माझ्या जीवनाची सरगम - अर्धामुर्धा कणसूर

राम चितळकर ऊर्फ अण्णा चितळकर ऊर्फ सी रामचंद्र यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपला झेंडा रोवला. 'ऐ मेरे वतन के लोगों' आणि 'सारे जहांसे अच्छा' ही गाणी तर 'लीजंड' झाली आहेत. बाकी गाणी आठवत बसलो तर भलीमोठी जंत्री होईल.

त्यांनी मराठीतही अनेक ओळखीच्या खुणा ठेवल्या. "आई गं बघ ना कसा हा दादा", "आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे", "पप्पा सांगा कुणाचे", "मलमली तारुण्य माझे" ही पट्कन आठवणारी गीते. याखेरीज त्यांच्या स्वतःच्या पठडीबाहेरच्या आवाजातली "दोन बोक्यांनी आणला हो आणला", "नवलाख तळपती दीप विजेचे येथ", "पळभर थांब जरा रे विठू", "पाचोळे आम्ही हो पाचोळे", "बघा तरी हो कशी बांधिली मी जमवुनि काडी काडी", "हवे तुझे दर्शन मजला", "दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे" अशी अनेकानेक गाणी.

अण्णा आणि लता मंगेशकर हे एक धडाडते प्रकरण. एकमेकांच्या साथीने त्यांनी अनेक अविस्मरणीय गीते निर्मिली. आणि जवळपास तेवढ्याच उत्साहाने कटुतेचा वर्षाव केला.

वयाच्या साठीत प्रवेश करताना त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. आणि त्यानंतर चार वर्षांनी ते निधन पावले.

पुस्तक लिहिण्याच्या दशकभर आधीच त्यांची कारकीर्द जवळपास संपली होती. 

अण्णांचे आत्मचरित्र म्हणजे अनेक गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल - त्यांच्यातला संगीतकार कसा घडला, काही गाणी त्यांनी स्वतःच्या आवाजात का घेतली, त्यांचे वैयक्तिक आयुष्य कसे होते, त्यांचे लता प्रकरण आणी मा. भगवानबरोबरची घट्ट मैत्री - या विचाराने वाचायला सुरुवात केली.

आणि निर्भेळ निराशा पदरी पडली.

घटनांची सुमारे कालक्रमानुसार जंत्री. आणि त्यात कुठेच सी. रामचंद्र या व्यक्तिमत्वाच्या अंतरंगात डोकावणे नाही. लिखाणाचा सूर म्हणजे निर्मळ, निवडक आणि निरिच्छ यांचे मिश्रण. त्यात मध्येच मतलबीपणाही डोकावतो.

अंतरंगात डोकावणे वा चविष्ट गॉसिप यापैकी कुठलाच हेतू साध्य होत नाही अशी ही १८७ पाने. नाही म्हणायला नऊ पानांचे एक प्रकरण शेवटाजवळ 'हे प्रकरण वाचलं नाही तरी लिंक लागेल' हा मथळा देऊन त्यात लता मंगेशकरांबद्दलची कटुता शब्दबद्ध केली आहे. पण भगवानबरोबरची मैत्री का नि कशी तुटली? माहीत नाही.

अण्णांच्या पहिल्या बायकोला गर्भधारणा होऊ शकणार नाही हे कळाल्यावर झालेली विमनस्क अवस्था नोंदली आहे. दुसरे लग्न होण्याचे भविष्य वर्तवण्यात आले हेही नोंदले आहे. आणि एवढेच. हे पुस्तक 'यशवंत आणि रेशमा माझ्या या दोन बाळांना तसेच माझ्या असंख्य चाहत्यांना आणि थोड्याशा निंदकांनाही' अर्पण केले आहे. पुढल्याच पानावर 'माझे हे दोन मित्र कविवर्य ग. दि. माडगूळकर व जयंत साळगावकर यांचे मनःपूर्वक आभार' मानून टाकले आहेत.

प्रकाशक इनामदार बंधू प्रकाशन. हे पुस्तक काढण्यापुरते जुळवलेले असावे असे वाटले. पण या प्रकाशनाने रा भि जोशी, वि स वाळिंबे, ज द जोगळेकर आदि लेखकांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. मग याच पुस्तकाच्या बाबतीत संपादकीय संस्कारांचा संपूर्ण अभाव का बरे असावा?

घटनांची तारीखवार नोंद असायला आत्मचरित्र म्हणजे 'पोलिस डायरी' नव्हे हे मान्य (पोलिस डायरीतही हल्ली काही गोष्टी गायब करण्याची फॅशन आली आहे) पण अत्यंत विस्कळितपणे गोळा केलेल्या घटना यापलिकडे या पुस्तकाला काहीच स्वरूप नाही.

खमंग गॉसिप थोडेसे आहे.

- फिल्मीस्तानच्या 'अनारकली'ला सी. रामचंद्र संगीत देत होते. त्याच काळात स्वतः 'झांझर' हा चित्रपट निर्माण करीत होते. स्वतःच्या 'झांझर'मुळे त्यांनी 'अनारकली'च्या संगीताकडे दुर्लक्ष केले म्हणून फिल्मिस्तानने अण्णांवर कोर्टात दावा लावला.

'झांझर' पूर्ण आपटला. 'अनारकली'च्या संगीताने (मोहब्बत दिल की धडकन है, आ जा अब तो आजा, जाग दर्दे इश्क जाग, ये जिंदगी उसीकी है आदि) इतिहास घडवला.

- जयंत देसाई या निर्मात्यांनी त्यांना 'स्क्रीन नेम' घ्यायला लावले. अण्णांनी 'व्ही शांताराम' या नावाने प्रभावित होऊन 'सी रामचंद्र' निवडले. या जयंत देसाईंनीच अण्णांना सैगलसाठी संगीत दिग्दर्शन करायची संधी दिली. आणि ती अण्णांनी 'ईगो'पायी सोडली. सैगल-सी रामचंद्र हे जोडनांव अस्तित्वात येण्याआधीच पुसले गेले.

- गजानन जागीरदार अण्णांना ओळखत होते चितळकर म्हणून. अण्णांनी सुरुवातीच्या काळात संगीत 'चितळकर' नावानेच दिले होते. 'शहनाई'च्या यशानंतर (जवानी की रेल चली जाये रे आणी आना मेरी जान मेरी जान संडे के संडे) एकदा जागीरदार अण्णांना भेटले आणि सल्ला दिला "काही नवे करा. आपण मराठी माणसं त्याच त्या वर्तुळात फिरत राहतो. तो बघा कुणी मद्रासी संगीत दिग्दर्शक आलाय. सारा व्यवसाय थक्क करून टाकलाय त्यानं." अण्णांनी निरागसपणे विचारले, "कोण हो?". जागीरदार गंभीरपणे म्हणाले, "सी. रामचंद्र".

- सारे जहांसे अच्छा या गाण्याच्या कोरसमध्ये नवल चतर्जी, डी पी कोरगांवकर नि अनिल विश्वास हे संगीतक्षेत्रातले दिग्गज गायले होते. त्यात अनिल विश्वास यांनी थोडा वेगळा सूर (तीव्र निषाद) लावल्यावर अण्णांनी तो खोडला. अनिलदांनी ते खोडणे मान्य केले.

- पुरुषोत्तम रामचंद्र भिडे ऊर्फ पु रा भिडे ऊर्फ स्वामी विज्ञानानंद या वल्लीने अनेक गोष्टी केल्या. 'वंदे मातरम' हा चित्रपट निर्मिला. त्यात ग दि माडगूळकर, पु ल देशपांडे, सुनीता देशपांडे, राम गबाले, सुधीर फडके नि माणिक वर्मा हे सहभागी होते. लोणावळ्याच्या मनःशक्ती विज्ञान केंद्राचे संस्थापक हेच. (त्या संस्थेचे जुन्या मुंबई पुणे हमरस्त्यावरचे कॅंटीन फर्मास आहे. तेवढ्यासाठी वाट वाकडी करून जावे असे. विशेषतः साबुदाणा वडा, कोथिंबीर वडी नि मिसळ). या पु रा भिड्यांनी अनेकानेक चमत्कारिक गोष्टी केल्या. न्यूटन आणि वेद हे एकच गोष्ट सांगतात असे हिरीरीने प्रतिपादून त्यांनी 'न्यू वेद' विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न केला. आपल्या आयुष्याचा अंत त्यांनी मुंबईत मंत्रालयाच्या गच्ची वरून उडी मारून केली. त्यांचे भक्त त्याला 'प्रकाश समाधी' म्हणतात.

या पु रा भिड्यांनी सी. रामचंद्र आणि लता मंगेशकर या दोघांचीही आर्थिक फसवणूक केली नि एका खटल्यात अडकवले. कोर्टाने अण्णा नि लता यांची सुटका केली.

एकूण, असे विस्कळित कण टिपायचे असले तर ठीक आहे. पण मूठभर वाळूत एखादा कण हे प्रमाण लक्षात ठेवावे.

पुस्तक इथे उपलब्ध आहे.

अवांतर - वरील वेबसाईटवर ८५ हजारांहून जास्ती मराठी पुस्तके मुक्तपणे उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत.