चिकन खिमा

  • चिकन खिमा अर्धा किलो
  • लाल कांदे ४०० ग्रॅम
  • हिरव्या मिरच्या गरजेनुसार
  • कोथिंबीर पन्नास काड्या
  • काळा/गरम मसाला चार टीस्पून
  • तेल ४० मिली, अमूल बटर ४० ग्रॅम
  • सैंधव मीठ (रॉक सॉल्ट) गरजेनुसार
  • लिंबाचा रस एक टेबलस्पून
  • हळद एक टेबलस्पून
दीड तास
दोन जणांसाठी

चिकन खिमा

खिमा धुऊन निथळून घ्यावा.

त्यावर खिम्यापुरते सैंधव, दोन चमचे काळा/गरम मसाला, लिंबाचा रस आणि हळद घालून नीट एकत्र करावे नि झाकून ठेवावे.

हिरव्या मिरच्यांना उभे काप द्यावेत.

कांदा डोसाभाजीसाठी चिरतो तसा पातळ कापून घ्यावा.

कोथिंबीर निवडून देठ नि पाने वेगळी करावीत. देठांचा मिक्सरमधून लगदा करून घ्यावा.

नॉन स्टिक पॅनमध्ये मंद आचेवर तेल तापवावे. पाच मिनिटांनी त्यात अमूल बटर घालावे.

ज्योत मध्यम करावी.

तेल-बटर मिश्रण धुरावल्यावर उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परताव्यात. दोन मिनिटांनी ज्योत बारीक करावी.

पाच मिनिटांनी कोथिंबिरीच्या देठांचा लगदा घालून नीट हलवून घ्यावे.

ज्योत मध्यम करून पातळ चिरलेला कांदा घालून परतावे. त्यावर कांद्यापुरते सैंधव घालावे.

कांदा गुलाबी रंगाकडे जाऊ लागला की दोन चमचे काळा/गरम मसाला घालावा.

पाच मिनिटे मध्यम ज्योतीवर परतावे.

मग खिमा घालून नीट हलवून घ्यावे. ज्योत मध्यमच ठेवावी. हलवत रहावे.

खिम्याला पाणी सुटू लागेल. पाच मिनिटे मध्यम ज्योतीवर हलवत रहावे.

मग ज्योत बारीक करून पॅनवर झाकण ठेवावे.

खिम्याला पाणी सुटत राहील. दहा-दहा मिनिटांनी झाकण उघडून हलवावे.

अर्ध्या तासाने खिमा शिजला आहे की नाही हे चाखून पहावे. शिजला नसल्यास गरजेप्रमाणे झाकण ठेवून शिजवावे.

मग झाकण उघडून सगळे पाणी आळू द्यावे. कोथिंबिरीची पाने बारीक चिरून घालावीत.

सर्व नीट सारखे करून ज्योत बंद करावी.

आवडत (आणि डॉक्टरांस मान्य) असल्यास वरून प्रोसेस्ड चीज किसून घालावे.

सोबत भाजलेला होल व्हीट ब्रेड अथवा कणकेचा जाड परोठा उत्तम.