इक्कीस - श्रीराम राघवनचे पुढले पाऊल

श्रीराम राघवनचे पुढले पाऊल

श्रीराम राघवन हे नाव चित्रपट दिग्दर्शक म्हणून स्वतःचा वेगळा ठसा उमटवून आहे.

प्रथमदर्शनी साधी वाटणारी परंतु अनेकानेक थर असलेली पटकथा, संयत आणि थेट दिग्दर्शन, नेमके संपादन, चपखल पात्रनिवड, त्यांना कथानकाच्या गरजेप्रमाणे(च) आखून दिलेला अभिनयपरीघ... 'चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे' हे (आता खोटे ठरत चाललेले) वाक्य स्वतःच्या चित्रपटांबाबतीत खरे ठरवत चाललेला इसम.

त्याचा पदार्पणाचा चित्रपट 'एक हसीना थी'. चित्रपट निर्माता रामगोपाल वर्मा. त्यामुळे नायिका उर्मिला मातोंडकर. आणि नवख्या दिग्दर्शकाला हातभार लावायला नाव हवे म्हणून आरजीव्हीने आणलेला खानावळीतील सैफ अली खान. एवढ्या मर्यादित स्वातंत्र्यातही राघवनबुवांनी आपली नोंद घ्यायला लावली.

त्यानंतर आला जॉनी गद्दार. नील नितीन मुकेशचा पदार्पणाचा चित्रपट. नवखेपणाचा स्पर्शही नसलेले काम त्याच्याकडून करून घेण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलाच. पण धर्मेंद्रला तोवर (आणि नंतरही) कुणी न दिलेल्या लहेजातली भूमिका देऊन ती चित्तवेधक पद्धतीने मांडण्यातही तेवढाच यशस्वी ठरला. किंबहुना त्या चित्रपटातली सगळेच कलाकार - झाकिर हुसैन, रिमी सेन, विनय पाठक, गोविंद नामदेव, दयानंद शेट्टी आणि अश्विनी काळसेकर - केवळ अप्रतिम. चित्रपट पहिल्या दृश्यापासून जो जखडून ठेवतो तो शेवटपर्यंत प्रेक्षकांची गचांडी सोडीत नाही. कथा, पटकथा, संवाद, चित्रण, संपादन... सगळ्या बाजूंनी परिपूर्ण. मल्याळम, तमिळ आणी तेलुगू या भाषांत या चित्रपटाचा यशस्वी रिमेक झाला.

नंतर आला एजंट विनोद. इथे चांगलीच गडबड झाली. सैफ अली खान निर्माता. त्यामुळे भट्टी पार बिघडली. सैफ अली खानची जेम्स बाँडची भूमिका करण्याची हौस भागवण्यासाठी परदेशी चित्रणस्थळे, विघातक शस्त्रे, डिझायनर कपडे असला सगळा मालमसाला खच्चून भरला गेला. पण पदार्थ चविष्ट होण्याऐवजी आम्लपित्त नशिबी आले.

पण ते अपयश मागे टाकून राघवनबुवा अवतरले 'बदलापूर' घेऊन. नावापासूनच लक्षवेधक. फक्त बदल्याची कहाणी म्हणून बदलापूर नव्हे, तर त्या गावाला (आणि तिथल्या पावसाला) चित्रपटात एक भक्कम स्थान देऊन.

बदलापूर हे गांव मुंबईबाहेरचे. होते. आता जसे उत्तर दिशेला मुंबईनगरीने बोरिवलीच्याही पुढे (बोरिवली ही मुंबईची उत्तरवेस होती हे आता खोटे वाटेल) सरकत दहिसर-भायंदर-वसई-डहाणूपर्यंत आपला आवाका नेला आहे तसेच पूर्वेला कल्याणपलिकडे उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर-नेरूळ हेही गिळंकृत केले आहे. ही गेल्या चार दशकांतली गोष्ट. पंचाहत्तर वर्षांपूर्वी उल्हासनगरला सिंधी स्थलांतरितांना वसवण्यामागे कारण हे की तिथे मोकळी जागा भरपूर होती.

बदलापूरला स्थलांतरितांची वस्ती गेल्या तीन दशकांत वाढली. तसेच मोकळ्या जागा सहजी मिळण्यामुळे गोदामे आणि कारखानेही वाढले.

हे सगळे, आणि बदलापूरचे मराठी रुपडे, हे राघवनने उत्तम पकडले. बदलापूरची मराठी संस्कृती हलकेच सूचित करण्यासाठी एका मराठी गाण्याला पार्श्वसंगीतात काही सेकंदांपुरते स्थान देऊन. गाणे आरती प्रभू - हृदयनाथ जोडीचे 'ये रे घना'.

वरुण धवनला या चित्रपटाचा एक नायक म्हणून पेश करणे ही राघवन-धवन जोडीने घेतलेली जोखीम होती. कारण धवनने आपले पहिले तिन्ही सिनेमे (स्टुडंट ऑफ द इअर, मैं तेरा हीरो आणि हम्प्टी शर्मा की दुल्हनिया) सुपरहिट करून दाखवले होते. ही 'स्टार' बनण्याची चिन्हे होती, 'अभिनेता' नव्हे. बदलापूरमधले इतर मुख्य नट नवाजुद्दिन सिद्दिकी, विनय पाठक आणि कुमुद मिश्रा. तिघेही 'अभिनेते'. पण धवन आणि राघवनने घेतलेले कष्ट फळाला आले. वरुण धवन अभिनेता म्हणून ठाम उभा राहिला.

त्यानंतर राघवनने आणला 'अंधाधुन'. शाळेत असल्यापासून तो पुण्यात वाढला (सेंट व्हिन्सेंट, फर्ग्युसन आणि फिल्म इन्स्टिट्यूट). तेव्हांपासून तो पुणे अनुभवत आला. त्या अनुभवातला एक तुकडा त्याने कथानकात मिसळून दिला. प्रभात रस्ता, खडकी, बाजीराव रस्ता, मगरपट्टा... 'बदलापूर'मध्ये सुरुवातीला कॅंपातली कयानी बेकरी दिसली होती पण नंतर कथानक पश्चिमेकडे सरकले.

'अंधाधुन'मध्ये 'जॉनी गद्दार'ची आठवण व्हावी इतक्या मोठ्या प्रमाणावर कथानक वळणे-वाकणे घेत पुढे सरकत राहते. आणि प्रत्येक दृष्यानंतर 'आता काय होईल' ही उत्कंठा वाढतच जाते.

आयुष्मान खुराना 'अंधाधुन'च्या आधीपासूनच अभिनेता म्हणून रुजला होता. विकी डोनर, दम लगाके हैशा आणि शुभमंगल सावधान यांच्यासारखे चाकोरीबाहेरचे चित्रपटही करून बसला होता. जोडीला तबू, राधिका आपटे, झाकिर हुसैन, अश्विनी काळसेकर, मानव विज. अनिल धवनसारखा मर्यादित परीघाचा अभिनेताही कथानकात चपखल बसला. आणि छोट्या भूमिकेतही भाव खाऊन गेली छाया कदम. 

त्यानंतर आला 'मेरी ख्रिसमस'. पण का कुणास ठाऊक, तो माझ्या रडारवर उमटलाच नाही. त्याला बरीचशी नामांकने मिळाली असे आंतरजालावर दिसते. बघायला हवे.

राघवनबुवा आता अवतरले आहेत 'इक्कीस' हा चित्रपट घेऊन. सत्य घटनेवर आधारित युद्धपट.

भारतात युद्धपट म्हणजे भारत-पाकिस्तान. चीनकडे डोळा वर करून बघण्याची कुठल्याच सरकारची हिंमत नाही. त्यामुळे 'हकीकत' सोडता त्या दिशेने काही चित्रपट नाहीत. श्रीलंका आणि बांगलादेश सतत कुरापती काढीत असतात, पण त्यांना खल ठरवून फार भावना उचंबळवता येत नाहीत. पाकिस्तान म्हणजे 'लव्ह टू हेट' श्रेणीतला टॉपर.

राघवनने या विषयाला कसा हात घातला या कुतूहलाने हा चित्रपट पाहिला. प्राईम व्हिडिओवर नुकताच (२६ फेब्रुआरी २०२६ला) उपलब्ध झाला आहे.

सर्वप्रथम लक्षात आले की हा युद्धपट नाही. जरी कथानक १९७१च्या युद्धावर बेतलेले असले तरी.

१९७१च्या युद्धात एनडीएमधून नुकताच बाहेर पडलेला २१ वर्षांचा सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल मृत्यूमुखी पडला. 'धारातीर्थी पडला', 'हुतात्मा झाला', 'वीरगती प्राप्त झाली', 'देशासाठी शहीद झाला' आदि वाक्ये वापरली नाहीत कारण चित्रपटात त्याचा मृत्यू अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडलेला आहे.

अरुण खेतरपालला परमवीरचक्र हा सर्वोच्च लष्करी सन्मान मृत्यूपश्चात देण्यात आला. आतापर्यंत २१ जणांना परमवीरचक्र देण्यात आले आहे. त्यातील सर्वात तरुण. अरुणचे वडीलही सैन्यात होते. ब्रिगेडिअर मदनलाल (एम एल) खेतरपाल. खेतरपाल कुटुंब मूळचे सरगोधा गावचे. हे गाव आता पाकिस्तानात आहे. 

युद्धानंतर तीस वर्षांनी वयाच्या ऐक्याऐंशीव्या वर्षी ब्रिगेडिअर खेतरपालना आपल्या मूळ गावी जाण्याची इच्छा झाली.

अनेकांना माहीत (आणि मान्य) नसलेली गोष्ट म्हणजे भारत आणी पाकिस्तान या देशांत 'ट्रॅक टू डिप्लोमसी' नावाने ओळखली जाणारी घडामोड घडत असते. भारत-पाक फाळणी ही किती अनैसर्गिक गोष्ट होती आणि आहे हे सत्य कागदावरच्या फाळणीने पुसले जात नाही. सत्तेसाठी हपापलेल्या काँग्रेस पक्षाने फाळणी झटपट मान्य केली. ज्यांनी विरोध करायला हवा होता ते शेपूट घालून बसले आणि फाळणीनंतर पन्नासेक वर्षांनी गोंगाट करायला लागले. आता गोंगाट भराला आला आहे. पण सत्य हे शेवटी सत्यच असते.

या 'ट्रॅक टू डिप्लोमसी'च्या कार्यकर्त्यांनी सूत्रे हलवली आणि ब्रिगेडिअर खेतरपाल आपल्या मूळ गावाला भेट द्यायला निघाले. त्यांची राहण्याची व्यवस्था पाकिस्तानी सैन्यातल्या एका निवृत्त ब्रिगेडिअरकडे, ख्वाजा मोहम्मद नासेर यांच्याकडे करण्यात आली होती. ब्रिगेडिअर नासेर आणि ब्रिगेडिअर खेतरपाल दोघेही लाहोर गव्हर्न्मेंट कॉलेजचे विद्यार्थी मात्र दोघांच्यात एका पिढीचे अंतर.

ब्रिगेडिअर नासेरकडच्या वास्तव्यात ब्रिगेडिअर खेतरपाल यांना एक गोष्ट कळाली. त्या युद्धात अरुण खेतरपाल आणि नासेर हे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आणि अरुणच्या मृत्यू नासेरने डागलेल्या दारुगोळ्याने झालेला होता. नासेरने खेतरपालांना हे सांगितले आणि माफी मागितली. ब्रिगेडिअर खेतरपाल यांनी माफी केली.

अजून मसाला घालण्याची गरज नसलेली ही सत्य घटना श्रीराम राघवनने उचलली आणि चित्रपटात वापरली. त्यावरची पटकथाही भक्कम बांधली.

पात्र निवडीमध्ये राघवनने अशी काही कामगिरी केली आहे की प्रत्येक पात्र आपापल्या जागी अचूक बसले आहे. ब्रिगेडिअर खेतरपाल म्हणजे धर्मेंद्र. नासेर म्हणजे जयदीप अहलावत.

अरुण खेतरपाल म्हणजे अगस्त्य नंदा. याची एक ओळख म्हणजे अमिताभ बच्चनचा हा नातू (मुलीचा मुलगा) आणि राज कपूरचा पणतू (मुलीचा नातू). अजून एक ओळख म्हणजे एस्कॉर्ट्स समूहाच्या संस्थापक-संचालक नंदा घराण्यातील. अरुणची 'मैत्रीण' किरण म्हणजे सिमर भाटिया. अक्षयकुमारच्या बहिणीची मुलगी. या दोघांचाही पहिलाच चित्रपट.

बाकीच्या भूमिकांसाठी उत्तमोत्तम अभिनेते नि अभिनेत्री जमवले आहेत. असरानी (एका दृष्यापुरता) सुहासिनी मुळे, सिकंदर खेर, राहुल देव, विवान शाह, दीपक डोब्रियाल, एकावली खन्ना, मामिक सिंग, झाकिर हुसैन ही माहीत असलेली नावे. माहीत नसलेल्या नावांच्या अभिनेत्यांनीही अत्यंत चोख भूमिका केल्या आहेत.

कथानकात कुठेच वीररस वाहत नाही. प्रत्यक्ष युद्धाचे चित्रणही इतके संयत आणी वस्तुनिष्ठ पद्धतीने केले आहे की कुठेच भावनांचे वादळ उभे राहत नाही. आणि तरीही चित्रपट मनात घर करून राहतो.

कथानक घडते १९७१ आणी २००१ साली. त्या अर्थाने ही पीरियड फिल्म आहे. त्यावेळचे वातावरण यथातथ्य उभे केले आहे. केशभूषा, वेशभूषेपासून त्याकाळच्या वस्तू नि गाड्या इथपर्यंत.

अगस्त्य आणि सिमर दोघांचीही कामे उत्तम झाली आहेत. पदार्पणाच्या भूमिकेचे ओझे न वागवता दोघेही वावरले आहेत. एकच गोष्ट खटकली. अगस्त्य प्रत्यक्षात २५ वर्षांचा असला तरी २१ वर्षांचा दिसतो. पण सिमर २१ वर्षांची दिसत नाही. तशीही ती आहे सत्तावीस वर्षांची. आणि त्या सहा वर्षांत वाढलेले वय दिसून येते. वयानुसार शरीरात होणारे बदल दरवेळेस मेक-अपने नाही झाकता येत.

पण चित्रपटाचे खरे नायकद्वय म्हणजे जयदीप अहलावत आणि धर्मेंद्र. धर्मेंद्रचा उल्लेख एकेरी करीत आहे कारण भारतात क्रिकेटपटू आणि सिनेनट/नट्या यांना एकेरी संबोधायची पद्धत आहे.

धर्मेंद्रचा हा शेवटचा चित्रपट. आपल्या अभिनयाची साठहून अधिक दशकांची कारकीर्द त्याने या चित्रपटाद्वारे अत्यंत झळाळून संपवली. अन्यथा गेल्या दहा वर्षांतले त्याचे चित्रपट (सेकंड हॅंड हजबंड, यमला पगला दिवाना फिरसे, रॉकी और रानीकी प्रेमकहानी, तेरी बातोंमें ऐसा उलझा जिया आदि) पाहणे उत्तरोत्तर अवघड होत गेले होते. वयानुसार बोलण्यात येणारे बोबडेपण, थकलेला चेहरा आणि शरीर ... फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचणारा धर्मेंद्र बघून वाईट वाटे. पण या चित्रपटाने त्याने गेली दहा वर्षे पुसून टाकली. बोलण्यातली अस्पष्टता आणि थकिस्त शरीर हे दोन्ही आपल्या भूमिकेत नीट मिळवून घेतले. एकवीस वर्षांचा मुलगा गमावलेला बाप ही व्यक्तिरेखा उभारताना त्याने नीटस अभिनयाचा वस्तुपाठ घालून दिला.

जयदीप अहलावत हा अत्यंत गुणी अभिनेता त्याच्यासमोर तोलामोलाने उभा राहिला आहे.

आणि दिग्दर्शकाचे डोके पूर्ण ठिकाणावर असल्याने 'एकाने दुसऱ्याला कच्चा खाल्ला' अशी नरभक्षकगिरी अभिनयात शिरत नाही याची त्याने पूर्ण खात्री केली आहे.

हा चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी ठरला नाही याचे आश्चर्य वाटायचे कारण नाही. भारत-पाक युद्धावर आधारित चित्रपट असूनही राष्ट्रभक्तीचा बाजार न मांडणारा हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या सुमारास प्रदर्शित झाला 'धुरंधर'.