लीव्ह नो ट्रेस - अस्तित्वाचा अर्थ

मानव हा समाजप्रिय प्राणी आहे हे सत्य आहे की गृहितक? विश्वाच्या उत्पत्तीपासून मानवी जीवनात जेवढे बदल होत गेले तेवढे इतर कुठल्याही प्राण्यांमध्ये झालेले नाहीत. या बदलांचा लेखाजोखा कॉनरॅड रिक्टरच्या कादंबरीत्रयीत (जी ए कुलकर्णींनी अनुवाद केलेली रान-शिवार-गांव) अगदी नेमका घेतलेला आहे.

भटका शिकारी ते स्थिरावलेला शेतकरी हे स्थित्यंतर. नंतर औद्योगिक क्रांती आणी त्यामुळे वसवाव्या लागलेल्या मोठ्या वसाहती. त्या वसाहतींच्या समस्या आणी त्यातून निर्माण झालेली वेगळी संस्कृती. पुढे निरंकुश उधळलेले उद्योगीकरण आणि त्यामुळे आकाराला आलेली महानगरे. माहिती तंत्रज्ञानाने तर या सगळ्याला एका वेगळ्याच भ्रमणकक्षेत नेले. वेगळ्या सूर्यमालेच्या वेगळ्या ग्रहाच्या वेगळ्या भ्रमणकक्षेत. माहिती तंत्रज्ञानाने पुरवलेल्या सुविधा आणि उभे केलेले प्रश्न हे पन्नास वर्षांपूर्वी (म्हणजे दोन पिढ्यांपूर्वी) अकल्पित होते.

अगदी 'प्रगत' आणी 'संपन्न' देशांमध्येही चाळणीच्या फटींतून निसटलेली अनेक आयुष्ये असतात. अमेरिकेत अंमली पदार्थांच्या विळख्यात समाज सापडल्यावर 'प्रॉजेक्ट्स'मध्ये राहणारी जनता हे एक उदाहरण.

आपल्याला 'प्रॉजेक्ट' म्हणजे प्रकल्प एवढाच मर्यादित अर्थ माहीत असतो. अमेरिकेत शहराचा असा भाग की जो बांधून झालेला आहे पण त्याची देखभाल होत नाही. मुख्य कारण आर्थिक टंचाई. आर्थिक टंचाईचे मुख्य कारण प्रॉजेक्ट्समध्ये राहणारी जनता संपूर्णतया गौरेतर, मुख्यतः कृष्णवर्णीय. काँक्रीटच्या टोलेजंग झोपडपट्ट्या.

या सगळ्या प्रस्तावनेचे कारण 'लीव्ह नो ट्रेस' हा चित्रपट.

'पीटीएसडी' (पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर) या विकारामुळे सैन्यातून निवृत्त झालेला एक चाळिशी-पंचेचाळीशीचा सैनिक. तो आपल्या विशी गाठू पाहणाऱ्या मुलीसोबत राहतो आहे. जंगलात. म्हणजे, शहराशेजारच्या 'पार्क' मध्ये. गरज पडेल तेव्हा आणी तितकी शहरी साधने - अन्न शिजवायला प्रोपेन सिलिंडर, सुपरमार्केटमधले शिजवायला तयार अन्नपदार्थ, कपडे आदि - वापरत या बापलेकींचे आयुष्य चालले आहे. म्हणजे 'शय्या भूमितलम्' एवढेच. 'दिशोःपि वसनम्' नव्हे. सैन्यात असताना आत्मसात केलेल्या 'फॉरेस्ट सर्व्हायव्हल स्किल्स'वर अवलंबून दोघे जगताहेत.

त्याची बायको (मुलीची आई) निवर्तलेली.

शहरातून वस्तू खरेदी करायला पैसे कुठून येतात? तर त्याला सैन्याच्या दवाखान्यातून जी 'बेंझोडायझिपाईन' प्रकारची औषधे (निद्रानाश, अपस्माराचे झटके, चिंताविकार यावर दिली जाणारी) मिळतात ती तो दुसऱ्या एका निवृत्त सैनिकाला विकतो. दुसरा निवृत्त सैनिकही असाच 'जंगलात' राहतो आहे.

इथवर कथानक कल्पित-अकल्पित या सीमारेषेवर खेळते. 'असे कुठे असते का?' वा 'असे कधी घडू शकते का?' या प्रश्नांना समर्पक उत्तरे नसलेले.

पण एकदा मुलगी पार्कमध्ये फिरायला/पळायला आलेल्या कुणा शहरी माणसाच्या नजरेस पडते, तो पार्क रेंजर्सना कळवतो आणी या दोघांना 'अटक' करून समाजकल्याण विभागात नेले जाते. तिथे वेगवेगळ्या तपासण्या होतात. मुलीला बापाने जंगलात जगण्याच्या कौशल्यांशिवाय लिहा-वाचायला (आणी बुद्धिबळ खेळायला) शिकवले आहे. तपासण्यांमध्ये मुलगी तिच्या वयाच्या मानाने जास्ती शिकलेली/प्रगत आहे असा निष्कर्ष निघतो.

त्या दोघांना एका 'ख्रिसमस ट्री'च्या बागेत एका घरात रहायला जागा दिली जाते. बाप तिथे काम करील या बोलीवर. पण बापाला तेवढे शहरीकरणही नको वाटते. मुलीला एक समवयस्क मुलगा भेटतो. तो स्वतःचे (लाकडी) घर स्वतः बांधतो आहे, ससे पाळतो आहे. त्याच्याबरोबर ती एका युवक संघटनेतही डोकावून येते.

एक दिवस बाप अचानक हे सगळे सोडून निघायचे ठरवतो. त्याप्रमाणे ते निघतात.

त्यांचा पुढला प्रवास कसा होतो? ते परत 'पकडले' जातात का? की 'शहरी' आयुष्य सोडून आभाळाखाली झोपणे, गवतावर पहाटे पडलेले दव पिऊन दिवसाची पहिली तहान भागवणे या गोष्टी करू शकतात का? की शहरी आणी अ-शहरी ('वन्य' या शब्दाला एक भलताच वास येतो) जीवनाचा समतोल साधतात? हे सगळे लिहिले तर कथानक सांगून टाकावे लागेल. त्यापेक्षा प्रत्यक्ष बघणे इष्ट.

या चित्रपटातून जे प्रश्न मांडले जातात ते भिडणारे आहेत.

आपण ज्या अनेकानेक 'सुविधा' वापरतो त्या सुविधा आहेत की बेड्या? संवाद ही मानवाची मूलभूत गरज आहे का? आणी असल्यास तो संवाद कृत्रिम साधनांनीच (फोन, सेलफोन, इंटरनेट) साधावा हीदेखील मूलभूत गरज आहे का? बाप आणी मुलगी दोघांची विचारपद्धती तंतोतंत सारखी असते का, असायलाच हवी का? एकमेकांची साथ आयुष्यभर मिळावी ही इच्छा प्रत्येक नातेसंबंधांत निर्माण होते. पण आयुष्यभर म्हणजे त्यातील अल्पायुषी व्यक्तीच्या आयुष्यभर हे आपण लक्षात घेतो का? आणी आपली आयुष्ये आता वेगवेगळ्या दिशांना निघाली आहेत हे समजून घेऊन मान्य करण्याचा प्रगल्भपणा किती जणांकडे असतो?

चित्रपट (बहुतांश जनतेच्या संतापजनक भाषेत) 'संथ' आहे. घडणाऱ्या घडामोडी दृष्यांतून मांडल्या जातात पण मनात त्याहून जास्ती खळबळ माजवून जातात. छोटछोट्या संवादांनाही अर्थ आहे. एखादा कटाक्ष, एखादी फ्रेम यांतूनही विशिष्ट विचार मांडला गेला आहे. पात्रे फार नाहीत. संवादांवर भर आहे.

पण ज्यांना चित्रपटांतून काही विचार मांडला जातो तो बघण्यात रस असेल त्यांनी आवर्जून हा बघावा. कुठल्याही उत्कृष्ट कलाकृतीत होते तसे या कलाकृतीचा आस्वाद घेताना आपण संपूर्ण गुंतून जातो. सुमारे पावणेदोन तासांचा चित्रपट. पण एक तास झाला, आता काहीतरी कथानकात वळण येईल, दीड तास झाला, आता काहीतरी ठाम शेवट येईल असे नेहमीचे 'हिशेबी' विचार मनात न येता आपण समोर जे उलगडले जाते आहे त्यात पूर्ण विरघळून जातो. शेवटी त्या दोघांनी एकत्रच रहावे असा 'सुखांत' शेवटाचा विचार करण्याइतकेही मन मोकळे राहत नाही. आणी जो शेवट होतो तो आपणही भारावलेल्या अवस्थेत मान्य करतो.

बापाचे काम करणारा बेन फॉस्टर आणि मुलीचे काम करणारी थॉमसिन मॅकेंझी या दोघांची ही संयुक्त मांडणी आहे. कुणीही कुणावरही वरचढ नाही. अगदी सुरुवातीच्या काळातली रवीशंकर - अलि अकबर खां यांची जुगलबंदी ज्यांनी ऐकली आहे त्यांना काय ते कळेल.

लीव्ह नो ट्रेस (२०१८)

दिग्दर्शिका - डेब्रा ग्रॅनिक