ढोबळी मिरची झुणका

  • ढोबळी मिरची अर्था किलो
  • सुके खोबरे बारीक कीस १०० ग्रॅम
  • बेसन २०० ग्रॅम
  • लसूण दोन गड्डी
  • तेल दोन पळ्या
  • मोहरी, हळद, हिंग, मीठ, लाल तिखट
४५ मिनिटे
चार जणांना

लसूण सोलून जाडसर ठेचून घ्यावी.

ढोबळी मिरची मध्यम कापून घ्यावी.

बेसनात तिखट आणी बेसनापुरते मीठ घालावे. अर्था लिटर पाणी घालून गुठळ्या मोडेस्तोवर एकजीव करावे. झुणक्या ऐवजी पिठले हवे असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवावे.

तेल तापवावे. धुरावल्यावर ज्योत बारीक करून मोहरी, ठेचलेली लसूण घालून लसूण तळून घ्यावी. मग हळद नि हिंग घालून हलवावे. त्यावर कापलेली ढोबळी मिरची घालून ज्योत मध्यम करावी. ढोबळी मिरचीपुरते मीठ घालावे नि हलवत रहावे. सुमारे दहा मिनिटांत ढोबळी मिरची अर्धवट शिजेल. त्यावर खोबऱ्याचा कीस घालून एकजीव करावे आणी ज्योत बारीक करावी. दहा मिनिटे मधून मधून हलवत रहावे.

त्यात बेसनाचे मिश्रण घालून ढवळत रहावे. बेसन पूर्ण शिजेस्तोवर (मंद आचेवर किमान वीस मिनिटे) ढवळत रहावे. नॉन स्टिक कढई असेल तर ठीक अन्यथा लोखंडी कढईत बेसन खाली लागते.

पूर्ण शिजल्याचा अंदाज घेऊन ज्योत बंद करावी.