थोडे दूर थोडे पास - कालोचित कल्पना, कालातीत विस्कोट

थोडे दूर थोडे पास - कालोचित कल्पना, कालातीत विस्कोट

डिजिटल मीडिया ('अंकीय माध्यमे' असे भाषांतर करणाऱ्यांचा आणि वापरणाऱ्यांचा विजय असो) आपल्या आयुष्यात किती खोलवर शिरला आहे याबद्दल अधूनमधून चर्चा झडतात. खरे उत्तर शोधायचे नसल्याने मग या चर्चा बहुतेक वेळेस 'तंत्रज्ञानाची प्रगती' या दिशेला वळवल्या जातात आणि शेवटी 'आपण कुठलेही तंत्र वा हत्यार जपून वापरायला पाहिजे' या सदैव सत्य असलेल्या निरर्थक वाक्यापाशी येऊन थांबतात.

काहीजण पोक्त असल्याचा आव आणून 'कुठलेही नवीन तंत्रज्ञान आले की त्याला विरोध हा होतोच. जुनाट, बुरसटलेल्या विचारांचे लोक सहजासहजी बदलायला तयार होत नाहीत' असे गंभीरपणे प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करतात.

गंमत अशी आहे की 'जुनाट, बुरसटलेल्या विचारांची' मंडळीच डिजिटल माध्यमांत पक्की रुजून बसली आहेत. 'इन्स्टा' (इन्स्टाग्रॅम असे पूर्ण म्हटले तर तुम्ही म्हातारडे असल्याचे सिद्ध होते), 'एफबी' आणि तत्सम मीडियात धर्मांतरे, दंगली, खून आणि बरेच काही करण्याचे सामर्थ्य असते हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. स्मशानातून आल्यावर आंघोळ करण्यामागे कसे शास्त्र आहे, लेन्ट आणि रमझानच्या उपासाचे फायदे, 'कोशर मीट' कसे आरोग्यदायी असते याबद्दल पुरेसे 'पुरावे' डिजिटल मीडियात इतस्ततः अनिर्बंध संचार करीत असतात.

पूर्वी (खास करून लहान मुलांसाठी) एक संतापजनक प्रश्न वापरला जाई. लहान मुलाने/मुलीने एखाद्या/दीच्या सांगण्यावरून काही केले आणि ते चुकले तर "तो/ती म्हणेल खड्ड्यात उडी मार, मारशील?" असे विचारले जाई. आता 'मॅप वापरून' खड्ड्यात पडणारे शूरवीर सगळीकडे पसरले आहेत. योगींच्या उत्तर प्रदेशातल्या बरैलीपासून ते (आतापर्यंत) कम्युनिस्टांच्या केरळातील थ्रिसूरपर्यंत.

व्यसनमुक्ती केंद्रे पूर्वी दारू आणि ड्रग्ज अशा ठळक गोष्टींसाठी असत. आता डिजिटल माध्यमांचे व्यसन सोडवण्यासाठी ती अपुरी पडू लागली आहेत. पोटामागे धावणाऱ्या महानगरांत कुटुंबातील संवाद झपाट्याने आक्रसत चालला होताच. आता 'आभासी' संवादाने प्रत्यक्ष संवाद साफ नाहीसा करीत आणला आहे.

एकाद्या सुस्थितीतल्या कुटुंबातल्या सर्वात वडीलधाऱ्या व्यक्तीने आपल्या वडीलकीच्या स्थानमहात्म्याचा मिळेल तेवढा फायदा घेत (आणि धनलालसेला आवाहन करून उरलेले काम करीत)  कुटुंबातल्या व्यक्तींना 'डिजिटल फास्टिंग' (सर्व 'डिजिटल' उपकरणांपासून दूर रहाणे) करायला उद्युक्त केले तर?

हे कालोचित कथासूत्र घेऊन 'झी-फाईव्ह'वर अजय भुयान या दिग्दर्शकाने 'थोडे दूर थोडे पास' ही पाच भागांची छोटेखानी मालिका सादर केली आहे.

कथासूत्र चित्तवेधक आहे.

पण...

अनेकानेक ठिकाणी घात करणाऱ्या या 'पण'नेच या मालिकेची विधुळवाट लावली आहे.

अभिनेत्यांची निवड चपखल आहे. वडीलधारी व्यक्ती - पंकज कपूर. त्याचा थोरला मुलगा - कुणाल रॉय कपूर. सून - मोना सिंग. धाकटा मुलगा - मयूर मोरे. नात - आयेषा कडुस्कर. नातू - सरताज कक्कड.

पण ही सगळी (आणि काही इतर) मंडळी म्हणजे 'दर्शनमात्रे तया होय मुक्ती' श्रेणीतली कुणी सिद्धमंडळी आहेत असा दिग्दर्शकाचा समज दिसतो. कारण कथा कशी आणि का पुढे सरकते हे बिचाऱ्या नटवर्गासाठी गूढच आहे. त्यांनी कितीही माहीतगार सराईतपणाचा आव आणायचा प्रयत्न केला तरी शेवटी पितळ उघडे पडतेच.

'डिजिटल' उपकरणांत मोबाईल आणि कंप्यूटर याबरोबरच मिक्सर, वॉशिंग मशीन, टीव्ही हेसुद्धा येतात. मग पाटा-वरवंट्याचे गुणगान होते. व्हीसीआर लावला जातो. स्क्रॅबल खेळले जाते.

'हाताने कामे करणे जमणार नाही' असे तडफदार उत्तर देऊन घरातली कामवाली बाई चालू पडते. भारतात बेरोजगारी हा प्रश्न नसल्याने दुसरी बाई मिळत नाही.

थोरला मुलगा 'न्यूमरॉलॉजी' या विज्ञान-तंत्रज्ञानातील सर्वात आघाडीच्या क्षेत्रातला तज्ज्ञ. हाताने केल्यामुळे त्याची 'गणिते' चुकतात आणि ग्राहक बिथरतात.

सूनबाई कॉस्च्यूम डिझायनर आहे. हाताने केल्यामुळे तिची डिझाईन्स चुकतात नि तिचे ग्राहकही बिथरतात.

नात आणि नातू मात्र पोक्त आहेत. त्यांना या 'डिजिटल डिटॉक्स'ची गरज पटलेली आहे. ते दोघे त्यांच्या आजोबांच्या (दादू) मागे उभे आहेत.

मग एकदा नात घरी फोन न करता बाहेर उशीरापर्यंत राहते. घरी 'रोंबा टेन्शन'. हे निमित्त साधून थोरला मुलगा डिजिटल डिटॉक्समधून बाहेर पडतो. इतरांनाही त्यांची त्यांची उपकरणे देतो. मुळात सहा महिन्यांच्या डिटॉक्सनंतर प्रत्येकाला काहीतरी मिळणार असते. त्याचे काय होते? हा प्रश्न तसाच सोडून कुटुंब जगत राहते.

अत्यंत कालोचित कल्पनेचा असा विस्कोट केला आहे. नटमंडळींनी आपापली कामे समजली तेवढी नीट पार पाडली आहेत. पण पंकज कपूर या नावाने निर्माण झालेल्या अपेक्षा आणि रंजक सुरुवात याने अखेर पश्चात्तापच पदरी येतो.

पंकजरावजी कपूरसाहेब, आज या ठिकाणी आपण आम्हां प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला आहे. तुमच्या खात्यात क्रेडिट साईडला अर्थपूर्ण भूमिकांची बरीच मोठी यादी आहे. तुम्हांला हाय नेट्वर्थ इंडिव्हिज्युअल या श्रेणीत सहज बसवणारी. डेबिट साईडला अशा घोटाळेबाज मंडळींना कृपया स्थान देऊ नका.

अवांतर - निर्माता म्हणून 'शीर्षक आनंद' या व्यक्तीचे नांव आहे. त्याचे इंग्रजी स्पेलिंग बघितले की थोरला मुलगा 'न्यूमरॉलॉजिस्ट' का आहे याचा थोडा खुलासा होतो.