'फुकरे' नामक एक बरीचशी उथळ पण चटपटीत चित्रपटमालिका आहे. पुलकित सम्राट, वरुण शर्मा, अली फजल, मनजोत सिंग, रिचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी या षट्कोनाने विनोदाचे बरेच षट्कार सहज ठोकले आहेत.
त्या मालिकेचा लेखक विपुल विग. त्याला या चमूतील पुलकित सम्राट आणि वरुण शर्माला घेऊन एक विनोदी चित्रपट तयार करावासा वाटला. 'झी एन्टरटेनमेंट'साठी कार्यक्रम निर्मिती करण्यासाठी जन्माला आलेल्या 'झी स्टुडिओ'ने याची निर्मिती केली. विपुलने बाकीचे अभिनेतेही तोलामोलाचे घेतले. पियुष मिश्रा, अमित सियाल, मनु ऋषी चढ्ढा, सुमित गुलाटी, चारु शंकर आणि शालिनी पांडेय.
आणि या सगळ्यातून निर्माण केला एक दिशाहीन धांगडधिंगा.
चित्रपटामध्ये अभिनेते हा एक घटकपदार्थ. महत्वाचा घटकपदार्थ. पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे कथा. मग दृष्यचित्रण. मग अभिनय. मग संकलन. यातली एकही गोष्ट हुकली की एकत्रित परिणाम बिघडलाच.
राहू केतू मध्ये कथाच एवढी विसविशीत आहे की त्यावर चित्रपट काढणे म्हणजे भुसभुशीत वाळूच्या पायावर सतरामजली इमारत बांधण्यासारखे. इमारत कोसळणार हे निश्चित.
एक जादूची वही. त्यात लिहिलेले सगळे काही खरे होते. त्या लिहिण्याला तीन नियम आहेत. जी कहाणी सुरू झालेली आहे ती संपल्याशिवाय नवीन कहाणी सुरू करता येणार नाही. कहाणी फक्त नायकाच्या माध्यमातूनच पुढे सरकू शकेल. जे लिहिले गेलेले आहे ते खोडता येणार नाही.
ही जादुई वही चुरूलाल शर्मा नामक एका लेखकाच्या (मनू ऋषी चढ्ढा) ताब्यात आहे. त्याने हिमाचल प्रदेशातील भ्रष्टाचार मिटवण्यासाठी (!) राहू नि केतू नामक दोन पात्रे (अनुक्रमे वरुण शर्मा आणि पुलकित सम्राट) निर्मिली आहेत. पण भ्रष्टाचार मिटवण्याऐवजी ही दुक्कल सुरू असलेले जनजीवन विस्कळित करीत हिंडते आहे. हे दोघे कुणाच्या वास्तुशांतीचे लाडू खायला गेले की ती वास्तू तत्परतेने कोसळणार हे नक्की [चित्रपटात जी वास्तू दाखवली आहे ते कोसळण्याआधी उभी आहे याचेच आश्चर्य वाटावे इतकी तकलादू; कुणी शिंकले तरी कोसळेल अशी. पण दोष या दोघांवर]. ज्याला काळ्या जिभेचे म्हणतात तसे हे दोघे.
तसे अधून मधून ते काही भ्रष्टाचाऱ्यांना परमगती प्राप्त करून देतात. पण तेवढ्याने हिमाचल प्रदेशमधील भ्रष्टाचार नाहीसा होणे अशक्य.
मीनू टॅक्सी नामक कन्येला (चित्रपटाची नायिका म्हणायला हरकत नाही; शालिनी पांडेय) पैशांची गरज आहे. आणि गांजाची शेती करून ते पैसे तिला मिळवायचे आहेत. तिच्या आईची (पात्र सुंदरी, नटी चारु शंकर) तिला समर्थ साथ आहे. गांजाच्या शेतीच्या आड येतो म्हणून या दोघींनी मीनूच्या बापाला टपकावले आहे. आणि भ्रष्टाचारी पोलिस अधिकारी दीपक शर्मा (अमित सियाल) याला हाताशी धरून ते प्रकरण मिटवायची त्यांची धडपड चालू आहे.
त्यांच्या मार्गात राहू केतू सारखे सारखे आडवे येत आहेत (हिमाचल प्रदेशातील भ्रष्टाचार मिटवायचा आहे ना). मीनूला या वहीबद्दल कळते. ती वही मीनू चोरते. आणि वहीच्या नियमांनुसार लिहीत लिहीत आपले ध्येय गाठायला धडपडते.
यात एक ड्रग लॉर्ड मोर्डेकाई (चंकी पांडे; यात तोलामोलाचा सोडा, साधा अभिनयही करण्याचे कष्ट याने घेतलेले नाहीत; नाहीतर याचे नाव वरच्या यादीत घालायला मला आवडले असते) हाही आहे. तो म्हणे इस्रायली गुप्तचर होता, आता ड्रग्जच्या व्यवसायात आहे.
मीनूवर बरेचसे एकतर्फी प्रेम करणारा बन्सी (सुमीत गुलाटी) हा कनिष्ठ पोलिस अधिकारी. वहीत लिहून मीनू त्याला वरिष्ठ अधिकारी करून टाकते. पण मीनूचे एकंदर वखवखलेले वागणे बघून बन्सी एकदम पलटी मारतो. प्रेम तेच ठेवतो. फक्त पिया-सैंया ऐवजी त्याला दीदी-भैयाचे प्रेम करून टाकतो.
ही कथा शक्य तितकी समजावून सांगत मधूनमधून सूत्रधार फूफा (पियुष मिश्रा) अवतरतो. हे खरे एबीसी पात्र - ऑथर बॅक्ड कॅरेक्टर. मग त्याची वेशभूषा, केशभूषा, संवादफेक सगळे काही अतिलक्षपूर्वक पेश केलेले. त्याचे वागणे बोलणे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे नाही अशा दरडावणीसकट.
पियुष मिश्राने ही भूमिका का स्वीकारली असावी? कळत नाही.
वरुण शर्मा आणि पुलकित सम्राट या दोघांनीही हा 'फुकरे ४' असल्यासारखी वर्तणूक ठेवली आहे. मधूनच त्यांच्या लक्षात येते की बाकीची फुकरे गॅंग गायब आहे. मग दोघे गडबडतात.
सुमित गुलाटी पात्र हा गुणी नट एरवी दुर्लक्षित असतो. इथे त्याला भूमिका अजिबात समजलेली नाही कारण समजण्यासाठी ठोस भूमिकाच नाही. मग होते तेच झाले आहे - भजे.
अमित सियाल, मनू ऋषी चढ्ढा आणी चारु शंकर यांनाही भूमिका शोधणाऱ्या पात्रांची भूमिका पदरात पडली आहे.
त्यातल्या त्यात 'सेव्हिंग ग्रेस' म्हणावे असे काम शालिनी पांडेयने केले आहे. आगापीछा नसलेली, बरीचशी खल भूमिका तिने शक्य तेवढी सुसह्य केली आहे.
हा चित्रपट सपाटून आपटला (खर्च रु ३० कोटी, उत्पन्न रु ७.५ कोटी) नि प्राईम व्हिडिओवर आला. अजिबात वाट्याला जाऊ नका.