बेस्टसेलर - जुळवलेले आणि चुकते केलेले हिशेब

बेस्टसेलर - जुळवलेले आणि चुकते केलेले हिशेब

रांड सांड सीढी सन्यासी

इनसे बचे तो (सेवे/आये/पावो) काशी

हे कवित्व कबिराचे नव्हे. कुणाचे ते कुणासच ठावे नाही. 

काशी ऊर्फ वाराणसी (इंग्रजीत बनारस) या शहराबद्दल हे कवित्व. खरेतर वाराणसी हे मूळ नांव. वरुणा आणि अस्सी या दोन नद्यांचा संगम म्हणून वरुणा-अस्सी = वाराणसी.

अर्थ सरळ आहे. रांड या शब्दाचा एक अर्थ 'विधवा' असा आहे आणि इथे तो अभिप्रेत आहे. या शहरात विधवा, बैल आणि संन्याशी मंडळींची रेलचेल आहे आणि शहरात अनेकानेक पायऱ्या (सीढी) आहेत - नदीवर जाणाऱ्या घाटांच्या. या सगळ्यातून स्वतःला बचावले तर काशीला येता (आये/पावो) येईल वा काशीची सेवा (सेवे) करता येईल.

यातल्या पहिले चार शब्द घेऊन ताहीर वझीर नामक लेखक एक कादंबरी 'लिहितो'. ती सुपर-डुपर-टिपर हिट ठरते. आणि त्या जोरावर तो सुमारे दशकभर लेखक म्हणून त्यानंतर एकही पुस्तक प्रसिद्ध न करता ऐषोआराम करतो.

एका हिंदी पुस्तकावर दशकभर ऐषोआराम करणारा, येऊ घातलेल्या पुस्तकाबद्दल कोट्यवधींची 'साइनिंग अमाऊंट' हस्तगत करणारा  भारतीय लेखक?

पोएटिक लायसन्स.

नवीन पुस्तकासाठी त्याला एक 'इंटरेस्टिंग कॅरेक्टर' भेटते. त्या व्यक्तीशी बोलून ताहीरला पुढले पुस्तक दिसू लागते.

पण ते 'इंटरेस्टिंग कॅरेक्टर' मीतू माथुर ताहिरच्या आयुष्यात आल्यावर त्याचे आयुष्य हळूहळू पण ठामपणे उद्ध्वस्त होत जाते.

ताहिरचे बेस्टसेलर 'रांड सांड सीढी सन्यासी' हे पुस्तक त्याने कुठूनतरी ढापले आहे आणि स्वतःचे म्हणून खपवले आहे. त्या मूळ लेखकाचे आणि मूळ लेखकाच्या कुटुंबाचे काय झाले याबद्दल ताहिरला शून्य माहिती आहे.

ताहिरची बायको मयांका कपूर. तिची मोठी ऍड-एजन्सी आहे. तिच्याही आयुष्यात अनेकानेक स्थित्यंतरे होतात.

ताहिर आणि मयांका यांच्या आयुष्यातील काही घटना अशा स्वरूपाच्या आहेत की कथानकात पोलिसांचे आगमन होते. लोकेश प्रामाणिक नामक डीसीपी, ज्याच्या निवृत्तीला थोडेच दिवस उरलेले आहेत. त्याची सहायक उर्मिला रानडे.

कथानक पुढे सरकत जाते. ताहिर नि मयांका अडकत जातात. लोकेश नि उर्मिला त्यामागे धावत सुटतात. पण अदृष्य सूत्रधार प्रेक्षकांच्या अपेक्षांशी खेळत राहतात.

हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागते. आणि शेवटी सगळे चित्र स्पष्ट होते.

अभिनेत्यांमध्ये ताहिर वझीर म्हणजे अर्जन बाजवा. 'रुस्तम' मधला विक्रम मखिजा. मयांका कपूर म्हणजे गौहर खान. मीतू माथुर म्हणजे श्रुती हासन. उर्मिला रानडे म्हणजे सोनाली कुलकर्णी (बकुळा नामदेव घोटाळे मधली).

पण 'हॅट्स ऑफ' भूमिका लोकेश प्रामाणिक - मिथुन चक्रवर्ती.

इक्कीसमध्ये जसे धर्मेंद्रने झळाळून उठणारे काम केले होते तशी या वेबसीरीजमधली मिथुनची भूमिका. त्याचे दिसणारे वय सहजपणे कॅरेक्टरमध्ये एकरूप होऊन जाते. अगदी दूधसाखर.

एकूण, जुळवलेल्या आणि चुकत्या केलेल्या हिशेबांची ही नोंदवही प्रेक्षणीय आहे.