बकैती - मध्यमवर्गीय मध्यममार्गी मनोरंजन

बकैती या हिंदी शब्दाचा अर्थ मोठ्या आवाजात केलेली निरर्थक, निरर्गल नि अखंड बडबड.

बकैत हा शब्द ऊर्दू वाटतो पण त्याचे मूळ संस्कृत असल्याचे काहीजण म्हणतात. बांका (कट्यार वा खंजीर) चालवण्यात प्रवीण असा मूळ अर्थ. कट्यार/खंजिराच्या जागी स्वैर जीभ चालवणारे ते बकैत अशी उत्पत्ती सांगितली जाते.

खरीही असेल. पण मराठी जनांना पटणारी नव्हे. आमचे शरच्चंद्ररावजी खंजीर चालवण्याबद्दल प्रसिद्ध. पण जीभ स्वैर चालवण्याबद्दल अजिबात नाही. अल्पशब्दांत गोंधळ माजवण्यात ते पटाईत. असो.

'झी-फाईव्ह'वर 'बकैती' ही वेबसीरीज उपलब्ध आहे. मध्यमवर्गीय कुटुंब, मध्यममार्गी कथानक, मर्यादशील मनोरंजन.

पूर्वी ज्याला मध्यमवर्ग म्हणत त्याचे आता दोन फाळके झाले आहेत - उच्च मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्ग. मध्यमवर्ग म्हणताना बऱ्याचदा उच्च मध्यमवर्ग गृहित धरला जातो. रोजचे खर्च भागवू शकणारा, एखादे मोठ्या खर्चाचे कलम आले की डगमगणारा, मोठ्या रकमेचे कर्ज घेण्याबाबत कच खाणारा, जात-उतरंडीत मध्याच्या आसपास असलेला निम्न मध्यमवर्ग हा फारसा मोजला जात नाही.

अशा एका निम्न मध्यमवर्गातल्या कटारिया कुटुंबाची ही कहाणी. गाझियाबाद गावात घडणारी.

गाझियाबाद दिल्लीच्या पूर्व सीमेवरील उत्तर प्रदेशातील एक शहर. दिल्लीच्या सीमेवरील शहरांच्या भाळी असलेला 'गाववजा शहर' ऊर्फ 'शहरवजा गाव' हा शिक्का भाळी मिरवणारे. गाझीउद्दिन या मोगलांच्या वजिराने वसवलेल्या या गावाचे नांव अजून बदलले गेले नाही हे आश्चर्यच.

कुटुंबप्रमुख संजय, त्याची पत्नी सुषमा, दोन टीन-एजर मुले (थोरली मुलगी नयना, धाकला मुलगा भरत) आणि पत्नीचे वडील एवढे कुटुंब. कुटुंबप्रमुख थोरला. त्याच्या धाकल्या भावाकडे (अजय) त्याचे कुटुंब - पत्नी, टीन-एजर मुलगा आणि कटारिया बंधूंचे वडील. संजय राहतो आहे ते कटारिया कुटुंबाचे मूळ घर. सीनीयर कटारियांचे एक दुकान आहे जे अजय चालवतो. संजय वकील आहे. नयना नुकतीच ग्रॅज्यूएट झालेली आहे. मुलगा बारावीला बसला आहे.

घरखर्चाची मिळवणी होत नाही म्हणून संजय एका खोलीत भाडेकरू ठेवायचा विचार करतो. सीनीयर कटारिया त्याला कडाडून विरोध करतात. आणि निधन पावतात.

नयना आणि भरत यांच्यात सदैव झकापकी चालू असते. एक खोली भाड्याने द्यायची असेल तर या दोघांना एका खोलीत रहावे लागणार असते. त्यामुळे त्या दोघांचा भाडेकरू ठेवण्यास विरोध.

मग पैसे कमावण्यासाठी भाऊ-बहीण एकत्र येतात, आईलाही सामील करून घेतात आणि काही व्यवसाय सुरू करायला बघतात.

त्यात ते यशस्वी होतात का? भाडेकरू येतो का? अशा प्रश्नांची उत्तरे देत ही छोटेखानी (प्रत्येकी सुमारे अर्ध्या तासाचे सात एपिसोड्स) वेब-सीरीज पुढे सरकते.

शहरी मध्यमवर्गाला केंद्रस्थानी ठेवून मराठीत बरेच 'साहित्य' निर्माण झाले. सुरुवातीला त्यांची 'पावणेतीन टक्के' अशी (चुकीची) संख्याशास्त्रीय संभावना झाली तरी त्या 'साहित्या'ची अशी वेगळी बाजारपेठ निर्माण झाली. त्यातील स्त्रीपात्रांना 'चट्कन कुकर लावणे, पट्कन पोळ्या करणे' यात प्रवीण असावे लागे. मग उरलेल्या वेळेत भावनापूर्ण प्रसंग, हुंदके, उसासे इ.

दुपारच्या वामकुक्षीच्या आधी मसाला सुपारी/बडिशेपेला साथ देणारे हे साहित्य मला स्वतःला कधी भावले नाही. 'बकैती'चे कथानक बरेचसे 'त्या' साहित्याच्या दिशेने जाते. सरधोपटीकरण करायचे झाले तर सात जणांच्या लेखनचमूत पाच महिला असल्याने असे झाले असावे असे म्हणता येईल.

पण मला ही वेबसीरीज आवडली. कथानकाचा कल जरी त्या दिशेला झुकलेला असला तरी सादरीकरण अत्यंत साधे सरळ आहे. फार वळण-वाकणे नाहीत. संवादांतून फार तत्वज्ञान वा मेलोड्रामा ओथंबत नाही.

सर्वात मुख्य म्हणजे नयना आणि भरतच्या भूमिकेतील तान्या शर्मा आणि आदित्य शुक्ला या दोघांची कामे. अत्यंत पठडीतल्या वाटणाऱ्या भूमिकांमध्ये एवढा सहज अभिनय फारा दिवसांनी पाहिला. विशेषतः तान्या शर्माचा स्क्रीन प्रेझेन्स अत्यंत विलोभनीय आहे. 'सो क्यूट' हा एरवी डोक्यात तिडीक उठविणारा अभिप्राय वापरावासा वाटेल एवढा विलोभनीय. सर्व वेब सीरीज तिने नि आदित्यने कुठेही अतिरेक होऊ न देता समर्थपणे शेवटाला नेली आहे.

एरवी दुय्यम भूमिकांत बघून माहीत असलेले राजेश तेलंग आणि शीबा चढ्ढा या दोघांनी (आणि परविंदर सिंग, पूनज जांग्रा, रमेश राय, शाश्वत चतुर्वेदी आदिंनी) आपापली कामे अत्यंत चोख पार पाडली आहेत.

निखळ 'फॅमिली एन्टरटेनमेंट' देणारी अशी ही वेब-सीरीज.