प्रथम एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. झाकिर (झ हा झिंगा वा झिम्मा यातला नव्हे, झबल्यातला; त्यातही 'ज'कडे जमेल तितका खेचलेला) हुसैन या व्यक्तीला एकारांती संबोधण्यामागे त्या व्यक्तीचे विशिष्टत्व दडले आहे.
सिनेनट आणि क्रिकेटपटू यांना एकारांती संबोधणे हे पन्नास वर्षांपूर्वीही मान्यताप्राप्त होते. त्यामुळे आजोबांच्या वयाच्या पृथ्वीराज कपूर यांनाही 'पृथ्वीराजचे काम चांगले झाले आहे' हा शेरा 'आवारा' पाहून परतताना ओठांवर मिसरूडही न फुटलेला दहावीतला कुणी सहज मारीत असे. आणि सुनील गावस्करचा 'स्टान्स कसा चुकतो आहे' हे पाचवीतला मुलगाही ठामपणे सांगत असे.
हिंदुस्थानी संगीतात एकेरी संबोधावे असे वाटणारी पहिली व्यक्ती झाकिर हुसैन. नंतर अनेकांना एकेरी संबोधले गेले, पण मुख्यत्वे वयाने ते खरोखर लहान होते म्हणून. झाकिरच्या बाबतीत पंधरावीस वर्षांचा (म्हणजे एका पिढीचा) फरक ओलांडून रसिक त्याला सहजतेने एकेरीत संबोधत.
झाकिर हा एका स्थित्यंतराचा साक्षीदार होता. आणि त्यातील मुख्य खेळाडूही.
झाकिरचे वडील अल्लारखा. मुख्यत्वे रविशंकर आणि अलि अकबर खां यांच्या साथीबद्दल प्रसिद्ध.
पण रविशंकर नि अलि अकबर हे अल्लारखांच्या आयुष्यात यायच्या आधीच चरितार्थासाठी अल्लारखांनी हिंदी सिनेमात हातपाय मारणे सुरू केले होते. वयाची पंचविशी गाठायच्या आतच हिंदी चित्रपटसृष्टीत अल्लारखांनी संगीत दिग्दर्शनाचे काम सुरू केले आणि वीसेक वर्षे ते चालू राहिले. ते संपता संपता रविशंकरांबरोबर जोडी जुळली नि अल्लारखां संगीतविश्वाला माहीत झाले.
हिंदी चित्रपटांना त्यांनी ए आर कुरेशी या नावाने संगीत दिले. तलत मेहमूदचे 'तुमको फुरसत हो मेरी जां इधर देख तो लो' या गाण्याचे संगीत अल्लारखांचे.
झाकिरचा जन्म १९५१चा. भावांत तो थोरला. त्याच्या मागे दहा वर्षांनी फजल आणि मागोमाग तौफिक.
झाकिरचे तबलाप्रेम लहानपणापासूनच दिसू लागले असे नंतर अल्लारखां नि झाकिर यांच्या मुलाखतींमधून कळाले.
झाकिरचा पहिला मोठा कार्यक्रम म्हणजे मुंबईच्या रंगभवनमध्ये शिवकुमार शर्मा यांची केलेली साथ. राग किरवाणी. आपल्याला 'सुरसुखखनी तू विमला' या नाट्यगीतामुळे ओळखीचा असलेला. या कार्यक्रमाची एचएमव्हीने एक एलपी काढली. दोन्ही बाजू मिळून चाळीस-पंचेचाळीस मिनिटे.
हा कार्यक्रम यूट्यूबवरती उपलब्ध आहे. हाँटिंग, मेस्मरायझिंग, कॅप्टिव्हेटिंग आदि इंग्रजी शब्द अनुभवायचे असतील तर ऐकावा.
पण ही रेकॉर्ड कानांवर पडण्याआधीच झाकिरबद्दल कुतूहलमिश्रित कुतूहल निर्माण झाले होते. कारण त्याचे दिसणे. तो अत्यंत देखणा होता. आणि त्याला ते नीट ठाऊक होते. आणि तो हे देखणेपण पराकोटीच्या निगर्वी सहजपणे वागवत असे. त्याचे बॉबकट केस, ते प्रफुल्लपणे उडवीत त्याने केलेली साथ, त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस हसू. सगळे विलोभनीय होते.
पुण्यात तेव्हां हिंदुस्तानी संगीताच्या कार्यक्रमांसाठी नूमवि, रमणबाग, लक्ष्मी क्रीडा मंदिर अशी चारपाच ठिकाणे नेमस्त असत. 'सांस्कृतिक राजधानी' म्हटल्यावर चारपाच ठिकाणे पुरे होत. एरवी लोकसंख्येचा विचार करता पंधरावीस लागली असती.
एकदा रमणबागेत एका कार्यक्रमाला गेलो होतो. शाळेच्या कॉरिडॉरमधून रेटारेटी करीत आत शिरताना पुढली व्यक्ती हातातली थोरली पिशवी वागवत आडवी आली. अर्धअंधारात धक्काबुक्कीत आमच्यात झालेला संवाद - पुढील व्यक्ती "कुणाचा कार्यक्रम आहे?" मी "झाकिर हुसैनची साथ आहे" पुढील व्यक्ती "काय उगाच गर्दी करतात लोक".
आत शिरल्यावर पुरेसा उजेड मिळाला. पुढली व्यक्ती खुद्द झाकीर होती. खट्याळपणे डोळे मिचकावीत तो स्टेजवर गेला नि तबला जुळवू लागला.
कार्यक्रमाचे संयोजक मुख्य पाहुण्यांच्या (तेव्हांच्या महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष) स्वागतासाठी ओळीने उभे होते.
स्थित्यंतर अशासाठी की झाकिरच्या पिढीपर्यंत संगीतक्षेत्रात विभागणी दोन प्रकारे होत असे. एक उघड आणि एक लपूनछपून.
उघड विभागणी 'घराणे' या शिक्क्याखाली होई. आणि एका घराण्याची माणसे दुसऱ्या घराण्याला सदैव पाण्यात बघत असत. काही कट्टर घराणेप्रेमी तर दुसऱ्या घराण्यांचे अस्तित्वही मान्य करीत नसत.
अर्थात हे तबल्यामध्ये स्वरसंगीताच्या मानाने कमी होते.
दुसरी विभागणी धर्माच्या आधारे. ही लपूनछपून होत असली तरी तिची विखारी सावली एखाद्या टोमण्यातून झळकून जाई.
बनारसच्या एका वयोवृद्ध आणि नामवंत कलाकाराशी बोलताना मी झाकीरस्तुतीचे प्रवचन सुरू केल्यावर पंडितजींनी "बेटा ये उनका चलन है, अपना नहीं" असा टोमणा मारला. या टोमण्याचा अर्थ नंतर त्यांच्या एका शागीर्दाने समजावून सांगितला.
मुंबईच्या झाकिरच्या पिढीतल्या एका नामवंत तबलाकाराशी बोलताना मीही थोडाफार तबला वाजवतो असे सांगितल्यावर त्याने मला ऐकू येईल अशा आवाजात आपल्या शागीर्दाला "अब ये घास खाके तबला बजायेंगे" असा टोमणा मारला. मी सर्वभक्षी असल्याचे जाहीर केल्यावर मग उस्तादांची कळी खुलली.
झाकिर या घराण्याच्या नि धर्माच्या भिंती निरागस बालकाच्या चपळतेने वेंघून जात असे. मुखंडांना प्रिय असलेली क्रियाकर्मे करण्यात तो कधी मागे नसे. कुठल्याही बुजुर्गाचे नांव ओठी येताना झाकिरचा हात कानाच्या पाळीकडे जायला चुकला नाही. त्याचा मृदू आवाज कधी तापला वा चिरकला नाही. स्वतःचे हत्यार (तबलाजोडी) त्याने कधीही पित्त्यांकडे सोपवली नाही. किंबहुना झाकिरच्या मागे पित्त्यांची प्रभावळ कधी दिसली नाही. त्यामुळे 'खास उस्तादजींसाठी' असे म्हणून आयोजकांना साध्या पाण्यापासून आगपाण्यापर्यंत आणि बडिशेपेपासून खास पानापर्यंत फर्मायशी करून पिडणारी चमचावर्गीय जनता झाकिरमागे कधी नसे. आणि हमखास 'वाहवा' मिळण्यासाठी प्रेक्षकांत चापलूस पेरण्याची त्याला कधी गरजही भासली नाही.
वादनात खोट नाही, स्वभावात खोट नाही. मग सनातनी मंडळींनी झाकिर लोकप्रिय आहे याबद्दलच आक्षेपायला सुरुवात केली. 'मास'ला आवडत असेल तर त्यात 'क्लास' नसतो हे तसेही एक ऐतिहासिक मान्यता पावून असलेले गृहितक आहे. रविशंकरांपासून ते भीमसेन जोशींपर्यंत सगळ्यांना याचा सामना करावा लागला आहे. रविशंकर खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर रमले. पण भीमसेन जोशींना विशेष करून 'संतवाणी'नंतर 'विद्वान' समीक्षकांचे टोमणे वा दुर्लक्ष पदरात पडले. भीमसेननी या दुर्लक्षाकडेच दुर्लक्ष केले आणि हिमालयासारखे उभे राहिले.
मग झाकिर तबल्यातून घोड्याच्या टापांचे वा आगगाडीचे आवाज काढून दाखवतो म्हणून त्याच्या कार्यक्रमाला गर्दी होते असे कथानक पसरवण्याचा प्रयत्न झाला. हिंदी चित्रपटसंगीतात आपल्या खानदानी तबल्याला सतरा सेकंदांच्या तुकड्यासाठी दावणीला बांधणारे दुड्ढाचार्य मात्र मुकाट मान्य करण्यात आले.
तो देखणा दिसतो म्हणून महिलावर्गाची गर्दी होते असेही एक उपकथानक प्रसवण्यात आले - जे पूर्ण खोटे होते. प्रेक्षकांत महिलावर्ग जेमतेम दहा-बारा टक्के असे. प्रेक्षकांत बहुतांशी चाळिशीपुढल्या प्रौढाच दिसत. त्या काळी विशीत असलेल्या कुणालाही विचारा.
झाकिर तबला वाजवताना खूप हलतो असाही एक आक्षेप सनातनी मंडळींनी घेतला. त्याच्या चेहऱ्यावरचे उत्फुल्ल भाव हेही पोटदुखीचे कारण ठरले. तबला वाजवताना चेहऱ्यावर भाव कसे असावेत? तर बद्धकोष्ठ आणि अर्धशिशी यांच्या संयुक्त रुग्णाचे असावेत तसे हा दंडक होता.
झाकिरने आपली मार्गक्रमणा या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून केली.
या माणसाने किती वेगळाले प्रयोग केले? सर्वात महत्वाचे म्हणजे त्याने तबल्यात डग्ग्याला मानाचे स्थान मिळवून दिले. तबल्याप्रमाणे डग्गाही 'वाजवता' येतो हे त्याने मोहकपणे ऐकवले. अन्यथा काही 'घरंदाज' घराण्यांत तर डग्ग्यामधून "ढाम ढाम" खेरीज इतर आवाज काढणे महापाप होते.
झाकिरने पाश्चिमात्य संगीतातही मनःपूत मुशाफिरी केली. 'शक्ती' या चमूमध्ये त्याने इआक गार्बरेक, जॉन मॅकलघ्लिन, विक्कू विनायकराम, हरिप्रसाद चौरसिया, एल शंकर अशा मांदियाळीमधून आपली कला सादर केली.
आणि याचवेळेस त्याने अभिजात संगीतातही आपल्या स्मृती पक्क्या रोवून ठेवल्या.
वसंतराव देशपांड्यांची शेवटची जाहिर मैफिल झाकिरच्या संगतीत होती. त्यातला 'बसंत बुखारी' म्हणजे वसंतराव आणि झाकिर यांचा संयुक्त प्रयोग होता.
'सवाईगंधर्व'मध्ये एकदा आपला कार्यक्रम संपवून उठताना झाकिरने भीमसेन जोशींना साथ करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या वर्षीच्या श्रोत्यांसाठी तो घबाडयोग होता.
पुढे त्याने काही चित्रपटांसाठी अभिनय आणि संगीत असे दोन्ही पेलून दाखवले.
पण नव्वदच्या दशकानंतर झाकिरला कार्यक्रमांमधून भेटणे दुर्मिळ होत गेले. त्याचे कार्यक्रम झालेच तर अवाढव्य तिकिटे लावून होत, जिथे श्रीमंतीचे प्रदर्शन किती नि कसे ओंगळवाणे करता येईल याची चढाओढ लागलेली असे.
पण स्मृतीत घट्ट रुजलेला झाकिर उन्मळणे शक्य नाही.