चांगली रहस्यकृती (कथा/नाटक/चित्रपट) म्हणजे काय? तर त्या रहस्याची उकल होत असताना वाचकाला/प्रेक्षकाला आपणही त्या उकलीचा भाग आहोत असे वाटणे.
म्हणजे, जे काही दुवे समोर येत जातात ते स्वच्छसरळ असतात. त्यांच्यामागे फक्त उकलकार ऊर्फ नायकाला ठाऊक असलेली पण इतरांना दृग्गोचर न होणारी अशी काही लपवलेली माहिती नसते. मग आपणही त्या रहस्यात गुंतत जातो, आडाखे बांधतो, विस्कटतो, परत बांधतो...
या अर्थाने चांगल्या रहस्यकथा दुर्मिळ. चित्रपट त्याहून दुर्मिळ. कारण दृक-माध्यमाची ताकद न कळालेले अर्धवटराव जेव्हां दिग्दर्शकाची टोपी घालतात तेव्हां कॅमेरा अनेक पात्रांवर गरज नसताना रेंगाळतो आणि ती पात्रेही उगाचच खुनशी नजरेने जगाकडे पाहतात. दुव्यांची साखळी जोडीत उकल करणे या क्रियेत अशा महान दिग्दर्शकांना रस नसतो. त्यांचा नायक शेवटल्या पाच मिनिटांत उकल करून मोकळा होतो. जेम्स बाँड जसा शेवटच्या पाच मिनिटांत खलनिर्दालन करून मदनिकेला कवेत घेतो तसा.
'डिटेक्टिव्ह शेरदिल' हा चित्रपट अपघातानेच नजरेस पडला. झी-फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही चित्रपट फुकट आहेत. उन्हाच्या तलखीने जडावलेल्या डोळ्यांनी हे शोधले आणि हा चित्रपट त्या यादीत पहिला होता म्हणून पाहिला.
आणि अजिबात पश्चात्ताप झाला नाही.
नायकाचे नाव शेरदिल. आईचे नांव शेरनी, वडिलांचे दिलबाग. म्हणून शेरदिल. त्याच्याच भाषेत, 'गोऱ्यांसाठी शर्लॉक, देसी लोकांसाठी ब्योमकेश'.
ब्युडापेस्ट या हंग्री देशाच्या राजधानीजवळ पंकज भट्टी नामक भारतीय वंशाच्या उद्योगपतीची हत्या होते. त्या हत्येची उकल शेरदिल कसकशी करतो याचे चित्रण म्हणजे हा चित्रपट. कथेची मांडणी 'नाईव्हज आऊट' या इंग्रजी चित्रपटावरून बरीचशी प्रेरित.
शेरदिल म्हणजे दिलजीत दोसांझ. प्रसिद्ध पंजाबी गायक नि नट. उडता पंजाब, फिल्लौरी, अर्जुन पटियाला, गुड न्यूझ, सूरज पे मंगल भारी आदि पंधराएक हिंदी चित्रपटांत झळकलेला. त्याचे विनोदी पंजाबी चित्रपट (जट्ट ऍंड ज्यूलियट भाग १ व २, सरदारजी भाग १ व २, सुपर सिंग, छडा, हौंसला रख्ख) आवर्जून बघण्यासारखे. तेवढाच आवर्जून बघावा त्याचा पंजाबी गंभीर चित्रपट 'पंजाब १९८४'.
पंकज भट्टी म्हणजे बोमन इराणी. इथे त्याला अभिनेता म्हणून जागा मिळाली आहे. 'खोसला का घोंसला' या चित्रपटात मिळाली होती तशी. आणि त्याने अर्थातच त्या भूमिकेचे सोने केले आहे.
पोलिस निरिक्षक नताशा म्हणजे डायना पेंटी. तिला फारसा वाव नाही, पण जो आहे तो तिने सहजपणे पेलला आहे.
पंकज भट्टीची बायको म्हणजे रत्ना पाठक शाह. या नावामुळे उद्भवणाऱ्या सगळ्या अपेक्षा तिने व्यवस्थित पुऱ्या केल्या आहेत. तीच गत पंकज भट्टीचा मुलगा म्हणून पेश झालेल्या सुमीत व्यासची.
बनिता संधू ही ब्रिटिश-शीख नटी म्हणजे पंकज भट्टीची मूक-बधिर मुलगी शांती. मूक-बधिरांची भूमिका ही भल्याभल्यांना चकवणारी गोष्ट. पण तिने ती भूमिका नीटस केली आहे.
फलक हे पात्र तसे किनाऱ्यावरचे. कश्मिरा इराणीने त्यातही जीव भरला आहे.
चंकी पांडे हा नट सुरुवातीच्या यशानंतर सतत अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावरच झुलत राहिला. अलिकडच्या काळात अनन्या पांडेचा बाप हीच त्यातल्या त्यात सभ्य ओळख. अन्यथा 'हाऊसफुल' या उथळ चित्रपटमालिकेतला 'आखरी पास्ता' हीच सगळ्यांना माहीत असलेली ओळख. 'संकट सिटी'मधला सिकंदर खान कुणाला आठवत नाही. 'संकट सिटी'च आठवत नाही.
चंकी पांडेची यातली 'बोधी मामा' ही भूमिका त्याने केलेल्या अर्थपूर्ण भूमिकांच्या यादीत वरती असेल.
मुकेश भट या हिंदी चित्रपट दिग्दर्शकाने यात एक भूमिका साकारली आहे. ठीकठाक.
एकूण, दीडदोन तास हाताशी असतील तर नक्की बघा.