तूच जवळी असशी माझ्या...

पानापानातून गारवा भिरभिरताना
गर्द सावलीतून विहरताना
तूच जवळी असशी माझ्या
ओंजळीत अलगद दवबिंदू झेलताना ॥ १ ॥

वळणदार सावली पळताना
गारठताच उन्हात शिरताना
तूच जवळी असशी माझ्या 
सोनेरी कवडशांत मोहकपणे हसताना ॥ २ ॥

विविधरूपी पावसाच्या स्पर्शाने
लाजरी हवा मंद लहरताना
तूच जवळी असशी माझ्या
लबाड बोटांनी गुदगुल्या करताना ॥ ३ ॥

बटांबटांतून जलधारा गळताना
अल्लड हसत मी शहारताना
तूच जवळी असशी माझ्या
जीवनग्रीष्माला प्रेमे चिंब भिजवताना ॥ ४ ॥

- वेदश्री.