हिंदी चित्रपट आणि त्यातील गाणी यांच्याशी आपले एक जिव्हाळ्याचे नाते आहे (मी 1970 पर्यंतच्या चित्रपट आणि गाण्यांविषयी बोलतो आहे ) गाणी हि सुद्धा हिंदी चित्रपटांचा अविभाज्य घटक आहेत आणि गाण्यांशिवाय हिंदी चित्रपटांची कल्पना करणे अशक्य. कानून , इत्तेफाक सारखी अगदी तुरळक उदाहरणे आहेत ज्यात एक पण गाणं नव्हते. पण मुख्यत्वेकरून हिंदी चित्रपटांची त्यातील गाण्यांशिवाय कल्पना करवत नाही. या गाण्यांची आपल्या आयुष्यात पण खूप मोठी मोलाची साथ आहे. खूप गाणी आहेत कि जी मनात घर करून बसली आहेत. त्याची अनेक करणे असू शकतात. अशाच काही गाण्यांविषयी मी लिहायचा प्रयत्न करणार आहे. त्या मालिकेतील पहिले गाणे आज मी लिहिणार आहे.
तेरे घर के सामने हा देव आनंद आणि नूतन यांचा एक सुंदर चित्रपट. विजय आनंद यांचे दिग्दर्शन, सचिनदेव बर्मन यांचे संगीत , शैलेंद्र यांचे काव्य आणि लता मंगेशकर, मोहम्मद रफी यांचे दैवी स्वर यांनी या चित्रपटातील गाणी अमर केली आहेत. विजय आनंद हे माझे अत्यंत आवडते दिग्दर्शक आणि सचिनदेव बर्मन हे आवडते संगीतकार. विजय आनंद यांचे चित्रपट सुंदर असतात पण मला मुख्य करून ते ज्या प्रकारे गाणी चित्रित करायचे ते खूप आवडते. विजय आनंद यांची गाणी पाहणे हा सुद्धा एक अवर्णनीय अनुभव असतो. हिंदी चित्रपटसृष्टीत (माझ्या मते ) विजय आनंद, गुरुदत्त आणि राज कपूर यांचा गाणी चित्रित करण्यात हातखंडा होता. त्यातही विजय आनंद हे मला त्याबाबतीत खूप आवडतात. एक वैशिट्य म्हणजे त्यांची गाणी लगेच कधी सुरु होत नाहीत. तर आधी त्या गाण्याचे शब्द संवादाच्या रूपाने येतात आणि मग गाणे सुरु होते . उदाहरण द्यायचे झालंए तर ओ मेरे सोना रे , पलभर के लिये कोई हमे , आसमान के नीचे , नफरत करनेवालों के अशी देता येतील.
मी ज्या गाण्याबद्दल लिहिणार आहे ते तेरे घर के सामने चित्रपटातील आहे. महान गायक मोहम्मद रफी साहेब यांनी गायलेले हे गीत माझ्या रफी साहेबांच्या आवडीच्या पहिल्या पाच गाण्यांमध्ये येते . हे गाणे मी कधीच फक्त ऐकत नाही तर ते पाहतो पण.
तेरे घर के सामने ची कथा अगदी दोन ओळींची , आजच्या भाषेत सांगायचे तर घिसी पिटी . दोन घरांमध्ये वैर आणि त्यांची मुलं एकमेकांच्या प्रेमात पडतात . बस . इतकीच कथा. पण विजय आनंद ने ती ज्या प्रकारे पडद्यावर साकारली आहे ते शब्दात नाही सांगता येत. एक ओळीच्या कथेवरून इतका सुंदर चित्रपट करणे हे फक्त विजय आनंदलाच जमू शकते. अर्थात त्याच्या बरोबर याचे श्रेय संगीतकार सचिनदेव बर्मन, गीतकार शैलेंद्र, गायक लता मंगेशकर , मोहम्मद रफी, देव आनंद , नूतन हि अत्यंत सुंदर जोडी , हरिन्द्रनाथ चटोपाध्याय आणि ओमप्रकाश हि जोडगोळी यांना पण तितकेच जाते .
नूतनच्या आई वडिलांना तिच्या प्रेमप्रकरणा बद्दल कळल्यावर ते तिला सिमल्याला पाठवतात. देव आनंदला तिला भेटायला दिल्लीहून सिमल्याला त्याच्या स्कुटर वरून जातो. तिथे पोचल्यावर तिला शोधायचे कसे हा त्याच्या पुढे प्रश्न असतो कारण ती कुठे राहत असते हे त्याला माहिती नसते. रात्रीची वेळ, थंड वारा सुटलेला , धुके पसरलेलं, शिमला मधील निर्मनुष्य रस्ता . देव आनंद तिला शोधायला निघतो. तिला कसे आणि कुठे शोधावे हे त्याला कळत नसते , इतक्यात त्याला एक भिकारी दिसतो आणि तो परमेश्वराचा धाव करत असतो " तू कुठे आहेस , कुठे आहेस " म्हणत असतो ....आणि देव आनंदला कल्पना सुचते आणि सुरु होते एक नितांत सुंदर गीत. मोहम्मद रफी आपल्या हळुवार आवाजात सुरु करतात " तू कहाँ " संपूर्ण गाण्यात एकोचा खूप सुंदर वापर केलाय. खेळकर आणि हॅण्डसम देव आनंद आणि मोहम्मद रफी यांचा स्वर्गीय स्वर. पहिल्या सेकंदापासून गाणे पकड घेते . विजय आनंद ने शिमल्याच्या रस्त्याचा सेट उभा करून त्यावर चित्रीकरण केलाय पण कुठे पण संपूर्ण गाणे बघताना तसे जाणवत नाही.
देव आनंद शिमल्याच्या रस्त्यावरून नूतनला शोधात तिला गाण्यातून हाक मारत फिरत असतो.
बड़ा नटखट है समा
हर नज़ारा है जवाँ
छा गया चारों तरफ़, मेरी आहों का धुआँ
दिल मेरा, मेरी जाँ, ना जला
एवढे सुंदर वातावरण आहे , प्रत्येक गोष्ट तारुण्याने नटलेली आहे . तुझ्या आठवणीत मी जे उसासे टाकतोय ते सगळ्या आसमंतात भरून राहिले आहे. अजून माझ्या हृदयाला यातना देऊ नकोस. एका घरात त्याचवेळी दिवा लागतो. देव आनंद आशेने त्या घराच्या खिडकीजवळ जाऊन उभा राहतो. पण ती खिडकी एक खत्रूड चेहऱ्याची म्हातारी उघडते. तिला बघितल्यावर खट्याळपणे हसत तो दुसरीकडे वळतो . पुढच्या खिडकीत एक इसम दिसतो आणि तो इसम याला पुढे जायला सांगतो. त्याला खट्याळपणे चिडवीत , ठेवणीतले हात हलवीत तो पुढे जातो. पुढे त्याला एका प्रेमी प्रेमिकाची जोडी दिसते. त्याला तीव्रतेने नूतनची आठवण येते. ते जोडपे त्याच्याकडे वळून बघते आणि तो हसत पुढे निघून जातो
चांद तारों ने सुना
इन बहारों ने सुना
दर्द का राग मेरा, रहगुज़ारों ने सुना
तू भी सुन, जानेमन, आ भी जा .
चंद्र तारे , हा आसमंत यासगळ्यांनी माझी वेदना ऐकली आहे. तू पण माझी हि वेदना एक आणि भेट मला... पुढे एका घराची खिडकी उघडली जाते आणि एक तरुणी बाहेर डोकावते. मोठ्या आशेने तो तिकडे पाहतो पण ती नूतन नाही म्हटल्यावर तो बिचारा परत नाराज होतो . अजून पुढे गेल्यावर एका घराची पहिल्या मजल्यावरची खिडकी उघडली जाते. पुन्हा तो आशेने त्या इमारतीसमोर वर बघतो. पण एक माणूस दार उघडतो. तो त्याच्याकडे नाणे फेकता. ते देव आनंद त्याच्या टोपीत घेतो आणि परत वर फेकतो
केवळ आणि केवळ देव आनंद हे गाणे पडद्यावर साकार करू शकला असता ज्या प्रकारे ते साकार झाले आहे. आणि केवळ देव आनंद आहे म्हणून हे गाणे एवढे देखणे झाले आहे. इथपर्यंत आपल्याला पण त्याची कीव येते आणि नूतन लवकर त्याला भेटावी असे आपल्याला पण वाटू लागते.
मी ह्या गाण्यात नेहमी चौथ्या कडव्याची आतुरतेने वाट पाहत असतो. त्याचे कारण म्हणजे नूतन. देव आनंद नूतनला शोधात रस्त्यावर गाणे म्हणत असतो आणि शेवटी ते नूतनला ऐकू येते आणि ती घराच्या बाल्कनी मध्ये येते . त्यावेळची तिची expressions म्हणजे बघण्यासारखी आहेत.
ती बालकनीमध्ये येऊन देव आनंदकडे आनंद मिश्रित आश्चर्याने बघते आणि दोन्ही हात वर करते. ती त्याला त्यातून सूचित करत असते कि तू इकडे कसा? कारण तो तिला शोधत ते पण पत्ता नसताना एवढ्या लांब येईल असे तिला वाटले नव्हते.
ओ ओ ... प्यार का देखो असर
आए तुम थामे जिगर
मिल गई आज मुझे, मेरी मनचाही डगर
ती डोक्याला दोन्ही हात लावते आणि त्यातून त्याला प्रेमाने सांगते कि तू अगदी वेडा आहेस. एवढ्या लांब रात्री केवळ माझ्यासाठी आलास . त्यानंतर ती आत जाते. तिला आतील सगळे झोपले आहेत ना हे बघायचे असते. पण ती आत गेलेली बघून देव आनंद म्हणतो
क्यूँ छुपा, एक झलक, फिर दिखा .
ती आत जाऊन सगळे झोपले आहेत याची खात्री करते आणि परत बाहेर येते. आणि हाताची घडी घालून सांगते आता सांग काय सांगायचे आहे ते. एकही शब्द न बोलता नूतन केवळ अभिनय आणि हातांच्या हालचालीवरून हे सर्व सांगते.
गाणं संपता संपता तोच भिकारी जो त्याला आधी भेटलेला असतो , तो तिकडे येतो आणि नूतन कडे बोट दाखवून खुणेने विचारतो हीच का ती.....आणि गाणे संपते.
एक मात्र नक्की हे गाणे पाहून अनुभवण्यासारखे आहे कारण नूतन हिचा अभिनय, देव आनंद याचे प्रसन्न व्यक्तिमत्व , शैलेंद्र यांचे शब्द, सचिनदेव बर्मन यांचे संगीत आणि मोहम्मद रफी यांचा आवाज...आणि या सगळ्याची मोट बांधून ते गाणे पडद्यावर अप्रतिमपणे साकारणारा विजय आनंद, हे शब्दात नाही सांगता येत...शब्द अपुरे पडतात या गाण्याबद्दल लिहायला आणि म्हणून हे गाणे बघून अनुभवायला हवे.
देव आनंद हा माझा आवडता अभिनेता. त्याला नुसते पडद्यावर पहिले तरी प्रसन्न वाटते . त्याच्या अभिनयाबद्दल काही म्हणोत पण तो पडद्यावर आला कि त्याच्याकडे बघत बसावेसे वाटते . तीच गोष्ट नूतनची. एक अत्यंत ताकदीची अभिनेत्री. देव आनंद आणि नूतन हि माझी आवडती जोडी. एकमेकांना अगदी पूरक. नूतनचे अभिनयातले एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा गाण्यातील पण अभिनय. काही गाणी आहेत जे फक्त नायक म्हणतो आणि नूतनची तिथे फक्त उपस्थिती असते अशा गाण्यात नूतन चा मुद्राभिनय बघण्यासारखा असतो. तू कहाँ ये बता या गाण्यात, किंवा याच चित्रपटातील दिल का भंवर करे पुकार या गाण्यात , सुजाता मधील जलते है जिसके लिये हि काही वानगीदाखल गाणी आहेत.
गाईड नंतर तेरे घर के सामने हा माझा सचिन देव बर्मन यांचा अत्यंत आवडता (गाण्यांच्या दृष्टीने ) चित्रपट. तेरे घर के सामने हा चित्रपट मी अनेक वेळा पाहिला आहे आणि अजूनही मी हा चित्रपट अधून मधून पाहत असतो . किमानपक्षी यातील गाणी पाहत असतो. गाण्याच्या चित्रणाच्या दृष्टीने वाजवुन एक अतिशय अप्रतिम चित्रीकरण असलेले गीत याच चित्रपटात आहे. चित्रपटाचे शीर्षक गीत. त्यावर पण लिहीन कधीतरी.
आजच्या साठी एवढेच. (आता हे लिहून झाल्यावर मी हे गाणे दोन ते तीन वेळा तरी नक्की बघणार )
टीप : हे गाणे youtube वर कलर मध्ये पण आहे. पण मी सांगेन हे गाणे ब्लॅक अँड व्हाईट मधेच बघा
विठ्ठल प्रभू
पुणे