण नि चहाच काय, पाणीही प्यायला वेळ नसतो. आऊटडोअरला रात्री पेयपान करणे हे 'रिलॅक्स' होण्यासाठी वापरले जाते, पण पुढल्या दिवसाचा विचारही सतत डोक्यात असतो. कोल्हापुरात बघितले तर आम्हां सगळ्यांना सकाळी पाचपासूनच उठावे लागणार होते (आदमी पांच, और बाथरूम एक। बहुत नाइन्साफी है). आणि या क्षेत्रात काम करूनही दारू पिणे 'नगण्य' श्रेणीत असणारी हरी नि संताजी सारखी भरपूर माणसे मला ठाऊक होती.

त्या रात्री चौघांत मिळून अर्धी बाटली रम संपवून आम्ही झोपलो.

सकाळी आठ वाजता निघालो. का कोण जाणे, मी गाडी पीडब्ल्यूडीच्या गेस्ट हाऊसला घ्यायला लावली. तिथे गेटवर रखवालदाराला शिवीगाळ चालू होती. शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीच्या अंगात बंडी नि लुंगी होती, तोंडावर दाढीचे बारीक खुंट होते, तोंडात अस्सल कोल्हापुरी शिव्या होत्या नि आवाजात अस्सल अधिकारवाणी होती. ते इरिगेशनचे एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर होते. आमच्या शूटिंगच्या तयारीच्या पाहणीसाठी ते काल गडहिंग्लजला गेले होते तिथून परतायला त्यांना मध्यरात्र झाली होती. आम्ही गेस्ट हाऊसला झोपलो असू या खात्रीने ते सकाळी आठ वाजता आम्हांला चहाला बोलवायला आले होते. रखवालदाराने आम्हांला हाकलून घातल्याचे कळल्यावर त्यांचा संताप अनावर झाला होता.

शेवटी आम्हीच त्यांची समजूत काढली आणि तिथल्याच कॅंटीनला मिसळ खाऊन निघालो. कालच्या अनुभवावरून शहाणे होऊन इंजिनियरसाहेबांना आमच्यासाठी एक जीपही गडहिंग्लजला तयार ठेवायला सांगितली. त्यांनी आमच्यासमोरच वायरलेसवरून हुकूम दणकावला.

अजूनही उघडीप होती. गडहिंग्लजच्या प्रकल्पामधल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती आणि त्यांचा शेतकऱ्यांशी संवाद असे शूट करायचे होते. आणी धरणाचे शूटिंगही. तिन्ही प्रकल्पांपैकी सर्वात नयनरम्य असे हे धरण होते.

गडहिंग्लजमध्येही उघडीप चालूच राहिली. पूर्ण दिवस शूटिंग करायला मिळाले. धरणाचे भरपूर शॉट्स घेऊन ठेवले. एडिटिंग करताना ट्रान्झिशन शॉट्स म्हणून कामी आले. एव्हाना सुधन्वाचा हातही नीट बसला होता.

धरणाच्या पार्श्वभूमीवरच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची मुलाखत घेण्याचा बेत केला. पण दृकभाषेला श्राव्यभाषा आडवी गेली. सतत घोंगावणारा वारा माईकमध्ये घुसून घों घों करीत उच्चारित शब्द अस्पष्ट करू लागला. पण अखेर हरीने जमवलेच. त्याने लाईट रिफ्लेक्टर म्हणून एरवी वापरले जाणारे थर्मोकोलचे शीट्स साऊंड ब्लॉकर म्हणून वापरले. सुरुवातीच्या लाँगशॉटनंतर सगळी मुलाखत क्लोजप मध्ये घ्यावी लागली पण एकूण छान झाली. क्लोजपमध्येही चेहऱ्यामागे भरलेला जलाशय नि त्या मागचा डोंगर सुंदर दिसला.

इथेही जेवणाची व्यवस्था मापात होती. आणि जेवणही एवढेसे तिखट नव्हते.

शूटिंग संपेपर्यंत पावसाने उघडीप दिली.

आंबोली घाटाने सावंतवाडीचे गेस्ट हाऊस गाठायला रात्रीचे आठ वाजून गेले. एक बरे होते, दुसऱ्या दिवशी शूटिंग सुरू करायचे होते दुपारी एकनंतर. कारण आता फक्त शेतकऱ्यांशी संवाद आणि जमल्यास शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील काही दृष्ये एव्हढेच उरले होते.

त्या रात्री सुधन्वाच्या मैत्रिणींनी पिकनिक वा ट्रेकला गेल्याच्या थाटात कॅंपफायर करायचा घाट घातला. कोरडी लाकडे नाहीत आणि पुरेशी कोरडी जागाही नाही कारण पाऊस मधून अधून पडतच होता हे ऐकूनही त्यांचा उत्साह मावळेना. एकीचे नाव शारदा नि दुसरीचे सरस्वती. गेले छत्तीस तास त्यांना टाळणेच योग्य वाटले होते म्हणून नावेही जाणून घ्यायची इच्छा झाली नव्हती. आता काम पूर्ण टप्प्यात आल्यासारखे दिसत होते म्हटल्यावर मीही सैलावलो.

त्या दोघी सख्ख्या बहिणी होत्या. नीट बघितल्यावर साम्यही दिसले. त्यांच्या आईला म्हणे दोन मुलीच हव्या होत्या. इतकेच नव्हे, जुळ्या मुली पाहिजे होत्या. दोन मुली झाल्या, पण जुळ्या नाही, एकेकट्या. म्हणून तिने नावे अशी ठेवली.

त्या दोघींनी हरीला सापांची आणि भुतांची भीती वाटते हे शोधून काढले. मग काय? दोघी चेकाळल्या. सावंतवाडी तीन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे - तिथली लाकडी खेळणी, तिथले राजघराणे आणि तिथली सापांची भुते अशा कल्पनेचा ढलप्या काढीत त्यांनी त्याला पिडला. हरी खरोखरच घाबरत होता की तो त्यांची खेचत होता कळायला मार्ग नव्हता.

एरवी तो दाढेला तंबाकू धरून गप्प बसलेला असे. दारू पिताना एक पेग झाला की त्याला चढे. त्यावर एखादा पेग म्हणजे शिकस्त. त्याहून जास्ती झाले तर तो असेल तिथे नि असेल तसा झोपी जाई.

सकाळी उघडलेले होते म्हटल्यावर सावंतवाडीत चक्कर मारली. काळ्या वाटाण्याची उसळ नि पुऱ्या असा स्थानिक नाश्ता करून गेस्ट हाऊसला परतलो. झालेल्या शूटिंगचे लॉग्ज मीच नोंदले होते. त्यानुसार सगळ्या रेकॉर्ड झालेल्या टेप्स पुन्हा एकदा बघून घेतल्या. आणि लौकर जेवून एक वाजता माडखोल गाठले. अंधारून आले होते, पण बरा उजेड होता. दोनेक तास बाहेरचे कॅंडिड शॉट्स घेतले नि मग शेतकऱ्यांच्या मुलाखती घेण्याची तयारी सुरू केली.

आणि अडचण लक्षात आली. इनडोअरसाठी लाईट्स हवेत. आणि कुठल्याच घरात मोठे (१५ ऍंपिअरचे) पॉवर पॉईंट नव्हते. छोट्या (५ ऍंपिअरच्या) प्लगमध्ये आमचे लाईट्स घातले तर फ्यूज नक्की उडणार अशी संताजीने खात्री दिली (तो फावल्या वेळेत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत असे).

उत्तरही संताजीनेच शोधले. संपूर्ण बेकायदेशीर. त्याने चक्क विजेच्या खांबांवर आकडे टाकून वीज घेतली. आमचे काम एका अर्थाने सरकारी असल्याने एवढा नियमभंग चालतो असे आम्हीच ठरवून टाकले.

मुलाखती सुरळीत पार पडल्या. आता भरून आले होते. पाच वाजताच मिट्ट अंधार झाला होता. आम्ही आवरून निघालो. फोंडाघाटातून जायचे कारण आंबोली घाटात आणि पुढे पहिल्या पावसाने रस्ता खराब झाला होता असे कळाले होते. सुधन्वा नि त्याच्या मैत्रिणींना ऍंबॅसिडर दिली आणि आम्ही चौघे मेटॅडोरमध्ये बसलो. संताजीला सांगून मी सकाळीच सावंतवाडीतून रॉयल चॅलेंज व्हिस्कीची अख्खी बाटली मिळवून ठेवली होती. पाण्याचा एक पंधरा लिटरचा कॅन. आणि प्लास्टिकचे ग्लास.

माडखोल सोडले मात्र, धूमधडाक्याने पाऊस सुरू झाला. आम्ही चौघांनी मागे कार्यक्रम सुरू केला. पहिला पेग हरीने वाया घालवला. प्लास्टिकच्या ग्लासात ओतलेल्या दारूत पाणी घालण्यासाठी हरीने प्लास्टिकच्या पंधरा लिटरच्या कॅनचे झाकण उघडले. आणि एका हातात ग्लास धरून दुसऱ्या हाताने त्याने कॅन कलता केला. कॅन कलता नव्हे, आडवा झाला नि ग्लासमधली दारू वाहत्या पाण्यात मिसळून गेली. मेटॅडोरच्या फ्लोअरला पहिला पेग मिळाला.

संताजीने एकंदर परिस्थिती बघून त्याचा पहिला पेग पाणी न घालताच रेटला. दोन मिनिटांतच त्याला वाचा फुटली. "हरकत नाय, पहिला पेग द्येवाला".

दीपकला हे मान्य नव्हते. दारू वाया घालवायची म्हणजे काय? त्याने साऊंड रेकॉर्डिस्ट नि एडिटर यांच्याबद्दल काही अनुदार उद्गार काढले. हरीने कधी नव्हे ते आवाज चढवून कॅमेरा अटेंडंट म्हणजे बैलगाडीखालून चालणारे कुत्रे असे जाहीर केले. दोघांची झकाझकी सुरू झाली. थोडक्यात, पार्टीला सुरुवात झाली.

आम्ही सावंतवाडी बायपास करून थेट झाराप गाठले. अचानक संजयने गाडी रस्त्याकडेला उभी केली. काय झाले होते, तर वायपर बंद पडले होते. आता?

थांबलोच होतो तर मी झारापमधून जे काही खाद्यपदार्थ नावाखाली मिळाले ते सगळे भरपूर घेतले. बिस्कीटे, पाव, फरसाण, शेंगदाणे आणि चॉकलेट्स. पावसाने आमचा वेग झाला होता ताशी तीसपस्तीस. या वेगाने फोंडाघाट चढायला मध्यरात्र होणार होती. त्यात कुठे जेवायला थांबलो तर संपलेच. आणि त्याकाळी गोवा महामार्ग इतका गजबजलेला नव्हता. मी जिथून खाद्यपदार्थ घेतले त्या दुकानदाराने माझी खरेदी संपल्यावर दुकानाच्या फळ्या ओढल्या नि तो 'रिटायर्ड फॉर द डे' झाला.

गाडी आरशात दिसेना म्हणताना विवेक गाडी वळवून परतला. त्याने खास ड्रायवर लोकांच्या विकीपीडीयामधून एक जुगाड काढला. जवळची एक पानटपरी गाठून एक पिवळा हत्तीचे पाकीट घेतले. त्यातल्या दोन सिगरेटी काढून त्यातली तंबाकू सुटी केली आणि समोरच्या काचेला बाहेरून चोळली. "चल आता. अर्धा तास तरी काय होत नाय. आणि मेटॅडोरची काच जवळजवळ उभीच असती, तुला लेका वायपर हवाच कशाला?" त्याने संजयला एक टपली लगावली. खरेच, बराच काळ पाणी काचेवर ठरले नाही. परत पाणी साचायला लागल्यावर अजून पिवळा हत्ती.आता पावसाचा जोरही अजून वाढला. त्याने एक बरे झाले, धो धो ओतल्यासारखे पडणारे पाणी तसेही काचेवर ठरेना.

विवेकबरोबर मी काही खाद्यपदार्थ ऍंबॅसिडरमध्ये पाठवले होते. करुळ ओलांडून गाडी घाटाला लागली. ऍंबॅसिडर आमच्या थोडीच पुढे होती. एव्हाना आमची विमाने उडायच्या तयारीत होती, नव्हे, उडायला लागली होती. खाद्यपदार्थांचा फन्ना उडत होता. आवाज चढले होते. मला अंधुक आठवते त्याप्रमाणे संताजी पोवाडा म्हणायला लागला होता आणि त्याला उत्तर म्हणून हरीने लावणी म्हणायला घेतली होती. काम झाल्यावर सगळा ताण हळूहळू निचरून जात होता.

गाडीचा आवाज हळूहळू बदलू लागला. ते आम्हांला जरा वेळाने समजले. अजून जरा वेळाने आवाज फारच बदलला. ते आम्हांला समजेपर्यंत गाडी अचानक बंद पडली. गाडी तापून बंद पडली असेल असे मत संजयने व्यक्त केले. ते ऐकल्यावर अजून जरा वेळाने हेही उमजले की हा गाडी तापण्याचा प्रश्न नाही. उडत्या पाखराच्या पंखांवर शेवाळ माजेल अश्या या पावसात तापण्याइतकी गाडी चालली होती किती हजार किलोमीटर? हे काहीतरी गंभीर होते. विमाने खाली यायला लागली.

तेवढ्यात आम्ही कुठे मागे पडलो ते बघायला ऍंबॅसिडर वळवून विवेक परतला. त्याला मेटॅडोरच्या इंजिनाचे फारसे काही माहीत नव्हते. जे माहीत होते त्याचा उपयोग झाला नाही.

तोवर मी नीट जमिनीवर आलो.

साडेअकरा वाजले होते. आम्ही दाजीपूरपासून सुमारे साताठ किमी लांब होतो. पण या पावसात ते अंतर कापायला कमीतकमी पंचवीस तीस मिनिटे लागणार होती. मी मेटॅडोरमधले जमेल तेवढे सामान ऍंबॅसिडरमध्ये कोंबले. विवेकला गाडी शक्य तितक्या वेगात हाणून सुधन्वा, दोन देवियां आणि सामान यांना दाजीपूरला सोडून परत यायला सांगितले. सुधन्वाला दाजीपूरच्या एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये सगळ्यांसाठी जागा बुक करायला सांगितली.

विवेक चाळीस मिनिटांतच पोहोचला. तोवर संजयला दोन ऑप्शन दिले. रात्रभर एकटा मेटॅडोरमध्ये थांबणे वा आमच्याबरोबर येऊन सकाळी गॅरेजमधून मेकॅनिकला घेऊन परतणे. तशीही ती मेटॅडोर होती, रोल्स रॉईस नव्हती. कोण कशाला चोरील? आणि मुख्य म्हणजे चोरून न्यायला ती चालू तर व्हायला हवी?

आता उरलेले सामान ऍंबॅसिडरमध्ये जमेल तसे कोंबले नि मेटॅडोर रिकामी केली. मग दाजीपूरच्या दिशेने निघालो. तोवर सगळी विमाने नीट जमिनीवर उतरून हॅंगरमध्ये जायच्या तयारीत होती. अजून थो...डी असती तर मजा आली असती असे मी पुटपुटलो आणि संताजी खिंकाळला. हरीच्या शबनममध्ये हात घालून त्याने अजून एक क्वार्टर काढली. "दादांच्या (माझ्या गुरुजींचे टोपणनाव) तालमीला तयार झालेला हे मी. दादा न्हेमी म्हंत्यात, नेमकी एक क्वार्टर कमी पडती. म्हनून जेवडी विकत घ्याल त्यावर एक क्वार्टर घीऊन ठिवायची". दाजीपूरला पोहोचेपर्यंत आम्ही ती क्वार्टर तशीच संपवली. पण आता या बूस्टर डोसने भूक चाळवली. शेंगदाणे खात दाजीपूर गाठले.

रिसॉर्टमध्ये रूम्स नव्हत्या. फक्त डॉर्मिटरी होती. आमची हरकत नव्हती. कोरडी नि ऊबदार जागा असल्याशी कारण. आणि आम्ही सोडून त्या वीस लोकांच्या डॉर्मिटरीत फक्त दोनजण अजून होते. दोघेही ढाराढूर पंढरपूर झालेले होते. आम्ही दुसऱ्या टोकाच्या कॉट्सवर बैठक मांडली. भूक लागल्याचे सत्य मी बोलून दाखवले. संताजी विचारमग्न चेहरा करून बाहेर गेला. त्याने काय खाण्याचेही सामान लपवून ठेवले होते की काय कुठे? पण माझे गुरुजी खाण्याच्या बाबतीत पूर्ण निरुत्साही होते. त्यापेक्षा अजून एक क्वार्टरच घ्यावी असे त्यांची मनोदेवता कायम सांगे.

दहा मिनिटांनी संताजी परत आला. "भुर्जीपाव चालंल का?" आम्हांला कानांवर विश्वास बसला नाही. बहुधा याला शेवटची क्वार्टर फारच चढली असेल म्हणून आम्ही गप्प बसलो. "आरं लौकर बोला" असे तो ओरडल्यावर तो कदाचित शुद्धीत बोलत असेल अशी आम्हांला शंका आली. आम्ही 'हो' म्हटल्यावर तो हुशारून एका कॉटवर बसला नि म्हणाला "म्हायतीच होतं मला. समद्यांसाटी सांगून आलोय. व्हतीय वीस पचवीस मिनिटांत. तोवर...." त्याने खिशातून अजून एक क्वार्टर काढली. गुरुजींच्या तालमीत तयार झालेला होता खरा!

मग त्याने बाहेर जाऊन काय केले ते सांगितले. वॉचमनकडून खानसाम्याचे नाव नि खोली विचारून घेतली. खानसाम्याला उठवले. सहा लोकांच्या बुर्जीपावासाठी दुप्पट पैसे देऊ केले नि त्याचा होकार मिळवून तो शेवटच्या (खरोखरच्या शेवटच्या) क्वार्टरला सद्गती द्यायला मोकळा झाला.

विमाने परत उडाली. बुर्जीपाव खाल्ल्याचे अंधुक आठवते. झोपल्याचे त्याहून अंधुक आठवते. जाग आल्याचे नीट आठवते कारण डोके कुणीतरी हातोड्याने फोडायला सुरुवात केली होती.

आठ वाजून गेले होते.

"आज संध्याकाळपर्यंत काही झाले तरी पुण्याला पोचायला हवे", दीपकने आठवण करून दिली. कारण? आज शूटिंग न करताही सामग्रीचे भाडे भरावे लागणार होते, तेही दीडपट. तेही संध्याकाळपर्यंत पोहोचलो तर.

दाजीपूरमध्ये एक गॅरेजवाला शोधून विवेक नि संजय परत मेटॅडोरपाशी गेले होते. पाऊस आता तुफान कोसळत होता. असल्या पावसात कोल्हापूर गाठायलाच अडीचतीन तास लागले असते. तिथून पुढे सहा तास. म्हणजे नऊ वाजेपर्यंत निघालो तर वाटेतले माफक थांबे धरूनही संध्याकाळी सातला पोहोचलो असतो.

पावणेनऊ-नऊला संजय, विवेक नि तो गॅरेजवाला आला. गाडीला 'मेजर फॉल्ट' होता. कोल्हापुरातून पार्ट आणून सगळी रिपेरी संपवायला कमीतकमी संध्याकाळ होईल, तेही कोल्हापुरात पार्ट मिळाला तर. नाहीतर पार्ट आणायला सांगलीला जावे लागेल असे त्या गॅरेजवाल्याचे म्हणणे पडले.

मी हबकलो. एक दिवसाचे (दीड दिवसाचे) जास्तीचे भाडे जेमतेम झेपले असते. तीन दिवसांचे म्हणजे एडिटिंगला सुरुवात करण्याआधीच फिल्म तोट्यात गेली असती.

मी हताशपणे दीपककडे पाहिले. तोवर दीपकचा पहिला चहा झाला होता. पहिला चहा होईपर्यंत तो अत्यंत चिडचिडा आणि खडूस माणूस असे. एकदा चहा पोटात गेल्यावर मग डोक्यावर बर्फ नि तोंडात साखर वगैरे.

दीपकने डोळे मिटून थोडा विचार केला आणि मला बाजूला बोलावले. "मेटॅडोरवाल्याला इथेच सोडायला लागेल. मी सगळे सामान ऍंबॅसिडरमध्ये बसवतो. आपण लगेच निघू."

मेटॅडोरमधले सामान ऍंबॅसिडर मध्ये बसवले तर किती माणसे जातील? विवेक नि मी तरी जाऊ शकू का?

"ती काळजी सोड तू. तुम्ही दोघेच काय, मीसुद्धा येईन आरामात. सामान कसे बसते बघू. जमल्यास त्या दोघा ढोल्यांनाही (विवेक, दीपक नि मी तेव्हा चांगलेच सडसडीत होतो; त्या तुलनेत हरी थोडा ऐसपैस होता नि संताजी चांगलाच गरगरीत पोटाचा होता) चेपून बसवू."

मला हा 'हाईट ऑफ ऑप्टिमिझम' प्रकारातला विनोद वाटला. चार दिव्यांच्या बॉक्सनीच मागली सीट अख्खी भरली असती. त्याशिवाय कॅमेरा, स्टॅंड, रेकॉर्डर, साऊंड रेकॉर्डर...

"तू पंधरा मिनिटे दे फक्त मला. आणि नंतर मी सांगेल तसे गाडीत बसायचे कबूल कर. मी करतो काय ते."

मी सुधन्वाला बाजूला घेऊन काय करावे लागेल याची कल्पना दिली. तो फारच बावचळला. त्याला त्या दोघींना घेऊन दाजीपूरहून कोल्हापूर एस्टीने जावे लागेल आणि कोल्हापुरातून एशियाड वा इतर काही बघावे लागेल हे फार अवघड वाटले. पण मी कॅमेरा नि सामग्रीचा दीड दिवसाचा रेट सांगितल्यावर ते एकदम सोपे झाले.

संजयचे त्याच्या मालकाशी एका एस्टीडी बूथवरून बोलणे करवून दिले. मालकाची अजून एक मेटॅडोर बेळगांवला एका लग्नासाठी गेली होती. ते लग्न उरकून ती दुसऱ्या दिवशी परतणार होती. आज त्या मेटॅडोरचा ड्रायव्हर पैसे घेऊन दाजीपूरला पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आली.

तोवर दीपकने दावा केल्याप्रमाणे अख्खी ऍंबेसिडर वापरून शूटिंगचे सगळे सामान नीट बसवले होते. डिकी तीन इंच उघडी रहात होती त्याच्या हॅंडलला सुतळीही बांधली होती. मागल्या सीटवर हरी नि संताजी सयामी जुळे असल्याच्या पोजमध्ये बसू शकत होते. पुढल्या सीटवर आम्ही तिघे. ऍंबॅसिडरचे गिअर फ्लोअर गिअर नसून व्हील गिअर होते त्यामुळे पुढले अख्खे बाक आम्हांला बसायला होते. क्लीनर साईडला पायाशी आमच्या खाजगी सामानाच्या बॅगा. त्यामुळे विवेकखेरीज आम्ही दोघे घट्ट मांडी घालून बसलो होतो.

निघालो.

सुमारे दर तासाला दोनतीन मिनिटे एव्हढेच थांबत आम्ही मार्गक्रमण चालू ठेवले. दाजीपूरमधूनच जे मिळेल ते खाण्याचे घेऊन ठेवले होते. अंग चोरून त्यातले थोडे मधून अधून खात होतो. बाटलीतले पाणी पीत होतो. पाण्याने बाहेर जाण्याची निकड दर्शवली की थांबत होतो. काल रात्रीची मैफल काही हजार प्रकाशवर्षे दूर भासत होती.

रस्त्यावर वाहनांची गर्दी आणि खड्डे दोन्ही भरपूर होते.

त्यातल्यात्यात मी नि विवेक थोडे सुस्थितीत होतो कारण आम्ही आलटून पालटून गाडी चालवीत होतो. बाकीचे तिघे बिचारे सोशिकपणे बसून होते.

अखेर संध्याकाळी सातला कॅमेरा नि सगळे इक्विपमेंट परत केले, सह्या केल्या नि हुश्श केले. गुरुजी भेटायला आले होते. मग 'दीवार' (फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेट समोर तेव्हा 'दीवार' होते) च्या मागल्या बाजूला खालती एक बार होता. त्यात बसून माफक श्रमपरिहार केला. खरेतर चारचौघात अजून बसण्याची माझी इच्छा नव्हती इतके अंग आखडले होते नि डोके ठणकत होते. पण गुरुजींनी हट्टाने सर्वांना कार्यक्रम करायलाच लावला. जेमतेम दीड-दोन पेग पिऊन मी नि दीपक थांबलो. हरी नि संताजी तर एकेक पेगमध्येच खपले.

बाहेर पडल्यावर मी नि गुरुजी निघालो आणि गुरुजींनी माझे बौद्धिक घेतले.

"हे बघ, ही सगळी मंडळी एफटीआयआय मध्ये क्लास थ्री वा क्लास फोर मधली नोकरी करणारी. पगाराखेरीज चार पैसे मिळवण्यासाठी कष्ट करणारी. आणि त्यासाठी आपल्या पगारी रजा खर्च करणारी. त्याबदल्यात त्यांचे नावही कुणाला ठाऊक होणार नाही."

"तू घरी गेल्यावर तुझा तुझा, दोन पेग का होईना, कार्यक्रम करणार हे त्यांना नीट ठाऊक होते. पण तुझ्याएव्हढेच कष्ट त्यांनाही झालेत. आणि घरी गेल्यावर दोन काय, एकही पेग घेण्यासारखी त्यांची सामाजिक परिस्थिती नाही. आजचा कार्यक्रम त्यांना 'आपण सगळे एकमेकांबरोबर आहोत' हे सांगण्यासाठी होता."

रात्री गडद झोप लागली.

दुसऱ्या दिवशी दिवसभर बसून सगळे क्यू शीट्स तपासून एडिटिंगसाठी जुळणी करून ठेवली.

आणि संध्याकाळी सल्लागार आस्थापनेतून आदेश आला की इरिगेशन डिपार्टमेंटच्या चीफ इंजिनिअरची आणि ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटच्या डायरेक्टरची अशा दोन मुलाखती शूट करून त्या फिल्ममध्ये ठळकपणे दाखवाव्यात. त्यासाठीचे वाढीव बजेट तत्परतेने मान्य करण्यात आले.

पुण्यात पाऊस फारसा नव्हता. आणि तशाही दोन्ही मुलाखती सेंट्रल बिल्डिंगमध्येच घ्यायच्या होत्या. डेक्कनहून सेंट्रल बिल्डिंगला जायला परत विवेक नि एमडब्ल्यूआर २०२०. एव्हढ्या भल्याथोरल्या प्रवासाला पावसापाण्यात वापरलेली गाडी पाच किलोमीटरसाठी वापरताना फारच विचित्र वाटत होते. धारदार खंडा तलवार लिंबू कापायला वापरावे तसे.

दोन्ही साहेबांनी मुलाखतींना मिळून एक दिवस घेतला. म्हणजे इतके रीटेक्स केले.

अखेर फायनल एडिटिंगला बसलो. दोन संपूर्ण रात्री बसून एडिटिंग नि साऊंड फायनल केला. आता शेवटले कॉपीईंग केले की काम झाले म्हणायला मोकळे.

म्हणजे असे की हायबॅंड झाली तरी ती शेवटी मॅग्नेटिक टेप. एका टेपवरून दुसऱ्या टेपवर कॉपी करताना काही प्रमाणात दर्जात घसरण होत असे. त्याला जनरेशन लॉस म्हणत. शूटिंग केलेल्या टेप्सवरून फायनल पिक्चर एडिट करताना एक जनरेशन लॉस होईच, पण ते अपरिहार्य असे.

तर पिक्चर एडिट करून फायनल करायचे. मग साऊंड मिक्सिंग करून साऊंडचा एक वेगळा फायनल कट तयार करायचा.

टेपवरती व्हिडिओ नि ऑडिओ ट्रॅक्स वेगळे असत. म्हणजे व्हिडिओ तसाच ठेऊन ऑडिओ बदलता येई (वा उलट करता येई). जनरेशन लॉस व्हिडिओला जास्ती जाणवे. त्यामुळे फायनल एडिट केलेल्या व्हिडिओवरती ऑडिओचा फायनल ट्रॅक कॉपी केला तर दोन्ही (व्हिडिओ नि ऑडिओ) एकेका जनरेशन लॉसमध्ये भागे.

अर्थात हे 'जनरेशन लॉस'चे प्रकरण गुरुजींच्या हेकटपणामुळे संभाळावे लागे. जेव्हा या हायबॅंड टेप्सवरून व्हीएचएस टेपवर (त्याकाळच्या व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डरमध्ये चालणारी टेप) कॉपी केले जाई तेव्हा दोनतीन वेळेस कॉपी केली तर जनरेशन लॉस दिसून येई. तेसुद्धा मूळ मास्टर एडिटवरून कॉपी केले तर नाही, एका कॉपीवरून दुसरी कॉपी केली तर.

इतर लघुपट निर्माते दणकावून काम करीत. जनरेशन लॉस वगैरेकडे दुर्लक्ष करून. आणि त्यांचे क्लायंट्सही एका मर्यादेनंतर व्हीएचएस कॅसेटवरचे चित्र हे सारवल्यासारखे दिसते हे मान्य करीत.

गुरुजींनी टेलिव्हिजनमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा भारतात टीव्ही नुकताच आला होता. गुरुजींचे पहिले काम (जे काही वर्षे चालले) ते होते यूएनडीपी (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रॉजेक्ट) मध्ये. तिथे अमेरिकन नि युरोपियन कॅमेरामन्सकडून गुरुजी हे काटेकोरपणे काम करायला शिकले होते. आणि 'की फर्क पैंदा' ही भावना आमच्या मनात अजिबात रुजू नये म्हणून झटत होते.

तर शेवटले कॉपीइंग निवांत रात्री करू म्हणून आम्ही सगळे सकाळी आठला पांगलो.

सुधन्वा दुसऱ्या रात्री नव्हता. पहिल्या रात्रीही तो मांडवशोभा म्हणूनच होता. कारण फायनल एडिट करताना मार्गदर्शक गुरुजी, चालक हरी नि विद्यार्थी मी. साऊंड फायनल करायला साऊंड इंजिनियर लक्ष्मण राव आले होते. यांचे आडनांवच राव. मूळ तेलुगु पण अस्खलित मराठी बोलत. राव एफटीआयआयमध्ये साऊंड इंजिनिअर होते. गुरुजींच्या प्रत्येक कामाला ते येत, पण सकाळी आठपर्यंत काम संपवण्याच्या अटीवर. मग ते घरी जाऊन नाश्ता करून डबा घेऊन ऑफिसात जात.

संध्याकाळी दुय्यम सल्लागार आस्थापनेमधून फोन. काम पूर्ण केल्याबद्दल 'धन्यवाद' म्हणून. मला हा खवचटपणा वाटला. तरी मी नम्रपणे दुसऱ्या दिवशी फायनल एडिट (विथ साऊंड) द्यायला येतो असे कबूल केले. पलिकडल्या बाजूने ते गोंधळले. "अहो, सुधन्वारावांनी आणून दिली की फायनल एडिट कॉपी". आता मी गोंधळलो. धावत एडिटिंग स्टुडिओत गेलो.

तर सकाळी सुधन्वाने दहा वाजता येऊन सगळे बघितले. फक्त कॉपीईंग राहिले आहे असे स्टुडिओ अटेंडंटने सांगितल्यावर सुधन्वा स्वतःच कॉपीईंगला बसला. नि काय कशावर कॉपी करायचे आहे हे न बघता त्याने ओरिजिनल साऊंडच्या टेपवर फायनल पिक्चर एडिटची टेप कॉपी केली. म्हणजे सेकंड जनरेशन लॉस.

गुरुजी भयानक खवळले. पण तोवर बाण धनुष्यातून निघून गेला होता.

अमेरिकेत कुठेतरी ती सेकंड जनरेशन फिल्म असेल अजून...