दिल्ली. दोन बालमित्र. दोघेही आता मध्यमवयात, दोघांनाही आपापली टीन-एजर्स मुले (पहिल्याला ट्विंकल, दुसऱ्याला सनी नि स्वीटी). पहिला मित्र (गोल्डी) घरमालक. दुसरा (सुनिल/चिकू) त्यात भाडेकरू. घरमालक भाडेकरूला घर रिकामे करण्याबद्दल तगादा लावतो आहे. पण अडचण अशी की भाडेकरूची आई (दर्शन कौर) गेली तीस वर्षे 'कोमा'मध्ये आहे. आणि तिला शुद्ध येईल तेव्हां ती तिच्या 'त्याच' घरात असावी म्हणून भाडेकरू जागा रिकामी करीत नाहीये. आणि घरमालक हे समजून घेऊन अधूनमधून त्रागा करतो एवढेच.
दूरदर्शन ('दूर के दर्शन' असेही नांव काही ठिकाणी वापरलेले आहे) या चित्रपटाची ही पार्श्वभूमी.
सुनिलची (मनू ऋषी चढ्ढा) बायको प्रिया/बिल्लो (माही गिल) त्याच्यापासून विभक्त राहते. दोघांचे नक्की कशामुळे फाटले आहे ते स्पष्ट नाही. सासुरवास हा मुद्दाच नाही कारण त्यांचे लग्न झाले तेव्हां सासू ऑलरेडी कोमात होती. तिच्या घरी सुनिल जातो येतो. तिच्या आईशी 'पैरी पौना - जीते रहो' असे संबंध राखून आहे. पण बुलेट चालवणारी फटाकडी पंजाबन बिल्लो सतत बंद पडणारी बजाज स्कूटर चालवणाऱ्या सुनिलकडे परत यायला तयार नाही.
सुनिलच्या मुलाचे, सनीचे (शार्दूल राणा) गोल्डीच्या (राजेश शर्मा) मुलीवर, ट्विंकलवर (महक मनवानी) प्रेम आहे. तिचेही त्याच्यावर आहे.
सनीचा समवयीन मित्र पप्पी/पप्पू (सुमित गुलाटी) हा त्या वयातल्या हॉर्मोन्सचा आदर करणारा इसम. तो 'तसली' मासिके सनीला पुरवतो. ती मासिके वाचण्यासाठी सर्वात सुरक्षित जागा म्हणजे (कोमात असलेल्या) आजीची खोली.
एकदा 'तसल्या' एका गोष्टीचे प्रकट वाचन चालू असते. गोष्टीतली 'नायिका' कुणी बिमला. आणि आजीला जाग येते. काही क्षणांपुरतीच. पण तेवढ्यात तिच्या स्मृतीपटलावर बिमला हे नांव कोरले जाते. मग नंतर ती व्यवस्थित कोमातून बाहेर येते. पण डॉक्टर सांगतात की तिला कुठल्याही गोष्टीचा धक्का बसू देऊ नका. ती तीस वर्षे कोमात होती हे सांगू नका.
तीन व्यक्तींचे रक्त एकसमयावच्छेदेकरून न्यूटनला फाट्यावर मारून गुरुत्वाकर्षणाविरुद्ध वर चढते आणि वैद्यकीय ज्ञानाला फाट्यावर मारून एकत्र होऊन एका व्यक्तीच्या अंगात घुसते. आणि तरीही सगळे जिवंत राहून अख्खा सिनेमा पार पाडतात. त्या तुलनेत एवढे माफ करायला हरकत नाही.
आता तीस वर्षांत काय काय बदल झाले? हिशेब करायलाच बसले तर लक्षात येईल की जग आमूलाग्र बदलले. आज आपल्याभोवती दिसणाऱ्या कित्येक वस्तू गेल्या तीस वर्षांत उद्भवल्या आहेत. सेलफोन, सेलफोन चार्जर, वायफाय राऊटर्स, लॅपटॉप ('खबरदार' मधल्या गौरी शृंगारपुरेच्या भाषेत 'लॅटपॉट'), फ्लॅट-स्क्रीन टीव्ही... आणि हे घरात. बाहेर रस्त्यावर तर तीस वर्षांपूर्वी 'फॉरेन'च्या वाटणाऱ्या चारचाक्या नि दुचाक्या. तीस वर्षांपूर्वीच्या रिक्षा तेवढ्या अजून पक्क्या आहेत.
भाटेजा कुटुंब (सुनिल आणि मुले) घरात कायकाय बदल करावे लागतील याची यादी करायला बसतात. त्यात प्रिया/बिल्लो घरी येणे हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण शाळेत असल्यापासून सुनिल-प्रिया जोडी सगळ्यांना माहीत आहे.
आव असा आणला जातो की तीस वर्षे नव्हे, सहा महिनेच उलटले आहेत. सुनिलच्या गबदुलपणाबद्दल थायरॉईडच्या नावाने पावती फाडली जाते. दोन्ही मुले (सनी अन स्वीटी) ही घरगडी नि मोलकरीण म्हणून पेश केले जातात.
दर्शन कौरला पलंगाखेरीज (आणि बाथरूमखेरीज) इतर कुठे हिंडायची परवानगी नाही. त्यामुळे हे गणित जुळत येते. प्रियाही घरी येण्याचे मान्य करते. तिला दर्शन कौर सुनिलशी लग्न करण्याबद्दल टोचत राहते.
हे नाटक किती काळ चालते? दर्शन कौरच्या मनावर उमटलेले 'बिमला' हे नांव, त्याची संगती कशी लावली जाते? सनी नि ट्विंकलचे जुळते का?
या आणि अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी 'दूरदर्शन' (दूर के दर्शन) पहावा. शेवट जरा 'रचलेला' आहे, पण तेवढे मान्य करावे हे बरे (मी केले).
निम्म्या चित्रपटात कोमात असलेली दर्शन कौर (डॉली अहलुवालिया) ही या चित्रपटातली एक मुख्य भूमिका. डॉलीने जे काम केले आहे त्याला तोड नाही. तसेही या भूमिकेत कोण असू शकले असते असा कल्पनाखेळ रचला तर डिंपल, किरण खेर आणि नीलू कोहली एवढीच नावे येतात. आणि या सर्वांत डॉलीच उत्तम असे माझे मत आहे.
एरवी दुय्यम/तिय्यम (खरे तर तिय्यमच) भूमिकांत दिसणारा मनू ऋषी चढ्ढा इथे सुनिलच्या भूमिकेत चपखल बसला आहे. 'इनसाईड एज' या वेबमालिकेत मनोहरलाल हांडा या मर्यादित भूमिकेत त्याने जे रंग भरले होते त्यामुळे तो माझ्या रडारवर आला. मग 'पती पत्नी और वोह', 'हम दो हमारे दो' या चित्रपटांत नीट लक्षात राहिला.
प्रिया/बिल्लो या भूमिकेत माही गिल सहज विरघळली आहे. 'देव डी' मधून हिंदीत पदार्पण केलेली ही पंजाबन नंतर 'साहिब, बीबी और गॅंगस्टर' चित्रपटमालिका, आणि 'गॅंग ऑफ घोस्ट्स' हे चित्रपट सोडता कायम परिघावरच राहिली. तिचे पंजाबी चित्रपट (विशेषतः 'कॅरी ऑन जट्टा') फारच धमाल आहेत.
गोल्डीच्या भूमिकेत एरवी 'ऍंड अदर्स' मध्ये असलेल्या राजेश शर्माने धमाल केली आहे. त्याच्या बायकोच्या भूमिकेत सुप्रिया शुक्लानेही त्याला समर्थ साथ दिली आहे.
सनी, स्वीटी आणि ट्विंकल ही पात्रे सहज अभिनीत झालेली आहेतच. पण सुमित गुलाटी (पप्पी) आणि आदित्य कुमार (बंटी तोतला) या दोघांनी अत्यंत मर्यादित भूमिकांतही जे रंग भरले आहेत त्याला तोड नाही.
एकूण, वाट वाकडी करून पहावा अशा दर्जाचा हा चित्रपट आहे.