लंडनमध्ये उत्तरायण

महाराष्ट्र टाईम्स मधे हे वाचायला मिळाले. श्वास नंतर मराठी चित्रपट पुन्हा आंतरराष्ट्रीय महोत्सवात जात आहे हे वाचून आनंद झाला. आपल्याला ह्यावर चर्चा करता यावी म्हणून ही बातमी येथे उतरवून ठेवत आहे.


मूळ बातमी : लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये 'उत्तरायण'पर्व!


महाराष्ट्र टाईम्स
बुधवार, सप्टेंबर १४, २००५ रा. ११:१८:१२
 
अमित भंडारी


मुंबई : श्वासच्या ऑस्करवारीनंतर मराठी चित्रपट पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' होतोय का, अशी चर्चा सुरू असताना 'उत्तरायण' या बिपीन नाडकर्णी दिग्दर्शित चित्रपटाला पुढील महिन्यात लंडनला होणाऱ्या फिल्म फेस्टिवलचं खास आमंत्रण मिळाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात दोनदा या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तरायणचे विशेष शो हे अनुक्रमे २१ आणि २३ ऑक्टोबरला रंगणार आहेत.


४९ व्या द टाइम्स बीएफआय लंडन फिल्म फेस्टिवल १९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. यामध्ये तब्बल २० चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. विविध देशांमधील गाजलेल्या 'द मेटॅडोअर', वर्किंगमॅन्स डेथ, लेम्मिंग, लोअर सिटी आणि 'दे केमबॅक' या चित्रपटांच्या पंक्तीत उत्तरायण दाखल झाले आहे.


फिल्म फेस्टिवलमध्ये प्रामुख्याने गर्दी होणाऱ्या 'वीकएण्ड आणि हॉलिडे' या दिवशीच्या शोचा मान 'उत्तरायण'ला मिळाल्यामुळे उत्तरायणची टीम प्रचंड खूष आहे. यासंदर्भात दिग्दर्शक बिपीन नाडकर्णी म्हणाला की, यंदा मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्यानंतर आता परदेशी प्रेक्षकांना हा चित्रपट अनुभवता येईल. या यशाचं श्रेय आपल्या टीमसोबत जयवंत दळवी यांच्या सकस लिखाणाचं आहे.


या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे शिवाजी साटम म्हणाले की, लंडन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रचंड खूष झालोय. जाहिरातींमध्ये हातखंडा असणाऱ्या बिपीनची ही पहिलीच फिल्म आणि त्याला फिल्म फेस्टिवलमध्ये दाखल होण्याचा मान मिळतोय, हे आमच्या टीमसाठी खूप महत्त्वाचं आहे.


या फेस्टिवलमध्ये ऋतुपर्ण घोषचा 'अंतरमहल'ही दाखवला जाणार आहे. 'द सिटी ऑफ गॉड' फेम दिग्दर्शक 'फर्नांडो मिअरलेस' यांच्या 'द कॉन्स्टण्ट गार्डनर' या चित्रपटाने फेस्टिवलचे उद्घाटन होणार आहे, तर जॉर्ज क्लूनीज यांची 'गुडनाइट अॅण्ड गुड लक या चित्रपटाने महोत्सवाचे सूप वाजणार आहे. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनविला जात असल्याची ही चुणूक आहे, अशी चर्चा फिल्म वर्तुळात रंगत आहे.





शंकाः


१. हा चित्रपट चित्रपटगृहात पाहणाऱ्यांचे त्याविषयी काय मत आहे?


२. ह्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळेल अशी त्याची गुणवत्ता आहे का?


३. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या मराठी लोकांना ह्याची कल्पना आहे का?