साटं लोटं... - दोन घटका करमणूक

साटं लोटं... - दोन घटका करमणूक

श्रावणी देवधर (मूळ बंगाली असल्याने स्पेलिंग नि उच्चार श्राबनी/श्राबोनी) या दिग्दर्शिकेने लपंडाव ('तीन फुल्या आणि तीन बदाम' आठवते ना?) या चित्रपटाद्वारे १९९३ साली कारकीर्दीची सुरुवात केली. 

त्या चित्रपटात सुनील बर्वे, अजिंक्य देव, वर्षा उसगांवकर हे सगळे पडद्यावर नुसते बघूनही नॉस्टेल्जियाचा झटका यावा इतके कोवळे दिसतात. सगळे पंचविशीच्या जवळपासचे. सुनील बर्वे तर मिशीही जेमतेम उगवत आहे अशा स्थितीतला (त्याच्यापेक्षा दोनच वर्षांनी मोठी सविता प्रभुणे त्याच्या आईच्या भूमिकेत व्यवस्थित बसण्याइतकी पोक्त/प्रौढ दिसते).

त्यानंतरचा 'सरकारनामा' बघून खेद वाटला. इतक्या उथळ आणि बटबटीत कथानकावर चित्रपट का काढावासा वाटला असेल?

या निमित्ताने शिकायला मिळाले ते एवढेच की गुणवत्ता असेल तर पारितोषिके मिळतात. याचा अर्थ गुणवत्ता असेल तर पारितोषिके मिळतात असा नाही. आणि त्यामुळे पारितोषिके मिळाली म्हणजे गुणवत्ता आहे असाही अर्थ काढता येत नाही.

त्यापुढले चित्रपट पाहिले नाहीत. श्रावणी देवधरबद्दल माझे मत पॉझिटिव्ह-निगेटिव्ह हिंदोळ्यावर झुलून न्यूट्रल झाले.

एवढ्या पार्श्वभूमीवर 'साटं लोटं पण सगळं खोटं' हा चित्रपट पहावा की नाही याचा निर्णय छापाकाटा करून घेतला.

मकरंद अनासपुरे या नटाचा 'अभिनय' (गेंगाण्या आवाजात 'ह्यॅ ह्यॅ ह्यॅ' असे संतापजनक फिदफिदणे, 'कायाला करितो रे तू आसं' आणि तत्सम 'ग्रामीण' ढंगातले संवाद म्हणून काव आणणे) सहन करण्यासाठी लागणारी प्रबळ इच्छाशक्ती आपल्याकडे आहे का या प्रश्नाचे उत्त्तर नाण्याकडूनच मिळवले.

आदिनाथ कोठारे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत नि मृण्मयी देशपांडे या तरुण रक्ताने कुठेतरी संतुलन साधले गेले असेल अशी आशा होती म्हणून नाणेफेक केली.

आणि फारसा पश्चात्ताप झाला नाही.

सत्यवान (आडनांव माहीत नाही) आणि रोकडे (नांव माहीत नाही) ही दुक्कल गुन्हेगारी कारवायांत सामील होऊन तुरुंगात पोहोचते. अनुक्रमे अनासपुरे आणि श्रोत्री. सत्यवानला एक विधवा बहीण (निशिगंधा वाड) आहे. तिला एक जयवर्धन ऊर्फ जय नामक मुलगा (मोठा झाल्यावर आदिनाथ कोठारे) आहे. बहीण मरते नि त्या मुलाला अनाथ करून जाते.

सत्यवान नि रोकडे गोगा नामक अजून एका गुन्हेगाराला चुना लावतात नि त्याचे डबोले घेऊन दुबईला पोहोचतात नि स्थायिक होतात. सत्यवान आपल्या भाच्याला दरमहिना भक्कम रक्कम (रु. दोन लाख) पॉकेटमनी म्हणून देतो. त्या जोरावर जय, त्याचा मित्र वीरेंद्र ऊर्फ वीरू (सिद्धार्थ चांदेकर) आणि वीरेंद्रची प्रेयसी वासंती (मृण्मयी देशपांडे) हे मौजमजा करीत असतात. जयची प्रेयसी इशा त्यात फारशी सहभागी होताना दिसत नाही.

च्यायला, मित्रांची नावे जय आणि वीरू असतील तर त्या चित्रपटावर कायद्याने बंदी घातली पाहिजे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य गेले @@मध्ये...

सत्यवानने आपल्या भाच्याला लाडावून ठेवले आहे असे रोकडेचे मत. अखेर तो जयच्या मौजमजेचे पुरावे सादर करतो आणि जयचा पॉकेटमनी खाड्कन वीस हजारांवर येतो. मौजमजा कंटिन्यू करण्यासाठी तो पूर्ववत होणे (खरेतर त्यात वाढ होणे) गरजेचे असल्याने जय, वीरू आणि वासंती काय खटपटी करतात, इशा त्यात कशी गुंतते याची घटनाजंत्री म्हणजे हा चित्रपट.

देबू देवधर (कॅमेरामन) हे चित्रपटसृष्टीतले एक मोठे नांव. श्रावणी त्यांची पत्नी. देबू देवधर या नावाने श्रावणीला अनेकानेक सवलती मिळाल्या आहेत.

इशाचे आडनांव सरपोतदार. तिचे वडील चित्रपट निर्माते/दिग्दर्शक असतात. अलका कुबलसाठी लिहिलेल्या भूमिकेत निशिगंधा वाडला कोंबले आहे. पार्श्वगायक म्हणून विशाल दादलानी, सिद्धार्थ महादेवन, शंकर महादेवन यांना गायला लावले आहे. 'सारी यांची कृपा' यादीतल्या या काही गोष्टी.

तरुण रक्ताने खरोखरच सुंदर काम केले आहे. उरलेल्यांचा अतिरंजित अभिनय सहन करण्याची शक्ती मिळेल इतके सुंदर. चौघांचाही वावर अगदी सहज वाटणारा आहे. मृण्मयी देशपांडेला विनोदी भूमिकांची चांगली समज आहे. 'आंधळी कोशिंबीर'मध्ये ते दिसले होते. दुर्दैवाने नंतर तिला तशा भूमिका मिळाल्या नाहीत. पूजा सावंतने तिचे भडक वाटणारे पात्र सुसह्य केले आहे. सिद्धार्थ चांदेकरनेही आपली भूमिका चोख पार पाडली आहे. आदिनाथ कोठारेच थोडा अवघडल्यासारखा वाटतो. पण हरकत घेण्याइतका नाही.

दोन घटका करमणूक एवढ्याच दृष्टीकोनातून बघितला तर पश्चात्ताप होणार नाही.