व्यापम (व्यावसायिक परीक्षा मण्डल) घोटाळा हा मध्यप्रदेशातील एक भीतीदायक घोटाळा. भीतीदायक यासाठी की त्याबद्दल कुणालाच फारशी माहिती वा फिकीर नसते. फक्त नांव (व्यापम घोटाळा) एवढेच माहीत असते.
वैद्यकीय शिक्षणाच्या जागा आणि सरकारी नोकरी (फूड इन्स्पेक्टर, ट्रान्स्पोर्ट कॉन्स्टेबल्स, पोलिस, शाळा शिक्षक, डेअरी सप्लाय ऑफिसर्स, फॉरेस्ट गार्ड्स आदि) यासाठी परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेली सरकारी संस्था म्हणजे व्यापम. वर्षाकाठी मिळून सुमारे बत्तीस लाख उमेदवार या परीक्षांना बसत. उपलब्ध जागा सुमारे दोन टक्के.
या परीक्षा पार करण्यासाठी एकाऐवजी दुसऱ्यालाच बसवणे, कॉपी करण्याची मुभा देणे, परीक्षा झाल्यावर उत्तरपत्रिकांमध्ये हेरफेर करणे आणी परीक्षेचे पेपर आधीच फोडणे या मार्गांनी काही ना-लायक उमेदवारांना पुढे चाल देणे असे या घोटाळ्याचे स्वरूप.
हा घोटाळा होत असल्याचे १९९५ पासूनच बोलले जात होते. पण भ्रष्टाचाराला तिलांजली देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या पक्षाचे सरकार २००५ साली आले आणि या घोटाळ्याने विक्राळ रूप धारण केले. शिक्षणमंत्री, शिक्षणमंत्र्यांचा ओएसडी, आयपीएस नि आयआरएस ऑफिसर्स, दलाल, व्यापम मधील उच्चपदस्थ यांना अटक झाली. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यावर आरोप झाले.
घोटाळ्याशी संबंधित किमान ३६ व्यक्तींचे 'संशयास्पद' मृत्यू झाले. काहीजण हा आकडा त्याहून जास्ती असल्याचे सांगतात; पण ते काहीजण 'राष्ट्रद्रोही' [प्रथम राष्ट्र, मग पक्ष, मग व्यक्ती हे कोकलणाऱ्या पक्षाविरुद्ध बोलणारे म्हणजे राष्ट्रद्रोही हे सरळ आहे] असल्याने त्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही.
अखेर मामला कोर्टात गेला नि सुप्रीम कोर्टाने ६३४ डॉक्टरांची सनद रद्द केली. सरकारी नोकरीतल्या मंडळींचे माहीत नाही.
या पार्श्वभूमीवर आधारलेली 'शिक्षा मंडल' ही वेबसीरीज प्राईम व्हिडिओज (एम एक्स प्लेअर) इथे उपलब्ध आहे.
अभिनेत्यांमध्ये गुलशन देवैया, पवन मल्होत्रा आणि गौहर खान ही नावे बघितली आणि बघायला बसलो.
हे तिघेही 'अंडररेटेड, अंडरऍप्रिसिएटेड' श्रेणीतले अभिनेते. त्यातल्या त्यात पवन मल्होत्रा चारेक दशके चित्रपटसृष्टीत असल्याने नजरेत तरी आहे. पण गुलशन देवैयाचे फूटफैरी आणि ब्लर हे बऱ्याच जणांना माहीत नसतात. गौहर खान ही नितळ देखणी पुणेरी मुलगी 'आन: मेन ऍट वर्क' या चित्रपटातल्या आयटम साँगमधून चित्रपट सृष्टीत प्रवेश करती झाली आणि बहुतांशी तिय्यम भूमिकांतूनच दिसली. 'शिक्षा मंडल' प्रदर्शित झालेल्याच वर्षी (२०२२) आलेल्या 'बेस्टसेलर' या वेबसीरीजमधले तिचे काम उत्तम आहे.
'पोएटिक लायसन्स' घेऊन या कथानकात राजकीय अस्थिरता पेरली आहे. ते ठीक. प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचे प्रस्थ ठळकपणे मांडले आहे तेही ठीक (खरे प्रायव्हेट कोचिंग क्लासेस अनिर्बंध माजले आहेत राजस्थानातील कोटा शहरी). पण कथानकाची मांडणी इतकी अतिरंजित आणी बटबटीत आहे की या त्रयीने या मालिकेत काम करणे का मान्य केले हा प्रश्न पडावा.
माझी सहनशक्ती चांगली आहे, त्यामुळे ही वेबसीरीज शेवटपर्यंत पाहिली. पण शेवट एका उत्कंठावर्धक क्षणापर्यंत नेऊन 'टू बी कंटिन्यूड' या संतापजनक पाटीवर सोडला आहे. २०२२ साली. मग निर्माता मिळाला नसावा.
बटबटीत मांडणीतही काही सुरेख क्षणही आहेत. पण दुर्दैवाने ते प्रमाण 'शिऱ्यातील बेदाणा' एवढेच. जेमतेम.
एकूण काय, मी पस्तावलो. बाकीच्यांनी त्याच खड्ड्यात पडू नये ही सदिच्छा.